Monday 5 February 2024

अँटिबायोटिक्स निरुपयोगी होताहेत, सावधान ! - डॉ. प्रदीप आवटे.

वैश्विक खेडे झालेल्या या जगासमोर कोणकोणती आव्हाने आहेत आणि त्या आव्हानांना मानव समाज म्हणून आपल्याला कसे तोंड देता येईल, या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वाचे काम करत असतात. आरोग्याच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना देखील हे काम करत असते. आजच्या जगासमोरील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मानवतेला भेडसावणारे जे दहा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा वाढता प्रतिरोध (ॲन्टीमायक्रोबियल रजिस्टन्स) हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शाश्वत विकासाची जी ध्येये आपण गाठू इच्छितो त्या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या अडचणींपैकी ही एक महत्त्वाची अडचण आहे.

 सूक्ष्मजीव विरोधी औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, विषाणूविरोधी औषधे, बुरशी विरुद्ध काम करणारी औषधे आणि परजीवी विरुद्ध काम करणारी औषधे अशा अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. सध्या या सर्वच औषधांना वेगाने प्रतिरोध वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक किंवा सर्वच प्रकारच्या औषधांना जुमानणारा सुपरब ही केवळ विज्ञान कथेतील काल्पनिक बाब राहिलेली नसून हा सुपरबग जगभर अनेक रुग्णांमध्ये आढळतो आहे. महत्वाची अशी अँटिबायोटिक्स या प्रतिरोधामुळे निकामी होत असल्याने दिवसेंदिवस जंतुसंसर्गावर उपचार करणे कठीण होत चाललेले आहे कारण नवीन अँटिबायोटिक्स फार सहजतेने मिळत नाहीत. नवीन अँटिबायोटिक्स शोधण्यासाठी संशोधन प्रक्रियेचा खर्च देखील अव्वा की सव्वा आहे त्यामुळे या प्रकारातील नवीन औषधे सापडण्याचा वेग अत्यंत मंद आहे. अनेक गरीब देशांना संशोधनासाठी एवढा खर्च करणे परवडत देखील नाही. अशावेळी आपण आपल्या हातातील आहे ती उपयुक्त सूक्ष्मजीव विरोधी औषधे गमावणे अत्यंत आत्मघातकी आहे. यामुळे जंतू संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे कठीण तर होतेच आहे पण त्याचबरोबर सिजेरियन शस्त्रक्रिया, सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील किमोथेरपी, अवयव प्रत्यारोपण अशा माणसाला संजीवन देणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणे देखील दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना प्रतिरोध निर्माण होण्याची मुख्य कारणे काय आहेत ?

·       या औषधांचा बेसुमार,वारेमाप वापर हे त्याचे मुख्य कारण आहे. ही औषधे जपून आवश्यक तेव्हाच आणि योग्य प्रमाणात योग्य कालावधी करता वापरली पाहिजेत परंतु असे होताना दिसत नाही.

·       स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता यांचा अभाव हे देखील असा प्रतिरोध वाढण्याचे एक मुख्य कारण आहे.

·       आरोग्य संस्थांमध्ये आणि शेतामध्ये जंतुसंसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भातील परिणामकारक उपाययोजना न राबवणे.

·       गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारी औषधे, लसी प्रयोगशाळा चाचण्या सहजतेने उपलब्ध नसणे.

·       सूक्ष्मजीव विरोधी औषधांना होत असलेल्या प्रतिरोधाबाबत जागृती आणि माहिती नसणे.

·       या संदर्भातील विविध कायद्यांचे काटेकोर पालन न केले जाणे.

  अशा अनेक कारणांमुळे हा प्रतिरोध वाढतो आहे. सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध ही काही प्रमाणामध्ये निसर्गतः होणारी गोष्ट आहे. आपल्यामध्ये आवश्यक ते जनुकीय बदल करून सूक्ष्मजीव हा प्रतिरोध निर्माण करतात हे खरे आहे तथापि वर नमूद केलेल्या कारणांमुळे या प्रतिरोधाचे प्रमाण विलक्षण गतीने वाढते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध नेमक्या कोणत्या औषधांना आणि कोणत्या सूक्ष्मजीवांचा आहे याची अचूक माहिती मिळून त्यानुसार कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी जागतिक पातळीवर या संदर्भात सर्वेक्षण यंत्रणा तयार करण्यात आलेली असली तरी देखील हे सर्वेक्षण अजून पुरेसे विश्वव्यापी झालेले नाही. जगातील कसेबसे पन्नास एक देश यासंदर्भातील माहिती गोळा करत आहेत.

अँटिबायोटिक्स ना निर्माण होणाऱ्या या प्रतिरोधामुळे टीबी अर्थात क्षय आजाराचे नियंत्रण अधिक कठीण झाले आहे. टीबीवरील अनेक औषधांना दाद न देणारे लक्षावधी रुग्ण जगभरात आढळून येत आहेत. भारतासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे कारण जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण आपल्या देशात आढळतात. आज रोजी देशभरात जवळपास २८ लाख टीबी रुग्ण आहेत. टीबी रुग्णांमध्ये प्रतिरोधाचे प्रमाण सुमारे चार ते पाच टक्के आहे. टीबी रुग्णांमधील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाचे हे प्रमाण असेच वाढत गेले तर टीबी नियंत्रण आपल्याकरता कठीण गोष्ट होऊन बसणार आहे. १९५०च्या पूर्वी ज्याप्रमाणे टीबी रुग्णांसाठी शहराबाहेर वेगळी रुग्णालय असत ती अवस्था येण्याचा धोका या प्रतिरोधामुळे निर्माण झालेला आहे.एच आय व्ही एड्स वरील औषधांमध्ये देखील प्रतिरोध निर्माण होताना दिसतो आहे. मलेरिया साठी कारणीभूत असलेल्या परजीवींपैकी अधिक धोकादायक असणाऱ्या फाल्सीपारम मलेरियामध्ये नेहमीच्या औषधाविरुद्ध निर्माण होणारा प्रतिरोध मलेरिया नियंत्रणातील मोठा अडथळा आहे.

