Tuesday, 16 July 2024

साहेबाचा पो-या मोठा अकली...

 निवडणूका आणि आरोग्य

नुकतीच इंग्लंडमध्ये निवडणूक पार पडली आणि तेथील १४ वर्षाची हुजूर पक्षाची राजवट संपुष्टात आली आणि मजूर पक्षाला तेथील जनतेने भरघोस बहुमताने निवडून दिले. एका अर्थाने हा मोठा ऐतिहासिक सत्तापालट या देशामध्ये झाला. हुजूर पक्षाचा पराभव होण्या पाठीमागे नेमकी काय कारणे आहेत, याचा जेव्हा विचार आपण करू लागतो तेव्हा तेथील सुमारे ४१ टक्के लोकांनी ढासळती आरोग्य व्यवस्था हे हुजूर पक्षाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. एखाद्या देशातील सत्तांतर हे निव्वळ आरोग्याच्या मुद्द्यावरून होणे हे खरोखरच आम्हां भारतीयांसाठी तर अगदीच कल्पनेपलीकडील आहे असे म्हणायला हरकत नाही. अगदी कोविड महामारी सुरू असताना देखील त्या कालावधीत झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आरोग्य हा विषय कधीही राजकारणाचा महत्त्वाचा विषय आपल्याकडे ठरला नाही. कोविडच्या महामारीनंतर जी लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली त्यात देखील आरोग्याचा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडयावर नव्हता, हे आपण अनुभवले आहे. असे असताना ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षांहून अधिक राज्य केले त्या देशातील निवडणूक मात्र आरोग्याच्या मुद्द्यावर लढली जाते, हे आपणा सर्वांसाठी महत्वाचे आहे. विकसित देशातील राजकारण आणि आपल्यासारख्या विकसनशील देशातील राजकारणामध्ये हाच मूलभूत फरक आहे का, असाही विचार आपण करावयाला हरकत नाही. 



