Saturday, 12 July 2014

ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी – ईश्वर डॉट कॉम



ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी
 – ईश्वर डॉट कॉम
-  डॉ.प्रदीप आवटे
       


 आजच्या उत्तर आधुनिक जगातील व्यक्ती,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सा-यांचेच आपल्या वस्तुनिष्ठ अस्तित्वासोबतच एक आभासी अवकाश देखील अस्तित्वात आहे. जग व्यापून टाकणा-या इंटरनेटच्या डब्ल्यूच्या बाराखडीत सगळ्यांची आभासी संकेतस्थळं दडली आहेत. ईश्वर – खरे तर ज्याच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाचाच कोणताही पुरावा नाही त्याने व्यापलेले अवकाश मात्र मानवी अस्तित्वाच्या वर्ल्ड वाईड वेबमध्ये सर्वाधिक आहे आणि त्याच्या भोवती धर्म, संस्कृती, श्रध्दा,परंपरा यांची सर्वशक्तीमान बेटे तयार झाली आहेत. मानवी जगण्यावर या सर्वशक्तिमान संकेतस्थळांची सत्ता सार्वभौम म्ह्णावी इतकी व्यापक आहे ईश्वर डॉट कॉम या कादंबरीत या संकेतस्थळांची कोड लॅंग्वेज डिकोड करत ही मुळातच फेक असलेली वेबसाईट मोडीत काढण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न विश्राम गुप्ते यांनी केला आहे.
   देवनगरी नावाच्या एका काल्पनिक शहरात घडणारी ही कथा गुप्ते यांनी अगदी नर्म विनोदी शैलीत सांगितली आहे आणि म्हणूनच अत्यंत गंभीर विषयावर तितक्याच गांभीर्यपूर्वक भाष्य करत असूनही कादंबरी आपल्याला अत्यंत खेळकरपणे टपल्या मारत आपल्या जुनाट पण सवयीच्या झालेल्या टोप्या उडवते आणि जागोजागी खळकन हसवते,हसवता हसवता पुन्हा अंतर्मुखही करते. खरे तर ही कादंबरी म्हणजे देवनगरीतील एका इंटेल्युक्चियल स्टडी सर्कलची गोष्ट आहे. सर्कल इज अ सर्कल जिकडं सरकल, तिकडं सरकल’, अशी सर्कलची एक गंमतशीर व्याख्या केली जाते,गुप्तेंचे स्टडी सर्कल या व्याख्येचे मूर्तिमंत रुप आहे. प्रोफेसर व्हिक्टर डिसुझा हा कॉमर्सचा प्राध्यापक असलेला गृहस्थ या स्टडी सर्कलचा सर्वेसर्वा...! बुध्दिमान विदूषक मेंडीस,सॉसेजचा इनसायक्लोपिडीया असलेला जॉन,जमीनदार कुळातून आलेला रॉय ,ऑन केलेल्या मिक्सरसारखे सतत डोके व्हायब्रेट होणारा पीटर, दलित लाडू, सतत धाप लागणारा पण फ्रेश फिशची पारख असणारा साविओ, छुपी कट्टरता बाळगणारा सिरील, त्या शिवाय हिंदू संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणारा दत्ताराम, विशीतला परशुराम आणि मेंडेलिन, लुईझा, शांती आणि रेश्मा ही उत्साहाने फुरफुरणारी महिला ब्रिगेड...हे सारे या स्टडी सर्कलचे सदस्य ! या सर्कलचा प्रत्येक नमुना ऑफ बीट आहे. या सा-यात आपल्याला गोष्ट सांगणारा निवेदक, तो ही या सर्कलचा भाग आहे. जगण्याच्या प्रत्येक खिडकीत डोकावण्याची बालसुलभ उत्सुकता असलेला आणि प्रत्येक नव्या दर्शनासोबत युरेका युरेका म्हणत आर्किमिडीज उत्साहाने नागव्याने नाचणारा आणि जे त्याला गवसले, दिसले ते तितक्याच स्फटिक स्वच्छ पध्दतीने आपल्या पर्यंत पोहचविणारा निवेदक हे या कादंबरीचे बलस्थान आहे. “लौकरच चार तरुण मुली प्रोंच्या सर्कलमध्ये सामील झाल्या.पण ती गंमत पुढे येईलच,” अशा परंपरागत ह.ना.आपटे शैलीत बोलणारी ही कादंबरी प्रत्यक्षात मात्र परंपरेचा हरेक पापुद्रा कांदा उलगडावा तशी उलगडत जाते.शैली आणि आशय यांच्यातील हे कॉन्ट्रास्ट मॅचिंग वेधक आहे.