अँटीबायोटिक्सच्या वापराबाबतची भारतातील परिस्थिती आपण सर्वांनी काळजी करावी अशी आहे २०१० ची जरी आकडेवारी आपण पाहिली तरी अँटिबायोटिक्सची जवळपास 13 अब्ज युनिट्स आपण देशभरात वापरली. याचा अर्थ सर्व जगभरात भारतातील अँटिबायोटिक्सचा वापर सर्वाधिक आहे.भारतात अँटिबायोटिक्सना वाढत्या प्रतिरोधाची कारणे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

 आपल्याकडे मेडिकल स्टोअर मध्ये डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटिबायोटिक्स सहजतेने उपलब्ध होतात. दुकानदाराच्या किंवा इतर कोणाच्यातरी सल्ल्याने अनेकदा रुग्ण स्वतःहून अँटिबायोटिक्स घेतात अँटिबायोटिक संवेदनशीलता चाचणी किंवा ब्लड कल्चर यासारख्या प्रयोगशाळा तपासण्या सहजतेने उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा डॉक्टर आपल्या अनुभवानुसार अँटिबायोटिकचा वापर करत असतात. प्रमाणापेक्षा जास्त  वापर करण्यासोबतच अनेकदा ती अपुऱ्या डोस मध्ये दिली जाणे, यामुळे सुद्धा प्रतिरोध निर्माण होतो. रुग्णाला कदाचित बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला असेल आणि तो आपल्याकडून उपचार करावयाचा राहू नये या भीतीने अनेकदा डॉक्टर गरज नसताना रुग्णाला अँटिबायोटिक्स देतात. अँटिबायोटिक्स वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाची नियामक यंत्रणा अपुरी असल्यामुळे तसेच मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने याबाबतचे नियमन काटेकोरपणे केले जात नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मानवी आरोग्य विभागाशिवाय अँटिबायोटिकचा वापर पशुसंवर्ध,न मत्स्य उत्पादन, शेती यामध्ये देखील केला जातो. अनेकदा तो पशु, मासे किंवा धान्य याच्या निव्वळ वाढीसाठी केला जातो. औषध कंपन्यांमधून बाहेर पडणा-या कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण देखील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाला हातभार लावते.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या अनुषंगाने एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये आपण हा प्रतिरोध रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर योग्य पावले उचलली जातच आहेत. मानवी आरोग्य,शेती, मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे सारे विभाग एकमेकांशी समन्वय साधून याबाबतीत योग्य कार्यवाही करत आहेत मात्र या सगळ्या गोष्टी आपण केवळ शासनावर सोडून चालणार नाहीत. आपले आरोग्य ही आपली व्यक्तिगत आणि कौटुंबिक जबाबदारी देखील आहे आणि म्हणून आपल्या आजारपणामध्ये उपयोगी पडणारी सूक्ष्मजीव विरोधी औषधे आपल्या निष्काळजीपणामुळे निकामी होऊ नयेत. यासाठी आपण देखील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.

 

ॲन्टीबायोटिक्स वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो ?

 

o  डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कधीही स्वतःच्या मनाने अँटिबायोटिक्स घेऊ नयेत.

o  आपल्याला अँटिबायोटिक्स द्या असा आग्रह आपण डॉक्टरांना करू नये.

o  अँटिबायोटिक्स कोणत्या डोसमध्ये आणि किती काळाकरता घ्यावयाचे याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

o  आपला उपचार पूर्ण झाल्यानंतर अँटीबायोटिक्सच्या काही गोळ्या, औषधे शिल्लक असतील तर ती इतर कोणाला देऊ नयेत. अँटीबायोटिक्स ओळखण्याची खूण म्हणजे या औषधांच्या स्ट्रीपच्या मागे लाल रंगातील जाड रेघ ओढलेली असते.




o  आपल्याला जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता हातांची नियमित स्वच्छता, अन्न आरोग्यदायी पद्धतीने तयार करणे, आजारी माणसाशी निकट संपर्क टाळणे, सुरक्षित शरीरसंबंध आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक लसीकरण वेळेवर पूर्ण करणे, आवश्यक आहे.

o  आपण आपले अन्न तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले पाच मुद्दे लक्षात ठेवावेत. स्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवणे, अन्न पूर्ण शिजवणे, तयार झालेले अन्न योग्य तापमानामध्ये ठेवणे, अन्न तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी कच्चे पदार्थ वापरणे.

 

समाज, शासन आणि व्यक्ती म्हणून आपण हातामध्ये हात घेऊन काम केले तर सूक्ष्मजीवाविरुद्ध लढणारी आपली औषधे आपण सुरक्षित ठेवू शकू आणि आपले आरोग्य देखील जपू शकू. म्हणूनच याबाबतीत सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स पशुसंवर्धन मत्स्य उत्पादन आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सूक्ष्मजीव विरोधी औषधांचा वापर काटेकोरपणे आणि नियमानुसारच करण्याची गरज आहे.

 

डॉ. प्रदीप आवटे 

Saturday 23 December 2023

प्रिय शेरअली..... प्रदीप आवटे.

 

प्रिय शेरअली,

मित्रा , काय ऐकतो आहे मी ? काल सकाळी साडे अकरा वाजता आपण व्हॉटस अप वर बोललो आणि संध्याकाळी तू निघून गेल्याची बातमी कानावर पडली. मी क्षणभर भांबावलो, मला खरे काय आणि खोटे काय तेच कळेना. अरे परवा परवा तर आपण तुझ्या ‘ अशांत टापू’ बद्दल बोललो, सोबत जगतापही होता. आणि आता सगळंच संपलंय.

आपण खूप जवळचे मित्र वगैरे होतो का? खरे तर याचं उत्तर 'नाही', असं आहे. तसा कॉलेज मध्ये तू माझा सिनिअर. बारावीला बार्शीतून रॅंकर वगैरे आलेला तू… तुझ्याबद्दल मला माहिती मिळाली ती जानराव मुळे, तो ही बार्शीचा म्हणून. कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला सिनिअर – ज्युनिअर ही दरी असतेच. नंतर ती कमी झाली. तू स्वतःच्याच तंद्रीत वा-याशी गप्पा मारत निघाल्यासारखा अनेकदा पाहिलाय मी. अजूनही तसाच दिसतोस तू मला. कधी तरी तीन नंबर होस्टेलच्या बाहेर कट्टयावर तुझ्याशी गप्पा पण मारल्या आहेत. तुझ्याशी बोलताना लक्षात आलेलं ब्रिलियंट प्रकरण आहे हे, तुझं पाठांतर तर जबरदस्त होतं. तुझ्या आवाजाला एक मुलायम पोत होता, ऐकत रहावा असा. कविता , गझल आवडायच्या तुला. मला आठवतं मला तू 'कमलाग्रज' म्हणायचास. माझ्या कविता कॉलेजात असतानाच प्रकाशित होत होत्या आणि मी तेव्हा त्या नावाने लिहायचो. तू ते टोपण नाव विसरला नाहीस. अगदी तीस वर्षांनीही मला तू त्याच नावाने हाक मारली तेव्हा टाईम मशीन मध्ये बसल्यासारखा मी कॉलेज वयात गेलो.