राष्ट्रीय आरोग्य सेवा अर्थात नॅशनल हेल्थ सर्विस ही सरकारी यंत्रणा इंग्लंड मधील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविते. निगेल लॉसन यांनी म्हटल्याप्रमाणे," इंग्लिश जनतेसाठी राष्ट्रीय आरोग्य सेवा जणू धर्मासारखी अत्यंत जवळची गोष्ट आहे." बार्बरा कॅसल आणि अनेकांनी नॅशनल हेल्थ सर्विस हे जणू इंग्लिश जनतेचे सेक्युलर चर्च आहे, अशी भावनाही वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या आरोग्य सेवेची परिस्थिती अत्यंत कठीण झालेली आहे सुमारे ७६ लाख लोक या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या वेटिंग लिस्टवर असून त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट वेळेत मिळत नाही आहे.२०१० पासून या वेटिंग लिस्टमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. सुमारे तीन लाख लोकांना एक वर्षाहूनही अधिक काळ डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्याकरता वाट पाहावी लागते, असे तेथील आकडेवारी सांगते अर्थात डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्यासाठीचा सरासरी कालावधी आहे सुमारे १४ आठवडे. विकसित देशांमध्ये लोक आपल्या आरोग्यवस्थेचे मूल्यांकन करण्याकरता विविध निर्देशांक वापरतात. तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तुम्हाला किती काळ वाट पाहावी लागते, हा निर्देशांक देखील यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी जर रुग्णाला चार तासांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागत असेल तर ते आरोग्यवस्थेचे फार चांगले लक्षण नाही. २०११ मध्ये केवळ सहा टक्के इंग्लिश रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी चार तासांपेक्षा अधिक काळ लागे पण तेच प्रमाण सध्या ४५ टक्क्यांवर गेले आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठीची आर्थिक तरतूद मजूर पक्षाचे सरकार असताना दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढत असे तथापि हुजूर पक्षाच्या या चौदा वर्षांच्या कालावधीमध्ये ही वार्षिक वाढ केवळ दोन टक्क्यांची आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात या पक्षाने राष्ट्रीय आरोग्य सेवेकरता पुरेसा निधी दिला नाही, अशी ही नागरिकांची एक रास्त तक्रार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्या नर्सेस आणि इतर मनुष्यबळांचे वेतन पुरेशा प्रमाणात न वाढणे आणि त्या कारणामुळे मनुष्यबळाने या व्यवस्थेतून बाहेर पडणे हे देखील एक मोठे आव्हान इंग्लंडच्या या सेक्युलर चर्च मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेसमोर उभे राहिले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथील साथरोगशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. मायकल मार्मो यांनी म्हटल्याप्रमाणे, आरोग्याच्या अनुषंगाने एका आव्हानात्मक वळणावर इंग्लंड येऊन ठेपले आहे. येथील लोकांच्या आरोग्यामधील सुधारणा जणू पॉज झाल्या आहेत आणि आरोग्यविषयक विषमता वाढते आहे. जणू काही इंग्लिश लोक ज्या अवस्थेत जन्मले, वाढले आणि जगत आहेत, काम करत आहेत, वयोवृद्ध होत आहेत त्या अवस्थेमध्ये सुधारणा होण्याचे थांबले आह. मार्मोट यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही देशाची सरकारे अनेकदा आपल्यासमोरील आव्हानांचे वर्णन करताना आरोग्य हा त्यातील एक मुद्दा असल्याचे बोलतात आणि आर्थिक परिस्थिती, महागाई, शिक्षण, परवडणारी घरे, स्थलांतरित लोकसंख्या, गरिबी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा बाबींना अधिक महत्त्व असल्याचे सांगतात. सार्वजनिक आरोग्य तज्ञ असणारे डॉ. मायकेल मार्मो अत्यंत मार्मिकपणे सांगतात की, इतर सारे मुद्दे हे आरोग्याचे सामाजिक निर्धारक आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जनतेला गुणवत्तापूर्ण अशी आरोग्यसेवा त्यातील विषमता दूर करून पुरवता त्यावेळी तुमच्या अर्थकारणासाठी देखील निरोगी मनुष्यबळ मिळते.त्यामुळे त्याला अधिक गती प्राप्त होते. निरोगी व्यक्ती शिक्षण, रोजगार या क्षेत्रात अधिक उत्तम काम करू शकते म्हणजे तुमच्या एकूण राजकीय धोरणांचा केंद्रबिंदू हा तुम्ही जनतेला पुरवीत असलेल्या आरोग्य सेवा असल्या पाहिजेत. कारण त्या तुमच्या सर्व सामाजिक घटकांवर प्रभाव टाकतात.’



भारतासारख्या देशाला इंग्लंडमधील ही निवडणूक आणि त्या अनुषंगाने झालेली राजकीय - सामाजिक चर्चा ही खूप काही शिकवणारी आहे. आरोग्य आणि शिक्षण हे मुद्दे आपल्या राजकीय चर्चेमध्ये खूप अभावानेच डोकावतात. जणू ते आपल्या राजकीय चर्चेच्या अजेंडयावरच नसतात, अशी एकूण परिस्थिती आहे. आपल्यासमोर देखील आरोग्याचे खूप मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. एकूण जीडीपीच्या कसाबसा दीड टक्का आपण आरोग्यावर खर्च करतो आहोत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यवस्था सक्षम होण्यासाठी खूप मोठा हातभार लागत नाही. आपल्या समाजात त्यामुळेच अनिर्बंध अशी खाजगी आरोग्य सेवा समांतर पद्धतीने वाढताना दिसते आहे. आरोग्यावरील खर्चामुळे गरीबी रेषेखाली ढकलल्या जाणा-या लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा काळात आपल्याला देखील इंग्लंडच्या नागरिकांप्रमाणे आपल्या आरोग्यसेवा हाच आपला धर्म मानून त्याबद्दलची चर्चा एकूण राजकीय सामाजिक कथनाच्या केंद्रस्थानी आणणे अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्य हा केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजाच्या देखील व्यक्तिमत्त्वाचा आत्मा असतो हे सत्य केवळ सुभाषितांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरायला हवे. अनेकदा आपण वसाहतवाद आणि त्याचा प्रभाव आपण पुसून टाकला पाहिजे असे म्हणतो परंतु गोऱ्या साहेबांकडून काही गोष्टी शिकण्याची देखील गरज आहे, हे त्यांच्या नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील निवडणुकांनी स्पष्ट केले आहे. इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे सुरु झाली तेव्हा ‘ सायेबाचा पोर मोठा अकली, बिन बैलाची गाडी कशी ढकली,’अशी इथल्या जनतेची प्रतिक्रिया होती तसेच आता ‘ सायेबाचा पोर मोठा अकली, आरोग्यावर निवडणूक कशी लढवी?,’ असे म्हणत त्यांचे सकारात्मक अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.

