Monday, 8 May 2017

उपोसथाचा दिवस

उपोसथाचा दिवस

-   डॉ.प्रदीप आवटे

------------------------------------------------------------------
                     श्रुती शाळेत जाऊ लागली तेव्हाची गोष्ट. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कोर्टी ता.करमाळा जि.सोलापूर ही तिची पहिली शाळा. श्रुती अगदी लाजाळू आणि अबोल.शाळेत कुणाशी बोलायची नाही. गाणी गोष्टी सादर करणे तर दूरच.अवघी पाच सहा वर्षाची चिमुरडी पण आम्हांला म्हणजे मला आणि माधुरीला मात्र वाटायचे हिने प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यावा वगैरे. पण हे व्हावे कसे? मग आम्ही ठरवले आपण टप्प्याटप्प्याने सुरुवात करु या. अगदी सुरुवाती पासून तिच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे टाकणे बरे नाही. पालक म्हणून इतकी सूज्ञता आमच्या ठायी होती. शाळेत रोज सकाळी प्रार्थनेच्यानंतर गुरुजी एखाद्या विद्यार्थ्याला आजचा सुविचार पुढे बोलवित.आणि मग तो विद्यार्थी हाताची घडी घालत थाटात आजचा सुविचार सर्वांना सांगे. श्रुतीने असा एकादा सुविचार सांगून आपल्या शालेय उपक्रमातील सहभागाची सुरुवात करावी,असे ठरले.म्हणून तिला रोज नवा सुविचार सांगणे सुरु झाले आणि ती शाळेतून घरी आल्यावर ,” सांगितला का आजचा सुविचार ?” असे आमचे रोजचे विचारणेही सुरु झाले. पण हे ही घडत नव्हते. सर्व शाळेसमोर जाऊन एक वाक्य बोलतानाही तिच्या मनातील अबोध भिती तिला आडवी येत असावी. एकेदिवशी मात्र ती शाळेतून आली आणि आम्ही तिला नेहमीच्याच उत्सुकतेने विचारले,”सांगितला आज सुविचार ?”
 “हो,” तिने उत्तर दिले.
“अरे व्वा, कोणता सुविचार सांगितला ?”,माधुरीने तिला थोपटत म्हटले.
“नेहमी खरे बोलावे”, श्रुतीने सांगितले.खरे तर अगदी बाळबोध,पुन्हा पुन्हा सांगून नर्मदेतल्या गोट्यासारखा गुळगुळीत झालेला सुविचार पण श्रुतीने तिच्या लाजाळूपणावर मात केली,याचा आनंद झाला. खरी गंमत झाली संध्याकाळी. तिच्या बनसोडे गुरुजींची आणि माझी गाठ संध्याकाळी फिरायला जाताना पडे.नेहमीप्रमाणे ते त्या दिवशीही भेटले. बोलता बोलता मी त्यांना सहज म्हटले,”चला आमच्या कन्येने अखेरीस तुम्हांला सुविचार सांगितला म्हणायचे?”
गुरुजींनी माझ्याकडे चमकून पाहिले आणि म्हणाले,”नाही आज तर सुविचार शिवप्रसादने सांगितला.मी श्रुतीला दोन तीन वेळा बोलावले पण ती पुढे आलीच नाही.”
 मी घरी आल्यावर घडला प्रसंग माधुरीला सांगितला.आमची हसून हसून मुरकुंडी वळायची वेळ आली. म्हणजे नेहमी खरे बोलावे’, हा सुविचार सांगितल्याचे तिने चक्क खोटे सांगितले होते. प्रसंगातील विरोधाभास म्हटले तर गंभीर म्हटले तर गंमतशीर होता. इवलीशी श्रुती पण तिच्या चेह-यावर अपराधीपणाचे भाव दाटले होते,ती अगदी रडकुंडीला आली होती. तिच्या चेह-यावर एक कन्फेशन अलिखित स्वरुपात उमटले होते. माझे चुकले,’ असेच तिची देहबोली सांगत होती. तिच्या आईने तिला जवळ घेऊन समजावले. आज श्रुती सोळा वर्षांची आहे.एक बाप म्ह्णून नव्हे तर एक त्रयस्थ म्हणूनही एक स्वच्छ नितळ मनाची पोर असेच तिचे वर्णन करावे लागेल. अशा छोट्या मोठ्या टक्क्याटोणप्यातून आपण अधिक निर्दोष,निर्मळ माणूसपणाकडे वाटचाल करित असतो,असे दिसते. महात्मा गांधींचे आत्मचरित्र वाचताना असे कन्फेशनचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात. मी एका कवितेत लिहिल्याप्रमाणे –
जनात जा,वनात जा
दिवसाकाठी एकदा तरी
स्वतःच्याच मनात जा...!”
