Saturday, 24 May 2025

डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून...


प्रदीप आवटे,

पुणे.

दिनांक – २७ जून २०२४

 

प्रिय डॉ. राजेंद्र,

तुला मी लिहित असलेलं कदाचित हे पहिलं पत्र असेल. अलिकडील काळात तर मोबाईल, व्हॉटस अप यामुळे  बोलणे सोपे झाले आहे. पत्राची मुळी गरजच पडत नाही. पण पत्र ही खूप सुंदर गोष्ट होती. तसं पाह्यलं तर आताही मी तुला टाईप करुन लिहतो आहे, पत्र तर आपण कागदावर छानपैकी पेनने वगैरे लिहायचो. त्या पत्राला लोक अर्धी भेट म्हणायचे. चलो , जाने दो..उगीच जुन्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा.. हेच खरे.

अलिकडे माझा डावा गुडघा चालताना अधूनमधून दुखतो तेव्हा अगदी तीव्रतेने तुझी आठवण येते. वाढत्या वयासोबत हाडाच्या डॉक्टरची आठवण प्रत्येक कळेसोबत येत राहते. म्हणून तर  ‘काय हवे ते माग’, असे कृष्णाने म्हटल्यावर कुंती कृष्णाला म्हणाली ना, ‘ देवा, मला दुःख दे.” दुःख, वेदना माणसाला जोडणारी गोष्ट असते. तुझा मला खरोखरच मनापासून अभिमान वाटतो. एका साध्यासुध्या घरात जन्मलेल्या आणि कोणतीच पार्श्वभूमी नसलेल्या तू कुठल्या कुठं भरारी मारली आहेस. आजही हायवेवरुन येता जाता तुझे हॉस्पिटल पाहताना मन एका विलक्षण आनंदाने भरुन येते. हॅटस ऑफ टू यू.

पण आज एका वेगळयाच कारणाने तुला लिहायला बसलो आहे. आज सकाळी ९ च्या आसपास तू ‘आपली माणसं’ या आपल्या ग्रुपवर एक फॉरवर्डेड मेसेज पाठवलास. खरं म्हणजे आज सकाळपासून मी पब्लिक हेल्थ इमर्जंसी ॲन्ड डिझास्टर मॅनेजमेंट या सीडीसी वर्कशॉपमध्ये बिझी आहे. पण तो तुझा मेसेज वाचल्यापासून माझे कशात लक्षच लागेना. मी बराच अस्वस्थ झालो. थोडा वेळ काढला आणि तुला लिहायला बसलो.

तुझी आणि माझी राजकीय मते वेगळी आहेत. आणि त्यात काहीच हरकत नाही. प्रत्येकाला आपापली राजकीय मते असतात. त्यात वावगे काहीच नाही. पण आजच्या तुझ्या मेसेजमध्ये केवळ राजकीय मते नव्हती. आणखी काही तरी गंभीर होते. मला एक माणूस म्हणून , एक डॉक्टर म्हणून काळजी वाटली. एका पत्रकाराची ही पोस्ट आहे. त्यात हिंदू व्यक्तींनी अवयव दान करताना आपला अवयव केवळ हिंदूनाच मिळावेत अशी अट घातली पाहिजे, असे म्हटले आहे. का तर, मुस्लिम व्यक्ती अवयवदान करत नाहीत केवळ अवयव घेतात , असे या पत्रकार महोदयांनी म्हटले आहे. असा मेसेज तू फॉरवर्ड केला आहे, हे पाहून मला धक्का बसला.

 हा पत्रकार कोण , ते जे बोलतात ते खरे की खोटे हे नंतर पाहू पण अवयवदान करणा-या हिंदूंनी आपले अवयव केवळ माझ्या धर्माच्याच माणसाला मिळावेत , अशी अट घालणे तुला डॉक्टर म्हणून योग्य वाटते ? केवळ हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा, मुसलमान दुकानदारांकडून खरेदी करु नका, हे आजवर ऐकले होते पण हे त्याहून गंभीर आहे. ‘ म्हाद्याचं रक्त ममद्याला, रक्त लागतं समद्याला,’ अशी घोषणा देत मी कोर्टी परिसरात किती तरी रक्तदान शिबिरे घेतली आहेत. उद्या हिंदूने आपले रक्त हिंदूनाच द्यावे असेही आपण म्हणायला लागू की काय असे वाटले क्षणभर.  