 - डॉ. प्रदीप आवटे. 

Wednesday, 26 June 2024

शाहू महाराजांनी दाखवलेली लोककल्याणकारी वाट - प्रदीप आवटे.


            
    शाहू महाराज यांची आज जयंती. आजच्या या दिवसेंदिवस विखारी होत चाललेल्या वातावरणात शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा एक धावता आढावा घेऊ. महाराजांनी केलेले काम आजच्या काळात आपल्याला योग्य रस्ता दाखविणारे आहे

अवघ्या २८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत एक लोककल्याणकारी, भेदभावरहित, सर्वांना प्रगतीचे संधी देणारे राज्य शाहू महाराजांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या कामाचा हा एक अगदी धावता आढावा.

शिक्षण प्रसार -

  • ·       १९१७ ते १९२२ – राज्याचा २३ टक्के निधी शिक्षणावर खर्च .
  • ·       शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • ·       ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.
  • ·       गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. 

जातिभेद आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य -

  •         जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
  •        अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले
  •        अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
  •        अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळया शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली.
  •        मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले.
  •        शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.
  •         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.

स्त्री उध्दाराचे कार्य -

  •        स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. 
  •        १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
  •        त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
  •        धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली.
  •        जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

गुन्हेगार समजल्या जाणा-या जातीजमातीसाठी कार्य -

  •        त्या काळातील परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला.
  •        ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे.
  •        शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. या भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

