Tuesday 21 October 2014

संगीत (?) संशयकल्लोळ



संगीत (?) संशयकल्लोळ
      उत्तम कथाकार असलेल्या चंद्रकांत गुरवांशी संध्याकाळी फिरायला जाताना होणारा संवाद हा माझ्या केतूरच्या वास्तव्यातला एक अविस्मरणीय भाग. आज त्यांनी सांगितलेली एक कथा आठवते.ही कथा त्यांनी नुकतीच वाचली होती. आज या कथेचा लेखक नेमका कोण हे मला स्मरत नाही.मला वाटते बहुधा शन्नांची असावी पण कथा मात्र माझ्या आजही लख्ख लक्षात आहे. दिवेलागण किंवा तत्सम काही नाव असलेली ही कथा. एक वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यातील जोडपे. एक मुलगा आहे या जोडप्याला पण तो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी. या जोडप्याला लग्नानंतर बरेच दिवस मूल होत नसते, अगदी लग्न होऊन दहा बारा वर्षे झाली तरी पाळणा हलत नव्हता. एके दिवशी त्यांचा एक कौटुंबिक मित्र काही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे येतो आणि आठ दहा दिवस राहून निघून जातो. त्या आसपासच तिला दिवस जातात. दोघेही आनंदतात.मुलगा होतो. मुलाच्या पाठीवर मात्र काही होत नाही. आता साठी ओलांडलेला तिचा नवरा तिला एकदा विचारतो, “एक विचारु?”
“विचारा ना,परवानगी कसली मागताय?”
विचारु की नको अशा संभ्रमात सापडलेला तो म्हातारा विचारतो,“मला खरं खरं सांग, आपला मुलगा कुणाचा आहे?”
आपला मुलगा नक्की आपलाच आहे की त्या मध्येच आपल्या घरी येऊन गेलेल्या मित्राचा,हा संशय जवळपास तीस वर्षे हा गृहस्थ मनात वागवत असतो. वारुळात फिरणा-या विषारी सापासारखा हा संशय त्याच्या अबोध मनात सतत वळवळत असतो पण त्याचं सभ्य सुसंस्कृत मन आणि बायकोवरला इतक्या वर्षाचा विश्वास (?) त्याला हा प्रश्न विचारायला परवानगी देत नसतो. पण अखेरीस हा साप बाहेर पडतो एका जळजळीत प्रश्नाच्या रुपाने. या प्रश्नाने ती अंतर्बाह्य हादरते. हा माणूस इतकी वर्षे हा संशय मनात बाळगून माझ्याशी संसार करत होता,या वास्तवाने ती कमालीची व्यथित होते.ही व्यथा तिच्या थकल्या ह्रदयाला पेलत नाही आणि ती गतप्राण होते. संध्याकाळ आली,‘दिवेलागण झाली तरी हा सरपटत सरपटत सहजीवन पोखरणारा संशय पाठ सोडत नाही,हे सांगणारी ही कथा.

  स्त्री पुरुष नात्यातल्या या संशयाचे पोस्टमार्टम करावयाचे म्हणजे आपल्या पुरुषपणाचेच पोस्टमार्टम करणे आहे आणि ते सोपे नाही.हा पुरुष आपल्यामध्ये कधी जन्मतो ?त्याचा जन्म कधी होतो? स्त्री बद्दल बोलताना सिमॉन द बुवा म्हणालीच आहे,Woman is not born, she is made.” पुरुषाबाबतही थोड्याफार फरकाने असेच म्हणता येईल का ? मला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग आठवतो, माझे लग्न झाले त्या संध्याकाळची गोष्ट. मी आणि माधुरी फिरायला निघालो होतो आणि मला अचानक जाणवले की माधुरीबाबत अगदी कॉन्शियस झालो आहे. रस्त्यावरुन येणा-या जाणा-याने तिच्याकडे कटाक्ष टाकला तरी मी अनकम्फर्टेबल होत होतो. खरे तर माझा प्रेम विवाह.लग्नापूर्वीही आम्ही अनेक वेळा मिळून फिरायला गेलो होतो पण आज मला काय झाले होते ? मी अचानक तिला सांगितले, “एका खांद्यावरुन पदर का घेतलास? पदर दोन्ही खांद्यावरुन घेत जा.” आज मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते,माझा नवरा झाला होता.प्रियकराच्या भूमिकेतून मी एकदम नव-याच्या भूमिकेत जात होतो आणि सांधेबदल करताना माझी गाडी खडखडत होती आणि मी घरी,आजूबाजूला,शेजारी पाजारी पाहिलेले ऐकलेले अनेक नवरे क्षणार्धात माझ्या मनावर माझ्याही नकळत अधिराज्य गाजवू लागले होते आणि मी संमोहित झाल्यासारखा वागत होतो.
