विवेक भेदितो,अंधाराचे जाळे
सकाळी पेपर वाचत घराच्या अंगणात बसलो तर भागवत
तात्याचा आवाज कानावर आला.
“आप्पा हायतं का घरात ?”
मी आवाजाच्या दिशेने पाहिले तर शेतावरुन दमून
भागून आलेले भागवत तात्या उभे होते. तेवढ्यात घरातून आप्पा म्हणजे माझे वडील
ओट्यावर आले.
“बोला तात्या,काय काम काढलं?”, आप्पांनी विचारले.
“काय नाय जरा नक्षित्र बघायचं हुतं,”
“का वो तात्या,काय
झालं?,” आप्पांनी विचारले.
“काय नाय वो,वावरातनं येताना
त्ये सुभाष आबाचं कुत्रं अंगावर आलं.मस हाडं हाडं केलं पन दोन दात लागलं
धोतरातून...!,” डाव्या पायाची पिंडरी दाखवित भागवत तात्या बोलत
होते. पिंडरीवर कुत्र्याच्या दाताच्या खोल खुणा होत्या,रक्त अजूनही वाहत होते. आता एवढे सारे झाल्यावर
तात्यांना नक्षत्र कशाला पाह्यचे होते,कोण जाणे? आप्पाही लगबगीने घरातून पंचांग घेऊन आले आणि
त्यात एखादे गणित सोडवावे तसे रंगून गेले. थोड्यावेळाने बोलले,”नक्षत्र तर चांगलंय तात्या...!” तसा तात्यांचा
चेहरा खुलला.स्वतःशीच बोलल्यासारखे ते बोलले,” चला बेस झालं...” आणि मग थोडा विचार करुन बोलले, “तरी पन रायगावला जाऊन येतू उगी जीवाला घोर
नकू.ह्ये कुत्रं चावनं लई वंगाळ...!”
आता हे रायगाव काय आणखी ? मी बुचकळ्यात पडलो.
“तात्या रायगावला कशासाठी चालला आहात?”,मला राहवले नाही.
“अहो डॉक्टर, तुमा शिकल्या
सवरल्या लोकास्नी नाय पटायचं ह्ये! रायगावला इक हिर हाय..तिचं पानी लई गुनकारी
हाय.कसलंबी कुत्रं चावू दी त्या हिरीचं पानी कुत्र्याच्या इखाचं पार पानी
करतंया...!”
काय बोलावे या भागवत तात्यांसमोर? श्वान दंशावर लस उपलब्ध असताना नक्षत्र पाहणे
आणि कोणत्या तरी विहिरीचं तथाकथित गुणकारी पाणी पिणं...! जीवावर बेतणा-या
अंधश्रध्दा...! प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असताना अशा अनेक प्रसंगांना तोंड
द्यावे लागायचे. लोकांच्या मनातील वेगवेगळ्या अंधश्रध्दा त्यांच्या आरोग्याच्या आड
कशा येतात, हे रोज लक्षात यायचे. मोठ्या क्लृप्तीने अनेकदा
लोकांना शास्त्रीय उपचारांचे महत्व समजावून सांगावे लागे कधी ते त्यांना पटे कधी
मी तोंडावर आपटे आणि पुन्हा नव्या मार्गाने त्यांना पटवता येईल का,याचा मी विचार करु लागे. आणि म्हणून,गावागावात अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्यक्रम घेणे,हा माझ्या आरोग्यविषयक उपक्रमाचा एक महत्वाचा भाग
होता. करमाळ्याच्या अंनिसच्या शब्बीरभाईंची यावेळी खूप मोलाची मदत होई.
मी
ज्या भागात काम करत होतो तो भाग म्हणजे उजनी धरणाच्या बॅकवॉटरचा भाग... बरीचशी
गावं ...धरणामुळं विस्थापित ... सारी झाडाझडती!नव्या शेत जमीनीवर वसलेल्या या
गावांमध्ये विंचू दंश,सर्पदंश यांचेही प्रमाण लक्षणीय होते. एकदा
आमच्या शेजारी राहणा-या हौसाबाईना कडब्याच्या गंजीत विंचू चावला. तिची
मुलगी मोठ्याने ‘आयला इचू चावला’, म्हणून
ओरडू लागली.हौसाबाईला प्रचंड वेदना होत होत्या पण तेवढ्यातही तिने तिच्या मुलीच्या
तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली,”ये माज्या आये,मोठ्याने बोंबलू नगं. त्या चंदरला कळलं तर काय
हुईल माजं ?”
मला कळेचना, हौसाबाईला विंचू
चावला हे चंदरला कळल्यामुळे काय होणार आहे?मग माझ्या एका
नर्सने माझे प्रबोधन केले.
“अहो सर, तो चंदर विंचू
चढवतो...!”