मला आतून भ्यायला झाले.

आपण डॉक़्टर आहोत, राजेंद्र. आपलं नातं फक्त माणसाच्या दुःखाशी आहे, त्याच्या जातधर्माशी नाही. आपण हिपोक्रेटिक शपथ घेऊन डॉक्टरकीची पदवी घेतली आहे. आपल्यासाठी सगळी माणसं सारखी आहेत, असली पाहिजेत. जगात कुणी काहीही म्हणेल आपण माणूस जपला पाहिजे. कुणाचीही असो, वेदना, कळ, दुःख हलकं करणं एवढंच आपण शिकलो आहोत. आपण जर वेदना असलेला माणूस कोणत्या धर्माचा आहे हे पाहून त्याला उपचार देऊ लागलो तर आपल्या डॉक्टरकीचाच तो पराभव असेल. मे बी, तू फार विचार न करता , अगदी नेहमी प्रमाणे कॅज्युएली हा मेसेज पाठवला असशील पण तो मेसेज अत्यंत माणूसद्वेष्टा आहे. माणसाला माणसापासून दूर करणारा आहे. तुला इमिली डिकिंसनची कविता आठवते ना, जी कनिंगहॅमच्या पहिल्या पानावर छापली होती,

“If I can stop one heart from breaking,

I shall not live in vain;

If I can ease one life the aching,

Or cool one pain,

Or help one fainting robin

Unto his nest again,

I shall not live in vain.”

मला कधी कधी ही कविता तुझ्यामाझ्यासारख्या डॉक्टरांची छोटीशी प्रतिज्ञा वाटते.



आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमान व्यक्ती अवयव दान करत नाहीत ही गोष्ट खरी आहे का ? ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. किती तरी मुसलमान व्यक्तींनी अवयव दान केले आहे. अरे साधं, ‘ऑर्गन डोनेशन बाय मुस्लिम्स इन इंडिया’, असं गुगल जरी केलं तरी किती तरी घटना समोर येतील.

अगदी डिसेंबर २३ ची मुंबई मधील गोष्ट आहे, कल्याण मधील रफीक शाह आणि घाटकोपर मधील आयुर्वेद डॉक्टर राहुल यादव यांची ! रफीकला किडनी दिली राहुल यादव यांच्या आईने आणि राहुल यादव यांच्या पत्नीला गिरिजाला किडनी दिली रफीकच्या पत्नीने..! किडनीमुळे ही वेगवेगळया धर्माची कुटुंबे एकमेकांना जोडली गेली. अशीच एक घटना २०२१ मध्ये डेहराडून मध्ये घडली. मागच्या वर्षी अहमदाबाद येथे ईदला रुबेन शेख यांचा ९ वर्षाचा मुलगा अपघातात ब्रेन डेड झाला. कुटुंबाने त्याचे अवयवदान केले. अशी किती तरी उदाहरणे.

अरे, आता मुस्लिम सत्यशोधक समाज दरवर्षीची बकरीद रक्तदान, अवयव दान आणि देहदानाने साजरी करतो. अनेक शहरांमध्ये रक्तदान शिबिरे होतात, मी स्वतः तिथं रक्तदान केले आहे. अनेक जण अवयवदानाचा आणि देहदानाचा फॉर्म भरुन देतात. या वर्षीच्या बकरीदच्या किती तरी बातम्या तुला दिसतील.

मुस्लिम अवयवदान करतच नाहीत, ही बाब खोटी आहे, हे सिध्द करायला अजून काय काय सांगू सांग ना !

आता तुझ्या त्या पत्रकार व्यक्तीबद्दल.

आपण कुणाला फॉलो करतो, कुणाला कोट करतो, हे खरेच खूप महत्वाचे असते. जरा या पत्रकार महोदयांचा इतिहास तरी पहा. चक्क दारु पिवून रिपोर्टींग केले म्हणून आपली नोकरी गमावणारा, फेक न्यूज पसरवणारा ,बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा ( पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला माणूस आपण फॉलो तरी करावा का ?  आता अशा माणसाला आपण कसे काय कोट करु शकतो, सांग ना ?

