“डोह” –
पहिल्या पावसाची गोष्ट
-
प्रदीप आवटे
![]() |
अक्षय इंडीकर |
एक
अत्यंत धाडसी असा विषय अक्षयने या लघुपटात हाताळला आहे. एका तरुणीच्या भावविश्वात
पहिल्या वहिल्या शारीर अनुभवानंतर होणारी खळबळ चित्रित करण्याचा प्रयत्न अक्षयने
या अवघ्या एकोणिस मिनिटांच्या लघुपटातून केला आहे. पहिल्या पावसानंतर मातीतून
येणारा गंध, शरीराच्या तारा प्रथमच छेडताना उमटणारा कातर मल्हार आणि त्याच
वेळी मनात पावसासोबत दाटून येणारे मळभ हे सारे १९ -२० मिनिटांच्या अवकाशात आणि
चित्रलिपीतून मांडणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ असा हा अनुभव पडद्यावर
मांडताना अक्षयने सिनेमॅटिक लॅंग्वेजचा मोठ्या कल्पकतेने वापर केला आहे. पहिला
शारीर अनुभव घेऊन रेल्वेने घराकडे परतणारी श्रुती (प्रमिती नरके) , तिचे दारात थांबणे ,भुरभुर उडणारे केस, समांतर धावणारे रेल्वे
रुळ आणि मध्येच परस्परांना छेदणा-या रुळांच्या रेघा, रेल्वेचा रंध्रारंध्रात जाणवत राहणारा नाडीच्या
ठोक्यासारखा आवाज आणि श्रुतीच्या पाठमो-या आकृतीतूनही जाणवणारे तिचे ओथंबलेपण या
सा-यातून एक कविता उमलत राहते.
![]() |
'डोह' मध्ये प्रमिती नरके |
श्रुती
आणि तिचा मित्र यांच्यातील इंटीमेट प्रसंगांच्या चित्रणात एक ऑकवर्डनेस मात्र सतत
जाणवत राहतो. अर्थात तो कथेतील पात्रांच्या शारीर अनुभवासंदर्भातील नवखेपणाचा
परिपाकही असू शकतो. मित्राशी आलेल्या शारिरीक जवळकी नंतर आरशात स्वतःलाच निरखून
पाहणारी श्रुती, घरी परतताना तिच्या चेह-यावर पडलेली खिडकीची जाळीदार सावली, घरी आल्यावर
धास्तावलेल्या श्रुतीने बेडवर ओणवे पडल्यावर दिसणारे छताचे पोफडे अशा अनेक
प्रतिमांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात अक्षय यशस्वी झाला आहे. मित्राचा फोन आला आहे असे समजून पर्समधील मोबाईल काढण्यासाठी डिस्परेट होऊन पर्समधील सारे साहित्य बाहेर काढणारी श्रुती जणू स्वतःलाच धुंडाळते आहे.
![]() |
ही कोण ? मीच क्षणापूर्वीची की नवीनच कोणी ? |
छायाचित्रण आणि ध्वनीचित्रण या लघुपटाच्या
जमेच्या बाजू आहेत. रेल्वेची धडधड, मोबाईलचे रिंगटोन, ठिबकणारा नळ असे अनेक आवाज त्या त्या फ्रेमला अगदी चपखल बिलगले आहेत. प्रमिती नरके श्रुतीच्या
भूमिकेत सहजतेने वावरली आहे, तिचे मुग्ध हसणे, आरशात पाहणे,इंटीमेट क्षणानंतर फोन न घेणा-या मित्रामुळे होणारी
तिची चिडचिड आणि त्याचा फोन आल्यावर रिलॅक्स झालेल्या प्रमितीचे आईला,” मम्मा, भाजी कोणती करणार आहेस ? “, असे लाडीकपणे विचारणे अशा
सा-याच प्रसंगात तिची अभिनयाची समज स्पष्ट होत जाते. शब्दांची काटकसर करणारा हा
लघुपट स्वतःच्या भाषेत बोलताना अर्थशक्यतांच्या वाटा मोकळ्या ठेवतो.
स्त्री पुरुष संबंधाच्या डोहाच्या सा-या मिती
गवसणे,उलगडता
येणे तसे कठीणच..! आणि तरीही त्या पहिल्या वहिल्या मुग्ध क्षणांची भेट देणारा “डोह” हे आव्हान सहजतेने पेलतो.
No comments:
Post a Comment