Sunday 22 December 2013

प्रिय डॉ.हिम्मतराव...
डॉ.हिंमतराव बावस्कर

प्रिय डॉ.हिंमतराव बावस्कर,
“खिशात शेवटची दिडकी असेपर्यंत मी वैद्यकीय व्यवसायातील भ्रष्टाचाराविरुध्द लढा देईन”
सर,तुमचे हे विधान नुकत्याच प्रसिध्द झालेल्या लॅन्सेटमध्ये वाचले आणि मला एकदम जुन्या काळी पाठ्यपुस्तकात वाचलेली आणि आता सर्वाथाने विस्मृतीत गेलेली कविता आठवली,
“भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले
तुझ्या कुशीला परि जन्मली काही वेडी मुले
काही वेडी मुले तयांची भडकूनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे ..!”
तुम्हांला पाहून स्वातंत्र्यपूर्व काळातील वेड्या क्रांतीकारकांची आठवण झाली तर त्यात नवल ते काय ? आणि आमच्या सारखी कोट्यावधी शहाणी’’ब्रिलियंटमुलं या देशात सुखात नांदत असताना तुम्हांला वेडे म्हणावं नाही तर काय करावं ?
कुठल्या तरी डायग्नोस्टिक लॅबला तुम्ही तुमच्याकडे आलेला पेशंट एम.आर.आय.साठी रेफर करावा आणि त्या लॅबच्या मालकाने (?डॉक्टरने) त्या बदल्यात तुमची प्रोफेशनल फी म्हणून प्रामाणिकपणे तुमचा वाटा चेकनं अदा करावा आणि त्या बद्दल त्याचे आभार न मानता तुम्ही चक्क मेडीकल कौन्सीलकडे त्याची तक्रार करावी?टोटली अनप्रोफेशनल !आता याला वेडेपणा म्हणावे नाही तर काय ? बरं यापूर्वीही असा वेडेपणा कोणी केला नाही,अशातला भाग नाही. १९९६ मध्ये डॉ.एम.के.मणी या नेफ्रालॉजिस्टनेही अशी तक्रार केली होती. त्यावर काही कारवाई करायला एम सी आयला वेळ मिळाला नाही,काय करणार? मर्दानं चहाला आन सवाष्णीनं कुकवाला कधी नाय म्हणू नाही”,अशी आपली जुनी रीत.लक्ष्मीचंही तसंच आहे,ती कोणत्या का वाटेनं येईना,शहाणी माणसं तिला नाही म्हणत नाहीत.म्हणून तर त्यांना शहाणं म्हटलं जातं.आता तुम्ही ज्या मेडीकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे त्या संस्थेचे बरीच वर्षे प्रमुख असलेल्या केतन देसाईंचेच उदाहरण घ्या ना एकावर नेमकी किती शून्य दिली म्हणजे त्यांच्याकडे सापडलेल्या बेनामी संपत्तीची मोजदाद करता येईल,हे व्यवहाराचं गणित न उमजणा-या वेड्यांना कसे कळणार ? पण सारी मजा ही शून्यं वाढविण्यातच आहे.अर्थात केतन देसाईवर कोणी खोटेनाटे आरोप केले असण्याची शक्यताही नाकरता येत नाही.कारण त्या सा-या आरोपातून देसाईंची निर्दोष सुटल्याचे ऐकतो.असो, प्रत्येक गोष्टीतील उपकथानके कुठं कळतात आपल्याला ?
 माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला आठवते.शाळेत असताना तू कोण होणार ?’असे कोणी म्हटले की मी अंतःस्फूर्तीने डॉक्टरअसे उत्तर देई.मी आठवी नववीत असताना शेवाळे सर नावाचे माझे शिक्षक माझ्या वडिलांना कौतुकाने म्हणाल्याचे आठवते,”आप्पा,आता काय तुमचा राजू डॉक्टर होणार म्हणजे काय पैसाच पैसा...!”
