Saturday, 24 May 2025

डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून...


प्रदीप आवटे,

पुणे.

दिनांक – २७ जून २०२४

 

प्रिय डॉ. राजेंद्र,

तुला मी लिहित असलेलं कदाचित हे पहिलं पत्र असेल. अलिकडील काळात तर मोबाईल, व्हॉटस अप यामुळे  बोलणे सोपे झाले आहे. पत्राची मुळी गरजच पडत नाही. पण पत्र ही खूप सुंदर गोष्ट होती. तसं पाह्यलं तर आताही मी तुला टाईप करुन लिहतो आहे, पत्र तर आपण कागदावर छानपैकी पेनने वगैरे लिहायचो. त्या पत्राला लोक अर्धी भेट म्हणायचे. चलो , जाने दो..उगीच जुन्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा.. हेच खरे.

अलिकडे माझा डावा गुडघा चालताना अधूनमधून दुखतो तेव्हा अगदी तीव्रतेने तुझी आठवण येते. वाढत्या वयासोबत हाडाच्या डॉक्टरची आठवण प्रत्येक कळेसोबत येत राहते. म्हणून तर  ‘काय हवे ते माग’, असे कृष्णाने म्हटल्यावर कुंती कृष्णाला म्हणाली ना, ‘ देवा, मला दुःख दे.” दुःख, वेदना माणसाला जोडणारी गोष्ट असते. तुझा मला खरोखरच मनापासून अभिमान वाटतो. एका साध्यासुध्या घरात जन्मलेल्या आणि कोणतीच पार्श्वभूमी नसलेल्या तू कुठल्या कुठं भरारी मारली आहेस. आजही हायवेवरुन येता जाता तुझे हॉस्पिटल पाहताना मन एका विलक्षण आनंदाने भरुन येते. हॅटस ऑफ टू यू.

पण आज एका वेगळयाच कारणाने तुला लिहायला बसलो आहे. आज सकाळी ९ च्या आसपास तू ‘आपली माणसं’ या आपल्या ग्रुपवर एक फॉरवर्डेड मेसेज पाठवलास. खरं म्हणजे आज सकाळपासून मी पब्लिक हेल्थ इमर्जंसी ॲन्ड डिझास्टर मॅनेजमेंट या सीडीसी वर्कशॉपमध्ये बिझी आहे. पण तो तुझा मेसेज वाचल्यापासून माझे कशात लक्षच लागेना. मी बराच अस्वस्थ झालो. थोडा वेळ काढला आणि तुला लिहायला बसलो.

तुझी आणि माझी राजकीय मते वेगळी आहेत. आणि त्यात काहीच हरकत नाही. प्रत्येकाला आपापली राजकीय मते असतात. त्यात वावगे काहीच नाही. पण आजच्या तुझ्या मेसेजमध्ये केवळ राजकीय मते नव्हती. आणखी काही तरी गंभीर होते. मला एक माणूस म्हणून , एक डॉक्टर म्हणून काळजी वाटली. एका पत्रकाराची ही पोस्ट आहे. त्यात हिंदू व्यक्तींनी अवयव दान करताना आपला अवयव केवळ हिंदूनाच मिळावेत अशी अट घातली पाहिजे, असे म्हटले आहे. का तर, मुस्लिम व्यक्ती अवयवदान करत नाहीत केवळ अवयव घेतात , असे या पत्रकार महोदयांनी म्हटले आहे. असा मेसेज तू फॉरवर्ड केला आहे, हे पाहून मला धक्का बसला.