पण तरीही आपली मैत्री अशी झाली नाही. मी खेडयातून आलेला, थोडासा बुजरा वगैरे. तू ही अगदी गरीब , कष्टकरी कुटुंबातून आलेला. आपल्याला आपले आपले कॉम्प्लेक्स होते. मग कधी तरी तू पास आऊट होऊन बाहेर पडलास. मी पीजी वगैरे केलं.

सरकारी नोकरीत आलो तेव्हा कोर्टीला असताना समजलं तू जवळच नगर जिल्ह्यात चापडगाव इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून आहेस. एकदा करमाळयात धावतं भेटलो देखील पण तेवढंच.

नंतर तुझी भेट झाली ती तू निवृत्त झाल्यावर. तू निवृत्त झालास पण निवृत्त झालाच नाहीस. एक नवी इनिंग तुला खुणावत होती. नगर, नंदूरबार, सोलापूर अशा ठिकाणी तू वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं होतंस. ट्युबेक्टॉमी सर्जन म्हणून तुझं नाव झालं होतं. त्याचा तुला सार्थ अभिमानही होता. वैद्यकीय अधिकारी म्हणून हाज यात्रेलाही तू जावून आला होतास. पण तुझ्यात साहित्य, कला, कविता या सा-यावर प्रेम करणारा एक शेरा दडलेला होता. तो आता मोकळा होण्यासाठी वाट पाहत होता. तू सोलापूर विद्यापीठातून मराठी साहित्यात एम ए  केलंस, मग मास कम्युनिकेशनचा अभ्यास करु लागलास. तीसेक एक वर्षे सरकारी नोकरीत तू जे भोगलंस ते तुझ्या मनात खदखदत होतं. ते तुला मांडायचं होतं. ‘ सात वर्षे सक्तमजुरी?’ या पुस्तकात तू नंदूरबार जिल्ह्यात जे भोगलंस ते मांडलंस. पदरमोड करुन हे पुस्तक प्रकाशित केलंस, अनेकांना पाठवलंस. मलाही पाठवलंस. त्यात नवखेपणातील काही त्रुटी आहेत, तपशीलांची थोडी अनावश्यक जंत्री आहे. पण तरीही सामाजिक दस्तावेज म्हणून मला हे लेखन मोलाचे वाटलं . हे लिहून तू महत्वाचं काम केलेलं मित्रा. या पुस्तकावर मी ‘लोकमत’ मध्ये लिहलंही होतं.



त्यातील काही भाग मला अजूनही आठवतो,

हे आत्मकथन मुख्यत्वे दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करते आणि म्हणून ते एका व्यक्तीचे आत्मकथन असले तरी देखील ते आपल्या वर्तमान समाजाचा एक महत्त्वाचा दस्तावेज देखील आहे. या आत्मकथनांमध्ये स्वतःची गोष्ट, स्वतःला आलेले अनुभव तोंड द्याव्या लागलेल्या अडीअडचणी यांचं डॉ. शेख वर्णन करत असताना आपल्यासमोर एकूणच शासन व्यवस्था,आरोग्य सेवा यांच्याबद्दलचे काही मूलभूत प्रश्न पडत जातात. मनुष्य बळ व्यवस्थापन हा आपल्या व्यवस्थेचा दुबळा भाग.

अधिकारी ,कर्मचारी यांच्या नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती यामध्ये आपल्या व्यवस्थेने अधिकाधिक पारदर्शक होण्याची गरज आहे. काम करणाऱ्या आणि आयतोबा असणाऱ्या माणसातील फरक ओळखण्याइतके तिने संवेदनशील होणे आवश्यक आहे. काम करणाऱ्या माणसाने पूर्णपणे नामोहरम व्हावे, त्याची काम करण्याची उमेदच हरवून जावे इतकी बिन चेहऱ्याची , माणूसपण हरवलेली व्यवस्था , व्यवस्था म्हणून सर्वसामान्य माणसाला काहीच देऊ शकत नाही.

 डॉ. शेख यांच्या अनेक अनुभवांवरून हे वास्तव  आपल्यासमोर येत जाते. नंदुरबारसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यामध्ये सात वर्षे सेवा दिल्यानंतर देखील त्यांची नियमानुसार सहजपणे बदली होत नाही. त्याकरता देखील व्यवस्थेतील दलालांचे हात त्यांना ओले करावे लागतात. अगदी आरोग्य सेवेचा भाग म्हणून मक्का मदीना येथील हज यात्रा करता  पाठविण्यात येणाऱ्या चमू मध्ये डॉ. शेख यांची निवड होते पण त्यासाठी कार्यमुक्ती आदेश मिळवताना देखील पुन्हा त्याच वाटेने जावे लागते. एकूणच शासन व्यवस्था बिनचेहऱ्याची, माणूसपण हरवलेली आणि निष्ठूर कशी असते याचे चित्र डॉ. शेख यांच्या या आत्मकथनामध्ये ठायी ठायी आपल्याला भेटत जाते आणि आपण अस्वस्थ होत जातो. आरोग्य सेवा ही सर्वसामान्य माणसाचा ऑक्सिजन आहे. इथल्या गरीब कष्टकरी माणसाकरता तिची गुणवत्ता चांगली असणे अगदी आवश्यक आहे, परंतु या आरोग्य सेवेचे व्यवस्थापन ज्या पद्धतीने केले जाते त्यामुळे ही व्यवस्था दिवसेंदिवस आपली गुणवत्ता हरवते आहे की काय असा व्याकुळ प्रश्न डॉ. शेख यांचे आत्मकथन आपल्यासमोर उभा करते आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपली आरोग्य सेवा अधिकाधिक मानवी चेहऱ्याची कशी होईल,याच्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले पाहिजे, याची जाणीवही हे आत्मकथन आपल्याला करून देते. खरे म्हणजे, आपल्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्या वरील हा प्राधान्याचा विषय असायला हवा.

 जी गोष्ट आरोग्य सेवांची तीच गोष्ट वैद्यकीय शिक्षणाची देखील!  दिवसेंदिवस वैद्यकीय शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होते आहे. आरक्षणाच्या लाभामुळे अनेक गरीब कष्टकरी समाजातील मुले कशीबशी वैद्यकीय शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचत आहेत पण तिथले वातावरण त्यांना अत्यंत अपरिचित आहे. अशावेळी या मुलांची खूप मोठी मानसिक आणि भावनिक ऊर्जा वैद्यकीय महाविद्यालयातील वातावरणाशी समायोजन करण्यात खर्च होते आणि अनेकदा ही मुले वैद्यकीय महाविद्यालयात एकटी पडतात. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर आणि परीक्षांच्या निकालावर होतो. ही मुले पुन्हा पुन्हा नापास होतात आणि त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. या सर्व मुलांसाठी काही वेगळी व्यवस्था, समुपदेशन , वेगळे मार्गदर्शन हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असणे गरजेचे आहे.  या परिघावरील मुलांना या नवीन व्यवस्थेसोबत समायोजन करण्याकरता व्यवस्थेने देखील दोन पावले पुढे येण्याची गरज आहे. डॉ. शेख यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनुभवातून ही बाब देखील तितकीच ठळकपणे अधोरेखित होते.