डॉक्टर झाल्यावर पैसाच पैसा कसा काय येतो, हे मला कळायचे ते वय नव्हते.माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र तरळले,मी गळ्यात स्टेथो अडकवून रस्त्याने चाललो आहे आणि लोक माझा,माझ्या डॉक्टरकीचा जयजयकार करत माझ्यावर पैसे उधळत आहेत.अर्थात बाल कथा –किशोरकथा वाचण्याच्या त्या वयात या पेक्षा वेगळी फॅंटसी माझ्या मनात येणे शक्यही नव्हते. वयाच्या बाराव्या वर्षी मला आणखी काय सुचणार? पण डॉक्टर झालो.अवघ्या चार हजार लोकसंख्येच्या गावात काम करु लागलो आणि अवघ्या काही दिवसातच पैसाच पैसाया रहस्य कथेची उकल झाली.आठवडाभरातच माझ्या छोट्याशा गावातील मेडिकल दुकानदार मला भेटला.ठराविक कंपनीचे ठराविक औषध महिना दोन महिन्यात खपविले तर किती लाभ मिळेल,टीव्ही फ्रीज,कार आणि काय काय मिळेल,कोणकोणत्या टूर कंपनी स्पॉन्सर करेल,हे तो समजावून सांगून,माझे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करुन निघून गेला. मी अवाक ...!
  आणि त्याचवेळी जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावातील मोठेमोठे प्रॅक्टीशनर्स गेस्टहाऊसला, चांगल्या हॉटेलात  नित्यनेमाने जेवणावळी आयोजित करत होते. त्यातील अर्थपूर्ण व्याख्याने नेहमीप्रमाणे माझ्या बथ्थड डोक्यात घुसली नाहीत,मला समजली नाहीत. पण मला आतून वाटत राहिले की,काहीतरी प्रचंड चुकते आहे.वाटले की,नोबल प्रोफेशन आपला आत्माच हरवते आहे. अर्थात काही सन्माननीय अपवाद प्रत्येक क्षेत्रात असतातच...सुदैवाने मलाही ते भेटले. अडल्या नडल्या पेशंटची फी  माफ करुन आणि वर त्या गरीब पेशंटला घरी जाण्यासाठी प्रवासखर्चाला पैसे देणारे डॉक्टरही मी पाहिले. आपले कौशल्य,प्रामाणिक मेहनत आणि रुग्णाप्रती असलेली निष्ठा यामुळे ही माणसे सर्वार्थाने मोठी असतात,होतात. पण अपवादाने नियमच सिध्द होतो,नाही का?
        असे काही, राहवले नाही म्हणून एका डॉक्टर मित्राशी बोललो,तो म्हणाला,”तू  विनाकारण फार विचार करतो आहेस”, आणि पुढे माझ्या खांद्यावर थोपटत हसत म्हणाला,” अबे,घोडा अगर घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या ?” मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मी डॉक्टर असलेल्या कवी पेक्षा कवी असलेला डॉक्टरअधिक होतो आणि आहे. म्हणून मी घोडा आणि घास या रुपक अलंकाराचा विचार करत राहिलो.आजही तो थांबलेला नाही. तुमची कट प्रॅक्टीसच्या विरोधात केलेल्या तक्रारीची बातमी वाचली आणि थबकलेला तो विचार प्रवाह पुन्हा सुरु झाला. गवतासोबतची माझी मैत्री घोडा असूनही मला कधी सोडता आली नाही पण गवताशी इतर घोड्यांनी केलेले शत्रुत्व कधी मोठ्या आवाजात बोलताही आले नाही,हे ही तेवढेच खरे! आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा मोठ्या आवाजात या गोष्टी बोलू लागला तेव्हा खूप आनंद वाटला. आजूबाजूला जे घडते आहे त्याला योग्य दिशा देणे आपल्या आवाक्याबाहेर आहे असे मानणारा प्रत्येकजण आशा निराशेच्या पेंडुलमवर ये जा करत असतो. आज तुम्ही दाखविलेल्या नव्या किरणाने मी पुन्हा या पेंडुलमच्या आशेच्या टोकाकडे सरकलो आहे.
