Monday, 8 May 2017

प्रदीप सांगतो……..( ' धम्मधारा ' या काव्यग्रंथाची प्रस्तावना )



प्रदीप सांगतो……..!

( ' धम्मधारा ' या काव्यग्रंथाची प्रस्तावना ) 

--------------------------------------------------------------------------------------------------
                                        १९९८-९९ चा काळ असावा,मी पहिल्यांदाच बाबासाहेबांचा ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ हा ग्रंथ वाचला. हिवाळ्यातील प्रसन्न सकाळी कोवळ्या उन्हात उभे असल्याचा अनुभव मला आला. हा वेगळाच बुद्ध मला कळत होता.वेगळा म्हणजे पठडीतील पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळा.लहानपणापासून माझ्या मनाला पडलेल्या,अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे लीलया देत बुद्ध हसत उभा होता. लोकशाही,समता.मित्रता या आधुनिक मूल्यांवर उभा असलेला,प्रज्ञा,शील,करुणेचे गाणे गाणारा,मानवाच्या ठायी असलेल्या विलक्षण अंतःसामर्थ्याची प्रखर जाणीव करुन देणारा आणि त्याच वेळी विवेक निष्ठता,विज्ञाननिष्ठतेची कास धरणारा बौद्ध धर्म,बौद्ध तत्वज्ञान मला मनोमन भावले. आणि मग जाणवली एक बोचरी खंत, हे तत्वज्ञान आपल्याला इतक्या उशीरा समजल्याची!  दैववाद,कर्मकांड,अंधश्रद्धा,विषमता यांची विषारी काजळी आपल्या दिव्याची काच काळ्वंडून टाकत असताना आपल्या आभाळात ‘उजेडाचे मळे’ फुलविणारे हे तत्वज्ञान आपल्याला या आधीच का भेटले नाही,असे सतत वाटत राहिले.
                         खरे तर ज्ञानप्राप्ती नंतर गौतमालाही हा प्रश्न पडला होता की,पुढे काय? हे ज्ञान आपल्यापुरते ठेवायचे की याचा प्रसार करावयाचा? ‘जगण्यातील दुःख नाहीसे करण्याचा आपल्याला गवसलेला मार्ग सर्वांना सांगायला हवा’, करुणेने ओतप्रोत भरलेल्या मनातून आवाज आला. त्यानंतर तब्बल ४८ वर्षे गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत धम्मज्ञान वाटत फिरत होते.लोकांना समजेल अशा लोकभाषेत पालीमध्ये हे ज्ञान लोकांपर्यंत शांत वाहणा-या नदीसारखे पोहचत होते,नदीकाठ बहरत होते. पण काळाच्या ओघात पालीचे महत्व हरपले.

          सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतमाने मांडलेले हे विचार आजही समकालीन आहेत,नव्हे त्यांच्यात नव्या निकोप समाज रचनेची सुप्त बीजे आहेत. गौतमाचे तत्वज्ञान हे मानवाच्या अगाध करुणेतून उगवलेले महाकाव्य आहे, हे ठायी ठायी जाणवत होते. माझ्यातील कवी मला शांत, स्वस्थ बसू देईना. हे सारे सारे साध्या सोप्या ओघवत्या गेय मराठीत मांडावे असे वाटू लागले. माझ्या पत्नीने माधुरीने हाच विचार सर्वप्रथम बोलून दाखविला. पण मनाचा हिय्या होत नव्हता. मीच मला प्रतिप्रश्न केला,”गौतम बुद्धाचे विचार मराठीत काव्यबद्ध करावयाचे म्हणतोस ,”तू ना तत्वज्ञानाचा अभ्यासक, ना धर्मशास्त्रांचा भाष्यकार ! तुझी पात्रता ती काय?”,मन खट्टू झाले. पण क्षणार्धात एक कोवळा किरण अंगणात उजळला,”अरे हीच तर तुझी पात्रता आहे. एका साध्या,सामान्य माणसाच्या नजरेने गौतमाला न्याहाळ्ले पाहिजे,माणूसपण जागविणा-या त्याच्या तत्वज्ञानाला अलिंगन दिले पाहिजे.”आणि मग मी माझ्या धूळमाखल्या पायांनी गौतमाचा शोध घेऊ लागलो,त्याच्या पाऊलखुणांमध्ये माझा चेहरा पाहू लागलो.