मुस्लिम समाजासाठी केलेले कार्य -

  •        शिक्षणासाठी इच्छुक मुस्लिम समाजातील १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात स्थापन झालेल्या ‘विक्टोरिया मराठा बोर्डिंग’मध्ये प्रवेश देऊन त्यांनी मुस्लिमांच्या शिक्षणास सुरुवात करून दिली.
  •        या १० विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावचा शेख मोहम्मद युनूस अब्दुल्ला या नावाचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याने राजाराम महाविद्यालयातून पदवी मिळविल्यावर त्याला महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. तसेच मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम त्याच्यावर सोपवले.
  •        सन १९०६ साली शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावून ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष झाले व युसुफ अब्दुल्लांना कार्यवाह केले. मुस्लीम बोर्डिंग सुरू करण्यात आले.
  •        महाराजांनी या समाजाच्या विविध धार्मिक स्थळांचे उत्पन्न मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा आदेश काढला. कसबा रुकडी, पेटा हातकणंगले येथील श्री हजरत पीर दर्गा व कोल्हापूर शहरातील निहाल मस्जिद, घोडपीर, बाबू जमाल व बाराइमाम या देवस्थानचे उत्पन्नही मुस्लीम बोर्डिंगला देण्यात आले. या शाळेसाठी शहरात मराठा बोर्डिंग जवळच २५ हजार चौरस फुटांची मोकळी जागा देऊन इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी व संस्थानातील जंगलातून मोफत सागवान देण्यात आले. ही एकूण मदत मराठा बोर्डिंगपेक्षाही अधिक होती.
  •        पाटगावच्या मौनी बुवांच्या मठाच्या उत्पन्नातून काही रक्कम तेथील मुसलमानांच्या मशिदीच्या बांधकाम खर्चासाठी म्हणून देण्याचा एक हुकूम शाहू महाराजांनी काढला.
  •        रुकडीतील पिराच्या देवस्थानच्या उत्पन्नातील काही भाग तेथील अंबाबाईच्या मंदिरातील दैनंदिन सेवेसाठी खर्च होत होता. अशी अनेक उदाहरणे शाहू महाराजांच्या मुस्लीम समाजाच्या उद्धारासाठी असलेल्या धोरणातून दिसून येतील.
  •        मंदिरांच्या उत्पन्नातील भाग हा मुस्लीम समाजाच्या शिक्षणासाठी व मुस्लीम धर्म स्थळांच्या उत्पन्नातील वाटा हा हिंदू मंदिराच्या खर्चासाठी देण्याचे हे धोरण आजच्या राजकर्त्यांना व समाजात द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना पुरून उरणारे आहे.
  •        शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह प्रसंगी मराठा वधू-वरांचे अनेक विवाह लावले गेले, त्यासोबत काही मुस्लिम जोडप्यांचेही विवाह लावण्यात आले. या नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यभरच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थाही करण्यात आली.
  •        मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. कुराणातील धर्म तत्त्वे सामान्य मुस्लिमांनाही समजली पाहिजेत यासाठी पवित्र कुराणचे मराठी भाषांतर करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते. याकरिता दरबारातील २५ हजार रुपयांची मोठी रक्कम खर्ची घातली होती. महाराजांचे अकाली निधन झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
  •        शाहू महाराजांनी नव्याने वसविलेल्या शाहूपुरी पेठेत मशीद नव्हती. तेव्हा तेथील मुस्लिमांच्या सोयीसाठी महाराजांनी जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजारांहून अधिक रक्कम दान केली. बोहरी हे मुस्लीम समाजातील सधन व व्यापारी होते, पण त्यांना समाजासाठी स्वतःची मशीद नव्हती तेव्हा बोहरींचे पुढारी तय्यबली यांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. महाराजांनी शहराच्या मध्यवस्तीतील पाच हजार चौरस फुटांची जागा बोहरींच्या मशिदीसाठी दिली.
  •        महाराजांनी राधानगरी हे नगर नव्याने बसवले होते. त्या ठिकाणी हिंदूंसाठी दोन मंदिरांच्या बरोबरच मुस्लिमांसाठी हजरत पीर गैबी साहेब आणि शहाज महाल ही दोन देवस्थाने निर्माण केली. त्यांना उत्पन्न जोडून दिले व या देवस्थानांना ७५ रुपयांची विशेष देणगीदेखील दिली.
  •      त्याकाळी ब्रिटिश इंडियामध्ये इतर भागांत दंगली होत होत्या पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात केव्हाही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. ही शाहू महाराजांच्या धोरणांचे यश होते.  
  •       १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणतात, “मुंबई, सोलापूर, अहमदाबाद, अमृतसर, लाहोर वगैरे ठिकाणी जे दंगे झालेत त्यात सुशिक्षित पुढारी मागे राहून गरीब लोकांवर प्रसंग आला, याचे कारण त्यांचे अज्ञान आहे. पुढाऱ्यांचा कावा त्यांना समजला नाही. लोकांना थोडे जरी शिक्षण असते, तरी असे प्रकार झाले नसते.”
  •         त्याच भाषणात पुढे ते म्हणतात, “आमचे खरे महात्मा बादशहा अकबर शहा हेच आहेत. ज्याने हिंदू मुसलमानांची एकी केली व स्वतः जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले व सूर्याला अर्घ्य देण्याकरिता लाखो रुपये खर्च करून व्यवस्था केली. त्याची साक्ष हल्ली आग्र्याचा किल्ला देत आहे. जी गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली आहे ती सतराव्या शतकात यवन बादशहाने शक्य केली होती.”
  •        शाहू महाराजांच्या भाषणातील हा उतारा आपण समजून घ्यावा असा आहे , “राज्य संपादन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांच्या काळी धर्मद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करीत नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठी रजपूत इतर हिंदू सरदार व लढवय्ये होते. विजयनगरच्या राजाच्या पदरी किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमानांची संख्या कमी नव्हती या सर्वांनी स्वधर्मियांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगीदेखील आपले इमान कायम राखले अशा वेळी त्यांचे बंधुप्रेम चांगल्या प्रकारे दिसून येई.”