आपण डॉक्टर असल्याने किती तरी साधी माणसं आपण जे सांगतो, बोलतो त्यावर विश्वास ठेवून इतरांनाही सांगतात. अशावेळी आपण काहीही बोलताना, मेसेज करताना काळजी घ्यायला हवी, असे मला वाटते.

मी खूप शहाणा आहे आणि मला सारे काही कळते, असे अजिबात नाही. चुकत चुकतच मी चालतो आहे.  फक्त तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे आणि मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी वाटते, म्हणून हे लिहिले. आपल्या जवळच्या माणसाने चुकू नये, असे वाटते ना, या भावनेने लिहिले हे सारे लिहिले आहे.  राग मानू नये, ही कळकळीची विनंती.

उद्या मी ही काही चुकलो तर तू ही इतक्याच सहजतेने मला नक्की सांगावेस. मला आवडेल ते, कारण आपलीच माणसे आपल्याला भलंबुरं काय ते सांगत असतात, आपल्याला सावरत असतात. 

पूर्वी कुठल्या कुठल्या कविता वाचायचास तू, साठवून ठेवायचास. अधेमधे कोट करत राहायचास. प्रॅक्टिसमध्ये पडलास आणि कवितेचे वेड कमी झाले की काय तुझे ? डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून, बरं असतं प्रकृतीला. बीएमआय नॉर्मल राहतो. बेसिक माणूसपण इंडेक्स रे ...! कवितेसारखं दुसरं मेडिसीन नाही, जप स्वतःला.

आनंदी आणि बच्चे कंपनीला खूप सारे प्रेम.

 

तुझा,

प्रदीप आवटे.

 

Sunday, 13 April 2025

शाहू, फुले, आंबेडकर आठवताना…

 

आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र अतिशूद्रांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली हयात खर्च केली. १८८२ साली शिक्षण विषयक काम करणा-या हंटर कमीशनला त्यांनी दिलेले निवेदन भारतातील शैक्षणिक इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. ‘ विद्येविना मती गेली,’ हे त्यांचे सुप्रसिध्द वचन मानवी जीवनातील उन्नतीसाठी शिक्षणाचे  सर्वांगीण महत्व विशद करते. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ हे बाबासाहेबांचे महत्वाचे वाक्य आपण सगळेच जण जाणतो. एके ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे , “The backward classes have come to realize that after all education is the greatest material benefit for which they can fight. We may forgo material benefits, we may forgo material benefits of civilization, but we cannot forgo our right and opportunities to reap the benefit of the highest education to the fullest extent. That is the importance of this question from the point of view of the backward classes who have just realized that without education their existence is not safe.” याचा अर्थ सर्व काही गमावले तरी चालेल पण मागास समाजाने गुणवत्तादायी अशा उच्च शिक्षणाचा आपला हक्क आणि संधी गमावता कामा नये. कारण चांगल्या शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्व सुरक्षित नाही.



याचा अर्थ शिक्षण हा या तिन्ही महापुरुषांच्या विचारातील सामाईक दुवा आहे. आज फुले, शाहू आणि आंबेडकरांना आठवताना त्यांची जयंती, स्मरणदिन नित्यनेमाने जोमात साजरी करत असताना वर्तमानातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था नेमकी काय आहे, याचा विचार म्हणूनच केला पाहिजे. प्रत्येक  भारतीय नागरिकाला त्याच्या जात धर्माचा सामाजिक आर्थिक स्तराचा विचार न करता दर्जाची आणि संधीची समानता देण्याचे वचन आपल्या घटनेची उद्देशिका आपल्याला देते. दर्जाच्या आणि संधीच्या समानतेच्या या दरवाजाची गुरुकिल्ली शिक्षण आहे. पण आज ही गुरुकिल्ली सर्वांना सहजतेने उपलब्ध होईल, अशी अवस्था आहे का, याचा विचार आपण करायला हवा.