 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. शेरअली शेख यांचे मुस्लिम असणे .भारतीय समाजामध्ये मुस्लिम म्हणून वाढताना लहानपणापासून ते अगदी निवृत्तीच्या काळापर्यंत जे वेगवेगळे अनुभव येतात ते विचार करायला लावणारे आहेत. शाळकरी मित्राने ' लांड्या ' म्हणण्यापासून ते मंत्रालयातील सुरक्षा रक्षकाने ' खिशात पिस्तूल बिस्तुल नाही ना,' असे विचारण्यापर्यंत हा प्रवास सुरू असतो. आजच्या काळात तर मुस्लिम समाजाचे आपल्या समाजातून मानसिक विस्थापन होत असताना डॉ. शेख यांचे अनेक अनुभव आपल्या मनामध्ये काहूर उठवतात.

या आत्मकथनातून गंगाजमनी तहजीबमध्ये वाढलेल्या, जाती धर्माच्या भिंतीपल्याड गेलेल्या, इथल्या परिघावरील गरीब कष्टकरी माणसाच्या सुखदुःखाची नाळ सांगणाऱ्या, आपल्या मर्यादांचे नीट भान असणाऱ्या डॉ. शेरअली शेख  यांचे एक लोभस व्यक्तिमत्व आपल्यासमोर येते. हा डॉक्टर, डॉक्टर म्हणून तर गुणवंत आहेच पण त्याला चित्रपट, राजकारण, समाजकारण, संगीत, साहित्य, कविता या सगळ्यांचीच मनापासून आवड आहे. हे सारं तो आपल्या जगण्याशी पडताळून पाहतो आहे. आणि म्हणूनच नारायण सूर्व्याच्या कवितेशी त्याची नाळ जुळते आहे.



डॉ. शेरअली शेख यांच्या या लोभस व्यक्तिमत्त्वामुळेच आणि माणसांवर प्रेम करण्याच्या त्यांच्या अपार ताकदीमुळे नंदुरबार सारख्या किचकट भागामध्ये सात वर्षे सेवा देतात, तो काळ सक्तमजुरीचा न वाटता नवे काही घडवणारा,स्वतःच्याच व्यक्तिमत्वाला नवे नवे पैलू पाडणारा त्यांना वाटतो आणि म्हणून आत्मकथनाच्या शेवटी येणारे प्रश्नचिन्ह डॉ. शेख यांचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करत करून जाते. 

आणि मग तू विभागीय चौकशी वगैरे बाबींवर प्रकाश टाक़णारे ‘ अशांत टापू’ लिहलं. मला पाठवलंस आणि म्हणालास, “ कवी कमलाग्रज नक्की वाचा हे. लिहा याच्यावर. मला यावर फिल्म करायची आहे.” आणि तुझं हे पुस्तक मी वाचण्यापूर्वीच तू एका अनोळखी टापूत निघून गेलास.



तुझा उत्साह प्रचंड होता. तू साठीनंतर एम डी पी एस एम करण्यासाठी नीट परीक्षा देत होतास. आयुष्य जगताना जे जे निसटले ते ते सारे तू पकडण्याचा प्रयत्न करत होतास. हजारो कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यास तू. तू स्वतःला मिशन ट्युबेक्टॉमीचा ब्रॅंड ऍम्बसिडर म्हणवून घ्यायचास. मला ते कधी कधी अगदी विनोदी वाटायचं पण तू ठाम होतास. आपण अगदी भारत सरकारची पद्मश्री मिळावी, एवढं काम केलं आहे याचा तुला मनोमन विश्वास होता. मला वाटायचं, खूप किरकोळ, सामान्य असतो रे आपण एम ओ मंडळी, कुणीही कसंही कोलून द्यावं अशी.

मला तुझ्या उत्साहाचा, आत्मविश्वासाचा, साधेपणाचा हेवा वाटायचा. तू आता कुठं स्वतःला खोदायला सुरुवात केली होतीस. हळूहळू सगळा मलबा दूर करत, असं खोदत खोदत तू शेवटी त्या झ-यापर्यंत पोहचशील, याची मला खात्री होती.

… आणि तेवढयात ही बातमी आली.

शेरा, यार तू असा चीट नाही करु शकत. तुला पद्मश्री नाही मिळाली शेरा पण आजही अकलकुवा, धडगाव, शहाद्याला एखाद्या पेशंटच्या मनात तू त्याचा जीव वाचवल्याची आठवण ताजी असेल. ज्या अडलेल्या बाळंतिणीला तू मोकळी केलीस ती अधून मधून  तुझी आठवण काढून मनातल्या मनात तुझे आभार मानत असेल. शेरा, हीच आपली पद्मश्री असते रे !

इतर कुणाला तुझी वाटचाल किरकोळ वाटत असेल पण मला तुझं मोल माहित आहे. तू कुठून निघाला होतास आणि कुठं पोहचलास हे मला माहित आहे.

दोस्त, अलविदा. तुझ्या वाटेने आम्हा सर्वांनाच यायचे आहेस. तू थोडी घाई केलीस एवढेच.

चालताना, बोलताना घशात अडकलेल्या हुंदक्यासारखा आठवत राहशील मित्रा.

 

तुझा,

प्रदीप अर्थात कवी कमलाग्रज.  

 

Wednesday 13 December 2023

बाबासाहेबांचे निरोपाचे बोलणे - प्रदीप आवटे

आपल्या कुटुंबातील कोणतीही मोठी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपला निरोप घेताना तिने सर्व कुटुंबीयांना काय सांगितले हे पुन्हा पुन्हा त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांगत असतात. 'सुखाने राहा, एकमेकांची काळजी घ्या.' कुटुंबातील एखादी व्यक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ' तिची अधिक काळजी घ्या', असे ही जाणारी व्यक्ती कुटुंबीयांना सांगत असते. त्या शिकवणीची एकमेकांना आठवण करून देत ते कुटुंब आपली वाट चालण्याचा प्रयत्न करत असते.
देश ,समाज हे देखील कुटुंबाचेच एक मोठे रूप. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर नावाचा बाप माणूस आपल्याला सोडून गेला. आपला निरोप घेताना त्यांनी आपल्याला काय सांगितले, याची आठवण ही आज आपण एकमेकांना करून देण्याची गरज आहे.
आज बाबासाहेबांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांची आठवण काढताना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेसमोर बोलताना बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले ते आपण कोणीही विसरता कामा नये.
संविधान निर्मितीचे काम कसे पूर्ण झाले, त्यामध्ये काय अडथळे आले, या कामांमध्ये कुणी कुणी मदत केली,घटनेबद्दल वेगवेगळ्या लोकांचे काय आक्षेप आहेत आणि त्याबद्दल मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना काय वाटते, या सगळ्या बाबत बाबासाहेब या भाषणामध्ये बोलतात.