विंचू
चढवतो ? मग कळले की तो म्हणे असे काही मंत्र टाकतो
ज्याच्यामुळे विंचू चावलेल्या माणसाचा त्रास आणखीनंच वाढतो. विंचू चढविणारे मंत्र
जसे असतात तसे विंचू उतरविणारेही असतात. अनेक वेळा विंचू चढविणारा कोण आणि उतरविणारा
कोण, हे त्या त्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांवर
ठरते. मनमिळाऊ माणसाच्या मंत्राची विंचू उतरविणारा म्हणून ख्याती झालेली तर खाष्ट ,लोकांच्या वाईटावर टपलेले लोक मात्र विंचू
चढविणारे म्हणून काळ्या यादीत टाकलेले. अंधश्रध्दा पाळतानाही जनमानस असे व्यक्त
होत राहते.
सापाची
तर बातच वेगळी ...! सर्पदंश झालेल्या व्यक्तीने गावची वेस ओलांडू नये,असा अलिखित संकेत ! गावची वेस ओलांडली की ते
त्याच्या जीवावर बेतणार अशी अदृश्य भिती जनमानसावर...! धरणग्रस्त गावांमुळे
भागातील अनेक गावं पुनर्वसन झालेली,कुठली वेस आणि काय?मी अनेक पेशंटना विचारी,’अरे गावालाच वेस नाही तर ओलांडणार काय?’ लोक फक्त हसायचे पण बधायचे नाहीत.गावाची रुपरेखा
पुनर्वसनामुळे बदलली तरी विस्थापित झाली ती माणसं,मनातल्या
अंधश्रध्दा नाही. गावातल्या भैरोबाच्या देवळासमोर सर्पदंश झालेल्या माणसाला घेऊन
लोक बसत, आजही काही गावात बसतात. त्याला भैरोबाचा अंगारा
खाऊ घाल,लिंबाचा पाला खाऊ घाल असे उद्योग चालत. सुदैवाने
बहुतांश साप बिनविषारी असतात त्यामुळे वाचणारे अधिक,अंधश्रध्देला
आणखी बळकटी.विषारी साप चावलेला दुर्दैवी मात्र आपला जीव गमावायचा तरी त्याचे
काहीतरी चुकले असेल,देवाचा कोप याची चर्चा व्हायची. आंधळी श्रध्दा
अढळच राह्यची. अशा अंधश्रध्दांची जोपासना करण्यात अनेक वेळा डॉक्टरमंडळी देखील
हातभार लावतात. एका डॉक्टरची ‘स्नेक बाइट
स्पेशालिस्ट’ म्हणून ख्याती होती.कसलाही साप चावलेला पेशंट
त्याच्याकडे आणला की बरा झालाच पाहिजे, अशी वदंता...!
मेडिकल व्यवसायातील वेगवेगळ्या हितसंबंधियांनी निर्माण केलेले बाजारु ‘मिथक’. बिनविषारी साप
चावलेल्या रुग्णालाही विनाकारण बरेच दिवस भरती करणे,त्याला
अनावश्यक महागडी औषधे लिहून देणे नंतर ती औषधे पेशंटला न वापरता मागच्या दाराने मेडिकल
दुकानात परत जात.दुकानदाराचे आणि डॉक्टरचे साटेलोटे..! हे आधुनिक
पोशाखातील बुवा बाबा...! यामुळे सर्वसामान्य माणसाचा अनेकदा आधुनिक शास्त्रावरील
विश्वास उडतो आणि तो अशास्त्रीय परंपरांना अधिकच बिलगतो. आणि या अंधश्रध्दा फक्त
श्वान दंश,विंचू अथवा सर्पदंशापुरत्या मर्यादित नाहीत.
कावीळ, मुतखडा ,इतर विविध असाध्य
आजार या बाबतीतही अशा वेगवेगळ्या गोष्टी आढळतात.मध्यंतरी मी धक्कादायक गोष्ट ऐकली.
आपल्याकडे कुणी एक फरशीवाले बाबा नावाचे डॉक्टर आहेत.त्यांची डिग्री त्यांनाच
ठावी. त्यांच्याकडे म्हणे पेशंटला घेऊन जावेच लागत नाही. म्हणजे पेशंट आला तरी
चालते पण नाही आला तरी काही बिघडत नाही. पेशंटचा
शर्ट,साडी,कोट,धोतर असे काहीही न्या बस्स!बाबांकडे एक जादूई
फरशी आहे,ती फरशी ते त्या कपड्यावर ठेवतात आणि प्रत्यक्षात
समोर नसलेल्या रुग्णाला काय आजार आहे, हे तंतोतंत बरोबर
सांगतात आणि औषधेही देतात. आता काय बोलणार ? अत्याधुनिक
टेलीमेडिसीनची ही स्वस्तातील स्थानिक आवृत्ती ?