अगदी पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत देशपातळीवर शिक्षणाची अवस्था काय आहे ? युनिफाईड डिस्ट्रिक्ट इनफॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन या शासकीय यंत्रणेची २०२३ -२४ ची माहिती सांगते की ६ ते १७ वर्षे या वयोगटातील देशातील एकूण शाळाबाह्य मुलांची संख्या ही सुमारे ४ कोटी ७४ लाख एवढी आहे म्हणजे त्या वयोगटातील मुलांच्या जवळपास १७ टक्के आहे. वय वर्षे १६ -१७ मधील प्रत्येक चौथे मूल हे शाळाबाह्य आहे. आपल्या देशातील एक चतुर्थांश मुले जर शाळेतच जात नसतील तर संधीची आणि दर्जाची समानता त्यांच्या वाटेला कशी येणार आहे ? वय वर्षे १८ ते २३ मधील निव्वळ २८ टक्के मुले उच्च शिक्षण घेतात.

पूर्व प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षण या बाबतीत काही गोष्टी काळजी कराव्या अशा आहेत. ग्रामीण भागात सरकारी शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होतो आहे. ग्रामीण भागातही खाजगी शाळांची संख्या वाढते आहे आणि अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठविण्याची पालकांची वृत्तीही वाढीस लागलेली आहे. शहरी भागात सरकारी माध्यमिक शाळांची संख्या अगदी नगण्य आहे. पालकांना आपली मुले खाजगी शाळांत पाठविण्याशिवाय इलाज नाही, अशी परिस्थिती आहे. अकरावी, बारावी ही वर्षे आपल्याकडे १०+२+३ या शिक्षण रचनेमुळे महत्वाची मानली जातात. या दोन वर्षांची अवस्था तर अजून बिकट आहे. विशेषतः विज्ञान शाखेतील ज्युनिअर कॉलेजस नावाला आणि कागदावर उरली आहेत. सर्व विद्यार्थी क्लासेस लावतात त्यामुळे वर्गात काही शिकवले जात नाही. क्लासेसची फी अव्वा की सव्वा असते आणि ती कष्टकरी, कामकरी , असंघटीत क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीच्या मुलांना परवडू शकत नाही. त्यामुळे वर्गात शिकवत नाहीत, क्लासेस परवडत नाहीत,अशा अवस्थेत आपल्या करियरच्या अगदी निर्णायक टप्प्यावर ही मुले आढळतात.जणू काही गरीब घरातील मुलांना विज्ञान शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर असा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाण्याचा रस्ता बंदच झाल्यात जमा आहे. त्यातही या सा-याचा परिणाम मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणावर अधिक विपरित होतो आहे. स्टेम ( सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ) शिक्षणात आणि एकूणच वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्था प्रचंड वेगाने वाढत आहेत त्यामुळे परिघावरील विद्यार्थ्यांना संधीची ही सारी दारे बंद झाल्यात जमा आहे. दुसरीकडे उच्च शिक्षण संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये मोठया प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या शिक्षणाची गुणवत्ता वेगाने ढासळते आहे. अलिकडील काळात शिक्षण संस्थांमध्ये उजव्या विचारांचा प्रभाव वाढतो आहे. वैचारिक आणि आर्थिक भ्रष्टाचाराच्या मार्गानेच शिक्षक, प्राध्यापकांची पदे भरली जात आहेत. त्यामुळे एकूणच आशय आणि इतर बाबतीतही उच्च शिक्षण आपली गुणवत्ता हरवते आहे. एकीकडे शिक्षण बाजारातील महागडी वस्तू झाल्याने ती सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर जाते आहे तर दुसरीकडे शिक्षकांची रिक्त पदे, विशिष्ट विचारांचा अनाठायी प्रभाव यामुळे हरवत चाललेली गुणवत्ता यामुळे शिक्षण क्षेत्रात एक विलक्षण गंभीर पोकळी निर्माण झालेली आहे.



शिक्षण हक्क कायदा झाला तरी आपला शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ३ ते ४ टक्क्यांमध्येच रेंगाळतो आहे तो आपण ६ टक्क्यांपर्यंत तरी पुढे न्यायला हवा. या सगळयाचा परिणाम म्हणून जॉब मार्केटमध्ये भारतीय तरुण किमान कौशल्यामध्ये मागे पडतो, असे काही अभ्यास सांगतात.

या आणि अशा पार्श्वभूमीवर आपण महात्मा फुले आणि बाबासाहेबांना आठवत आहोत.

