Friday, 4 April 2014

डंख छोटा,धोका मोठा
                         -डॉ.प्रदीप आवटे.

        माणसं तापानं फणफणत होती आणि काही कळायच्या आत गतप्राणही होत होती.तो या मृत्यूच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होता पण रस्ता पुन्हा पुन्हा चुकत होता. तो उदासीने ग्रासला होता पण रात्र जेव्हा अधिक काळोखी होते,ओळखायचे पहाट आता फार दूर नाही. आणि तेच घडले.
दिनांक २० ऑगस्ट १८९७. त्याला थोडा उजेड दिसला.हा मलेरियाचा फणफणता ताप आणि डास या कार्यकारण संबंध त्याच्या लक्षात येऊ लागला होता.कवी असलेला रोनाल्ड रॉस आपल्या वहीत लिहित होता –
ईश्वरा तू ऐकलीस माझी प्रार्थना
आणि ठेवलीस ही अदभूत गोष्ट
माझ्या तळहातावर ...!
रडलो पडलो उर फुटेस्तोवर राबलो मी,
पण अखेरीस आज,
 गवसले मला
लाखोंचा खात्मा करणा-या दुष्ट मृत्यू,
तुझे धूर्त भूमिगत बीज ..!

आता उलगडले आहे तुझे रहस्य,
आता रोखू शकेन मी मरणाच्या खाईत जाणारी अगणित माणसे,
अरे मृत्यो,
आता कुठे आहे तुझा डंख,
आणि डंका तुझ्या विजयाचा ?
   जवळपास एकशे पंधरा वर्षांपूर्वी आपल्या हिवतापावरील महत्वपूर्ण संशोधनाने रॉस मरणालाही आव्हान देत होता. “विज्ञान हा अखिल जग उजळून टाकणारा उजेड आहे,”हे लुई पाश्चरचे वाक्य तरी दुसरे काय सांगते ? अनारोग्याच्या अंधारावर मात करण्याची ताकद विज्ञान तर आपल्याला देते. रॉसची कविता केवळ दर्पोक्ती निश्चितच नव्हती. त्याच्या संशोधनाने अनेकांचे प्राण वाचविले. भारतापुरतेच बोलायचे झाले तर  ज्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात दरवर्षी सुमारे पंच्याहत्तर लाख मलेरिया रुग्ण सापडत तर जवळपास आठ लाख मृत्यू ...!  त्यानंतर आज देशाची लोकसंख्या चौपटीहून अधिक होऊनही देशात मलेरियामुळे होणारे मृत्यू काही हजारात आले आहेत. ही प्रगती निश्चितच नेत्रदिपक आहे.
 ... आणि तरीही,या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे डंख छोटा, धोका मोठा !