ही आपल्या स्वसंवादाची पूर्वअट असते. असा अर्थपूर्ण स्वसंवाद साधता आला की देहूच्या तुकोबा वाण्याचा संत तुकारामाकडे तर बॅ.मोहनदास करमचंद गांधीचा महात्मा गांधीकडे अलौकिक प्रवास सुरु होतो. तुकाराम यालाच आपलाचि वाद आपणासी म्हणायचे तर गांधी त्यालाच आतला आवाजम्हणायचे.
  मला राहून राहून माझे हायस्कूलचे मुख्याध्यापक लोंढे सर जे वाक्य म्हणायचे त्याची पुन्हा पुन्हा आठवण होते. स्वतःच्या प्रांजळपणा बद्दल ग्वाही देताना ते नेहमी म्हणायचे,”मी खडकावर उभा आहे आणि मी स्वच्छ आहे.” त्या पोर वयात सरांचे ते वाक्य खूप आवडायचे,खरे तर त्याचा मोह पडायचा.वाटायचे असा एक खडक आपल्यालाही गवसला पाहिजे,ध्रुवपदासारखा! पण प्रत्यक्ष जगताना हे ठायी ठायी जाणवले , असे खडकावर उभे राहून कोणाला जगता येत नाही. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हांला व्यवहाराच्या नकोशा कर्दमात उतरावेच लागते.खडकांवर निर्जिव पुतळे निरंतर उभे राहू शकतात सजीव माणसांना ही मुभा नाही. व्यवहाराच्या लौकिक चिखलातून चालताना पाय बरबटण्याची,केवळ कपड्यांवरच नाही तर खोल आत डाग पडण्याची भिती असतेच.अशा वेळी हा मनाशी संवाद,पश्चातापाची टोचणी,आतला आवाज ऐकू येण्याची क्षमता आणि कन्फेशनचे धैर्य आपल्याला माणूसपणाच्या वाटेवर राह्यला मदत करते.
   माणसाची ही मानसिक गरज सा-या धर्मांनी ओळखली आहे,हे अभ्यासाअंती आपल्या लक्षात येते. धारणा करतो तो धर्म ‘,ही धर्माची सर्वमान्य व्याख्या.या व्याखेनुसार जावयाचे म्हटले तर देव,धार्मिक श्रध्दा,कर्मकांड यांच्या पलिकडे जाऊनही समाज जीवनाचे निकोप नियमन हे धर्माचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. आणि म्हणूनच समाजातील विविध व्यवहाराचे नियमन करण्यासाठी सर्वच धर्मांनी काही नियमावलीही केलेली दिसते. अर्थात आधुनिक कायदाव्यवस्था आणि धार्मिक नियमावली यांच्यात काही मूलभूत फरक आहेतच. थोड्याफार फरकाने सगळे धर्म लौकिक व्यवहाराचे नियमन करतानाच मुख्यत्वे आपापल्या अनुयायांच्या मानसिक उन्नयनाची काळजी घेताना दिसतात. व्यक्तीची मानसिक निरामयता निकोप सामाजिक जडणघडणीसाठी आवश्यक असते,याची सूक्ष्म जाणीव विविध धार्मिक तत्वज्ञानाच्या मुळाशी झुळझुळताना दिसते.अनेक वेळा कर्मकांडे आणि घातक परंपरांच्या शेवाळात हा झरा बुजून जातो,हे ही तेवढेच खरे!   