   असे हे सर्कल प्रत्येक आठवड्याला नियमितपणे भेटते आहे. काळाला बारकाईने वाचू पाहणा-या प्रो.डिसुझांना नवं काही घडावं असं सतत वाटत राहतं. नव्या युगातला माणूस ईश्वर,श्रध्दा, तथाकथित संस्कृती आणि परंपरांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे,यासाठी त्यांचा अवघा चर्चा प्रपंच आहे. पण या सर्कलाला कोणताही विषय वर्ज्य नाही. ईश्वरी साक्षात्कारापासून ते समलिंगी संबंधापर्यंत सारे काही चहा बिस्किटासोबत चगळले जाते.  आजूबाजूला घडणा-या प्रत्येक घडामोडीवर खमंग चुरचुरीत चर्चा झडते आहे. सतत इकडे तिकडे भरकटणारे हे चर्चेचे जहाज हरेकवेळी योग्य मार्गावर आणण्याचे म्हत्कार्य प्रोंचे आहे. अर्थात हे भरकटणे निव्वळ बिटिंग अबाऊट द बुश नाही, ते आपल्याला अनेकदा योग्य रस्ता शोधण्याला मदत करणारे आहे. मेंडीस, जॉन आणि रॉय या त्रिकुटांच्या गमती जमतीतून अंतर्मुख करणारे निरिक्षण आपल्यापर्यंत पोहचते. अजगराची उशी करुन झोपणारा शीर्षासन स्पेशॅलिस्ट अवलिया पॉल,  रात्रीच्या गोंगाट करणा-या बीचवरील पार्ट्या बंद पडाव्यात म्हणून एग बॉम्ब फेकणारा सनातनी हेकट नथन अंकल, करिष्माटिक ग्रुपची विल्मा या सा-या पात्रांनी या चर्चात्मक कादंबरीला नवा नवा आयाम दिला आहे. स्टडी सर्कलच्या अनेक वादविवादातून, निवेदनातून अनेक नवी दृष्टी देणारी वाक्ये लोण्याच्या गोळ्यासारखी आपल्या हातात पडतात. “श्रद्धा ही अंडरवेअरसारखी खाजगी गोष्ट असते.ये अंदर का मामला है...” ,”आमच्या शहरातले सगळी चर्च, सगळ्या मशिदी आणि सगळी देवळं कायम नवी कोरी दिसतात.माणसाची त्वचाही भिंतीसारखी दणदणीत,रंगोत्सुक आणि रंगशोषक असायला हवी होती.मग माणसं जुनी दिसलीच नसती.आली दिवाळी किंवा ख्रिसमस किंवा ईद की मारला त्वचेला नवा रंग,न्यू मॅनहोणं किती सोपं झालं असतं मग !” हे त्याचे काही मासले. परंपरा,जुनाट तर्कदुष्ट श्रध्दा,देवभोळेपण या सा-यांचे जुनाट पापुद्रे खरवडून काढून नवं होण्याची असोशी,तगमग या कादंबरीच्या गुदगुल्या होत असलेल्या कातडीखाली वाहते आहे. आणि म्हणूनच रुढार्थाने कोणताही प्रोटागोनिस्ट नसलेल्या या कादंबरीचा अवतीभवती पसरलेला परंपराग्रस्त समाज हाच खरा नायक आहे.
 पण प्रो. डिसुझांच्या पत्नी कॅरलने म्हटल्याप्रमाणे केवळ “टॉक टॉक आणि टॉकणा-या या कंपूला पॉल,नथन अंकल अशा अनेकांनी टोचल्यानंतर आपल्या टॉक प्रमाणे काही वॉक वॉक वॉक ण्याचीही इच्छा होते. त्यानुसार पूर्वाश्रमीच्या दलित ख्रिश्चनांना आजही चर्चमध्ये मागे बसावे लागते, या छुप्या जातीयतेविरुध्द सर्कल बंड पुकारते पण दलितवाड्यातील हे बंड सेंट जेरॉम चर्च पर्यंत न पोहचताच थंड होते त्यानंतर वेताळबाबाच्या बड्डेला हजारो वर्षांपासून होत असलेल्या रेडा बळीची प्रथा बंद पाडण्यासाठी स्टडी सर्कल सरसावते आणि गनिमी काव्याचा वापर करुन यशस्वीही होते. कादंबरीच्या कथेचा ऐवज म्हटले तर एवढाच आहे पण रानात पळून गेलेल्या रेड्यासारखा धर्म,परंपरा,श्रध्दा आणि संस्कृती यांच्या खुंटीला युगानुयुगे बांधलेला आपला विवेकही ते दावे तोडून मोकळा होऊन विशाल मानवतेच्या रानात मोकळा श्वास घेऊ पाहतो,हे या कलाकृतीचे यश आहे.