            डॉक्टर,तुम्हांला भेटलो कधीच नाही मी पण तुमच्याबद्दल वाचलंय,ऐकलंय खूप ! डॉ.हिंमतराव,खूप कमी व्यक्तींना त्यांना शोभेल असे नाव लाभते नाहीतर सर्वसाधारणपणे नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा,’ अशी परिस्थिती सर्वत्र पाह्यला मिळते.वैद्यकीय व्यवसायातील कट प्रॅक्टीस सारख्या भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवायला हिंमत लागते. तुम्ही विंचूदंशावर केलेले संशोधन तर जगप्रसिध्द आहे. एका वेड्या निष्ठेने,जिद्दीने तुम्ही केलेल्या या संशोधनामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आहेत,उद्याही वाचतील.रानावनात फिरणा-या या विंचवावर तर नेमका उतारा सापडला तुम्हांला पण आता खूप मोठ्या विंचवावर स्वारी करायला निघाला आहात तुम्ही..!
शाहीर साबळे आणि मंडळींनी गायलेले विंचू चावला,विंचू चावलाहे भारुड कोण विसरेल ? या भारुडात गमती जमतीतून या विंचवाचे खरे स्वरुप आपल्यासमोर येते-
“मनुष्य इंगळी अतिदारुण
मज नांगा मारिला तिनं ...!”
लोभ,मोहाचे रसायन आपल्या नांगीत भरुन अवघा माणूसच विंचू झाला आहे.एकमेकांना दंश करतो आहे.या विंचवावरी उतारा शोधण्याची सुरुवात तुम्ही केली आहे.या शोधयात्रेत मी तुमच्यासोबत आहे,हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच...!एकनाथांनी पुढे लिहले आहे –
“या विंचवावर उतारा
तमोगुण मागे सारा
सत्वगुण लावा अंगारा
अन विंचू इंगळी उतरे सरसरा...!”
   आणि म्हणूनच हा उतारा शोधणे म्हणजे माझी,तुमची आणि अवघ्या व्यवस्थेचीच झाडाझडती घेणे आहे तरच हा उतारा गवसेल आणि किंचित राहिली फुणफुण,शांत केली जनार्दने’, असे म्हणत शांतपणे सुस्काराही टाकता येईल.पण ही फुणफुण शांत करणारा जनार्दनकोणी एक व्यक्ती नाही,हा अवघा जनता जनार्दन आहे,याचे भान माझ्यासारख्या अगणित तथाकथित शहाण्यांना येणे आवश्यक आहे. कारण ही फुणफुण शांत करणारी ताकद कोण्या एका व्यक्तीमध्ये नाही ती इथल्या प्रत्येकात,तुमच्या माझ्यात आहे.आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल,आण्णा हजारे असे आयकॉनायझेशन करणा-या आपल्या समाजात लोक तुम्हांलाही विंचूवाले बाबाकरुन मखरात बसवतील आणि कट प्रॅक्टीससह सारे दंश नित्यनेमाने सुरुच राहतील. म्हणूनच ही लढाई सर्वांची आहे, डॉक्टरांची आहे तितकीच पेशंटचीही, राजकीय धुरींणाची आहे तितकीच माध्यमांचीही ! ज्या समाजातील डॉक्टर भ्रष्ट आहेत तिथले शिक्षक,पत्रकार,राजकारणी,प्रशासक सारेच एकाच बोटीत असतात. डॉक्टर भ्रष्ट पण शिक्षक उत्तम किंवा त्या उलट ... असे कधी असत नाही कारण वेगळ्यावेगळ्या क्षेत्रातील माणसं एकाच समाजातून आलेली असतात आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींचा सामना करताना हे आंतरसंबंधाचे जाळे समजावून घेऊन आपल्याला अधिक समंजसपणे,होलिस्टिक पध्दतीने जायला हवे.