  कन्फेशन अर्थात अपराधाची कबुली ही व्यक्तीची मानसिक निरामयता जपण्याचा एक प्रयत्न ! ख्रिश्चन, बौध्द, मुस्लिम अशा अनेक धर्मात ही कल्पना वेगवेगळ्या स्वरुपात आढळते. कन्फेशन ही ख्रिश्चन धर्मातील एक महत्वपूर्ण कल्पना आहे. कॅथोलिक पंथात ही अपराधाची कबुली देण्याकरिता धर्मगुरुची आवश्यकता प्रतिपादली आहे. देव आणि मानव यातील ही मध्यस्थाची भूमिका प्रोटेस्टंट पंथात मात्र मान्य नाही. आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आपण आपल्या चुकांची प्रांजळ कबुली परमेश्वराजवळ द्यावी,असे या पंथात मानले जाते. गांधी अपराधाच्या प्रांजळ कबुलीस मनाचा मळ नाहीसा करणारा झाडू म्हणतात. मुस्लिम धर्मातही इस्तिग फार (अस्तगफिरुल्ला) अशी परमेश्वराजवळ आपले अपराध कबूल करण्याची पध्दत आहे.
    धर्मक्षेत्रातील पहिला वहिला मनोवैज्ञानिक,समुपदेशक मानला जाणा-या गौतम बुध्दाने आपल्या धम्मसंघासाठी निर्माण केलेली उपोसथाची पध्दत ही कन्फेशनची अधिक शास्त्रशुध्द पध्दत आहे,यात काही शंका नाही. बौध्द वाड़्मयात विनय पिटक या ग्रंथात संघातील भिक्खूंनी पाळावयाच्या २२७ नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आणि कोणत्या चुकीकरिता कोणती शिक्षा याचेही सविस्तर आणि सोदाहरण वर्णन करण्यात आले आहे. या पैकी जवळपास ९२ चुकांकरिता बुध्दाने पाचित्तिय म्हणजे आपल्या चुकीची ज्येष्ठ भिक्खूसमोर अथवा संघासमोर प्रांजळ कबुली ही शिक्षा सांगितली आहे. आपल्या नियम उल्लंघनाची कबुली कोणाही साधकाला संघासमोर देता यावी,या करिता बुध्दाने उपोसथाची पध्दत शोधून काढली. उपोसथ चांद्रकलेनुसार दर पंधरवड्यात तीनदा आयोजित केले जाई.या दिवशी सर्व भिक्खू उपवास धरित.उपोसथाच्या सभेचे आयोजन केले जाई. सभेत एक भिक्खू एकेक नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून म्हणे,”तुम्ही स्तब्ध आहात यावरुन तुमच्यापैकी कोणीही या नियमाचे उल्लंघन केले नाही,असे मी गृहित धरतो”. नियमाचे उल्लंघन झालेला भिक्खू प्रांजळपणे आपल्या उल्लंघनाची कबुली देई. अपराध घडूनही जर कोणी तो कबुल केला नाही तर अपराध घडताना ज्या भिक्खूने पाहिले आहे तो सभेला त्याची माहिती देई आणि मग न्याय परीक्षा सुरु होई. हा उपसोथाचा प्रकार म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भिक्खूसंघाची सद्सद्विवेकबुध्दी संघटित करण्याचा आणि संघातील कोणाचेही पाऊल चुकीच्या मार्गावर पडणार नाही याची दक्षता घेणारा उत्तम मार्ग आहे. उपासकांचे शील,ध्येय आणि प्रज्ञा उच्च प्रतीची व्हावी रहावी,या साठी अव्याहत प्रयत्न करणे हा या सा-या विनयांचा प्रमुख उद्देश होता आणि आहे. हा सा-या मनाच्या व्यायामाचा भाग आहे. धम्मधारात मी लिहिले आहे –
“देहाइतुका द्या,चित्ताशी व्यायाम
फुलापरी खुले,चित्ताचे आयाम
विकारा नकार,सकार साकार
सम्यक व्यायामे चित्त घे आकार...!”