इतर कार्य –

  •        १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
  •       शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
  •        कला, कुस्ती यांना प्रोत्साहन दिले.  चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

असा लोककल्याणकारी राजा आपणां सर्वांना आजही आदर्शवत आहे. शाहू महाराजांची केवळ जयंती साजरी करुन , त्यांना वंदन करणे पुरेसे नाही, सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी जी वाट त्यांनी दाखवली, त्या वाटेने आपण चालत राहणे हीच शाहू महाराजांना खरीखुरी श्रध्दांजली आहे.

( संदर्भ – मराठी विश्वकोश,  शाहू महाराज गौरव ग्रंथ इत्यादी)

*******


Monday, 5 February 2024

अँटिबायोटिक्स निरुपयोगी होताहेत, सावधान ! - डॉ. प्रदीप आवटे.

वैश्विक खेडे झालेल्या या जगासमोर कोणकोणती आव्हाने आहेत आणि त्या आव्हानांना मानव समाज म्हणून आपल्याला कसे तोंड देता येईल, या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वाचे काम करत असतात. आरोग्याच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना देखील हे काम करत असते. आजच्या जगासमोरील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मानवतेला भेडसावणारे जे दहा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा वाढता प्रतिरोध (ॲन्टीमायक्रोबियल रजिस्टन्स) हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शाश्वत विकासाची जी ध्येये आपण गाठू इच्छितो त्या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या अडचणींपैकी ही एक महत्त्वाची अडचण आहे.

 सूक्ष्मजीव विरोधी औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, विषाणूविरोधी औषधे, बुरशी विरुद्ध काम करणारी औषधे आणि परजीवी विरुद्ध काम करणारी औषधे अशा अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. सध्या या सर्वच औषधांना वेगाने प्रतिरोध वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक किंवा सर्वच प्रकारच्या औषधांना जुमानणारा सुपरब ही केवळ विज्ञान कथेतील काल्पनिक बाब राहिलेली नसून हा सुपरबग जगभर अनेक रुग्णांमध्ये आढळतो आहे. महत्वाची अशी अँटिबायोटिक्स या प्रतिरोधामुळे निकामी होत असल्याने दिवसेंदिवस जंतुसंसर्गावर उपचार करणे कठीण होत चाललेले आहे कारण नवीन अँटिबायोटिक्स फार सहजतेने मिळत नाहीत. नवीन अँटिबायोटिक्स शोधण्यासाठी संशोधन प्रक्रियेचा खर्च देखील अव्वा की सव्वा आहे त्यामुळे या प्रकारातील नवीन औषधे सापडण्याचा वेग अत्यंत मंद आहे. अनेक गरीब देशांना संशोधनासाठी एवढा खर्च करणे परवडत देखील नाही. अशावेळी आपण आपल्या हातातील आहे ती उपयुक्त सूक्ष्मजीव विरोधी औषधे गमावणे अत्यंत आत्मघातकी आहे. यामुळे जंतू संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे कठीण तर होतेच आहे पण त्याचबरोबर सिजेरियन शस्त्रक्रिया, सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील किमोथेरपी, अवयव प्रत्यारोपण अशा माणसाला संजीवन देणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणे देखील दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना प्रतिरोध निर्माण होण्याची मुख्य कारणे काय आहेत ?

·       या औषधांचा बेसुमार,वारेमाप वापर हे त्याचे मुख्य कारण आहे. ही औषधे जपून आवश्यक तेव्हाच आणि योग्य प्रमाणात योग्य कालावधी करता वापरली पाहिजेत परंतु असे होताना दिसत नाही.

·       स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता यांचा अभाव हे देखील असा प्रतिरोध वाढण्याचे एक मुख्य कारण आहे.