बाबासाहेबांना आपल्या भविष्याची काळजी:

आणि हे सगळं सांगून बाबासाहेब म्हणतात की, खरं म्हणजे इथं मी माझं भाषण संपवू शकतो पण मला अजून काही बोलायचं आहे. मला या देशाच्या भविष्याची काळजी वाटते आणि म्हणून मला आणखी काही गोष्टीबद्दल बोलायचे आहे, असं म्हणून बाबासाहेब आपल्या देशाने यापूर्वी स्वातंत्र्य कसे गमावले, याबद्दल सांगतात आणि येणाऱ्या काळात आपण कष्टाने मिळवलेले हे स्वातंत्र्य पुन्हा गमावू शकतो का, याबद्दल बोलू लागतात.

आपण आपले स्वातंत्र्य पुन्हा गमावू शकतो का?
आपल्या स्वातंत्र्य गमावण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते का, असा प्रश्न विचारत बाबासाहेब कमालीचे अस्वस्थ होतात आणि एक महत्त्वाचा इशारा ते आपणा सगळ्यांना देतात, आपल्या देशात वेगवेगळ्या पक्षांचे, राजकीय विचारधारांचे लोक आहेत परंतु आपला खरा शत्रू आहेत जात आणि धर्म.
"जेव्हा भारतीय म्हणून आपण कोणत्याही जात धर्माला देशापेक्षाही अधिक महत्व देऊ तेव्हा आपले स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते आणि आपण ते गमावू शकतो, कदाचित कायमचे. आणि म्हणूनच आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असे बाबासाहेब अगदी तळमळीने सांगतात.
आपल्या लोकशाहीचे काय होईल?
बाबासाहेबांना दुसरी काळजी वाटते, ती या देशातील लोकशाहीची. लोकशाही तत्त्व म्हणून आपल्याला खूप पूर्वीपासून माहित आहे हे बाबासाहेब नमूद करतात. गौतम बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये लोकशाहीचे दर्शन आपल्याला होते पण इतिहासाच्या क्रमात कधीतरी आपण या लोकशाहीच्या तत्वाला तिलांजली दिली. ही लोकशाही व्यवस्था आपण पुन्हा हरवून बसू का, याची भीती बाबासाहेबांना वाटते.
लोकशाही केवळ सांगाडा म्हणून उरता कामा नये तर ती प्रत्यक्षामध्ये आपल्या लोक जीवनात, सामाजिक जीवनात सतत अस्तित्वात असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. अन्यथा केवळ सांगाडा म्हणून असलेली लोकशाही एका वेगळ्या रूपात हुकूमशाहीला आमंत्रण देऊ शकते.



कोणाचेही भक्त बनू नका.▪️
बाबासाहेब जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताला उद्धृत करून सांगतात, 'आपण एखाद्या थोर व्यक्तीच्या पायाशी आपल्या स्वातंत्र्याची आहुती देणे किंवा सारी संस्थात्मक रचना दुय्यम करून टाकण्याचे अधिकार, सामर्थ्य त्याला प्रदान करणे ,' अत्यंत धोकादायक आहे. थोर व्यक्तींनी देशासाठी जे केले आहे, त्याबद्दल कृतज्ञ असणे आवश्यक आहे पण कृतज्ञतेला मर्यादा असायला हवी, असा इशारा बाबासाहेब देतात. डॅनिएल ओकॉनेल या आयरिश देशभक्ताचे वचन ते समोर ठेवतात," No man can be grateful at the cost of his honour , no woman can be grateful at the cost of her chastity and no nation can be grateful at the cost of its liberty." हा इशारा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतासाठी अधिक महत्त्वाचा असल्याचे बाबासाहेब नमूद करतात. कारण भारतामध्ये भक्ती आणि व्यक्तीपूजा यांची भलतीच चलती आहे. कुठल्याही देशापेक्षा भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर व्यक्तीपूजक आहेत. धर्माच्या क्षेत्रात भक्ती हा मुक्तीचा मार्ग असेल पण राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही निश्चितपणे आपल्या विनाशाची वाट आहे आणि यातूनच हुकूमशाही उदयाला येण्याची भीती आहे.

देश रक्षणासाठी स्वातंत्र्य, समता आणि सहभावाचे त्रिकुट :
आणि तिसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब नमूद करतात आपण केवळ राजकीय लोकशाहीमध्ये समाधान मानता कामा नये. आपली राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही देखील कशी होईल, याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही राजकीय लोकशाही तिला सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय टिकू शकत नाही. ज्या समाजामध्ये जीवनमूल्य म्हणून स्वातंत्र्य ,समता आणि सहभाव जगण्यामध्ये आवश्यक मानले जातात त्याच समाजामध्ये सामाजिक लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू शकते. स्वातंत्र्याची समतेपासून फारकत होऊ शकत नाही, समता स्वातंत्र्यापासून घटस्फोट घेऊ शकत नाही आणि स्वातंत्र्य ,समता सहभावाशिवाय नांदू शकत नाहीत. घटना 'एक व्यक्ती, एक मत ,एक मूल्य,' असे म्हणते आहे पण आपल्या समाजात देखील प्रत्येक व्यक्तीची पत आणि मूल्य हे इतर कोणत्याही व्यक्ती एवढेच जेव्हा होईल तेव्हाच ही खरी सामाजिक लोकशाही अस्तित्वात येईल. आपले राजकारण आणि समाजकारण यातील हा अंतर्विरोध आपण जितक्या लवकर संपवू तितके आपले स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिक सुरक्षित राहील.
या भाषणात बाबासाहेबांच्या अवघ्या विचारांचा सारांश जणू उतरला आहे. हेच त्यांनी आपला निरोप घेताना, आपल्या सुखी जगण्यासाठी आपल्या हातात भारतीय संविधान ठेवताना आपणा सगळ्यांना सांगितले आहे.
या वाटेने चालणे हीच या महामानवाला खरीखुरी आदरांजली आहे.


May be an image of 1 person


All reaction

Monday 6 November 2023

एक वेडा आणि बिघडलेली हवा - डॉ. प्रदीप आवटे.


    जानुल्का ग्रिमाल्डा (Gianluca Grimalda) असं उच्चारायला कठीण नाव असणारा एक माणूस. पण या माणसाचे केवळ नावच उच्चारासाठी कठीण आहे असे नाही तर त्याचे आचरण देखील आपल्यासारख्या निव्वळ बोलभांड लोकांसाठी अनुकरणे कठीण आहे.
 