    स्त्री पुरुष नात्यामधला संशय हा खरे तर दुहेरी आहे म्हणजे पुरुषाच्या बाजूने घेतला जाणा-या संशया प्रमाणेच स्त्रीच्या बाजूने घेतला जाणारा संशय हा ही एक आयाम त्याला आहे. पण एकूणच पुरुषसत्ताक कुटुंब आणि समाज व्यवस्थेत स्त्रीचा पुरुषावरील संशय हा गौण आणि बहुधा परिणामशून्य ठरतो. या विवेचनाचा रोख म्हणूनच एकूण पुरुषाच्या बाजूने घेतल्या जाणा-या संशयाकडे आहे. स्त्री पुरुष नात्यातल्या या पुरुषी संशयीवृतीची मुळे पुरुषाच्या पुरुष असण्यात आणि पुरुष धार्जिण्या व्यवस्थेत दडली आहेत. इथल्या समाजव्यवस्थेने स्त्रीला स्वातंत्र्य नेहमीच नाकारले आहे. “न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती”, हे इथे उच्चरवाने नेहमी सांगितले गेले आहे. त्यामुळे इथल्या स्त्रीची कस्टडी नेहमी कोणत्या ना कोणत्या भूमिकेतील पुरुषाकडे दिली गेली आहे.
“बालपणामध्ये बापाचं नाव
तरुणपणामधी पती हा देव
म्हातारपणामधी पोरांना भ्याव !”
हे तिचे प्राक्तन आहे आणि ते इथल्या समाजव्यवस्थेने तिला बहाल केले आहे. मुळात कस्टडी या संकल्पनेत सुरक्षा आणि कशाची तरी चोरी होण्याचे भय अध्याह्रत आहे. त्या बरोबरच जिला सुरक्षा द्यावयाची वल्गना करावयाची तिचे वस्तुकरणही त्या विचारव्यूहाचा अपरिहार्य भाग आहे. स्त्री ही एक व्यवच्छेदक वस्तू आहे कारण ती सजीव आहे.तिला तिच्या स्वतःच्या भावना आहेत. तिच्याजवळच्या ज्या संपत्तीची चोरी होईल म्हणून तिचे संरक्षण केले पाहिजे असे तिच्या कस्टोडियनना वाटते त्या संपत्तीचा विनियोग स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनिषा तिच्या मनात येऊ शकते पण मुळात तिच्याजवळ हा विवेक आहे हे कस्टोडियन्स मान्य करत नाहीत.
     म्हणूनच स्त्रीच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हा निर्णय घेण्याची जबाबदारी वेगवेगळा पुरुष कस्टोडियन पार पाडीत असतो. पण सुरक्षा कशाची? स्त्रीजवळ असे काय आहे की जे हरविण्याची या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला भिती वाटते. परंपरेने स्त्रीचा एक आदर्श स्टिरिओटाईप तयार केला आहे. शील ही तिची खरी संपत्ती आहे आणि या शीलाची सारी संकल्पना योनिशुचितेभोवती गिरक्या मारत असते. आणि म्हणूनच या अनुषंगाने या विवेकहीन बाहुलीवर संशय घेत राहणे ही या कस्टोडियनची प्राथमिक जबाबदारी ठरते. स्त्री पुरुष नातेसंबंधातील संशय घेणारा पुरुष हा केवळ नवराच असतो असे नाही. कॉलेजमधून घरी उशीरा परतणा-या मुलीवर बाप संशय घेतो, भाऊ नजर ठेवतो आणि पुरुषी व्यवस्थेत तयार झालेली आईही बाप - भावाला सामील होते. मुलीने आपल्या मनाविरुध्द आंतरजातीय लग्न केले म्हणून झोपलेल्या मुलीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून करणारा बाप किंवा तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला चिरडणारा भाऊ ही अगदी अलिकडच्या काळातील महाराष्ट्रातील उदाहरणे आहेत. संशयावरुन मारहाण,खून म्हणजे स्त्रीचा स्वमताप्रमाणे जगण्याचा अधिकारही आपली पुरुषी मानसिकता आपल्याला मान्य करु देत नाही.