                                ‘मन दाखविते,मन दडविते,
                                सारे काही येथे,मन घडविते’
हे मलाही उमजू लागले. पोट भरण्यासाठी कोणता व्यवसाय करावा,बोलावे कसे,मित्र,धन जोडावे कसे, धन वेचावे कसे ,मनाचा आरसा करुन त्यात नित्य पाहावे कसे, काय आणि किती खावे,पहावे कसे,विवेकाचे डोळे राखावे कसे,मन,घर,गाव निखळ समाधानाने भरावे कसे आणि अखेरीस आपल्याच मनात कधीही न विझणारा दिवा लावावा कसा , या सा-याबद्द्ल बुद्ध मला आईच्या मायेने समजावून सांगत राहिला. बुद्ध समजून घेत असताना बुद्ध माझ्या सारख्या अनेकांसाठी साध्या सोप्या मराठीत सांगण्याची आवश्यकता अधिकच अधोरेखित होत गेली. विशेषतः इथल्या लहानग्या कोवळ्या रोपांना माणूसपणाचा हिरवा पोत देण्यासाठी बुद्ध पुन्हा पुन्हा सांगणे,मनात रुजवणे आवश्यक आहे,हे जाणवत गेले आणि मग मी मला उमजलेला,समजलेला गौतम बुद्ध मांडत गेलो,लिहित गेलो,जणू स्वतःलाच पुन्हा पुन्हा उजळित गेलो.बुद्धाचे क्रांतिकारी,शांत समाधानी जीवनाची वाट दाखविणारे विचार मी माझ्या परीने मराठीत लिहीत गेलो,सहजपणे कुणालाही गुणगुणता येतील अशा वृत्तबंधात बांधीत गेलो.
          जागतिकीकरणानंतरच्या काळात जग किती बदलले,अनोळखी वाटावे इतके नवे झाले पण आश्चर्यकारकरित्या पारंपारिक धर्माची पकड वाढली,कर्मकांडे वाढली,जातीय धार्मिक तेढ वाढली,बाबा बुवांची कार्पोरेट दुकानदारी वाढली. अशा काळात तर बुद्ध अधिकच हवाहवासा वाटला नाही तरच नवल!
          मानवाच्या हिताला जे जे बाधक ते ते सारे बुद्धाने नाकारले. वर्ण व्यवस्था नाकारली ,ईश्वर नाकारला,आत्मा नाकारला,पुनर्जन्म नाकारला,स्वर्ग नरकाच्या कल्पना नाकारल्या,मोक्ष नाकारला,कर्मकांड, यज्ञयाग नाकारला,व्यक्तिपूजा नाकारली,विश्वाच्या उत्पत्तीचे तर्कशून्य,खुळे सिध्दांत नाकारले. बुद्धाच्या प्रत्येक नकारासोबत एक समर्थ विधायक होकार आहे. बुद्धाने समता दिली. कुळ,जात,गोत्र,वर्ण याने प्राप्त होणारे श्रेष्ठत्व त्याने नाकारले.ब्राम्हणांसोबतच न्हावी,भंगी,चांडाळ अशा हीन मानल्या जाणा-या जातीतील व्यक्तींनाही बुद्धाने आपले शिष्यत्व बहाल केले. सत्कर्म माणसाला श्रेष्ठ बनविते तर दुष्कर्म त्याला हीन बनविते,असा तर्कशुद्ध विचार बुद्धाने मांडला. फ्रेंच राज्यक्रान्तीने समता,बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये मांडण्याच्या कितीतरी आधी बुद्धाने ही तत्वे प्रतिपादिली. फ्रेंच राज्यक्रांतीला समता प्रस्थापित करता आली नाही तर समता प्रस्थापित करण्याच्या  प्रयत्नात रशियन साम्यवादी क्रांतीने बंधुता आणि स्वातंत्र्याचा बळी दिला आणि म्हणूनच बाबासाहेबांसारख्या द्रष्ट्या पुरुषाला समता,बंधुता आणि स्वातंत्र्य ही त्रयी एकत्रित नांदण्याची आश्वासकता बुद्धाच्या वाटेवर आढळली.