“ येत्या सोमवार पर्यंत जर्मनीतील आपल्या ऑफिसमध्ये पोहचा नाही तर तुम्हांला आम्ही नोकरी वरुन काढून टाकू,” असा दम देणारा आदेश या जानुल्का ग्रिमाल्डाच्या  संस्थेने त्याला दिला होता. आणि हा गृहस्थ पुढील सोमवार पर्यंत म्हणजे पाच दिवसात जर्मनीला पोहचायला काही करता तयार नव्हता. याला सुट्टी हवी होती की काय की हा भलताच कामचुकार माणूस आहे? आपल्या मनात आणखी काय येणार ? पण गोष्ट अगदी निराळी आणि आपणां सर्वांचे डोळे  खाडकन उघडावी, अशी आहे. जानुल्का ग्रिमाल्डा हा सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे. मागील काही वर्षांपासून तो ‘क्लायमेट चेंजचे सामाजिक परिणाम’ या विषयावर एका जर्मन संस्थेमध्ये संशोधन करतो आहे. क्लायमेट चेंजवरील त्याचे संशोधन निव्वळ तोंडपाटीलकी नाही, तो ‘ बोले तैसा चाले’ शैलीचा माणूस आहे. आपल्या कार्बन फूटप्रिंटस कमी व्हाव्यात म्हणून या वेडया माणसाने मागील दहा वर्षांपासून विमानाने प्रवास करणे बंद केले आहे. आताही मागील सहा महिन्यांपासून तो जर्मनीपासून सुमारे १५ हजार मैल दूर असणा-या पापुआ न्यू गिनिआ या बेटावर क्लायमेट चेंज संदर्भात काम करत होता. तिथं जातानाही तो बोट, रेल्वे असे पोहचला. आता तेथील काम संपल्यावर मात्र त्याच्या जर्मन संस्थेने त्याला तात्काळ बोलावले पण हा विमानाने यायला तयार नाही. विमानाने निघाला तर तो अवघ्या ३२ तासांमध्ये जर्मनीत पोहचेल पण त्यासाठी दरडोई ५.३ टन कार्बन वातावरणात सोडला जाईल. आणि त्याच्या पध्दतीने तो बोट, रेल्वे असे आला तर त्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ लागेल पण अवघा ४०० किलो कार्बन सोडला जाईल. तो म्हणतो, “ ५.३ टन कार्बन म्हणजे सर्वसामान्य माणसामुळे संपूर्ण वर्षात जेवढा कार्बन सोडला जातो त्याहूनही किती तरी जास्त. आजच्या क्लायमेट क्रायसिसच्या काळात आपण हे पाच टन कार्बन उत्सर्जन कमी करणे अधिक महत्वाचे आहे.”  गार्डियन या दैनिकात तो पुढे लिहितो, “ ही पृथ्वी अधिक सुंदर करण्याच्या माझ्या प्रयत्नात माझ्या नोकरीची किंमत काहीच नाही.”

आपण या माणसाला वेडा, मॅड, सर्किट अशा शेलक्या शब्दांत नावाजू आणि दिल्ली, मुंबई , पुण्यातील वायू प्रदूषणाबाबत आपल्या कारमधून ऑफिसकडे जाताना कोणाशी तरी बोलताना काळजी व्यक्त करत राहू. पण खरेच या जानुल्का ग्रिमाल्डाला वेडा नाही तर काय म्हणणार ? सगळं वारंच बिघडलेलं असताना हा एकटा वेडा पीर आपल्या मुठीत वारा पकडून त्याची दिशा बदलू पाहतो आहे. तो एकटा काय करणार ? त्याच्या मुठीसोबत आपण आपल्याही मुठी आवळल्या तर काही होऊ शकते. पण आपल्याला नेमके काय बिघडले आहे, हे तरी कळलंय का ?

खरे तर आपल्या सारख्या देशात तर अशा वेडया माणसांची गरज सर्वाधिक आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये आपला क्रमांक दुसरा लागतो. जगातील सर्वाधिक वायू प्रदुषित ३० शहरांपैकी २० शहरे भारतीय आहेत . भारतातील सर्वसामान्य व्यक्तीचे सरासरी आयुष्य वायुप्रदूषणामुळे ५.२ वर्षांनी कमी होते असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो आणि हेच आपण दिल्ली किंवा लखनौ सारख्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राहत असू तर आपले आयुर्मान सुमारे नऊ ते दहा वर्षांनी कमी होते. हे सारे लक्षात घेतले तर, “मी माझी स्वतःची कार, बाईक वापरणार नाही. सायकल  किंवा  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीन,” अशी मॅड शपथ घेणारे जानुल्का आपल्याला घराघरात हवे आहेत.

आता हिवाळा सुरु झाला आहे. हिवाळयात वा-याची गती मंदावते आणि हवेतील सूक्ष्मकण बराच काळ तरंगत राहतात. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरात परिस्थिती बिकट झालेली आहे. दिल्ली मध्ये तर या वायू प्रदूषणामुळे शाळा १० नोव्हेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारसाठी पुन्हा सम विषम दिवस पध्दत कदाचित लवकरच सुरु करण्यात येईल, असे दिसते. पण या सगळयाच तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत.

मागील ४ वर्षांपासून युनो ७ सप्टेंबर हा दिवस , निळ्याभोर आभाळासाठी स्वच्छ हवा दिवस म्हणून साजरा करते आहे. क्लीन एअर डे फॉर ब्ल्यू स्काइज, किती सुंदर वाटते ना, निव्वळ वाचूनही. पण नुसते दिवस साजरे करुन काय होणार ? या क्लीन एअर डेचे घोषवाक्य आहे, टुगेदर फोर क्लीन इयर! अर्थात आपली हवा स्वच्छ होण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपल्या हातात काय आहे ?

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शासन, समाज आणि व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाच्या स्तरावर २०१९ सालापासून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पंधराव्या वित्तआयोगाने पुढील पाच वर्षासाठी १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी रक्कम वायू प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी मंजूर केलेली आहे. आपल्या देशातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांनी आपल्या वायू प्रदूषणाची पातळी दरवर्षी किमान १५ टक्क्यांनी कमी कमी करत न्यावी, असे आपले नियोजन आहे. याशिवाय राष्ट्रीय क्लायमेट चेंज आणि मानवी आरोग्य कार्यक्रम असा एक महत्त्वाचा कार्यक्रम देखील केंद्र सरकारने सुरू केला आहे.

          आपणही व्यक्तिगत पातळीवर अगदी साध्या सोप्या गोष्टी करुन वायू प्रदूषण कमी करण्यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो –

(१) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर - व्यक्तिगत वाहनांचा वापर कमी करून सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे.