    स्त्री संदर्भातील ही कस्टोडिअनशीप केवळ कौटुंबिकच असते असे नाही. मोठ्या कॅनव्हासवर ती सोशिओपोलिटिकल ही असते. अलिकडचे लव्ह जिहादहे याचेच उदाहरण. इथे धार्मिक आणि राजकीय प्रस्थापित मंडळी हिंदू मुलींच्या निखळ वैयक्तिक निर्णयावर आक्षेप घेऊन थांबत नाहीत त्यात हस्तक्षेपही करत आहेत. कारण त्यांच वैयक्तिक बाब धार्मिक आणि राजकीय अस्मितेचा विषय म्हणून पाहिली जात आहे. स्त्रीच्या योनिशुचितेभोवती कुटुंब,जात,धर्म,समुदाय यांच्या अस्मिता जोडल्या गेल्याने या वेगवेगळ्या स्तरावर तिच्या वैयक्तिक आणि लैंगिक व्यवहाराचे नियंत्रण केले जाते.जातपंचायत हे याचेच उदाहरण.
    लग्नानंतर योनिशुचितेच्या संपत्तीची रखवाली नवरा नावाच्या पुरुषाकडे येते. योनिशुचितेच्या कल्पनेतूनच स्वामित्वाची भावना जन्म घेते. पुरुषप्रधान संस्कृतीने तिच्या केलेल्या वस्तुकरणाचा हा स्वाभाविक परिपाक असतो. या योनिशुचिता आणि स्वामित्वाच्या भावनेतून पडदा,बुरखा, स्त्री जननेंद्रियाचे विद्रुपीकरण या प्रकारांचा जन्म होतो. कारण नातेसंबंधातील निष्ठा आपण केवळ शरीर संबंधापुरती संकुचित करुन टाकली आहे. त्यामुळे नात्यात आलेल्या दांभिकतेमुळे स्त्री पुरुष संबंध हा अनेकदा लहान मुलांचा चोर पोलिसांचा खेळ होऊन बसतो.
मी कोर्टी आरोग्य केंद्रात काम करित असताना या स्वामित्व आणि स्त्री शरीरावरील हक्काचा विलक्षण किळसवाणा प्रकार मी पाहिला होता.
    एकेदिवशी माझ्या ओपीडीत एक पन्नाशीचे गृहस्थ म्हणजे आपला गावाकडील शेतकरी गडी त्यांच्या सूनेला घेऊन आले होते.तिला काही तरी त्रास होत होता. मी तपासून औषधोपचार दिला. सून ओपीडीच्या बाहेर गेली पण हा गडी तसाच उभा.
“ काही काम आहे का ?”, मी विचारले.
“जरा खाजगी काम व्हतं...”, असं म्हणत ते बोलू लागले, “ ही माझी सून हाय.रांडव हाय” मला कळेचना हे काय सांगताहेत पण ते पुढं बोलतच राहिले, “ अलिकडे तिचा पाय वाकडा पडाया लागलाय.”
“ तुम्ही का सांगताय मला?”
“अवो तसं नाय मी काय म्हनतू मी असताना तिनं कशापायी बाहेर शेन खावं ? आपल्या टोपल्यातील भाकरी हाय ती आपन शेजा-या पाजा-यांच्या ताटात का वाढावी ?”
यावर काय बोलणार?मी निव्वळ सुन्न बसलो होतो.