'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।'

इतक्या नेमक्या भाषेत अविद्येचे परिणाम फूल्यांनी सांगितले. दर्जाची आणि संधीची समानता आश्वासित करताना बाबासाहेबांनी शिक्षणाची गुरुकिल्ली आपल्या हाती दिली पण आज आपण ती या चकचकीत मॉलमध्ये हरवली आहे. शिक्षणाचा हा हौद पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करावयाचा असेल तर शाहू, फुले ,आंबेडकरांना मानणा-या आपण सगळयांनी आपली सगळी राजकीय ,सामजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक लढाई शिक्षण या एकाच विषयाभोवती केंद्रीत केली पाहिजे. आजच्या काळाची सगळी उत्तरे यातच दडली आहेत पण आपण आजच्या हंटर कमिशनसमोर हंटर घेऊन कधी उभे राहणार, हाच एकमेव प्रश्न वर्तमान आपल्याला विचारतो आहे.

 

-         --     प्रदीप आवटे.

Thursday, 23 January 2025

मि. प्रेसिडेंटपेक्षा मरियन बडी !

                

           दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर नॅशनल प्रेयर सर्विस निमित्ताने बोलताना वॉशिंग्टन शहराच्या पहिल्या महिला बिशप मlरियन बडी यांनी आपले विचार व्यक्त केले. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षासमोर बोलताना साठी ओलांडलेल्या मेरियन बडी यांनी जे धाडस दाखवले आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्यांचे हे छोटेसे भाषण नीट ऐकले तर ते ऐकता ऐकता १८९३ साली शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचे सूर आपल्या कानावर पडू लागतात, इतके हे भाषण महत्त्वाचे आहे. मानवी जगण्यातील धर्मासह साऱ्या संकल्पनाच आपला अर्थ हरवून बसलेल्या असताना धर्म या संकल्पनेची नेटकी व्याख्या देखील मरियन बडी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवली आहे.


मरियन बडी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून, त्यांच्याकडे पाहत अत्यंत नम्रपणे त्यांना सांगतात, 

"मला तुम्हाला एक शेवटची विनंती करायची आहे. मिस्टर प्रेसिडेंट, लाखो लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय आणि जसं तुम्ही काल अवघ्या देशाला सांगितलं, त्या प्रेमळ परमेश्वराचा सर्वशक्तिमान हात तुमच्यासोबत आहे.
त्या आपल्या परमेश्वराची आठवण ठेवत मी आपल्याला सांगू इच्छिते की, आपल्या देशातील अनेक लोक खूप घाबरलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही दयार्द बुद्धीने वागावे
 गे, लेसबियन आणि ट्रांसजेंडर मुलं प्रत्येक कुटुंबात आहेत, मग ती कुटुंब डेमोक्रॅटिक असतील,रिपब्लिकन असतील की स्वतंत्र विचारांची!  ही सगळीच त्यांच्या जीवाच्या भीतीने घाबरून गेली आहेत."


"...आणि ते लोक जे आपली पिकं काढायला मदत करतात, आपल्या ऑफिसची स्वच्छता करतात, आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये, आपल्या मिटपॅकिंग प्लांट्स मध्ये काम करतात, आपण हॉटेलमध्ये जेवल्यावर आपली ताटं विसळतात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करतात, कदाचित ते आपल्या देशाचे नागरिक नसतील किंवा त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नसतील पण या स्थलांतरित लोकांपैकी बहुसंख्य लोक हे गुन्हेगार नाहीत. ते टॅक्स भरतात, ते आपले चांगले शेजारी आहेत. ते आपल्या चर्च,  मशिदी, सिनेगॉग, गुरुद्वारा आणि मंदिरांचे विश्वासू सदस्य आहेत."

"मिस्टर प्रेसिडेंट, आपला समाजातील ज्या मुलांना आपले पालक आपल्यापासून हिरावून घेतले जातील अशी भीती वाटते त्या सगळ्यांसाठी मी दयेची याचना करते आणि युद्धजन्य भागातून,प्रचंड छळाला त्रासून जे लोक आपापले देश सोडून इथं आसऱ्यासाठी आले आहेत त्यांना सहानुभूतीने आणि प्रेमाने वागवलं जावे अशी विनंती करते."