 हा पत्रकार कोण , ते जे बोलतात ते खरे की खोटे हे नंतर पाहू पण अवयवदान करणा-या हिंदूंनी आपले अवयव केवळ माझ्या धर्माच्याच माणसाला मिळावेत , अशी अट घालणे तुला डॉक्टर म्हणून योग्य वाटते ? केवळ हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा, मुसलमान दुकानदारांकडून खरेदी करु नका, हे आजवर ऐकले होते पण हे त्याहून गंभीर आहे. ‘ म्हाद्याचं रक्त ममद्याला, रक्त लागतं समद्याला,’ अशी घोषणा देत मी कोर्टी परिसरात किती तरी रक्तदान शिबिरे घेतली आहेत. उद्या हिंदूने आपले रक्त हिंदूनाच द्यावे असेही आपण म्हणायला लागू की काय असे वाटले क्षणभर.  

मला आतून भ्यायला झाले.

आपण डॉक़्टर आहोत, राजेंद्र. आपलं नातं फक्त माणसाच्या दुःखाशी आहे, त्याच्या जातधर्माशी नाही. आपण हिपोक्रेटिक शपथ घेऊन डॉक्टरकीची पदवी घेतली आहे. आपल्यासाठी सगळी माणसं सारखी आहेत, असली पाहिजेत. जगात कुणी काहीही म्हणेल आपण माणूस जपला पाहिजे. कुणाचीही असो, वेदना, कळ, दुःख हलकं करणं एवढंच आपण शिकलो आहोत. आपण जर वेदना असलेला माणूस कोणत्या धर्माचा आहे हे पाहून त्याला उपचार देऊ लागलो तर आपल्या डॉक्टरकीचाच तो पराभव असेल. मे बी, तू फार विचार न करता , अगदी नेहमी प्रमाणे कॅज्युएली हा मेसेज पाठवला असशील पण तो मेसेज अत्यंत माणूसद्वेष्टा आहे. माणसाला माणसापासून दूर करणारा आहे. तुला इमिली डिकिंसनची कविता आठवते ना, जी कनिंगहॅमच्या पहिल्या पानावर छापली होती,

“If I can stop one heart from breaking,

I shall not live in vain;

If I can ease one life the aching,

Or cool one pain,

Or help one fainting robin

Unto his nest again,

I shall not live in vain.”

मला कधी कधी ही कविता तुझ्यामाझ्यासारख्या डॉक्टरांची छोटीशी प्रतिज्ञा वाटते.



आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमान व्यक्ती अवयव दान करत नाहीत ही गोष्ट खरी आहे का ? ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. किती तरी मुसलमान व्यक्तींनी अवयव दान केले आहे. अरे साधं, ‘ऑर्गन डोनेशन बाय मुस्लिम्स इन इंडिया’, असं गुगल जरी केलं तरी किती तरी घटना समोर येतील.

अगदी डिसेंबर २३ ची मुंबई मधील गोष्ट आहे, कल्याण मधील रफीक शाह आणि घाटकोपर मधील आयुर्वेद डॉक्टर राहुल यादव यांची ! रफीकला किडनी दिली राहुल यादव यांच्या आईने आणि राहुल यादव यांच्या पत्नीला गिरिजाला किडनी दिली रफीकच्या पत्नीने..! किडनीमुळे ही वेगवेगळया धर्माची कुटुंबे एकमेकांना जोडली गेली. अशीच एक घटना २०२१ मध्ये डेहराडून मध्ये घडली. मागच्या वर्षी अहमदाबाद येथे ईदला रुबेन शेख यांचा ९ वर्षाचा मुलगा अपघातात ब्रेन डेड झाला. कुटुंबाने त्याचे अवयवदान केले. अशी किती तरी उदाहरणे.

अरे, आता मुस्लिम सत्यशोधक समाज दरवर्षीची बकरीद रक्तदान, अवयव दान आणि देहदानाने साजरी करतो. अनेक शहरांमध्ये रक्तदान शिबिरे होतात, मी स्वतः तिथं रक्तदान केले आहे. अनेक जण अवयवदानाचा आणि देहदानाचा फॉर्म भरुन देतात. या वर्षीच्या बकरीदच्या किती तरी बातम्या तुला दिसतील.