  शिक्षकाच्या गरीब असण्याचा आग्रह धरणारे गांधी कधी डॉक्टरांबद्दल काही म्हटल्याचे माझ्या वाचनात आले नाही पण मला नेहमी वाटते,वैद्यकीय क्षेत्रात अपप्रवृत्तींचा मोठ्या प्रमाणाव्रर शिरकाव होण्याची सुरुवात वैदयकीय आणि एकूणच शिक्षणाच्या अनिर्बंध खाजगीकरणातून झाली आहे.शिक्षणच जेव्हा बाजारात येऊन बसले आणि मॉलमधील चकचकीत वस्तू बनले तेव्हापासून डॉक्टरांचे दवाखानेही बिझनेस सेंटर झाले.आज सत्तर टक्केहून अधिक खाजगी वैदयकीय महाविद्यालये राजकीय पाठिंबा असणा-या शिक्षण सम्राटांची आहेत. सोलापूरात राहणारा डॉक्टर कागदावर तिरुपतीच्या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत असतो आणि फलटणचा कोणी करीमनगर कॉलेजच्या पेरोलवर असतो.कॉलेजची आणि त्याची भेट होते केवळ एम सी आय तपासणीच्या वेळी अथवा मुलांच्या परीक्षेच्या वेळी..! नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपण अशी रिमोट टीचिंगची अभिनव पध्दत शोधून काढली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जाणीवपूर्वक सवतीच्या मुलाची वागणूक देऊन ती निरुपयोगी कशी होतील,हेच जणू पाहिले जात आहे.ही अनास्था आपल्या मान्यवर वैद्यकीय संस्थांसाठी स्लो पॉयझिनिंग सारखी आपल्या व्यवस्थेत भिनत चालली आहे. वैद्यकीय शिक्षणातील ही अनागोंदी वैद्यकीय व्यवसायातील बजबजपुरीला खतपाणी घालते आहे.
 पण आपण नमोंचा इतिहासाचा तास घेण्यात गर्क आहोत,युवराजांना राजकीय समज शिकवण्यासाठी उत्सुक आहोत,तेजपालचे तारुण्य आणि आसारामांची सकाम प्रवचने याबद्दल गॉसिपींग करण्यात आपल्याला रस आहे पण इकडे आपले सार्वजनिक आरोग्य रुग्णालयाच्या खाटेवर दीनवाणे होऊन पडले आहे, याचे कोणालाच भान नाही.डॉक्टर,तुम्ही कट प्रॅक्टीसबद्दल आवाज उठवून या रुग्णाची केस हिस्ट्री सांगायला सुरुवात केली आहे.कट प्रॅक्टीस हे केवळ एक लक्षण आहे.रुग्णाचा इतिहास आपण जसजसा तपासत जाऊ तसतसे या आजाराची पाळेमुळे या व्यवस्थेच्या शरीरात किती खोलवर गेली आहेत, हे समजत जाईल.आणि सार्वजनिक आरोग्य हा राजकीय अजेंड्यावरील पहिल्या रांगेतील विषय बनत नाही तोवर काही या रुग्णावर आणि त्याच्या दुर्धर आजारावर रामबाण उपाय करणे, आहे.
डॉक्टर,आपण पेटविलेल्या ठिणगीने उद्याच्या पहाटेची वाट दाखविली आहे.या वाटेने चालायला मात्र प्रत्येकाने हवे.
एका नव्या दिशेसोबतच मूठभर धैर्य दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
आपला,

प्रदीप आवटे. 

dr.pradip.awate@gmail.com

सदर लेख साप्ताहिक 'लोकप्रभा' च्या दिनांक २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. सोबत लिंक दिली आहे.  


Friday 31 May 2013


मानो तो मैं गंगा मां हूं ...!