·       आरोग्य संस्थांमध्ये आणि शेतामध्ये जंतुसंसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भातील परिणामकारक उपाययोजना न राबवणे.

·       गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारी औषधे, लसी प्रयोगशाळा चाचण्या सहजतेने उपलब्ध नसणे.

·       सूक्ष्मजीव विरोधी औषधांना होत असलेल्या प्रतिरोधाबाबत जागृती आणि माहिती नसणे.

·       या संदर्भातील विविध कायद्यांचे काटेकोर पालन न केले जाणे.

  अशा अनेक कारणांमुळे हा प्रतिरोध वाढतो आहे. सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध ही काही प्रमाणामध्ये निसर्गतः होणारी गोष्ट आहे. आपल्यामध्ये आवश्यक ते जनुकीय बदल करून सूक्ष्मजीव हा प्रतिरोध निर्माण करतात हे खरे आहे तथापि वर नमूद केलेल्या कारणांमुळे या प्रतिरोधाचे प्रमाण विलक्षण गतीने वाढते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध नेमक्या कोणत्या औषधांना आणि कोणत्या सूक्ष्मजीवांचा आहे याची अचूक माहिती मिळून त्यानुसार कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी जागतिक पातळीवर या संदर्भात सर्वेक्षण यंत्रणा तयार करण्यात आलेली असली तरी देखील हे सर्वेक्षण अजून पुरेसे विश्वव्यापी झालेले नाही. जगातील कसेबसे पन्नास एक देश यासंदर्भातील माहिती गोळा करत आहेत.

अँटिबायोटिक्स ना निर्माण होणाऱ्या या प्रतिरोधामुळे टीबी अर्थात क्षय आजाराचे नियंत्रण अधिक कठीण झाले आहे. टीबीवरील अनेक औषधांना दाद न देणारे लक्षावधी रुग्ण जगभरात आढळून येत आहेत. भारतासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे कारण जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण आपल्या देशात आढळतात. आज रोजी देशभरात जवळपास २८ लाख टीबी रुग्ण आहेत. टीबी रुग्णांमध्ये प्रतिरोधाचे प्रमाण सुमारे चार ते पाच टक्के आहे. टीबी रुग्णांमधील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाचे हे प्रमाण असेच वाढत गेले तर टीबी नियंत्रण आपल्याकरता कठीण गोष्ट होऊन बसणार आहे. १९५०च्या पूर्वी ज्याप्रमाणे टीबी रुग्णांसाठी शहराबाहेर वेगळी रुग्णालय असत ती अवस्था येण्याचा धोका या प्रतिरोधामुळे निर्माण झालेला आहे.एच आय व्ही एड्स वरील औषधांमध्ये देखील प्रतिरोध निर्माण होताना दिसतो आहे. मलेरिया साठी कारणीभूत असलेल्या परजीवींपैकी अधिक धोकादायक असणाऱ्या फाल्सीपारम मलेरियामध्ये नेहमीच्या औषधाविरुद्ध निर्माण होणारा प्रतिरोध मलेरिया नियंत्रणातील मोठा अडथळा आहे.

अँटीबायोटिक्सच्या वापराबाबतची भारतातील परिस्थिती आपण सर्वांनी काळजी करावी अशी आहे २०१० ची जरी आकडेवारी आपण पाहिली तरी अँटिबायोटिक्सची जवळपास 13 अब्ज युनिट्स आपण देशभरात वापरली. याचा अर्थ सर्व जगभरात भारतातील अँटिबायोटिक्सचा वापर सर्वाधिक आहे.भारतात अँटिबायोटिक्सना वाढत्या प्रतिरोधाची कारणे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