मुस्लिम अवयवदान करतच नाहीत, ही बाब खोटी आहे, हे सिध्द करायला अजून काय काय सांगू सांग ना !

आता तुझ्या त्या पत्रकार व्यक्तीबद्दल.

आपण कुणाला फॉलो करतो, कुणाला कोट करतो, हे खरेच खूप महत्वाचे असते. जरा या पत्रकार महोदयांचा इतिहास तरी पहा. चक्क दारु पिवून रिपोर्टींग केले म्हणून आपली नोकरी गमावणारा, फेक न्यूज पसरवणारा ,बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा ( पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला माणूस आपण फॉलो तरी करावा का ?  आता अशा माणसाला आपण कसे काय कोट करु शकतो, सांग ना ?

आपण डॉक्टर असल्याने किती तरी साधी माणसं आपण जे सांगतो, बोलतो त्यावर विश्वास ठेवून इतरांनाही सांगतात. अशावेळी आपण काहीही बोलताना, मेसेज करताना काळजी घ्यायला हवी, असे मला वाटते.

मी खूप शहाणा आहे आणि मला सारे काही कळते, असे अजिबात नाही. चुकत चुकतच मी चालतो आहे.  फक्त तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे आणि मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी वाटते, म्हणून हे लिहिले. आपल्या जवळच्या माणसाने चुकू नये, असे वाटते ना, या भावनेने लिहिले हे सारे लिहिले आहे.  राग मानू नये, ही कळकळीची विनंती.

उद्या मी ही काही चुकलो तर तू ही इतक्याच सहजतेने मला नक्की सांगावेस. मला आवडेल ते, कारण आपलीच माणसे आपल्याला भलंबुरं काय ते सांगत असतात, आपल्याला सावरत असतात. 

पूर्वी कुठल्या कुठल्या कविता वाचायचास तू, साठवून ठेवायचास. अधेमधे कोट करत राहायचास. प्रॅक्टिसमध्ये पडलास आणि कवितेचे वेड कमी झाले की काय तुझे ? डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून, बरं असतं प्रकृतीला. बीएमआय नॉर्मल राहतो. बेसिक माणूसपण इंडेक्स रे ...! कवितेसारखं दुसरं मेडिसीन नाही, जप स्वतःला.

आनंदी आणि बच्चे कंपनीला खूप सारे प्रेम.

 

तुझा,

प्रदीप आवटे.

 

6 comments:

  1. कवितेबरोबर वास्तवतेच सुभान देणार हे पत्र...
    कविता व्यापक असते...
    आणि ती किती जिव्हाळा निर्माण करते...
    खरंच कविता वाचायलाच हवी...
    कविता वाचनाने आपल्याच आनंदात भर पडते
    आणि आपलीच समाज वाढत जाते...
    कवितेचे कोट्स अनेकदा टाळ्या हि मिळवून देतात...
    खूप छान...

    ReplyDelete
  2. भयाण वास्तव मांडले आहे. भयंकराच्या जबड्यात आपण वेगाने जात आहोत. असो. हेही दिवस जातील. वह सुबह कभी तो आयेगी |

    ReplyDelete
  3. ताळ्यावर आणणारं पत्र ! सुंदर शैलीत लिहिलेलं !!

    ReplyDelete
  4. खूप सुंदर आणि नवी दृष्टी देणारे पत्र आहे... पत्राच्या शेवटी कवितेसारखे दुसरे मेडीसीन नाही.. हे तर मला खूपच भावले आहे... आणि ते खरेच की.....🌿🍀🌸💐🙏🏻

    ReplyDelete
  5. Ignorance मुळे धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी फार महत्वाचे... आणि हे टाळायलाचं हवं... अन्यथा अजाणतेपणी Subconsciously हे खोल रुतत जातं! जीवनाचे गाणे... सुंदरपणे मांडलय सर...! 💙

    ReplyDelete