मन हे अवघ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि या मनाची जडण घडण ही मानवी जीवनाचा पाया आहे,याची सार्थ जाणीव उपोसथ आणि पाचित्तियच्या मुळाशी आहे.” Religion is essentially the art and the theory of the remaking of man. Man is not a finished creation,” या एडमंड बर्कच्या म्हणण्यानुसार ही सारी मानवाच्या जडणघडणीसाठीची उठाठेव आहे.
  आज जणू साक्षात गौतम बुध्दच माझ्यासमोर बसून एक एक विनय (नियम) मला समजावून सांगतो आहे. आज माझा उपोसथ आहे. मी स्वतःला विचारतो आहे, काय पाळला आहेस तू हा नियम ? तुझ्याकडून कळत नकळत उल्लंघन तर नाही ना झाले या नियमाचे ?’ मी स्वतःतच डोकावून बघतो आहे,पुन्हा पुन्हा! स्वतःकडे असे निर्मम होऊन पाहण्याचे धाडस कोठे होते आहे ? मुळात बाहेर पाहण्याची इतकी सवय लागली आहे की आत पाहताही येत नाही की काय ? आणि बुध्द मंद हसत सांगतो आहे-
“ पाहू कशापायी,इतरांचे दोष
सन्मित्रा तयाने,मिळे का संतोष ?
उत्तम त्या परी स्वतःमध्ये पाही
केले बोललो जे,पारखुनि घेई ...!" (धम्मधारा)
आणि मग मी स्वतःचा जीवनपट एखाद्या फ्लॅशबॅक सारखा पाहू लागतो. मनाच्या तळाशी साचलेले अपराधी भाव जपणारे अनेक क्षण पृष्ठभागावर येऊन तरंगू लागतात.
   मी नऊ दहा वर्षांचा असताना एक प्रसंग मला आजही आठवतो आणि माझी मलाच माझी लाज वाटते. हा प्रसंग माझ्या वडिलांसंदर्भात घडला होता पण मी त्यांना कधी या संदर्भात बोलल्याचे मला आठवत नाही. पण माझ्या मनात अजून ताजा आहे. त्याचे झाले असे,माझ्या चुलत मावशीचे लग्न सोलापूरजवळील बाळे या छोट्याशा गावात होणार होते. माझी मावशी माढा तालुक्यातील धानोरे गावची तेथून बाळे फार तर पन्नास किलोमीटर दूर पण त्या काळात दळणवळणाची एवढी सोय नव्हती त्यामुळे आम्ही सारे व-हाडी बैलगाड्यातून बाळ्याला निघालो. एक वेगळीच मजा होती तो प्रवास म्हणजे ! आजच्या तुलनेत एवढेसे अंतर पण मला आठवते आम्ही रस्त्यात एका गावाजवळ मोठ्या वडाच्या झाडाखाली थांबलो.गाडीवानांनी गाड्या सोडल्या.आणि बायकांनी दगडाच्या चुली मांडून मस्त भाक-या बडवल्या,गरम गरम पिठले बनविले आणि झाडाखाली एका कातळावर बसून आम्ही त्या गरम गरम भाकरी पिठल्याचा स्वाद घेतला. रमत गमत आम्ही बाळ्याला पोहचलो.बाळ्याला खंडोबाचे मोठे मंदिर आहे. तिथेच कोठे तरी आमची राहवयाची व्यवस्था होती असे धूसरसे स्मरते. सकाळी उठल्यानंतर माझे वडील म्हणजे आप्पा मला घेऊन मंदिराजवळच असलेल्या एका शेतात गेले. शेतामध्ये मोठी विहिर होती.आप्पा म्हणाले,”राजू, आपण झकासपैकी या विहिरीत आंघोळ करु या.  लग्न घरी मोठी धांदल असेल कशाला उगी पाहुण्यांना त्रास ?” मला पोहता येत नसल्याने पाण्याची खूप भिती वाटे.मी घाबरुन म्हटले,” मला नको,तुम्ही पोहा खुशाल !”
“ अरे घाबरट ,तू विहिरीच्या पायरीवर बस.मी तुझ्या अंगावर तांब्याने पाणी ओततो,मग तर झाले,” आप्पांनी माझी समजूत काढली.