 आपल्याकडे मेडिकल स्टोअर मध्ये डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटिबायोटिक्स सहजतेने उपलब्ध होतात. दुकानदाराच्या किंवा इतर कोणाच्यातरी सल्ल्याने अनेकदा रुग्ण स्वतःहून अँटिबायोटिक्स घेतात अँटिबायोटिक संवेदनशीलता चाचणी किंवा ब्लड कल्चर यासारख्या प्रयोगशाळा तपासण्या सहजतेने उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा डॉक्टर आपल्या अनुभवानुसार अँटिबायोटिकचा वापर करत असतात. प्रमाणापेक्षा जास्त  वापर करण्यासोबतच अनेकदा ती अपुऱ्या डोस मध्ये दिली जाणे, यामुळे सुद्धा प्रतिरोध निर्माण होतो. रुग्णाला कदाचित बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला असेल आणि तो आपल्याकडून उपचार करावयाचा राहू नये या भीतीने अनेकदा डॉक्टर गरज नसताना रुग्णाला अँटिबायोटिक्स देतात. अँटिबायोटिक्स वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाची नियामक यंत्रणा अपुरी असल्यामुळे तसेच मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने याबाबतचे नियमन काटेकोरपणे केले जात नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मानवी आरोग्य विभागाशिवाय अँटिबायोटिकचा वापर पशुसंवर्ध,न मत्स्य उत्पादन, शेती यामध्ये देखील केला जातो. अनेकदा तो पशु, मासे किंवा धान्य याच्या निव्वळ वाढीसाठी केला जातो. औषध कंपन्यांमधून बाहेर पडणा-या कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण देखील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाला हातभार लावते.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या अनुषंगाने एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये आपण हा प्रतिरोध रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर योग्य पावले उचलली जातच आहेत. मानवी आरोग्य,शेती, मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे सारे विभाग एकमेकांशी समन्वय साधून याबाबतीत योग्य कार्यवाही करत आहेत मात्र या सगळ्या गोष्टी आपण केवळ शासनावर सोडून चालणार नाहीत. आपले आरोग्य ही आपली व्यक्तिगत आणि कौटुंबिक जबाबदारी देखील आहे आणि म्हणून आपल्या आजारपणामध्ये उपयोगी पडणारी सूक्ष्मजीव विरोधी औषधे आपल्या निष्काळजीपणामुळे निकामी होऊ नयेत. यासाठी आपण देखील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.

 

ॲन्टीबायोटिक्स वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो ?

 

o  डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कधीही स्वतःच्या मनाने अँटिबायोटिक्स घेऊ नयेत.

o  आपल्याला अँटिबायोटिक्स द्या असा आग्रह आपण डॉक्टरांना करू नये.

o  अँटिबायोटिक्स कोणत्या डोसमध्ये आणि किती काळाकरता घ्यावयाचे याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

o  आपला उपचार पूर्ण झाल्यानंतर अँटीबायोटिक्सच्या काही गोळ्या, औषधे शिल्लक असतील तर ती इतर कोणाला देऊ नयेत. अँटीबायोटिक्स ओळखण्याची खूण म्हणजे या औषधांच्या स्ट्रीपच्या मागे लाल रंगातील जाड रेघ ओढलेली असते.




o  आपल्याला जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता हातांची नियमित स्वच्छता, अन्न आरोग्यदायी पद्धतीने तयार करणे, आजारी माणसाशी निकट संपर्क टाळणे, सुरक्षित शरीरसंबंध आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक लसीकरण वेळेवर पूर्ण करणे, आवश्यक आहे.

o  आपण आपले अन्न तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले पाच मुद्दे लक्षात ठेवावेत. स्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवणे, अन्न पूर्ण शिजवणे, तयार झालेले अन्न योग्य तापमानामध्ये ठेवणे, अन्न तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी कच्चे पदार्थ वापरणे.

 

समाज, शासन आणि व्यक्ती म्हणून आपण हातामध्ये हात घेऊन काम केले तर सूक्ष्मजीवाविरुद्ध लढणारी आपली औषधे आपण सुरक्षित ठेवू शकू आणि आपले आरोग्य देखील जपू शकू. म्हणूनच याबाबतीत सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स पशुसंवर्धन मत्स्य उत्पादन आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सूक्ष्मजीव विरोधी औषधांचा वापर काटेकोरपणे आणि नियमानुसारच करण्याची गरज आहे.

 

डॉ. प्रदीप आवटे