    विश्राम गुप्तेंची शैली अत्यंत लक्षवेधक आहे. वरवर पाहता केवळ बौध्दिक चर्चांचा भरणा असलेली कादंबरी कोठेही कंटाळवाणी होणार नाही,याची दक्षता गुप्तेंच्या नर्म विनोदी आणि खेळकर शैलीने घेतली आहे. त्याचवेळी मुळात फारसे काहीच घडत नसलेल्या या कथेत वाचकांनी खिळून राहण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली पॉल,नथन अंकल, विल्मो, नताशा,पीटर ही स्वतःभोवती धुक्यासारखी विरविरित गूढता पांघरणारी पात्रे साह्यभूत ठरतात आणि त्याचवेळी कादंबरीच्या मध्यवर्ती चर्चेला पुढे नेतात. पीटरचे शांग्रीलाहे घर,त्याची पियानो वाजविणारी बहीण नताशा,तिचे चुंबकीय लावण्य या सा-यांचे वर्णन करताना गुप्तेंची नर्म विनोदी लेखणी रोमॅंटिक,गूढरंजनवादी कवितेसारखी वाहू लागते. कादंबरीतील हे भाग कमालीचे वाचनीय झाले आहेत. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ अर्थपूर्ण  आणि मार्मिक आहे.
   ही कादंबरी घडते देवनगरी या काल्पनिक शहरात..! पण हे शहर आहे कोठे ? गुप्ते म्हणतात,तुमच्या माझ्या सभोवती. असे असले तरी ही देवनगरी म्हणजे गोवा आहे,हे कोणाही चाणाक्ष (?आत्मस्तुती) वाचकाच्या सहज लक्षात येईल. समुद्र किनारा, ख्रिश्चनबहुल लोकसंख्या, बीचवर अत्यल्प कपड्यात फिरणारे परदेशी पर्यटक हे सारे असल्यावर आणि काय असणार ? आणि म्हणूनच धर्म आणि ईश्वर या विषयाभोवती फिरणारी ही कादंबरी मुख्यत्वे ख्रिश्चन आणि हिंदू धर्माभोवती फिरते. वास्तविक पाहता भारत नावाच्या देवनगरीत अवघे राजकारण हिंदू –मुसलमान या द्वैताभोवती फिरत असताना कादंबरी मुस्लिम धर्माबाबत काही भाष्य करत नाही. प्रों.च्या स्टडी सर्कल मध्ये एकही मुस्लिम नाही. जी गोष्ट मुस्लिम धर्माची तीच बौध्द धर्माची..! ईश्वर नाकारणा-या विचारवंताचे ईश्वरीकरण कसे होत जाते,या परिप्रेक्षातही बुध्द या चर्चेत अनिवार्य ठरतो. राजकारण आणि  धर्म – संस्कृतीच्या आंतरसंबंधाबद्दल ही कादंबरी नेमके भाष्य करायचे टाळते. जातीव्यवस्थेचा उल्लेख असला तरी आरक्षण आणि त्याचे राजकारण या दलदलीत शिरायचे धाडस कादंबरीकार करत नाही. प्रस्थापित धर्म आणि परंपरा यांना ढुसण्या देणारा व्हिक्टर डिसुझा हा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. शिक्षणसंस्थांमध्ये नोकरी करताना या प्रकारचे काम करताना होणारा त्रास, शिक्षणसंस्था,विद्यार्थी संघटना आणि राजकारण या सा-या बाबींकडे डोळेझाक झाली आहे. दैनिक भंबेरी आणि दंडेली सारख्या वर्तमानपत्रांच्या उदाहरणातून आजच्या जगातील माध्यमांची दिवाळखोरी गुप्ते दाखवितात पण २०१२ मधल्या या देवनगरीत २४ × ७ चालणारे,टॉक शोंचे गु-हाळ चालविणारे एकही न्यूज चॅनेल नसावे याचे आश्चर्य वाटते. कथानकातील सोशल मिडिया आणि त्यावरील स्टेटस युध्द यांचा अभावही खटकतो.
   पण या सा-या मर्यादा मान्य करुनही “बर्फाची लादी झालेला  देवनगरीतला हा अनादी अनंत काळ केव्हा तरी वितळेल.मग इथली माणसं नवी होऊन झरझर,झुळूझुळू वाहू लागतील.तेव्हा कुठे इथे नवी संवेदना जन्म घेईल,”असं म्हणणा-या प्रो.डिसुझांचा आशावाद आपल्या आजच्या गोठलेल्या काळात रुजविण्यासाठी आणि ही बर्फाची लादी वितळविण्यासाठी ही कादंबरी एक प्रामाणिक आच, एक ह्रदयस्पर्शी, हवीहवीशी वाटणारी ऊब निर्माण करते, हेच तिचे ईप्सित आहे आणि यातच तिचे वेगळेपण दडले आहे. 
(मुक्त शब्द - जुलै २०१४)

No comments:

Post a Comment