(२)  इलेक्ट्रीक वाहनांचा वापर

(३) एल ई डी चा वापर -  घरी कामाच्या ठिकाणी साध्या विजेच्या दिव्या ऐवजी एलईडी चा वापर करणे.

(४) पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर -  शक्य तिथे सर्वत्र सौरऊर्जा किंवा इतर अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र वापरणे.

(५)  ऊर्जेची काटकसर करणे.  ज्या खोलीत आपण बसलो आहोत केवळ तिथलेच दिवे आणि पंखे चालू ठेवणे. सरकारी किंवा इतर कार्यालयातील दिवे, पंखे एसी गरज नसताना बंद करणे. लिफ्ट ऐवजी जिना वापरणे.

(६)  घरगुती कच-याचे ओला , सुका असे वर्गीकरण करणे. कचरा न जाळता खत निर्मिती किंवा ऊर्जा निर्मितीसाठी वापरणे.

(७)  धुम्रपान टाळा.

(८)  घरगुती इंधन म्हणून एल पी जी चा वापर करणे. गरीब कुटुंबास एल पी जी घेण्यासाठी आवश्यक मदत करणे.

(९)  फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे. फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अधिकच कमी होते. कोविड साथीमुळे अनेकांची फुप्फुसे कमकुवत झाली आहेत. या सगळया पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी आपल्या सगळयांच्या भल्यासाठी आवश्यक आहे.

 

जानुल्का ग्रिमाल्डा सारखे आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केले तर आपणही या दिवाळीत ‘ ये हवा मेरे संग संग चल,’ असं मनापासून गुणगुणू शकू पण त्यासाठी आपल्याला प्राणवायू पुरवणा-या आपल्या अवतीभवतीच्या हवेवर आपल्याला मनापासून प्रेम करता यायला हवे.  

 

-         डॉ. प्रदीप आवटे.

मोबाईल  - ९४२३३३७५५६

 

******* 

Thursday 22 April 2021

 

खबरदारी घेऊकरोनावर मात करु !

सध्या करोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठया संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करु शकतो.

आपण काय करु शकतो ?

·       सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजेकरोनाची अनाठायी भिती बाळगू नका.

 करोना आजाराची भिती वाटणे स्वाभाविक आहे. सर्वत्र याच आजाराचे नाव ऐकू येत असले तरी या आजारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टक्केपेक्षा कमी आहे, हे लक्षात ठेवू या. करोना झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला भेदभावाची वागणूक देऊ नका. परस्परांना मदत करा.

·       करोना प्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या.

मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, योग्य शारिरिक अंतर पाळणे, गरज नसताना बाहेर पडणे, हे साधेसुधे नियम पाळणे, आवश्यक आहे. तसेच आपण बाधित आल्यानंतर आपल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला दिल्याने त्या व्यक्तींचा शोध लवकर घेता येतो आणि प्रसाराला आळा घालता येतो.

·       करोना आजाराची जोखीम कुणाला जास्त आहे ?

ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, ज्यांना मधुमेहउच्च रक्तदाब असे आजार किंवा लिव्हर, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे वजन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये करोना आजाराची गुंतागुंत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी करोनाची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

·       करोनाची लक्षणे समजून घ्या आणि ती अंगावर काढू नका.

  ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, वास येणे, थकवा, धाप लागणे ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. रात्री झोप झाली नाही, काल काही तरी तेलकट खाण्यात आले म्हणून असे होत असेल असे म्हणून लक्षणे अंगावर काढू नका. आपल्याकडे ग्रामीण भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र कार्यरत आहे. या प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि एक आरोग्य सेवक आहेत. याशिवाय प्रत्येक तीस हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र ( पी एच सी) आहे. इथे जावून वैद्यकीय सल्ला घ्या. प्रत्येक आरोग्य केंद्रात ऍंटीजन टेस्टची व्यवस्था आहे. त्यामुळे करोना आजाराचे लवकर निदान होईल. वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्या. शहरी भागातही वेगवेगळया केंद्रांमध्ये टेस्टिंग, तपासणीची व्य्वस्था करण्यात आलेली आहे. आपापल्या भागातील हेल्पलाईनची माहिती असणे आवश्यक आहे.

·       घरगुती विलगीकरण - करोनाचे बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होऊ शकतात. पण

कोणतेही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य स्वरुपाच्या प्रत्येक करोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही. ज्या रुग्णाच्या घरी पुरेशी जागा आहे, रुग्णासाठी वेगळी खोली , टॉयलेट आहे अशा ठिकाणी लक्षणे विरहित किंवा सौम्य स्वरुपाच्या रुग्णाची देखभाल घरच्या घरी घेणे शक्य आहे. अर्थात या बाबत एकच एक नियम नाही, प्रत्येक रुग्णानुसार हा निर्णय घ्यावा लागतो. ज्यांचे घर छोटे आहे, रुग्णासाठी वेगळी खोली नाही तिथे हे शक्य नाही. तसेच लक्षणे जरी सौम्य असतील पण रुग्णास इतर जोखमीचे आजार असतील आणि वय जास्त असेल तर अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केलेले अधिक चांगले. हा निर्णय त्या त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी घेणे अधिक योग्य !

घरच्या घरी करोना रुग्णांची काळजी घेताना कोणते नियम पाळले पाहिजेत, हे समजून घेऊ या.

१)     रुग्णाने २४X वेगळ्या खोलीत रहायला हवे आणि हॉल/किचन मध्ये येणे पूर्णपणे टाळायला हवे. घरात वृध्द, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणा-या व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळणे अधिक महत्वाचे !

२)     रुग्णाने आणि रुग्णाची काळजी घेणा-या व्यक्तीने ट्रिपल लेयर सर्जिकल मास्क वापरावा.

३)     घरातील  निश्चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी.

४)      काळजीवाहू व्यक्तीने आपल्या हाताची स्वच्छता जपली पाहिजे. काळजीवाहू व्यक्तीने घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत.  

५)     रुग्णाचे कपडे, प्लेटस आणि इतर गोष्टी शेअर करु नयेत.

६)     तास वापरुन झाल्यावर किंवा ओले /खराब झाल्यानंतर मास्क बदलावेत. मास्क प्रथम % सोडियम क्लोराईट द्रावणात टाकावेत आणि नंतर जाळून अथवा जमिनीत खोल पुरुन टाकावेत.

७)     रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु ठेवावेत.

८)     रुग्णाने  डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावा. तपमानाची नियमित नोंद ठेवावी. पल्सऑक्सीमिटरद्वारे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसातून वेळा मोजावे. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी होणे गंभीर आजाराचे लक्षण आहे. दिवसातून एक वेळा मिनिट वॉक टेस्ट करा.