  स्मॉल बाईट , बिग थ्रेटया  इंग्रजी स्लोगनचे हे मराठमोळे रुप. डंख आणि धोका इंग्रजीत काय आणि मराठीत काय त्याची तीव्रता थोडीच कमी होते. कीटकजन्य आजारांच्या वाढत्या प्रभावाकडे समस्त जगाचे लक्ष वेधण्याचे काम या चार शब्दांनी केले आहे. “ एक मच्छर साला….” या नाना पाटेकरच्या एका डायलॉगने डासांच्या कर्तृत्वाची सार्थ कल्पना बॉलीवूडच्या चाहत्यांना फार पूर्वीच करुन दिली होती.
रोनाल्ड रॉस आणि अनेकांच्या प्रयत्नानंतरही डंखाची तीव्रता आणखीन वाढली कशी ? जागतिक आरोग्य संघतनेने आपल्याला आठवण करुन द्यावी असे नेमके काय घडले आहे ?
   आज जगाची सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या कीटकजन्य आजारांच्या छायेखाली जगते आहे. मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया,जपानी मेंदूज्वर,हत्तीरोग,यलो फिवर असे अनेक आजार डासांमार्फत पसरतात. पण कीटक म्हणजे केवळ डास नव्हे, ढेकूण, पिसवा, सॅण्ड फ्लाय,गोचिड असे अनेक लहान मोठे कीटक रिकेटशिअल फिवर,प्लेग, चंडीपुरा मेंदूज्वर, काला आजार आणि कांगो क्रिमियन रक्तस्त्रावी ताप अशा अनेक गंभीर आजारांना आपल्यापर्यंत घेऊन येतात. म्हणूनच दिसायला एक सेंटीमीटर पेक्षाही लहान दिसणारे हे कीटक मानवी अनारोग्याचे एक प्रमुख कारण आहेत – डंख छोटा आणि धोका त्याहून कितीतरी मोठा...!
     या आजारांचे प्रमाण वाढावे,असे काय घडले आहे,घडते आहे ? अर्थातच हे अचानक एका दिवसात झाले नाही. औद्योगिकीकरण,शेतीतील बदलते तंत्रज्ञान, वाढते शहरीकरण आणि आता जागतिकीकरण यातून घडणा-या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा हा परिपाक आहे. मानवी प्रगती आणि हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण यांचा जवळचा संबंध आहे. पाण्याचे बाष्प,कार्बन डाय ऑक्साईड,मिथेन,हॅलो कार्बन या स्वरुपाच्या ग्रीन हाऊस गॅसेसचे वातावरणातील वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. गेल्या शतकात हे तापमान ०.६ डिग्री सेल्शियसने वाढले आहे. या बदलामुळे अनेक ठिकाणी टोकाचे हवामान अनुभवायला मिळत आहे. नुकतीच आपल्याकडे झालेली गारपीट हा याचाच एक नमुना म्हणावा लागेल. डासांना वाढण्यासाठी साठलेले पाणी लागते तर प्रौढ डासांना तगण्यासाठी पुरेशी आर्द्रता लागते.उष्ण वातावरणात डासांची पैदास वेगात होते तसेच त्यांच्या शरीरातील रोगकारक जंतू लवकर परिपक्व होतात. यामुळे स्वाभाविकच रोग लागणीचे प्रमाण किती तरी पट वाढते. तापमानातील बदल,पाण्याचे वाढते बाष्पीभवन,घरात पाणी साठविण्याच्या बदललेल्या सवयी आणि भूजल खेचण्याच्या आधुनिक पध्दती यामुळे आपल्याकडे डेंग्यू खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वातावरणातील बदल आणि वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण यामुळे पूर्वी ज्या भागात हे आजार आढळत नव्हते अशा व्हर्जिन लॅंडमध्ये हे आजार आता प्रवेश करित आहेत. या भागातील लोक या आजारांना इम्युन नसल्याने अशा ठिकाणी या आजारांचे भयप्रद उद्रेक संभवतात. थोडक्यात सांगायचेच झाले तर आता उष्ण कटिबंधातील देशांकडून कीटकजन्य आजारांचा पट्टा समशितोष्ण भागाकडे वळण्याची शक्यता आहे. एकूण काय,या छोट्याशा डासाने आपल्या अवघ्या विश्वाला त्याच्या आकारापेक्षा कितीतरी मोठे आव्हान उभे केले आहे.
   महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आजमितीला आपला मुंबई ठाणे रायगडचा शहरी पट्टा आणि अगदी त्याच्या विरुध्द बाजूला पूर्वेकडे असलेला गडचिरोली, चंद्रपूर,गोंदियाचा अदिवासी पट्टा या भागात हिवतापाचे प्रमाण अधिक आहे. गडचिरोली जिल्ह्यात फॅल्सीपॅरम या हिवतापाच्या गंभीर प्रकाराचे अधिक रुग्ण आढळतात. २०१० नंतर मुंबई शहरातील हिवतापाचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले असले तरी शेजारचा ठाणे जिल्हा एकूणच कीटकजन्य आजारांसाठी जणू बॉईलिंग पॉट आहे.हा लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा जिल्हा,सत्तर टक्के हून अधिक शहरीकरण झालेला,या एकाच जिल्ह्यात सात महानगरपालिका आणि पाच नगरपालिका,त्याचबरोबर या जिल्ह्याचा खूप मोठा भाग अदिवासी...! अशा अनेक बाबींचे मिश्रण असलेला हा जिल्हा साथरोगशास्त्रीय दृष्ट्या आव्हानात्मक आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होते आहे.डेंग्यू मात्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अगदी ठाणे पुण्यापासून जळगाव नागपूरपर्यंत संचार करतो आहे. या शिवाय विदर्भात जपानी मेंदूज्वराची समस्या आहे तर सॅंड फ्लाय या माशीपासून पसरणारा चंडीपुरा मेंदूज्वरही या भागातच आढळतो.या आजाराचे रुग्ण जरी तुरळक स्वरुपात आढळत असले तरी या मध्ये मृत्यूचे प्रमाण खूप अधिक आहे. म्हणूनच राज्यातील नऊ जिल्ह्यात जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण आपल्या नियमित लसीकरण मोहिमेचा भाग आहे. राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाची समस्या आ वासून उभी आहे. मागच्या मे महिन्यात खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच दुर्लक्षित उष्णकटिबंधिय आजारांची यादी जाहिर केली आहे.हत्तीरोग त्यापैकी एक..! या आजाराने माणूस मरत नाही म्हणून अनेकदा तो कमी गंभीर वाटतो पण हातापायांना येणारी सूज आणि पुरुषांमध्ये होणारी अंडवृध्दी या सा-यांमुळे हत्तीरोग झालेला रुग्ण आयुष्यातूनच उठतो,त्याचे काय ? ना त्याचे लग्न जमते,ना त्याला कोणी नोकरी देते , सारे नातेसंबंध उसवतात..! एका अर्थाने त्याचा सामाजिक मृत्यू होतो आणि म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