  स्त्री लैंगिकतेविषयीच्या पुरुषी कल्पना हे स्त्री विषयक संशयाचे आणखीन एक प्रमुख कारण आहे. स्त्री आणि स्त्री लैंगिकता या विषयी पुरुषांच्या मनात एक रहस्यमय कुतूहल आहे. यातून तिच्या लैंगिकतेविषयी भन्नाट फॅण्टसी अनेकदा पुरुषांच्या मनात नांदत असतात. तिच्या लैंगिकतेची अमर्याद क्षमता,मासिक पाळीच्या विशिष्ट कालावधीतील तिची अनावर आसक्ती या संदर्भात इतक्या लोककथा,समज,गैरसमज यातून तिला दावणीला बांधायची इच्छा पुरुषी मनात अधिक प्रबळ होत जाते.या सगळ्या समज गैरसमजातूनही तिच्या बद्दलचा संशय अधिक बाळसेदार होत जातो. स्त्रीची अमर्याद लैंगिक भूक तिला व्याभिचार करायला भाग पाडते असा एक समज अनेक पुरुषांच्या मनात असतो.माझा एक मित्र म्हणे,’स्त्री ही कधीही विश्वासपात्र असू शकत नाही. ती हमखास वाकड्या वाटेने गेलेलीच असते. एकदा त्याच्यावर वैतागून मी म्हणालो,”अरे तुझी आई ही सुध्दा एक स्त्रीच आहे हे कसे विसरतोस तू..?” त्यावर तो थंड पणे म्हणाला, “तिच्यावर तरी विश्वास कसा ठेवू?सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याच माहित असतात?”
 “ आमच्या पिढीला व्हर्जीन बायको मिळणे अलमोस्ट दुरापास्त आहे.”
  “पुण्या/मुंबईतील मुली व्हर्जीन भेटणे महाकठीण..!”
अशी अर्ग्युमेंटस अलिकडे कॉलेज पोरांकडून ऐकायला मिळतात. म्हणजे आजची मेट्रोसेक्शुअल म्हणवली जाणारी पिढीसुध्दा लॉस ऑफ व्हर्जिनिटी ची खंत करते आहे.पण तुमच्या व्हर्जिनिटीचे काय रे?’असा प्रश्न ही पिढी हसत हसत डक करते म्हणजे कौमार्य हा केवळ मुलींचा गुण आहे त्याची मुलांना त्याची आवश्यकता नाही कारण शील हे स्त्रीचे खरे सौन्दर्य पुरुषांचे मात्र कर्तृत्व हेच सौन्दर्य. अशी आपल्या व्यवस्थेने स्त्री पुरुष गुणवैशिष्ट्यांची रितसर विभागणी केली आहे.
    स्त्रीच्या या अवास्तव लैंगिकतेच्या पार्श्वभूमीवर पुरुषाच्या मनातील असुरक्षितता आणि लैंगिक संबंधातील पुरुषाची मर्यादा यामुळे त्याच्या मनातील न्यूनगंड अधिक गडद होतो. त्यातून संशयाची नवनवी वर्तुळे निर्माण होत राहतात. स्त्रीयश्च चरित्रम पुरुषस्य भाग्यम.... सारखे पारंपारिक विचार ते अधिक गर्द करत जातात.
   स्त्रीची धर्मव्यवस्थेने उभी केलेली प्रतिमा हा पुरुषी संशयकल्लोळाचा वेगळा अध्याय आहे. मोहाचे दार,पापाची खाण,मोक्षातील अडचण अशा विशेषणांनी धर्माने संतांनी स्त्रीला गौरविले आहे. या सगळ्या प्रतिमेतून स्त्रीचे स्खलनशील रुप धर्मव्यवस्थेने अधोरेखित केले आहे. या सा-या घटकांनी पुरुषाच्या संशयी वृत्तीला खतपाणी घातले आहे पण या संशयाने स्त्री पुरुष नातेसंबंध पोखरले गेले आहेत. त्याचा पायाच भुसभुशीत झाला आहे. 
 या संशयाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरिता आपल्याला काय करायला हवे ? हा चक्रव्यूह आपण भेदू शकू ?