            
              मागच्या आठवडयात मान्सून अंदमानमध्ये येऊन धडकला आहे आणि जूनच्या पहिल्या आठवडयात तो केरळला येऊन पोहचेल आणि मग मुंबईत पाऊसधारा कोसळू लागतील. जीवघेणा उन्हाळा पावसाच्या पाण्यात वाहून जाईल आणि या दुष्काळाने दिलेले चटके, शिकविलेले धडे आपण नेहमी प्रमाणे विसरुन जाऊ. कारण आपल्या आजोबा वडिलांच्या पिढीची एकच कविता आपल्याला माहित आहे - 'नेमेचि येतो मग पावसाळा..!' भले आपण सारे नेम, नियम तोडत जाऊ,मोडत जाऊ पावसाने मात्र आपला नियम पाळायला पाहिजे, अशी आपली अपेक्षा..! कधी कधी प्रश्न पडतो,खरेच का आपल्याला पाण्याचे महत्व कळले आहे? 'अरे काय पाण्यासारखा पैसा खर्च करतो आहेस?', आपण किती सहज म्हणून जातो इतके आपण पाण्याला कःपदार्थ लेखले आहे. पाण्याविना तोंडचे पाणी पळायची वेळ आली तरी आपल्या डोक्यात प्रकाश पडायला तयार नाही. ज्या पध्दतीने आपण पाण्याचा वापर करतो आहोत आणि आपल्या नद्यांची जी अवस्था झाली आहे, ती पाहिली तर आपण स्वतः बसलेल्या फांदीवरच कु-हाडीचे घाव घालणा-या शेखचिल्लीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
     पाणी आणि आरोग्य यांचा संबंध इयत्ता पाचवीचे चिमुरडेही सांगेल पण आपली अवस्था कळते पण वळत नाही, अशी झाली आहे. मानवाला होणा-या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी ८५ टक्के आजार पाण्याच्या वाटेने आपल्यापर्यंत येतात, हे का आपल्याला माहित नाही? अतिसार या पाण्यामुळे होणा-या एकाच आजाराचे नाव पाणी आणि आरोग्याचा निकट संबंध सांगण्याकरिता पुरेसे आहे. अतिसार हे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडे तीन लाख मुले अतिसारामुळे मृत्यूमुखी पडतात. ही साधी सरळ माहिती आपण पाण्याच्या गुणवत्तेशी खेळतो तेव्हा आपल्याच आयुष्याशी, नव्हे नव्हे तर आपल्या लाडक्या लहानग्यांच्या आयुष्याशी खेळत असतो,हे आपल्या कानी कपाळी ओरडून सांगत असते. कावीळ, विषमज्वर (टायफॉईड),कॉलरा,पोलिओ अशी पाण्यामुळे होणा-या आजाराची यादी वाढतच जाते. २०१० मध्ये सोलापूर शहरात उद्भवलेली कॉलराची साथ आणि गेल्या वर्षी इचलकरंजी या महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर मध्ये आलेली काविळीची मोठी साथ आपण आपल्या पाण्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नाही,हेच सिध्द करतात.

   भारतात जगाच्या १७ टक्के लोकसंख्या राह्ते पण जगात उपलब्ध ताज्या पाण्यापैकी केवळ ४ टक्के पाणी साठे भारतात आहेत, ही लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध पाण्याची कमतरता लक्षात घेऊन आपण वागायला हवे पण "पाण्याचे दुर्भिक्ष, त्याची जीवनधारक क्षमता आणि आर्थिक मूल्य याची पुरेशी जाणीव नसल्याने आपण पाण्याचे नीट व्यवस्थापन करत नाही,पाणी वाया घालवतो,पाणी प्रदुषित करतो," असे चक्क राष्ट्रीय पाणी बोर्डाचे २०१२ चे निरिक्षण आहे आणि या साठीच आपल्याला एक राष्ट्रीय पाणी धोरण आखण्याची गरज या बोर्डाने अधोरेखित केली आहे. आज वातावरणातील विपरित बदलांमुळे जागतिक तापमानात वाढ होते आहे,त्यामुळे सागराच्या पातळीत वाढ होते आहे. या सा-याचा परिणाम आपले भूजल खारवण्यात होणार आहे. आणि म्हणूनच हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी करण्यात येणारे उपाय आपले पाणी साठे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. आपले ऑटोमोबाईल धोरण बदलणे, ही काळाची गरज आहे. आज आपण प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन हवे, या पाश्चात्य धोरणाची री ओढतो आहोत. पण हे धोरण आपल्याला महागात पडणार आहे कारण या धोरणामुळे हरित गृह वायूंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन जगाचे तापमान वाढण्यास हातभार लागणार आहे. या साठी आपल्याला आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल पण असे होताना दिसत नाही आणि म्हणूनच प्रत्येक शहरांमध्ये वैयक्तिक वाहनांची संख्या बेसुमार वाढते आहे. आपण टकमक टोकावरुन कोसळण्याची का वाट पाहत आहोत?