     या छोट्याशा डंखाची तीव्रता कमी कशी करायची,हा आजचा लाखमोलाचा प्रश्न ..! डासोत्पत्ती रोखणे हे केवळ शासनाचे किंवा एका विशिष्ट संस्थेचे काम नाही. लोकसहभागाशिवाय या कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे निव्वळ अशक्य आहे. डासांची पैदास रोखण्याची सात प्रमुख सूत्र आहेत. ती आपण प्रत्येकाने अंमलात आणली पाहिजे.पहिले सूत्र आहे – परिसर अभियांत्रिकी म्हणजे आपल्या घराभोवती पाणी साचू न देणे,डबकी वाहती करणे,डबकी बुजविणे. परिसर स्वच्छता हे दुसरे सूत्र आपल्या घराभोवती,कार्यालयाभोवती नारळाच्या करवंट्या, डिस्पोजेबल प्लास्टिकवस्तू, टायर्स, ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा गोष्टी पडू नयेत,साचू नयेत,त्यांची वेळेत योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक नाही तर डेंग्यूला आमंत्रण.तिसरे सूत्र आहे पाण्याची योग्य साठवणूक आणि नियोजन. साठविलेले पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, या दिवशी सारे पाणी साठविलेली भांडी मोकळी करुन ती आतून घासून पुसून घेणे हा डासोत्पत्ती थांबविण्याचा एक महत्वाचा उपाय. कारण डास अळी पासून प्रौढ डास तयार व्हायला साधारणपणे  ८-१० दिवसांचा काळ लागतो त्यापूर्वीच ही अंडी,डासअळ्या फेकल्या गेल्याने हे जीवनचक्र तुटायला मदत होते.रिकामे करता न येणा-या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापरही आवश्यक ! चौथे सूत्र आहे वाहते न करता येणा-या,बुजवता न येणा-या डबक्यामध्ये डास अळ्या खाणा-या गप्पी माशांचा वापर. पाचवे सूत्र आहे संवेदनशील भागात कीटकनाशकांची फवारणी,अळीनाशकांचा वापर. सहावे सूत्र म्हणजे वैयक्तिक सुरक्षा – खिडक्यांना जाळ्या,मच्छरदाणी, डास प्रतिबंधक अगरबत्ती,क्रीम इत्यादीचा वापर.आपली काळजी आपणच तर घ्यायला हवी आणि सातवे अत्यंत महत्वाचे सूत्र आहे – कायद्याचा बडगा. डास नियंत्रणासाठी सिव्हिक बायलॉजचा वापर इंग्रजांनी सुरु केला. तुम्ही तुमच्या घरात,अवतीभवती जर डासांची उत्पत्ती व्हावी,अशी परिस्थिती निर्माण करत असाल तर तुम्हांला कायद्याने दंड होणे आवश्यक आहे. मुंबई मनपा हा कायदा प्रभावीपणे राबविते आहे.नव्याने होत असलेली अनियंत्रित बांधकामे,तिथे होणारा पाण्याचा निष्काळजी वापर यामुळे अनेक वेळा डासोत्पत्ती वाढत राहते.सर्वसामान्य नागरिकांसोबतच विकासक, उद्योजक यांच्यावर कायद्याने डासोत्पत्तीस कारणीभूत ठरल्याबाबतची जबाबदारी कायद्याने निश्चित करणे ही काळाची गरज आहे. कारण कोणीही कळत नकळत, निष्काळजीपणाने अथवा स्वार्थासाठी डासांच्या पैदासीला हातभार लावणे म्हणजे सार्वजनिक आरोग्याशी खेळणे आहे. अशा प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे. आज सुमारे पन्नास टक्के जनता शहरात राहत असलेल्या आपल्या राज्यात सिव्हिक बायलॉज प्रत्येक शहरी क्षेत्रात लागू झाला तर या आरोग्य दिनाचा सावधानतेचा इशारा आपल्याला नेमका समजला असे म्हणता येईल,नाही तर ये रे माझ्या मागल्या म्हणत आपल्या चर्चेचे निष्फळ गु-हाळ असेच चालू राहील.
      रामायणाच्या एका परभाषेतील आवृत्तीत हनुमान श्रीलंकेत डासाचे रुप घेऊन शिरला,असे वर्णन  केले आहे. आणि डासाचे रुप घेऊन लंकेत प्रवेश केलेल्या हनुमानाने नंतर लंकेला त्राही त्राही करुन सोडले, अगदी लंकादहन देखील केले. आजच्या उत्तर आधुनिक कालखंडात हे कधी काळचे मिथक नव्या रुपात अवतरले आहे आणि ते तुम्ही आम्ही उभारलेल्या विकासाच्या लंकेला ढुसण्या देते आहे. म्हणूनच या वर्षीचा जागतिक आरोग्य दिन म्हणजे एक सावधानतेचा इशारा आहे. तेव्हा बाबू,समजो इशारे...! इतकेच !
( http://issuu.com/lokprabha/docs/11_april_2014__issue_for_website_ne/27?e=8629813/7363044) 



No comments:

Post a Comment