                          बौध्द भिख्खूंचा संघ स्थापन करणा-या गौतमाने स्वतःला अथवा स्वतःच्या तत्वज्ञानाला कधीही चिकित्सेच्या पल्याद ठेवले नाही. मी मांडत असलेल्या विचारांची डोळसपणे चिकित्सा करा. तर्क आणि अनुमानावर ते उतरतात का हे पहा आणि महत्वाचे म्हणजे ते बहुजन हिताचे, समाजातील अधिकाधिक लोकांच्या फायद्याचे आहेत का, हे तपासा,हे बुध्दाने आग्रहाने सांगितले.खुद्द तथागताच्या गुणावगुणांची चिकित्सा करावयाचा अधिकार त्याने आपल्या शिष्यांना दिला होता. एवढेच काय,आपल्या पश्चात त्याने कोणताही वारस नेमला नाही. लोकशाही तत्वज्ञानाचे एवढे जिवंत उदाहरण विरळेच म्हणावे लागेल.
            निकोप बौध्दिक व्यवहारासाठी बुध्दाने घालून दिलेले सम्यक नियम सार्वकालिक आहेत. इतरांचे मत आपल्या विरोधी असले तरी शांतपणे ऐकून घ्यावे,पटल्यास सहमती दर्शवावी. अशी सहमती ही निर्मळ मनाची खूण असल्याचे बुद्ध प्रतिपादितो. मात्र त्याच वेळी मत न पटल्यास आक्षेप घेण्यासही तो सांगतो आणि मांडणी न समजल्यास संयतपणे स्पष्टीकरण विचारण्याचा सल्लाही तो देतो.बुध्दाने सांगितलेली ‘सम्मा दिठ्ठी’ कोणत्याही विचारधारेला (ism) आंधळेपणाने चिकटून राहण्यास विरोध करते आणि मनाची खिडकी उघडी ठेवून बौध्दिक व्यवहारात लवचिक भूमिका घेण्यास प्रवृत्त करते. हे सारे समजून घेताना बुद्ध अडीच हजार वर्षांपूर्वी जन्मला होता,हेच विसरायला होते.
       प्रतित्य समुत्पाद (कार्यकारण भाव) हा बुद्ध विचारांचा प्रमुख घटक आहे. ओशो म्हणतात,’बुध्द हा धर्म क्षेत्रातील पहिला वैज्ञानिक आहे.’ मला वाटते,बुध्द हा धर्म क्षेत्रातील एकमेव वैज्ञानिक आहे.बुद्ध डोळस श्रध्देची गोष्ट करतो.प्रार्थना,नवस,गंडेदोरे,ज्योतिष ,भविष्य हे सारे सारे तो नाकारतो. नव्हे नव्हे या सा-यांना तो हीन विद्या म्हणून संबोधतो. तो चमत्कार नाकारतो,शकून अपशकून नाकारतो. आजच्या नव्या संगणकाला नारळ फोडून तो सुरू करणा-या तथाकथित विज्ञान वादी युगाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची विलक्षण क्षमता बौध्द तत्वज्ञानात आहे. आपल्याला नवे डोळे देणा-या या बुध्दासोबत म्हणूनच चालले पाहिजे.