आम्ही दोघे विहिरीत उतरलो.मी अगदी पाण्याजवळच्या पायरीवर बसलो. आप्पांनी मला आंघोळ घातली आणि मग मला म्हणाले,”आता जा तू वर ,अंग पुसून घे.मला नाही अशी बुडूबुडू आंघोळ आवडत. मी जरा विहिरीत दोन हात मारतो.कालच्या बैलगाडीच्या प्रवासाने अंग आंबून गेले आहे.जरा पोहले म्हणजे छान वाटेल.”
 मी वर आलो आणि टॉवेलने अंग पुसू लागलो. अंग पुसत असतानाच एकदम,” ये पोरा…” असा राकट आवाज आला.मी आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक भला धिप्पाड माणूस समोरच्या लिंबाच्या झाडाकडून माझ्याकडे येत होता.अंगात बंडी,गुडघ्यापर्यंत धोतर,हातात तांब्याचे कडे,भरघोस मिश्या आणि तांबारलेले डोळे!त्याला बघून माझी तर घाबरगुंडीच उडाली.
“आरं हरामखोरा,हिरीत पवलास व्हय रं ?थांब तथंच थांब तुला बुडीवतोच त्या पान्यात!,” मी इतका घाबरलो होतो की मला काय करावे तेच सुचेना. तेवढ्यात तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझी बकोटीच धरली.
“खरं सांग, पवलास की नाय हीरीत ?”
त्याचा तो अवतार बघून मी इतका घाबरलो होतो की मी त्याला बोलून गेलो,”नाय नाय मी नाय पोहलो तुमच्या विहिरीत,तो बघा, तो माणूस पोहतोय,” असे म्हणून मी विहिरीकडे बोट केले.
विहिरीत तर आप्पा – माझे वडील पोहत होते आणि एका प्रचंड भितीने मी चक्क त्यांना तो माणूस म्हणून संबोधले. मी इतका घाबरलो होतो की,त्या क्षणी मला त्या माणसाच्या तावडीतून फक्त माझी सुटका करुन घ्यायची होती. मला आप्पांची काळजी नव्हती की ते मोठे असल्याने तो आप्पांना काही म्हणणार नाही,असे मला वाटले.कोण जाणे?माझ्या त्या क्षणीच्या मनोव्यापाराची मला कल्पना नाही पण आजही तो प्रसंग आठवला की,मला माझ्या अप्पलपोटेपणाची भयंकर शरम वाटते. अरे तू लहान होतो त्यावेळी.या वयात काही कळते का?,” असे म्हणून माझे दुसरे मन माझी समजूत काढू लागते पण काही केल्या माझी समजूत निघत नाही. आजही पुन्हा पुन्हा तो प्रसंग मनाच्या पृष्ठभागावर येत राहतो आणि मनाला छळत राहतो. खरे तर नंतर त्या विहिरीच्या मालकाची आणि आप्पांची नंतर काही बाचाबाची बिलकुलच झाली नाही. आप्पा बोलता बोलता माणसाला आपलेसे करतात. तंबाखूचा बार भरता भरता माणसे आपलीशी करण्याची कला आप्पांना चांगलीच अवगत आहे.गावाकडच्या माणसांची आणि त्यांची गट्टी तर लगेच जमते. त्या दिवशीही तेच झाले.आप्पा आणि त्याच्यात काय संभाषण झाले हे आज मला स्मरत नाही पण आप्पा आणि तो अगदी जुन्या मित्रांसारखे गप्पा मारत विहिरीकडून येताना मला दिसले. मी मात्र कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखे लग्न घरी परतलो.   
   कुणाचे पुस्तक चोर,कुणाची पट्टी चोर,कुणाशी मारामारी कर माझ्या बालपणी अशा छोट्या मोठ्या चुका खूप केल्या पण या प्रसंगासारखा त्यांचा कोणताही व्रण माझ्या मनावर नाही.
