Thursday, 23 January 2025

मि. प्रेसिडेंटपेक्षा मरियन बडी !

                

           दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर नॅशनल प्रेयर सर्विस निमित्ताने बोलताना वॉशिंग्टन शहराच्या पहिल्या महिला बिशप मlरियन बडी यांनी आपले विचार व्यक्त केले. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षासमोर बोलताना साठी ओलांडलेल्या मेरियन बडी यांनी जे धाडस दाखवले आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्यांचे हे छोटेसे भाषण नीट ऐकले तर ते ऐकता ऐकता १८९३ साली शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचे सूर आपल्या कानावर पडू लागतात, इतके हे भाषण महत्त्वाचे आहे. मानवी जगण्यातील धर्मासह साऱ्या संकल्पनाच आपला अर्थ हरवून बसलेल्या असताना धर्म या संकल्पनेची नेटकी व्याख्या देखील मरियन बडी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवली आहे.


मरियन बडी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून, त्यांच्याकडे पाहत अत्यंत नम्रपणे त्यांना सांगतात, 

"मला तुम्हाला एक शेवटची विनंती करायची आहे. मिस्टर प्रेसिडेंट, लाखो लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय आणि जसं तुम्ही काल अवघ्या देशाला सांगितलं, त्या प्रेमळ परमेश्वराचा सर्वशक्तिमान हात तुमच्यासोबत आहे.
त्या आपल्या परमेश्वराची आठवण ठेवत मी आपल्याला सांगू इच्छिते की, आपल्या देशातील अनेक लोक खूप घाबरलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही दयार्द बुद्धीने वागावे
 गे, लेसबियन आणि ट्रांसजेंडर मुलं प्रत्येक कुटुंबात आहेत, मग ती कुटुंब डेमोक्रॅटिक असतील,रिपब्लिकन असतील की स्वतंत्र विचारांची!  ही सगळीच त्यांच्या जीवाच्या भीतीने घाबरून गेली आहेत."


"...आणि ते लोक जे आपली पिकं काढायला मदत करतात, आपल्या ऑफिसची स्वच्छता करतात, आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये, आपल्या मिटपॅकिंग प्लांट्स मध्ये काम करतात, आपण हॉटेलमध्ये जेवल्यावर आपली ताटं विसळतात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करतात, कदाचित ते आपल्या देशाचे नागरिक नसतील किंवा त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नसतील पण या स्थलांतरित लोकांपैकी बहुसंख्य लोक हे गुन्हेगार नाहीत. ते टॅक्स भरतात, ते आपले चांगले शेजारी आहेत. ते आपल्या चर्च,  मशिदी, सिनेगॉग, गुरुद्वारा आणि मंदिरांचे विश्वासू सदस्य आहेत."

"मिस्टर प्रेसिडेंट, आपला समाजातील ज्या मुलांना आपले पालक आपल्यापासून हिरावून घेतले जातील अशी भीती वाटते त्या सगळ्यांसाठी मी दयेची याचना करते आणि युद्धजन्य भागातून,प्रचंड छळाला त्रासून जे लोक आपापले देश सोडून इथं आसऱ्यासाठी आले आहेत त्यांना सहानुभूतीने आणि प्रेमाने वागवलं जावे अशी विनंती करते."

 "आपला परमेश्वर आपल्याला शिकवतो की, अनोळखी माणसांसोबत दयेने वागा आणि आपण विसरता कामा नये की आपणही कधीकाळी या देशामध्ये अनोळखीच होतो."

 "तो सर्वशक्तिमान आभाळीचा बाप प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेने वागवण्यासाठी आवश्यक अशी ताकद आणि धाडस आपल्याला देवो,  एकमेकांशी प्रेमाने सत्य बोलण्याची क्षमता देवो आणि आपण सर्वांनी एकमेकांसोबत आणि आपल्या परमेश्वरासोबत ही वाट चालताना या देशातील आणि जगातील सर्व लोकांच्या भल्याचाच विचार आपल्या मनात असो !"