     आपल्याला पाण्याचे नेमके मोल कळलेले नाही,हे सिध्द करायला फार दूर जायची गरज नाही. भारतातल्या नद्या पाहिल्या तरी हे लगोलग समजते. मानवी संस्कृती नद्यांकाठी वसली. नदीला माता म्हणायची आपली प्रथा..  गंगामैया ..! पण आज गंगेची अवस्था काय आहे? १९८५ पासून गंगा शुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला पण आज सुमारे २८ वर्षांनंतरही गंगेच्या पाण्याची गुणवत्ता हवी तशी सुधारली नाही. आजही सुमारे ६६ कोटी गॅलन सांडपाणी गंगेत कोणतेही प्रक्रिया न करता सोडले जाते. "मानो तो मैं गंगा मां हूं,ना मानो तो बहता पानी...!" असं दुःखाने म्हणणारी गंगा आज केवळ एक वाहणारे गटार मात्र झाली आहे. आपल्या दांभिकतेचे आणखी कोणते उदाहरण द्यावे? महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही. केंद्रीय प्रदुषण बोर्डाच्या दोन वर्षापूर्वीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदुषित आहेत आणि त्या खालोखाल गुजरातमधील! तथाकथित विकासासोबत आपण या बाबतीतही गुजरातशी स्पर्धा करतो आहोत हे बाकी खरे! आपल्याकडील नद्या सर्वाधिक प्रदुषित आहेत कारण आपण सर्वाधिक विकसित (?) राज्य आहोत. पंचमहाभूतांपैकी एक असणा-या पाण्याचेच बारा वाजवून आपण कोणता शाश्वत विकास साधणार आहोत, ते एक आमचे नियोजनकर्तेच जाणोत. पुण्याची मुळामुठा या विकासाची फळे भोगते आहे. हा तथाकथित विकास तिच्या मुळावर आल्याने बिचारी जीव मुठीत घेऊन वाहते(?) आहे. शहरातून वाहणा-या अनेक नद्यांमधून केवळ औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी वाहते आहे. शुध्दीकरणानंतरही वापरता येणार नाही,इतके हे पाणी गये बिते झाले आहे. हे तुमच्या माझ्या आधुनिक शहरी जीवनाचे प्रतिबिंब तर नाही ना, अशी कधी कधी शंका येते. केंद्र स्तरावर राष्ट्रीय नदी बचाव योजना कार्यरत आहे पण तिच्या अंतर्गत देशातील फक्त ३९ तर महाराष्ट्रातील केवळ ४ नद्या येतात. आणि केवळ कागदावर योजना आखून काय होणार? त्याची यथायोग्य अंमलबजावणी नको?
   वाढत्या शहरीकरणासोबत वाढत जाणारी बांधकामे,त्यामुळे होणारा अपरिमित वाळू उपसा यामुळे देखील नद्यांचे जीवन संपुष्टात आले आहे. वाळू उपश्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नाहीसा होतो, पात्रातील मोठ्मोठ्या खड्ड्यांमूळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढते, पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया मंदावल्याने भूजल पातळी खालावते,नदीची पुनर्भरण क्षमता कमी होते आणि महत्वाचे म्हणजे पाणी नैसर्गिक रित्या शुध्द होण्याची क्षमता हरवते.हे सारे ठावे असूनही गावोगावी वाळू माफिया वाढताहेत. कारखाने, शेतीमधून आलेल्या सांडपाण्यामुळे पाण्यातील फ्ल्युराईड,नायट्रेट,अर्सेनिक अशा घातक रसायनांचे प्रमाण वाढते. त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होतो. औष्णिक विद्युत केंदातील राख पाण्यात मिसळल्याने कर्करोगजन्य क्रोमियमचे पाण्यातील प्रमाण वाढते. किटकनाशके, प्लास्टिक पाण्यात मिसळल्यानेही अनेक दुष्परिणाम संभवतात. 