                 महत्वाचे म्हणजे,माणसाच्या लौकिक जगण्याशी संबंधित नसलेले सारे खुळे प्रश्न बुध्द ठामपणे नाकारतो,त्यासाठी आपली अपार उर्जा तो खर्च करत नाही. लौकिक जगणे दुःखमुक्त कसे करता येईल,हा त्याचा ध्यास आहे. मानवी मनाच्या अपरंपार ‘अणुशक्ती’ ची सार्थ जाणीव त्याला आहे.मानवी मन हे सा-या जगण्याचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच गौतम बुध्द सहजगत्या मानवी मनाच्या अद्भूत शक्तीची गुपीते आपल्यासमोर उकलत जातो. सुखी,निकोप ,समाधानी जगण्याची वाट्मानवी मनातून कशी जाते,हे तो साध्या साध्या उदाहरणातून समजावतो. मनाचे भरधाव धावणारे यान चालविण्यासाठी तो आठ पदरी द्रुतगती महामार्ग आपल्यासमोर  पसरतो आणि अंतिम सुखाच्या गावी जाणारी नेमकी वाट उजळ करतो. आपल्या अडखळणा-या पावलांसाठी तथागत समुपदेशक होतो. आपल्या विषयीच्या अपार करुणेने तो आपल्याला आनंदाने चालणे शिकवितो.हात धरतो पण अखेरीस चालायचे तुलाच आहे,याची जाणीवही करुन देतो.
                       गौतम बुद्ध … गृहस्थाला व्यवस्थापन शिकवतो,राजांना सांगतो लोकप्रशासन,पती पत्नींना शिकवितो मैत्र ! मालकांना विशद करतो,श्रमिकांचे महत्व,सेवकांचे माणूसपण आणि रेखाटतो चित्र लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेचे ! विस्मित नजरेने आपण पाहत राहतो,माणुसपण बहाल करणा-या या सर्वसमावेशक तत्वज्ञानाकडे !
धर्मसंस्थापक की मनोवैज्ञानिक ?
समुपदेशक की तत्वज्ञ ?
गौतम बुध्द….. काय नाही तो ?
मनाची मशागत करणारा शेतकरी आहे तो….
मनाची गुपिते,मनाची सामर्थ्ये,मनाचा दुबळेपणा नेमकेपणाने ओळ्खून त्यावर उतारा सांगणारा मनोवैज्ञानिक आहे तो…
आजच्या कॉर्पोरेट युगात, ‘सक्सेस पासवर्ड ‘च्या शोधात असणा-या तहानल्या प्रत्येकाला शाश्वत सुखाची गुरुकिल्ली बहाल करणारा ‘महागुरु’ आहे तो…..
कल्याण मित्रता आणि करुणेच्या ओलाव्याने मानवी हृदये जोडणारा अदृश्य पूल आहे तो….
विवेक आणि विज्ञाननिष्ठतेच्या पायावर नव समाज निर्मू पाहणारा लोक वैज्ञानिक आहे तो….
लोकशाही,समतेचा विचार पहिल्यांदा या मातीत रुजविणारा तत्वज्ञ आहे तो….
माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची सार्थ जाणीव करुन देणारा दिग्दर्शक आहे तो….
म्हणूनच अनेकांना ‘ मानवी संस्कृतीच्या वेलीवर उमललेले सर्वांगसुंदर फूल ‘ म्हणून त्याचा उल्लेख करावासा वाटतो.
बुध्दाला ‘इझम’च्या चौकटी मान्य नाहीत. तो केवळ मानव जातीच्या अंतिम  सुखाचा विचार करतो.
 वैर हा शब्दच बुध्दाच्या शब्दकोषात नाही.
बुध्दाचे कुणाशीच वैर नाही.
बुध्द वैर जाणत नाही.
तो सा-यांचा आहे आणि सारे त्याचे !
आपापले खुळे दुराभिमान फेकून देऊन ,पाहता आले पाहिजे आपल्याला,
                    या मातीत निखळ माणूसपणाचे बीज पहिल्यांदा पेरणा-या गौतमाकडे
सुखी जगण्याचा मार्ग आणि अर्थ सांगणा-या सिध्दार्थाकडे,
                    तुझे आणि माझे समानत्व ज्याने जाणले आहे, त्या तथागताकडे !
सन्मित्रा, ते बघ, तो लावतो आहे अवघा अंधार उजळविणारा दिवा, तुझ्या माझ्या मनात !
वादळे येतील, थरथरेल वात,
मनात उजळ्लेली ज्योत,राखतील आता, आपलेच हात !
अपार निळ्या करुणेने तो पुन्हा हसेल,
आणि पुटपुटेल तुझ्या माझ्या कानात,
“ अत्तदीप भव !
तू स्वयंदीप हो !”
--- प्रदीप आवटे.

2 comments: