Sunday, 6 April 2014

फॅंड्री – जात-वास्तवाची पटकथा अनादि अनंत
-         डॉ.प्रदीप आवटे.

पि-या, किती अचूक नेम लागलाय दोस्त?

१४ फेब्रुवारी २०१४
व्हॅलेंटाईन डे ...!
आज ती चा दिवस ...!
तो कमालीचा धुंद.. रोमॅंटिक मूडमध्ये...!
काय करायचं आजचं प्लॅनिंग ?
आज फॅंड्री रिलिज होतोय. मस्त प्रेमकथा आहे म्हणे.. किती जमलीय कोण जाणे पण लव स्टोरीआहे ,इतना ही बस है.. बॉस..!
ठरलं तिच्यासोबत आज फॅंड्री पाह्यचा...!
थिएटरमधला अंधार .. फॅंड्री सुरु होतो....
“असं का होतंय मला... पडद्यावर मीच का दिसतोय मला,” तो स्वतःशीच पुटपुटतो.
तो हरवलाय.. ती शेजारी बसलीय हे ही विसरलाय क्षणभर...
थिएटरमध्ये उजेड पसरलाय...
अरे कुणी लावल्या या लाईटस .. बंद करा रे.. या अंधारातच मी मला गवसलो होतो इथे... जब्याचा दगड उचलण्यासाठी त्याचे हात शिवशिवताहेत .. डोळ्यांतून पाणी खळत नाही.
ती हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवते ,”,कुठं हरवलायंस? काय झालं?”
“मला ना तुला काही सांगायचंय..! मी लपवत होतो तुझ्यापासून आजपर्यंत पण आज तुला सांगायचंय ...”
विस्फारलेल्या डोळ्यात  अस्फुट “ काय? काय सांगायचंय तुला ?
“मी कैकाड्याचा आहे,” छातीवरला दगड कोणीतरी उचलून ठेवावा तसा तो बोलतो.

फॅंड्री ने असे काय केले ?
या दांभिक व्यवस्थेत जगता जगता जाती व्यवस्थेने दिलेले सारे गंड साखळ दंडासारखे निखळले आणि जब्याने दातओठ खाऊन मारलेल्या दगडाने आणि कैकाडीत दिलेल्या शिव्यांनी आपल्यातले शिळा होऊन पडलेले माणूसपण पुन्हा सजीव झाले.
या जातस्तरीय अग्निजन्य खडकाला दुभंगून, त्या पलिकडे जाऊन तुला पाहता येत असेल माझ्याकडे तरच तू माझी व्हॅलेंटाईन...!
    असे वाटले मनोमन आणि म्हणूनच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( टीस ) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकणा-या त्याला फॅंड्री पाह्यलावर आपले जात वास्तव आपल्या सखीला सांगावेसे वाटले.
... टीस मधल्या कार्यक्रमात त्यानेच तर सांगितले नागराजला सारे..!

  हे फॅंड्री चे यश तर खरेच पण तेवढेच समाज म्हणून तुमचे माझे अपयशही ..!
   जात भूमिगत झाल्यासारखी वाटते,अनेकांना नामशेष झाल्यासारखी दिसते. ग्लोबल जगात जगणा-या ,इंडियात राहणा-या अनिवासी भारतीयांना तिचे अस्तित्व जाणवत नाही. पण ती इंग्रजी पेपरांच्या मॅट्रीमोनिअल्समध्ये, घर भाड्याने घेणा-या भाडेकरुंच्या करारपत्रात वाकुल्या दाखवत हसत असते. ज्यांना तिचे फायदे त्यांना ती मिरवावी वाटते. पुढा-यांसाठी ती वोटबॅंक असते पण ज्याला ती पदोपदी नाडते,गावकुसाबाहेर धाडते, माणूसपणातून उठवते, उपासपोटी झोपवते, दारोदार फिरवते, त्यांना ती न्यूनगंडाने पछाडते, आपला चेहरा, आपली ओळख या ग्लोबल गावातही लपवायला भाग पाडते.काही बुध्दिवंतांना जात आणि वर्ग अशी वैचारिक खलबतं करायला आवडते. त्यांना माणूस हा इकॉनॉमिकल क्रिएचर वाटतो.त्याच्या जगण्यातील धार्मिक – सांस्कृतिक – सामाजिक पदर त्यांना उमगत नाहीत.
 फॅंड्री आणि फॅंड्रीवरील प्रतिक्रिया आपल्या समाज वास्तवाची लिटमस टेस्ट आहे.  
   १९१३ ते २०१३ सिनेमाची शंभर वर्षे.आपल्या समाज वास्तवाला डोळे भिडवायला मराठी चित्रपटाला तब्बल शंभर वर्षे लागली. आणि म्हणूनच अनेक चित्रपट समीक्षकांना आता फॅंड्री पूर्वीचा मराठी सिनेमा आणि फॅंड्री नंतरचा मराठी सिनेमा अशी काल विभागणी भविष्यात होईल,याची खात्री वाटते.
  मी या चित्रपटाच्या गर्भधारणेपासून नागराजच्या सोबत आहे, त्याचे डोहाळे मी पाहिले आहेत, प्रसव वेदना अनुभवल्या आहेत आणि त्याने माझ्या घरी विक एन्डला रंगलेल्या एका मध्यरात्रीच्या मैफिलीत जेव्हा फॅंड्री ची पटकथा ऐकवली तेव्हाच बर्नार्ड शॉने जे शेक्सपिअर बद्दल जे म्हटले होते तेच मी फॅंड्रीबद्दल म्हटले ,” फॅंड्री न आवडणे ,हीच फॅंड्री न आवडण्याची शिक्षा आहे.
“ काळा कुरुप माणूस चित्रपटाचा नायक का असू शकत नाही ? का असू शकत नाही काळ्या माणसाचीही आपली एक कथा ?”, टीन एजचा अवघा पडदा बॉलीवूडी चित्रपटांनी भरुन गेलेला नागराज इकडे स्वतःलाच प्रश्न विचारत स्वतःच्या मातीत उमटलेल्या फॅंड्री च्या पाऊलखुणा उकलत होता,उकरत होता आणि त्याचवेळी तिकडे सातासमुद्रापलिकडे ऑस्करची निवड समिती प्रथमच एका कृष्णवर्णिय दिग्दर्शकाच्या स्टीव मॅकविनच्या ट्वेल्व इयर्स अ स्लेव या एका गुलामगिरीवरील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान प्रदान करित होती. माणसाने माणसाच्या केलेल्या शोषणाची पटकथा इथले आणि तिथले सारेच पडदे व्यापून उरली आहे. आजही आपण फॅंड्री बद्दल बोलत असताना नागराज मंजुळे अमेरिकेतल्या कुठल्यातरी विद्यापीठात आपल्या जगण्याची चित्तरकथा उलगडत असेल. सारी गोरी काळी माणसे भान हरवून त्याला ऐकत असतील,पाहत असतील. गावकुसाबाहेर वाढलेल्या नागराजच्या शब्दाला दुभाषा लागणार नाही कारण वेदनेला भाषांतराची आवश्यकता नसते. म्हणून तर आमीरखान म्हणतो, “या वर्षी चित्रपट माध्यमाच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फॅंड्री ने भारताचे प्रतिनिधित्व करायला हवे...!”
नागराज आमीरची भेट


   खरे तर किती साधी कथा. पण ती इतक्या साध्या पध्दतीने कुणाला सांगताच आली नाही. आपली कथा इतक्या साध्या पध्दतीने सांगायला स्वतः निखळ माणूस असायला लागते. कोणतीच पोज न घेता नागराज ही गोष्ट सांगत जातो. कुठल्याशा गावात राहणा-या जांबुवंत कचरु माने नावाच्या टीन एजर मुलाची ही कथा. जांबुवंत कैकाडी जातीचा. घरात त्याचे वडील नाना,आई आणि दोन बहिणी, एकीला नव-याने टाकलेले तर दुसरी लग्नाची..! अशा या जब्याचे वर्गातील शालूवर प्रेम..!  शालू देखणी आहे,ती जब्याला खूप आवडते पण जब्या तिला कसा आवडावा ? जब्या खालच्या जातीचा,रंगाने काळा.पण जब्यावर शालूने गारुड केले आहे मग गावातला सायकलवाला चंक्या त्याला युगत सांगतो, “काळी चिमणी पकडायची, मारायची,जाळायची अन तिची राख आपल्याला आवडंल त्या पोरीवर टाकली की ती आपल्याला वश होते.” झालं, अडनिड्या वयातील जब्या आपला मित्र  पि-या सोबत काळी चिमणी शोधण्याची मोहिम सुरु करतो. या अनवट प्रेमकथेतील खलनायक आहे – जब्याची जात आणि या जातीवरुन त्याला हीन शुद्र समजणारी प्रचलित समाजव्यवस्था. या समाजव्यवस्थेने या इवल्याशा जीवात अनेक गंड निर्माण केले आहेत,त्याला आपल्या दिसण्याचा गंड आहे, म्ह्णून तो किती तरी वेळ आरशासमोर भांग पाडत बसतो, आपण नीटनेटके दिसतो आहोत ना म्ह्णून पुन्हा पुन्हा कॉन्शियस होतो. आपले नाक अजून धारदार व्हावे म्हणून नाकाला चिमटा लावून ठेवतो. पितळेच्या तांब्यात चुलीतला विस्तू टाकून आपल्या जुन्या पान्या कपड्यांना इस्त्री करुन घालण्याचा तो अट्टाहास करतो. दिसणे,कपडे  हे सारे थोड्याशा प्रयत्नाने बदलता येते पण त्याच्या अवघ्या जगण्यावर इथल्या समाजाने कोरलेले जात वास्तव ते मात्र त्याला पुसता येत नाही. गावातील डुकरांचा बंदोबस्त करणे,हे गावगाड्याने दिलेले त्याचे परंपरागत काम आहे. या शिवाय गावगाड्यातल्या सरंजामदारांनी सांगितलेली कामं निमूटपणे करणे, भाग आहे. शाळेतल्या मित्रांसमोर आणि विशेषतः शालूसमोर असली हलकी सलकी कामं करताना त्याच्या जीवाचे पाणी पाणी होते. तो पळत राहतो पण जगण्याला चिकटलेली जात आणि जातीची कामे त्याचा पाठलाग सोडत नाहीत. आणि एक दिवस गावचा सरपंच जब्याच्या बापाला गावातले माजलेले डुक्कर पकडायला सांगतो...आणि जब्या, नाना, जब्याची आई,दोघी बहिणी डुक्कर पकडण्यासाठी धावताहेत.सारं गाव,शाळा त्यांची गंमत बघताहेत.. जब्याचे खविस मित्र,गावातले टगे त्याला “ए फॅंड्री म्हणून चिडवताहेत. अखेर कडेलोट होतो आणि जब्या त्या बघ्यांवर जीव खाऊन दगड भिरकावतो. कॅमेराचा ऍन्गल बदलतो आणि पुढचा दगड थेट पडद्यावरुन आपल्या अंगावर येतो. आपणही या चित्रपटाचा भाग होतो, हे आता आपल्या ध्यानात येते. आपण सुन्न होतो.ज्यांचे डोळे अद्याप दुष्काळग्रस्त झाले नाहीत,त्यांच्या कडा पाणावतात. जब्याची हलगी कानटळ्या बसेपर्यंत वाजू लागते आणि पडके वाडे आणि शिखरांवर बसलेली अदृश्य भुते आता आपल्यासमोर नाचू लागतात.
 काय विचारतो आहे जब्याने भिरकावलेला दगड ?
अरे तुम्ही गोविंदराव फुलेच्या पोराला सवर्ण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीतून हाकलून दिले...
बॅरिस्टर झालेल्या भिमरावाच्या टेबलवर दुरुन फाईली भिरकावल्यात...
राजर्षी शाहू सोबत वेदोक्त – पुराणोक्तच्या खुळचट वल्गना केल्यात...
१९९० आले.. ग्लोबलायझेशन आले. वाटले होते वैश्विक खेड्यात तुम्हांला वैश्विक शहाणपण येईल पण ...
किलावेनमानी,खैरलांजी घडतेच आहे...!
सोनई, भाळवणी, पुर्णिया रोज नवे गाव,रोज नवे अत्याचार...!
का?का?का?
असे आणखी किती दिवस चालणार ?’
जब्याच्या दगडाला प्रश्नांचे असे न संपणारे गाठोडे बांधले आहे.
       या जात वास्तवाच्या धगीत जळणा-या बाईचे अस्फुट हुंदकेही फॅंड्री मध्ये ऐकू येतात. स्त्री ही जातीचे प्रवेशद्वार आहे. असे म्हणणा-या बाबासाहेबांनी अवघ्या स्त्री जातीलाच दलित म्हटले होते. इथेही हाताला मेंदी लावलेली सुरखी नव्या संसाराची स्वप्ने पाह्यची सोडून आय-बाच्या संगं डुकरामागं धावताना दिसते. नव-याने टाकलेली धुरपा गावातल्या आल्या गेल्याच्या विखारी नजरा झेलत जगताना दिसते. दुखणारे गुडघे विसरुन नानी पुरुष पुरुष उंचीचे खड्डे खोदत राहते आणि त्याच खड्ड्यात स्वतःची स्वप्ने पुरत राहते.

  नागराजने त्याने अनुभवलेले जातवास्तव फॅंड्रीमधून मांडले आहे. पण जब्याचे हे जगणे चित्रित करताना आलेले काही अनुभवही पुन्हा हे जात वास्तवच अधोरेखित करतात. संतोष संखद हा फॅंड्रीचा कला दिग्दर्शक. त्याला शुटिंगच्या दरम्यान आलेल्या अनुभवातून जातीव्यवस्थेचा हा पिळ अजूनही जिवंत कसा आहे,याचाच प्रत्यय येतो.
    चित्रपटात चंक्या साठे नावाचे एक पात्र आहे. हा आहे गावातला सायकल दुकानदार. हा मांग समाजाचा आहे. त्याचे सायकल दुकान बनविण्याचे काम सुरु होते. दुकानात सायकल संदर्भातील अनेक गोष्टींची मांडामांड करताना भिंतीवर आण्णाभाऊ साठेंचा फोटोही लावण्यात आला. गावातल्या काही लोकांनी त्याला आक्षेप घेतला,
“इथं हा फोटो कशापायी?’
त्यांना काय आणि कसे समजवावे ते संतोषला कळेना. त्याने विचारले, “तुमची काय हरकत आहे?”
“ तुम्ही इथं शिवाजी म्हाराजांचं फोटो का लावित नाय ? तुम्हाला काय म्हाराजांचा फोटो आवडत नाय काय ?”
या मंडळींची समजूत कशी काढावी तेच कळेना.
शेवटी कोणीतरी सांगितले,”अहो,हे पिक्चरमध्ये चंक्या नावाच्या मान्साचं दुकान हाय आन त्यो हाय मांगाचा म्हणून आण्णाभाऊंचा फोटो लावला.”
मग त्यातील एकजण म्हणाला,”बरोबर हाय, त्याच्या दुकानात म्हाराजाचा फोटो कशापाई?”
जातीचा खंदक एवढा खोलवर गेलेला आहे की आपले सारे महापुरुषही आपण आपापल्या जातीत वाटून घेतले आहेत,याचा एक दुःखद अनुभव.

असाच आणखी एक अनुभव ...
ह्र्दयातून आलेली कलाकृती ह्रदयपरिवर्तनही कसे करते हे सांगणारा.  
फॅंड्रीमध्ये डुक्कर हे एक महत्वाचे पात्र आहे. या करताच मुळात ज्या गावात काही पडके वाडे किंवा किल्ला असेल अशा लोकेशनच्या शोधात नागराज होता. कारण अशा जागेत डुक्कर सर्वसाधारणपणे आढळते आणि त्यामुळे चित्रणातही स्वाभाविकता येते. मात्र ज्या गावात चित्रिकरण तिथे अडचण व्हायची अशी की या पडक्या वाड्यांच्या जागा म्हणजे गावची हगणदारी. बरीचशी मंडळी तिथे सकाळी सकाळी विधी उरकायची आणि त्यानंतर तिथे शुटींग करणे म्हणजे ..... महाकठीण..! येथे शुटींग होणार आहे, इथे संडासला बसू नये’, असे बोर्ड लावूनही काही फायदा होईना. त्यामुळे अनेकवेळा लोकांनी केलेली घाण साफ करुन शुटींग करावे लागे पण ती घाण साफ करायची कोणी?म्हणून गावातील काही लोकांना सांगितले, त्यांना त्यासाठी रोजगारही देऊ केला. पण तरीही एक दोन दिवसानंतर लोक या कामासाठी येईनात. “पैसा मिळतो म्हणून तुम्ही कसलीही कामे करता,”असे म्हणून गावातील लोक आपल्याला हसतात म्हणून आम्ही हे काम करणार नाही असे त्यांनी सांगितले. मग शेजारच्या गावातील लोक बोलविले. पण तेही या कामाकरिता फार उत्साही नव्हते. केवळ पैसा देऊन उपयोग नव्हता,अशा प्रकारच्या कामाला चिकटलेले हीन स्वरुप याही लोकांना छळत होते.
    आपण जातिव्यवस्था आणि तिच्यासोबत चिकटलेल्या कामांना आणि माणसाला हीन लेखण्याच्या प्रवृत्ती संदर्भात फिल्म करतो आहोत. आता या फिल्ममधून उमटणारा संदेश कृतीत आणावयाची वेळ आहे,” हे संतोष आणि  टीमने ओळखले आणि त्यांनी त्या लोकांसोबत स्वतःही स्वच्छतेचे काम करायला सुरु केले. सारी कष्टकरी मंडळी फिल्मच्या सर्व टीम सोबत चहा,नाश्ता,जेवण घेऊ लागली आणि  बघता बघता एका किळसवाण्या कामाचे स्वरुपच जणू पालटून गेले. लोकांना ते काम करण्यात लाज वाटेनाशी झाली.

   पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये फॅंड्री समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचीही सर्वाधिक पसंतीची फिल्म ठरली. या फेस्टिवलमध्ये लोकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद अवाक करणारा होता. फिल्म संपली तरी लोक बसून होते,कोणी सुन्न कोणी हताश,कोणी ओल्या डोळ्यांनी आसमंतात हरवलेले...! एका कलाकृतीला मिळणारा हा प्रतिसाद सुखद होताच पण त्याहूनही अधिक समाज म्हणून तो अधिक आश्वासक होता आणि आहे. इथल्या सर्वसामान्य माणसालाही हे जातवास्तव काचते आहे,त्याला ते नकोसे झाले आहे,असा दिलासा या प्रतिसादातून मिळत होता आणि आहे.
    अर्थात काही वेगळ्या प्रतिक्रियाही आहेत. तेही पुन्हा आपले जातवास्तव अधोरेखित करणा-या. एबीपी माझाच्या प्रसन्न जोशीने एका मुलाखतीत नागराजला विचारले, “ गावाकडील जातीपातीची खूपशी बंधने आता गळून पडली आहेत,असे तुला वाटत नाही का ? चित्रपटात ग्रामपंचायत मिटींगच्या वेळी गावातील सारे कैकाडी असलेल्या कचरुकडून चहा घेतात.त्यात त्यांना काही वावगे वाटत नाही हा बदल स्वागतार्ह नाही का ?”
  स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षाहून अधिक काळात खालच्या जातीतील लोकांनी केवळ आता सारे लोक आपल्या हातचा चहा पित आहेत म्हणून धन्यता मानावी आणि त्यातच संतुष्ट रहावे अशी अपेक्षा आपण कशी काय करु शकतो ? कचरुच्या मानवी हक्कांची गोष्टही आपल्या गावी नाही. त्याच्या हातचा चहा लोक पितात हे प्रसन्न जोशी टिपतो पण कचरु सा-या मिटींगभर लोकांनी सोडलेल्या चपलांजवळ बिचा-यासारखा उभा आहे, हे तो कसे विसरतो? आणि डुकराच्या मागे धावून धावून दमलेल्या जब्याच्या बहिणीला पाणी देणारी ती बाई आवर्जून पाण्याचा तांब्या खाली ठेवते, तिच्या हातात नाही देत हे कसे डोळ्याआड करता येईल? म्हणूनच नागराज म्हणाला,” फास ढिला झाला आहे पण फास आहे. आपण एक दिवस बायकोला फिरायला नेली म्हणजे स्त्री पुरुष समता प्रस्थापित होत नाही.”
    फेसबुकवरील फॅंड्रीवरील स्टेटस मध्येही प्रसन्न जोशीने जे लिहले आहे ते विचारत टाकणारे आहे. जागतिक दर्जाची फिल्म मराठीला दिल्याबद्दल नागराजचे अभिनंदन करताना,
जांबुवंताकडेही अगदी दगड जरी नाही तरी छोटा खडा मला फेकायचाय....”
असे म्हणत प्रसन्न जांबुवंतला असणारा शुध्द मराठीचा सोस, त्याचे टी शर्ट,जीन्स आणि शहराचे आकर्षण या मुळे कदाचित उद्या तो आर्थिक दृष्ट्या प्रस्थापित झाल्यावर आपल्या गावठी आई बापाचा,कुटुंबियांचा दुस्वास तर करणार नाही ना,अशी भिती व्यक्त करतो. त्याला ही चित्रपटातील निसरडी जागा वाटते. यावर काय लिहावे,काय बोलावे तेच सुचू नये अशी अवस्था. मुळात आपल्या अवघ्या जगण्याबद्दलचे हे न्यूनगंढ या व्यवस्थेने त्या जब्यामध्ये रुजविले आहेत. आपलं अवघं जगणंच कमअस्सल आहे,अशी भावना घेऊन जगत राहणं,तेही हळव्या टीन एज मध्ये.ही किती भळभळती जखम असते,हे कसे समजावून सांगावे. ही व्यवस्था शोषितांना स्वतःचा,स्वतःच्या भाषेचा,दिसण्याचा,कपड्याचा दुस्वास करायला भाग पाडते, हे दिग्दर्शकाचे जळजळीत विधान निसरडी जागा कशी असू शकेल? जगण्याच्या मुळालाच अशी कीड लावणा-या व्यवस्थेबद्दल अवाक्षरही न काढता प्रसन्न जब्याकडेच एक खडा फेकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो फारच केविलवाणा ठरतो.
    मुळात प्रसन्नसह अनेकांना जब्याचा दगड हा सवर्णांच्या दिशेने येताना दिसतो. खरे तर हे अर्धसत्य आहे. जब्याचा ए फॅंड्री म्हणून वारंवार मानभंग करणारे केवळ सवर्ण नाहीत. त्यात गावगाड्यातील बहुजन समाजातील मंडळीही आहेत. चित्रपट बारकाईने पाहिला तर हे सहज ध्यानात येईल. “जातव्यवस्था म्हणजे श्रमाचे नव्हे तर श्रमिकांचे विभाजन आहे”, हे बाबासाहेबांचे विधान चित्रपटातील अनेक प्रसंगातून ठळक होत जाते. त्यामुळे ज्याला आपली जात विसरता येत नाही, डी कास्ट होता येत नाही आणि जे जे जातीपातीवर आधारित भेदभावाला थारा देतात त्या प्रत्येकासाठी जब्याचा दगड आहे. मुळात शोषक आणि शोषित हे दोघेही व्यवस्थेचे बळी असतात. त्यांच्या माणूसपणाचा अवकाश संकुचित करणारी व्यवस्था दोघांचेही जगणे बेमालूम कुरतडत असते. शोषितांचे हे कुरतडणे सहजी उमगते तरी पण शोषकांचे कुरतडणे त्यांनाही कळू नये इतके नेणिवेतले असते.
    उस्मानाबाद मधील काही मांग कार्यकर्त्यांनी फॅंड्रीचा एक शो बंद पाडला.का तर म्हणे,डुकरामागे धावणा-या जब्याच्या अंगावर जो टी शर्ट आहे त्यावर लहुजी वस्तादांचे नाव आहे आणि लोक त्याला फॅंड्री फॅंड्री म्हणून चिडवताहेत.हा म्हणे,लहुजी वस्तादांचा अपमान आहे. अवघे माणूसपण हरवलेल्या या व्यवस्थेतील हा अंतर्विरोध असा बोचरा आहे आणि इथल्या प्रत्येकाच्या तथाकथित अस्मिता इतक्या निमताळ्या आहेत. म्हणून तर नागराज बेडरपणे त्याला वडार भूषण पुरस्कार देऊ इच्छिणा-या संघटनांना नकार देतो. “माझ्या भोवती ही अशी जातीची वारुळं वाढली तर मी जिवंत तरी कसा राहू शकेन”,असा प्रश्न या संवेदनशील कवीला पडतो आणि त्याचवेळी त्याला फॅंड्री शब्दाचा अर्थ विचारणा-यांचा म्हणजे आपणां सगळ्यांचाच रागही येतो.त्याला वाटते,’का माहित नाही तुम्हांला या शब्दाचा अर्थ, हा शब्द वापरणारी मंडळी तुमच्या अवतीभवती जगत असताना ? आणि आज कदाचित तुम्हांला या शब्दाचा अर्थ कळेल पण या शब्दाचा वापर करणा-या लोकांच्या जगण्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्ही काय कराल ?कसा द्याल त्यांच्या जगण्याला अर्थ ?’
जब्या आणि पि-याला घावेल का ती मिथिकल काळी चिमणी ?

           या चित्रपटात जब्याची भूमिका करणा-या सोमनाथ अवघडेच्या निमित्ताने जात वास्तवाचा आणखी एक आयाम आपल्याला स्प्ष्ट दिसतो. सोमनाथ सोलापूर जिल्ह्यातील केम या गावचा मांग समाजाचा मुलगा. फॅंड्रीसाठी ऑडिशन सुरु असताना सचिन बिचितकरने त्याचे नाव सुचविले, त्याची हलगी नागराजच्या मनात भरली आनि सोमनाथ जब्या झाला. सोमनाथ गावातीलच एका शाळेतला इयत्ता नववीचा विद्यार्थी पण त्याला लिहता वाचता यायची बोंब...! ७९ ,८९ असे अंक लिहताना सुध्दा अडचण तर साधी बेरीज वजाबाकी तर आणखीनच दूरची गोष्ट..! शाळेत शिकवायचे कमी आणि अद्वातद्वा बोलणे जास्त. सोमाचा अपमान करणा-या शिक्षकाला हा कधी तरी उलट बोलला. शिक्षकाने दिला घरी हाकलून तेव्हापासून शाळेची गोडीच संपली. शाळेलाही सोमा येतो की नाही याच्याशी काही देणेघेणे नव्हते. “ढ” असा एक शिक्का कपाळावर बसला. शुटींगच्या वेळीही सुरुवातीला अडचण आली. सोमनाथ आणि सूरज (पि-या) या दोघांनाही वाचता यायचे नाही मग संवाद कसे पाठ करणार ? मग कुणीतरी सारी पटकथा संवाद त्यांना एक दोन वेळा वाचून दाखविले आणि बहाद्दरांचे सारे संवाद तोंडपाठ ! केवळ आपलेच नाही तर इतर पात्रांचे सुध्दा. ही मुले प्रचलित शिक्षण पध्दतीमधली मुले होती मग हे कसे झाले ? बुध्दिमत्ता होतीच फक्त तिचा शोध घ्यायला आपल्या शिक्षण पध्दतीत अवकाश नाही. ज्या जब्यासाठी शाळेला आस्था नव्हती त्याच जब्याचे नाव झाले,त्याने पिफ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळवला, सोमा एका रात्रीत सेलिब्रिटी झाला आणि सोमाच्या गावात त्याच्या शाळेने फ्लेक्स लावले-आमच्या शाळेचा विद्यार्थी म्हणून ढोल बडवायला सुरुवात केली. सोमाला २६ जानेवारीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले पण सोमा गेला नाही. सोमाच्या व्यक्तित्वावर साचलेली चिमूटभर माती देखील दूर करण्याचे सौजन्य आपल्या प्रचलित शिक्षणाने दावले नव्हते. आणि मग आम्ही मेरीटच्या गोष्टी करतो,गुणवत्तेच्या नावाने गळा काढतो. आजही स्थलांतरित मजूरांपैकी दोन तृतियांश मजूर मागासवर्गीय का असतात, याच समुदायात बालमृत्यूदर,माता मृत्यूदर अधिक का असतो आणि शाळाबाह्य मुलांपैकी बहुतांश मुले याच समाजाची का असतात या सा-या प्रश्नांची उत्तरे या व्यवस्थेत दडली आहेत. एकोणविसाव्या शतकाच्या मध्यावर फुल्यांनी मुक्ता साळवे साठी शाळा काढली.आज मुक्ता साळवे शाळेत आहे पण किती शाळा तिला आपली मानतात ? सोमा सूरजच्या निमित्ताने हा ही प्रश्न ऐरणीवर यायला हवा. हस्तिदंती मनो-यात राहणा-या अनेकांना मुळात आता जात कुठे राहिली आहे असे भाबडे प्रश्न पडतात. त्यांनी स्टॅलिनची “इंडिया अनटच्ड “ही डाक्युमेंटरी पहावी. भारतात पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर, प्रत्येक राज्यात,प्रत्येक धर्मात आजही विद्यमान असणारी जातियता आपल्याला घायाळ करते.या एका डॉक्युमेंटरी मध्ये किमान दहा फॅंड्रीचा ऐवज भरला आहे. ती वर्तमानातील आपल्या समाजातील जात वास्तवाचे जिवंत चित्रण करते. आपण या जात वास्तवासंदर्भात संवेदनशील आहोत काय,याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे आहे. आपली ऍट्रोसिटी विरोधी कायद्यान्वये नोंदविण्यात आलेल्या केसेस आणि त्यातील शिक्षा होण्याचे अत्यल्प प्रमाण हीच गोष्ट सप्रमाण सिध्द करते.
घटना समितीसमोरील एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते,
“On 26th  Jan 1950, we are going to enter in to life of contradictions.  In politics, we will have equality & in social & economic life we will have inequality. In politics, we will be recognizing the principle of one man, one vote & one vote, one value. In our social & economic life, we shall by reason of our social & economic structure, continue to deny the principle of one man, one value. “
  आपल्या राजकीय आणि सामाजिक जगण्यातला हा अंतर्विरोध लवकरात लवकर संपुष्टात आणण्याची आवश्यकता कालही होतीच पण आजच्या जागतिकीकरणानंतरच्या जगात आपल्याला समाज म्हणून टिकायचे असेल तर ती पूर्वअट आहे. जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहणा-या आपण ही निकड ओळखणे आणि व्हॉटस अप आणि फेसबुकवरील आपल्या प्रोफाईल पिकवर आपले माणूसपण गोंदणे कधी नव्हे एवढे आज गरजेचे झाले आहे.
  काळ्या चिमणीसाठी व्याकुळ झालेल्या जब्यासाठी मी छोटेसे गीत लिहले आहे –
“ काळी काळी जीव जाळी,चिमणी मला कधी घावंल ?
निळं निळं आभाळ कधी,मुठीत या माझ्या मावंल ?

  काळी चिमणी ही नुसती फॅण्टसी नाही. ते इथल्या प्रत्येक जब्याचे जीवापाड जपलेले स्वप्न आहे. या प्रत्येक जब्या,पि-या, वेदांत, संग्राम, शालू आणि राणीच्या हातात त्यांना हवा असणारा आभाळाचा निळा तुकडा गवसायला हवा. फॅंड्री ला हे सारे सांगायचे आहे. जब्याच्या त्वेषाने उठलेल्या हातात आणि वेगाने भिरकावलेल्या दगडात संताप तर आहेच पण एक आर्जव ही आहे, उद्याच्या तुमच्या माझ्या जगासाठी... जे सा-यांचे असेल,सा-यांसाठी असेल ! 

        (' मिळून सा-याजणी ' च्या एप्रिल २०१४ च्या अंकात प्रसिध्द) 

1 comment:

  1. आदरणीय दादा,
    तुम्ही फँड्रीची कथा सांगितली आहे.खरं तर ती तपशीलवार लिहायला हवी. "मॅकिंग ऑफ फँड्री" हे छान पुस्तक होईल. केवळ फँड्रीच नाही तर एकूण परिस्थितीवर भाष्य करता येईल. तुमच्या भन्नाट शैलीत ते एक चांगले पुस्तक होईल. कारण तु्‌म्ही सुरवातीपासून या प्रोजेक्टमध्ये आहात.

    ReplyDelete