 "आपला परमेश्वर आपल्याला शिकवतो की, अनोळखी माणसांसोबत दयेने वागा आणि आपण विसरता कामा नये की आपणही कधीकाळी या देशामध्ये अनोळखीच होतो."

 "तो सर्वशक्तिमान आभाळीचा बाप प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेने वागवण्यासाठी आवश्यक अशी ताकद आणि धाडस आपल्याला देवो,  एकमेकांशी प्रेमाने सत्य बोलण्याची क्षमता देवो आणि आपण सर्वांनी एकमेकांसोबत आणि आपल्या परमेश्वरासोबत ही वाट चालताना या देशातील आणि जगातील सर्व लोकांच्या भल्याचाच विचार आपल्या मनात असो !"

या भाषणात काय नाही? ज्ञानदेवाचे अवघे पसायदान इंग्रजी भाषेत अनुवादित केले तर ते याच्याहून वेगळे काय असेल ? 'दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती 'या तुकोबाच्या अभंगाचा आशय याहून वेगळा कसा असेल?  धर्म समाजाची धारणा करतो आणि म्हणून समाजातील प्रत्येक माणसाची काळजी त्यानं आपुलकीने आणि जिव्हाळ्यानं घेतली पाहिजे आणि जर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसणारे लोक माणसांमध्ये भेदभाव करत असतील तर 'भेदभाव धर्म अमंगळ' हे उच्च रवाने ठणकावून सांगण्याचे धाडस देखील खऱ्या धार्मिक व्यक्तीत असले पाहिजे. कारण खरी धार्मिक व्यक्ती ही भित्री आणि सत्तेपुढे नमणारी नसते तर वेळप्रसंगी सत्तेला देखील दोन शब्द सुनावण्याचे नैतिक धैर्य तिच्या अंगी असते.'अंकल टॉम्स केबिन ' लिहिणाऱ्या 
हॅरियट बीचर स्टोवेबद्दल बोलताना,' अमेरिकन यादवी युध्दाला कारणीभूत ठरलेली एक एवढीशी स्त्री ' असे उद्गार अब्राहम लिंकन यांनी काढले होते. परवाच्या भाषणानंतर आणखी एक एवढीशी मरियन प्रेसिडेंट पेक्षा बडी वाटली, हे मात्र खरेच !

अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हे सारं प्रवचन अत्यंत बोअरिंग आणि त्रासदायक वाटलं. मेरीयन बडी यांनी देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे असे ट्रम्प यांनी याबद्दल म्हटले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदारांनी तर देशाबाहेर पाठवण्याची व्यक्तींची जी यादी आपण तयार करतो आहोत त्यात या बिशप बाईंचे नाव पहिले असले पाहिजे,असेही म्हटलं.  

दया, क्षमा,शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणाऱ्या माणसांचं बोलणं कंटाळवाणे आणि बोअरिंग वाटावं, त्रासदायक वाटावं ,असाच हा सारा काळ आहे. धर्माच्या नावावर मॉब लिंचींग, आगी लावणे, दंगली भडकावणे हे जिथे समाजसंमत होत चालले आहे तिथे दया क्षमा शांती आणि प्रेमाची गोष्ट करणारी माणसं वेडपटच ठरणार आहेत. त्यांना प्रत्येक देशाबाहेर हाकलण्याची मागणी होत राहणार, कदाचित त्यांचा कोणताच देश नाही.

आणि तरीही ' वैष्णव जन तो तेने कहीये ,जो पीर पराई जाने रे,' असे सांगणारे आमच्या गुजरातचे नरसी मेहता अजून कालबाह्य झालेले नाहीत, याची खूण परवा या मरियन बाईंना ऐकताना झाली आणि मन विलक्षण आनंदाने ओसंडून वाहू लागले.
मनात आले,   

"स्वतः भोवती फिरत राहिलेल्या
पृथ्वीचा अक्ष पदर,
अजूनही          
पुरता ढळलेला नाही,
अजूनही ध्रुवीय प्रदेशातील
सगळेच बर्फ वितळलेले नाही.

अजूनही तरेल हे जग...
नक्कीच !" 

~ प्रदीप आवटे.