  आमचे राजकीय धुरीण अनेक कारणांकरिता परदेशी वा-या करतात पण तेथून काही शिकून येतात की नाही, याची शंका येते. सिंगापूरचेच उदाहरण घ्या, हे शहर सिंगापूर या नदीभोवती वसले आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे, उदयोगधंद्यांच्या सांडपाण्यामुळे,तेल गळतीमुळे, वराहपालनातील कच-यामुळे ही नदी एवढी गलिच्छ झाली होती की ती आपले नदीपणच हरवून बसली होती. पाण्यातील जीवसृष्टी नष्ट झाली होती.पण १९७७ मध्ये तेथील पंतप्रधानांनी एक स्वप्न बोलून दाखविले," आज पासून बरोबर दहा वर्षांनी आपण आपल्या सिंगापूर नदीत मासे पकडू...!" गटार झालेल्या नदीत मासेमारी...? हसावे की रडावे ! पण ते एका राजकीय नेत्याचे निवडणुकीतील आश्वासन नव्हते. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे सिंगापूर नदी स्वच्छतेचा प्लॅन तयार करण्यात आला. नदीकाठचे कारखाने, झोपडपट्ट्या हलविण्यात आल्या, दैनंदिन  कच-याचे व्यवस्थित संकलन सुरु झाले. नदीच्या पात्रात शेकडो टन कचरा गाळ म्ह्णून जमा झाला होता, तो काढण्यात आला. बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १९८७ साली नदीतील प्रदुषणाने नाहीशी झालेली जीवसृष्टी नदीच्या निवळशंख पाण्यात पुन्हा अवतरली. आज सिंगापूर नदीत नौकानयन आणि अनेक प्रकारच्या जलक्रीडा बहरात आल्या आहेत. कधीकाळी गटार झालेली नदी सिंगापूरवासियांकरिता आनंदाचा ठेवा झाली आहे. हे होऊ शकते पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, लोकसहभाग हवा. आणि हे शिकण्यासाठी सिंगापूरला जाण्याची तरी काय गरज आहे? राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात राजेंद्र सिंह आणि त्यांच्या सहका-यांच्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अरवरी नदी साठ वर्षांनंतर पुन्हा वाहू लागली, आता ती बारमाही झाली. हे पुण्याच्या मुळा मुठाचे का होऊ शकत नाही? कोल्हापूरच्या पंचगंगेचे का होऊ शकत नाही. नक्कीच होऊ शकते.आपल्यात, आपल्या धोरणातच आधुनिक भगिरथ दडला आहे. भूजल पुनर्भरण-संधारण, पाण्याचा पुनर्वापर, छतावरील पाणी गोळा करणे, नद्यांची स्वच्छता, पाणी व्यवस्थापन या केवळ शब्दांत नव्हे तर त्यांच्या कृतिप्रवण उच्चारात सारे सामर्थ्य दडले आहे.
   मानवी इतिहासात नद्यांचे स्थान खूप मोठे आहे. त्यांनी मानवी जीवनाला नवी उभारी, नवी गती दिली आहे. पण आज जलपर्णी आणि विविध  घातक रसायनांनी गळा आवळलेल्या आपल्या नद्यांना पाहून स्वतःशीच एक शपथ घेऊ -
"आपणच जपू या, आपलं पाणी ...!
मिळून गाऊ या,आरोग्याची गाणी...! "
-डॉ.प्रदीप आवटे.
सी-१०४ सुवर्णरत्न गार्डन सोसायटी,
कर्वेनगर,पुणे -५२.
---------------------------------------------------------------------------------------------