   हा चक्रव्यूह भेदणे सोपे नाही पण अशक्य नाही. आपल्याला आपल्या पारंपारिक पुरुषत्वाचा एक एक पदर त्यासाठी उकलावा लागेल. नव्या बदलत्या काळात हे आव्हान अधिक कठिण झाले आहे. आजच्या किमान शहरी जगात पारंपारिक कुटुंबव्यवस्थेचे पहारे तुटून पडत आहेत.चूल आणि मूल या मर्यादित क्षेत्रात अडकलेली स्त्री विशाल जगात बाहेर पडली आहे. अर्थार्जनातून आलेल्या आत्मविश्वासातून तिची कुटुंबातील भूमिका अधिक असर्टीव होते आहे. नव्या ग्लोबल जगात ती हवीहवीशी मोकळिक अनुभवते आहे पण त्याचवेळी जगभर पसरलेल्या मार्केटमध्ये तिचे वस्तूकरणही कल्पनातीत वेगाने होते आहे. आता लैंगिक संबंधाभोवतीचा पारंपारिक सॅक्रेडनेस विरु लागला आहे. पण त्यामुळेच स्त्री पुरुष शरीर संबंध अधिक अधिक किरकोळ स्वरुपाचे होत चालले आहेत. या नव्या पार्श्वभूमीवर अद्याप परंपरेची कात पुरती न टाकलेला पुरुष पुरता भांबावला आहे आणि स्त्री पुरुष संबंधांचे आभाळ संशयाच्या धुराने व्यापून जावे अशी परिस्थिती आज समोर उभी ठाकली आहे. फॅमिली कोर्टात ट्रॅफिक जॅम व्हावे एवढी गर्दी झाली आहे,संशयाच्या धुराने प्रत्येकाचे डोळे चुरचुरत आहेत.
    अशावेळी स्त्री पुरुष नातेसंबंधांची व्याख्याच आपल्याला नव्याने समजावून घ्यायची आवश्यकता आहे.बट्रांड रसेलने नेमके म्हटले आहे,The essence of a good marriage is respect for each other's personality combined with that deep intimacy, physical, mental and spiritual, which makes a serious love between man and woman the most fructifying of all human experiences.  Such love, like everything else that is great and precious, demands its own morality, and frequently entails a sacrifice of the less to the greater; but such sacrifice must be voluntary, for where it is not, it will destroy the very basis of the love for the sake of which it is made.”
 आपले नाते केवळ स्कीन डीप असता कामा नये. त्यासाठी स्त्रीला प्रथम समान योग्यतेची माणूस म्हणून समजून घ्यायला हवे. आपण तिचे कस्टोडियन नाही हे उमजायला हवे. परस्परांच्या शारिरिक,मानसिक गरजा समजावून घ्यायला हव्यात त्यांच्या पूर्ततेचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा म्हणजे म्हणजे नात्यातला दांभिकपणा कमी होईल.रसेलने म्हटल्याप्रमाणे आपल्या नात्याला मानसिक,भावनिक आणि ख-या अर्थाने आध्यात्मिक आयामही मिळायला हवेत. शरीर संबंधांना पावित्र्याचे नाहक वलय नको,पण त्यांचा केवळ पोरखेळ होऊन जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावयाची असेल तर आपल्याला आपल्या नात्याचा पाया अधिक भक्कम,अधिक व्यापक करायला हवा. योनिशुचितेच्या भ्रामक कल्पनातून बाहेर यायला हवे. शरीर संबंधातील एकनिष्ठतेहून या ह्रदयीचे त्या ह्रदयी होणा-या प्रक्रियेने आपले नाते अधिक श्रीमंत होत असते,हे आपण समजावून घ्यायला हवे. पारंपारिक विवाह संस्थेकडून झालेल्या अपेक्षाभंगातून आपण लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रयोग ही सुरु केले आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या ओझ्यात दबलेल्या स्त्री पुरुष नातेसंबंधातील हरवलेले चैतन्य पुन्हा शोधण्याचा हा प्रयत्न आहे अर्थात पुरुषसत्ताक,पितृसत्ताक व्यवस्थेचा पाया उखडल्याशिवाय नवा इमला रचता येणार नाही,हे ही तेवढेच खरे.
असे झाले तरच या अनादि कालापासून सुरु असलेल्या या संगीत संशयकल्लोळ नाटकाचा अखेरचा पडदा पडेल.
- डॉ.प्रदीप आवटे.
( ' पुरुष उवाच ' दिवाळी अंक २०१४ मध्ये प्रकाशित )