या भाषणात काय नाही? ज्ञानदेवाचे अवघे पसायदान इंग्रजी भाषेत अनुवादित केले तर ते याच्याहून वेगळे काय असेल ? 'दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती 'या तुकोबाच्या अभंगाचा आशय याहून वेगळा कसा असेल?  धर्म समाजाची धारणा करतो आणि म्हणून समाजातील प्रत्येक माणसाची काळजी त्यानं आपुलकीने आणि जिव्हाळ्यानं घेतली पाहिजे आणि जर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसणारे लोक माणसांमध्ये भेदभाव करत असतील तर 'भेदभाव धर्म अमंगळ' हे उच्च रवाने ठणकावून सांगण्याचे धाडस देखील खऱ्या धार्मिक व्यक्तीत असले पाहिजे. कारण खरी धार्मिक व्यक्ती ही भित्री आणि सत्तेपुढे नमणारी नसते तर वेळप्रसंगी सत्तेला देखील दोन शब्द सुनावण्याचे नैतिक धैर्य तिच्या अंगी असते.'अंकल टॉम्स केबिन ' लिहिणाऱ्या 
हॅरियट बीचर स्टोवेबद्दल बोलताना,' अमेरिकन यादवी युध्दाला कारणीभूत ठरलेली एक एवढीशी स्त्री ' असे उद्गार अब्राहम लिंकन यांनी काढले होते. परवाच्या भाषणानंतर आणखी एक एवढीशी मरियन प्रेसिडेंट पेक्षा बडी वाटली, हे मात्र खरेच !

अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हे सारं प्रवचन अत्यंत बोअरिंग आणि त्रासदायक वाटलं. मेरीयन बडी यांनी देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे असे ट्रम्प यांनी याबद्दल म्हटले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदारांनी तर देशाबाहेर पाठवण्याची व्यक्तींची जी यादी आपण तयार करतो आहोत त्यात या बिशप बाईंचे नाव पहिले असले पाहिजे,असेही म्हटलं.  

दया, क्षमा,शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणाऱ्या माणसांचं बोलणं कंटाळवाणे आणि बोअरिंग वाटावं, त्रासदायक वाटावं ,असाच हा सारा काळ आहे. धर्माच्या नावावर मॉब लिंचींग, आगी लावणे, दंगली भडकावणे हे जिथे समाजसंमत होत चालले आहे तिथे दया क्षमा शांती आणि प्रेमाची गोष्ट करणारी माणसं वेडपटच ठरणार आहेत. त्यांना प्रत्येक देशाबाहेर हाकलण्याची मागणी होत राहणार, कदाचित त्यांचा कोणताच देश नाही.

आणि तरीही ' वैष्णव जन तो तेने कहीये ,जो पीर पराई जाने रे,' असे सांगणारे आमच्या गुजरातचे नरसी मेहता अजून कालबाह्य झालेले नाहीत, याची खूण परवा या मरियन बाईंना ऐकताना झाली आणि मन विलक्षण आनंदाने ओसंडून वाहू लागले.
मनात आले,   

"स्वतः भोवती फिरत राहिलेल्या
पृथ्वीचा अक्ष पदर,
अजूनही          
पुरता ढळलेला नाही,
अजूनही ध्रुवीय प्रदेशातील
सगळेच बर्फ वितळलेले नाही.

अजूनही तरेल हे जग...
नक्कीच !" 

~ प्रदीप आवटे.

3 comments:

  1. खुपच सुंदर, अप्रतिम असा हा लेख, आदरणीय सर... तमाम प्रज्ञावंताच्या काळजाला हात घालणारा, मा. मारियन बडी यांचे बडेपन अतिशय कमी शब्दात आपण विस्तृतपणे रेखाटले आहे, धन्यवाद सर...

    ReplyDelete
  2. खूपच महत्त्वाच्या विषयावर लिहिलेय डॉक्टर साहेब आपण. अमर्याद सत्ता मिळालेल्या सत्ताधिशांपुढे धीरोदात्तपणे बोलणारी लोकं खरं तर आज समाजाची हिरो व्हायला हवीत.

    ReplyDelete
  3. Very Excellent 👍👍👍 Need of Time...
    Thanks a lot Dr. Saheb.
    samyak

    ReplyDelete