या
परंपरांचा,अंधश्रध्दांचा फटका स्त्रियांना अनेक वेळा बसतो
किंबहुना त्याच अशा गोष्टींच्या अनेकदा बळी ठरतात.वेगवेगळी व्रतवैकल्ये,उपवास यांचे ओझे अनेक वेळा स्त्रियांवर टाकलेले
असते.आपल्याकडील निम्म्याहून अधिक महिला ऍनिमिआने ग्रस्त आहेत या
पार्श्वभूमीवर हे महत्वाचे ठरावे. या
स्त्रियांची मासिक पाळी अनेक अंधश्रध्देचे मूळ आहे.तिच्या साध्या निसर्गचक्राला
एवढे पवित्र अपवित्रतेचे वलय जोडले गेले आहे की विचारच करु शकत नाही आपण..! एकदा
एका गृहस्थाने मला सहज विचारावे तसे विचारले”का हो डॉक्टर,बायकांची पिशवी काढायचा काय खर्च येतो?”
मी म्हटले,” का हो,कुणाची काढायची आहे का?” तर त्यांनी मला त्यांच्या बायकोचीच पिशवी
काढायची आहे म्हणून सांगितले. त्यावर मी त्यांना विचारले ,” काही त्रास आहे का त्यांना?कुणी स्त्री रोग तज्ज्ञाने तसा सल्ला दिला आहे
काय ?”
त्यावर त्या गृहस्थाने जे उत्तर दिले त्या
धक्क्यातून मी अजून सावरतो आहे,” नाही हो तसं काहीच
नाही.तिला काही म्हणता काही त्रास नाही.”
“मग गर्भाशयाची पिशवी काढायची गरजच काय?”
“अहो, दारात दत्ताचे
मंदिर..!हिची दर महिन्याची मासिक पाळी.. सारखी विटाळाची भिती, म्हणून म्हटलं आता मुलंबाळं झाली,सारं झालं आता पिशवीच काढून टाकली तर काय हरकत
आहे?”
विटाळाचा आंधळा समज स्त्रीच्या अवयवाला अवयव
म्हणून समजून घ्यायची संवेदनशीलता सुध्दा बाळगत नाही. आजही अनेक रुग्णालयांच्या
परिसरातच देव देवरुषीचे प्रकार चाललेले दिसतात. डॉक्टरही अनेकदा रुग्णांच्या
अंधश्रध्दा गोंजारताना दिसतात कारण त्यात अनेक वेळा डॉक्टरांचे नाकर्तेपण
झाकण्याचे सामर्थ्य असते.
“लोकहो,तुम्ही विचार करायला का घाबरता?”, हा आगरकरांनी विचारलेला प्रश्न आजही प्रस्तुत
ठरावा. आम्ही विचार आणि कृती यांची फारकत केली आहे आणि म्ह्णूनच आमच्या आरोग्याचे
खरे निर्धारक आजही आरोग्य क्षेत्राबाहेरील बाबी आहेत. आणि म्हणूनच अनेकवेळा केवळ
वैद्यकीय मनुष्यबळ, अत्याधुनिक उपकरणे आणि मोठमोठी रुग्णालये या
माध्यमातून आरोग्याच्या गावाला जायची वाट गवसत नाही. आमच्या निरामय आरोग्याची वाट
आमच्या मनाच्या समृध्दीत दडली आहे. आमचे वैचारिक कुपोषण हेच आमच्या अनारोग्याचे
खरे कारण आहे. ‘प्रतित्य समुत्पाद’
सांगणारा बुध्द आपल्याला नीट उमजला नाही.वैज्ञानिक दृष्टीकोनाचा इतका अमूल्य वारसा
आपल्याला लाभलेला असतानाही आपण आपली वैचारिक दिवाळखोरी का जाहीर केली आहे,हे न कळणारे कोडे आहे. माझ्या ‘धम्मधारा’ या बौध्द
तत्वज्ञानावरील काव्यसंग्रहात मी लिहले आहे -
“तथागत म्हणे तुला,मला,त्याला
सन्मित्रा सांभाळी,तुझ्या
विवेकाला
विवेक भेदितो,अंधाराचे जाळे...
आभाळी देखणी, पहाट उजळे !”
तुमच्या माझ्या आभाळात ही देखणी पहाट उजळविणारा
विवेक आज आपल्याला पारखा का व्हावा,हा लाखमोलाचा प्रश्न
आहे.
या
पार्श्वभूमीवर,नुकतीच झालेली डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही
समाजातल्या अंधश्रध्देची आणि अनारोग्याची भयावह युती आहे. पाण्यातील निवळीप्रमाणे
समाजातील अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी नाहीशा करण्याचा आपल्या आयुष्यभर
प्रयत्न करणा-या दाभोलकरांनाच नाहीसे करणे,हे आपण स्वतःच
सर्वांगिण आरोग्याकडे जाणारी आपली वाट बुजविण्यासारखे आहे. आणि म्हणूनच,दाभोलकरांनी लावलेला विवेकाचा दिवा या भयाण
अंधारात आणि जीवघेण्या तुफानातही जपून ठेवणे,तो इथल्या प्रत्येक
घराघरात,प्रत्येक मनामनात रुजविणे ही आपल्या सर्वसमावेशक
आरोग्याची खरी सुरुवात आहे !
No comments:
Post a Comment