     कन्फेशनसाठीच उभा आहे म्हटल्यावर आणखी एका गोष्टीबाबत बोलले पाहिजे. माझ्या वैवाहिक आयुष्यात काही महत्वपूर्ण जबाबदा-या पाळण्याच्या बाबतीत मी अक्षम्य चुका केल्या याचीही बोचरी खंत माझ्या मनात आहे. एवढ्या वैयक्तिक गोष्टी बोलाव्यात का ? पण कन्फेशन म्हणजे शब्दशः नागवे होणे.गरज पडली तर अंगावरची त्वचा देखील सोलून काढता आली पाहिजे,असे वाटते खरे पण माझे सामर्थ्य इतके नाही. सतीश काळसेकरांनी म्हटल्याप्रमाणे तडकली वस्त्रे जरी,मज नग्नता बघ येईना.’ सत्याची इतकी तीव्रतर धग सहन होत नाही. मी वैद्यकीय डॉक्टर ...डॉक्टरकीची पदवी हातात पडण्यापूर्वीच मी घरच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय विवाह केला. मी एका वेगळ्याच पुस्तकी जगात जगत होतो. मला खेड्यात जाऊन लोकांची सेवाही करायची होती. पदव्युत्तर शिक्षण घेऊन  मी गावी आलो. आंतरजातीय विवाहाचे वेगळेच मानसिक ताणतणाव घरीदारी जाणवत होते. त्यात एकुलती एक बहीण लग्नाची.भावाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिचा विवाह नीट जमेल की नाही,ही सर्वांची रास्त काळजी. एकीकडे मी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो.माझा एक चांगला,लोकाभिमुख डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत लौकिक वाढत होता.लोकांना कुटुंब नियोजन सांगणारा मी स्वतः मात्र त्यात अपयशी ठरलो. आज मला काहीच नीटसे कळत नाही. माझे भोंगळ वागणे की एकत्र कुटुंबामुळे प्रायव्हसीचा अभाव म्हणून पण माधुरीची चार वेळा ऍबार्शन करावी लागली.आम्ही वापरायचो ती सेफ पिरियड मेथड इतक्यावेळा फेल गेली. विचार करु लागलो म्हणजे मला माझ्या डॉक्टरकीचीच लाज वाटू लागते. कुटुंब नियोजन ही दोघांची जबाबदारी,ही गोष्ट खरीच पण आपल्या पुरुष प्रधान व्यवस्थेतील नवरा म्हणून आणि त्यात ही पुन्हा डॉक्टर म्हणून ही माझी जबाबदारी अधिक होती.पण मी त्यात सपशेल नापास झालो. मी आणखीन एक मोठी चूक केली किमान स्वतःची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करुन घ्यायची तर नाही इथेही मी माधुरीला पुढे केले. मला आज याचे आश्चर्य वाटते की तो विचारच माझ्या मनात त्या वेळी कसा आला नाही. गोरोबा कुंभारांच्या भाषेत माझे गाडगे  कच्चेच राहिले. मनातल्या विचारांना कृतीचा शेक मिळालाच नाही. आज कधी कधी पुण्यातल्या माझ्या पत्त्यात कर्वेनगर असे लिहताना माझे मलाच शरमिंधे होते. स्वातंत्र्यपपूर्व काळात जगतानाही रधों सारखी माणसं काळाच्या किती पुढे होती आणि आज त्यांच्यानंतर सुमारे पाऊणशे वर्षानंतर जगणारा मी काळाच्या किती मागे आहे,ही जाणीव मला अंतर्बाह्य होरपळत ठेवते.
   अर्थात ही अंतर्बाह्य होरपळ कुसुमाग्रजांप्रमाणेच मला माझे सूर्याशी असलेले नाते स्पष्ट करते कारण ही होरपळ असते त्या आदिम तेजाने मला दिलेले शासन आणि पुन्हा नव्या उजेडाचे आश्वासनही !

               ( 'पुरुष उवाच' दिवाळी अंक २०१३ मध्ये प्रकाशित)

§   डॉ.प्रदीप आवटे,
सी-१०४, सुवर्णरत्न गार्डन सोसायटी,
कमिन्स इंजिनिरिंग कॉलेज जवळ
कर्वेनगर,पुणे -५२ 
मोबाईल -९४ २३ ३३ ७५ ५६

No comments:

Post a Comment