९)      रुग्णाने आपल्या प्रकृतीची माहिती दैनंदिन स्वरुपात स्थानिक डॉक्टरांना द्यावी. लक्षणे वाढत असल्यास डॉक्टर योग्य निर्णय घेऊ शकतात.

१०)आपण घरगुती विलगीकरणात आहोत आणि आपल्याला फारशी लक्षणे नाहीत म्हणून या रुग्णांनी छोटया मोठया कारणांसाठी घराबाहेर पडणे, इतर लोकांसोबत मिसळणे टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपले आयसोलेशन शिस्तीने पाळणे आवश्यक आहे.

करोना रुग्णाची काळजी घरगुती पातळीवर नीटपणे घेता यावी यासाठी स्थानिक डॉक्टर आणि रुग्ण यांचा उत्तम समन्वय असावा तरचमेरा घर, मेरा अस्पताल’, हे प्रत्यक्षात येणे शक्य आहे.

·       सहा मिनिटे चालण्याची टेस्ट -   जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी एक वेळा ही सोपी चाचणी करावी.

​(१) तुमच्या बोटाला पल्सऑक्सी मीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.

(२) आता पल्स ऑक्सी मीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे फिरा.

(३) सहा मिनिटांचे चालणे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

निष्कर्ष -

सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम.

जर ती केवळ एक दोन टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही.

  रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल किंवा चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा ३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिकने कमी होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम/धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सीजन अपुरा पडतो आहे,असा त्याचा अर्थ होतो. वेळेत भरती होणे आवश्यक.

६० वर्षांवरील व्यक्ती साठी ६ मिनिटा ऐवजी ३ मिनिटांची वॉक टेस्ट करावयाला हरकत नाही.

 

या प्रकारे व्यवस्थित घरगुती काळजी घेतल्याने शंभरातील बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होतात. आणि ज्यांना भरती करण्याची गरज आहे, ते वेळेत लक्षात येऊन त्यांना वेळेत भरती करता आल्याने गुंतागुंत आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागतो.

 

·       फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी

कोविडची लक्षणे असतील तर आपण जागेपणी पालथे झोपण्याची सवय लावावी.  दिवसातील शक्य तेवढा वेळ पोटावर झोपल्यास फुप्फुसाचे सर्व भाग उघडले जाऊन ऑक्सिजन सर्व भागास पोहचतो. अगदी सुरुवातीपासून या पध्दतीचा वापर केल्यास त्याचा रुग्णाची ऑक्सिजन पातळी उत्तम ठेवण्यास मदत होते.

फुप्फुसाचा प्रत्येक भाग उघडला जावून ऑक्सिजन खोलपर्यंत पोहचावा यासाठी  विविध प्रकारे ३० मिनिटे ते तास झोपल्यास त्याचा फायदा होतो.

१.    पोटावर झोपणे. श्वासास अडथळा येऊ नये यासाठी कपाळाखाली टॉवेलची घडी ठेवावी किंवा मान एका बाजूला वळवावी.

२.    उजव्या कुशीवर झोपणे.

३.    उठून पाठीवर मागे रेलून बसणे. अशा पध्दतीने बसताना पाठीला आवश्यक आधार द्यावा.

४.    डाव्या कुशीवर झोपणे.

५.    आणि पुन्हा पालथे पोटावर झोपणे.

हे करत असताना ऑक्सिजन पातळी मोजत जावी. या साध्या वाटणा-या झोपण्याच्या प्रकारांमुळे ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत होते. मात्र म्हणजे हा प्रकार व्हेंटीलेटरला पर्याय आहे, असे नव्हे.

·       गुंतागुंत ओळखणा-या रक्ताच्या तपासण्या

 डॉक्टरांच्या सल्याने रक्तातील पांढ-या पेशींचे प्रमाण, डी डायमर, सी आर पी, एल डी एच अशा तपासण्या केल्याने संसर्गाची तीव्रता लवकर ओळखण्यास मदत होते. त्या नुसार रुग्णास वेळेत भरती करता येते. छातीचा एक्स रेसी टी स्कॅनमुळेही संसर्ग  तीव्रता वेळेमध्ये कळण्यास मदत होते.

·       उपचार पध्दती औषधे

कोविड रुग्णाच्या उपचारासाठी आयवरमेक्टिन, डॉक्सीसायक्लीन, फॅविपिराविर , डेक्सामिथॅसोन, रेमडेसिविर, टोसिलोझुमॅब, प्लाझ्मा अशा अनेक औषधांचा वापर केला जातो. यातील कोणतीही उपचार पध्दती ही या आजारावरील रामबाण उपाय नाही. रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार आणि गरजेनुसार योग्य ती उपचार पध्दती देण्यात येते.

·       कोविड उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार सुविधा

 कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात तीन स्तरीय रचना उभी करण्यात आलेली आहे.

कोविड केअर सेंटर -  तालुका पातळीपासून ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यभरात अशी दोन हजाराहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये सौम्य स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो.

कोविड हेल्थ सेंटरया केंद्रांमध्ये मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. काही ऑक्सिजन बेडस देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. तालुका आणि जिल्हा पातळीवर ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यात अशी सोळाशेहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.

कोविड हॉस्पिटलगंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठी ही केंद्रे कार्यरत आहेत. इथे ऑक्सिजन बेडस, व्हेंटीलेटर्स आणि अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध आहे. राज्यात सुमारे ९५० कोविड हॉस्पिटल्स कार्यरत आहेत.

·       कोणत्या कोविड रुग्णास भरती होणे आवश्यक आहे ?

१.     ज्याचे वय ५० पेक्षा अधिक आहे आणि ज्याला काही जोखमीचे आजार आहेत

२.    ज्याचा आजार सौम्य स्वरुपाचा आहे पण घरात पुरेशी जागा नाही.

३.    ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी आहे.

४.    मिनिट वॉक टेस्ट नंतर ज्यांना धाप लागते किंवा ऑक्सिजन ९३ पेक्षा कमी होतो.

५.    ज्यांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया आहे

६.    ज्यांना सतात तीव्र ताप आहे

७.    रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाडाच्या खुणा

कोविड कसा होतो, कसा पसरतो, तो टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि करोना झाला तर काय करायला हवे, निदानउपचार सुविधा कुठे आहेत, याची पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार वागणे आवश्यक आहे. आजच्या संकटाच्या प्रसंगी छोटी छोटी वाटणारी माहिती हे संकट नाहीसे करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

 

- डॉ. प्रदीप आवटे,

राज्य सर्वेक्षण अधिकारी,

एकात्मिक रोग सर्वेक्षण अधिकारी