Sunday 11 May 2014

हत्तीरोगाला बाय बाय करण्यासाठी....!
- डॉ.प्रदीप आवटे

            
       माणसांप्रमाणेच आजारांमध्ये देखील काही जातीय उतरंड असावी. वेगवेगळ्या आजारांना मिळणारे प्राधान्य,महत्व किंवा एखाद्या आजाराकडे समाजाचेच नव्हे तर नियोजनकर्त्यांचेही होणारे अक्षम्य दुर्लक्ष हे सारे पाहिले की हा संशय अगदी प्रबळ होतो. नियती,नशीब किंवा दैव अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा कोणी प्रत्येक आजार आपापले नशीब घेऊन जन्माला येतो,असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.खरे तर असे काहीच नसते. असते ते आपले अज्ञान आणि निखळ अर्थकारण.आणि म्हणूनच समाजातल्या मुख्यत्वे आहे रे वर्गाचे आजार औषध कंपन्याचे विशेष लक्ष वेधून घेतात कारण या वर्गाची क्रयशक्ती अधिक असते. या आजारांवर अधिक संशोधनही केले जाते, औषध कंपन्यांच्या सत्तेच्या कॉरिडॉर मधील लॉबिंगमुळे नियोजनकर्त्येही त्यात सामील होतात. आणि अनेकदा सर्वसामान्यांचे आजच्या भाषेत बोलायचे तर आम आदमीचे आजार दुर्लक्षित राहतात. आजारांच्या प्राधान्याचा हा पिरॅमिड असा अनेक कारणांनी उलटा सुलटा होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेलाही याची कल्पना आहे आणि म्हणूनच गेल्या मे महिन्यात झालेल्या जागतिक आरोग्य असेम्ब्लीने जगभरातील १७ आजारांची गणना दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय आजार अशी केली आहे आणि या आजारांच्या प्रभावी प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन सर्व देशांना जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
    
      हत्तीरोग (Filaria) हा या सतरा आजारांपैकी एक. खरे तर या वर्षीचे जागतिक आरोग्य दिनाने डंख छोटा,धोका मोठाअशी घोषणा देऊन यापूर्वीच सर्व जगाचे लक्ष कीटकांमुळे होणा-या आजारांकडे वेधले आहे मात्र तरीही या आजारांच्या प्रकारात जे लक्ष हिवताप किंवा डेंग्यू या आजारांना मिळते त्या प्रमाणात हत्तीरोगाची चर्चा कोणी करताना दिसत नाही. याचे मुख्य कारण अर्थातच आजाराचे उपद्रव्य मूल्य मोजण्याची आपली म्हणजे सर्वसामान्य माणसाची पध्दत. हत्तीरोगामुळे कोणाचाही मृत्यू होत नाही त्यामुळे या रोगाची तीव्रता म्हणावी त्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहचत नाही. पण हा आजार हत्तीरोग रुग्णाचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य ज्या प्रकारे उध्वस्त करतो ते पाहता मरणाहूनी वोखटे दुसरे काय असू शकते,याची आपल्याला कल्पना येते.
   खरे तर हत्तीरोग हा काही नवा आजार नाही. सहाव्या शतकातील सुश्रुत संहितेतदेखील या आजाराचा उल्लेख आढळतो. आज जगभरातील सुमारे ८३ देशात या रोगाचे रुग्ण आढळतात. जगाची एक पंचमांश लोकसंख्या या आजाराच्या छायेखाली जगते आहे. जगभरात या आजाराचे सुमारे बारा कोटी रुग्ण आहेत त्यातील सत्तर टक्के प्रादुर्भाव हा भारत,नायजेरिया, बांगला देश आणि इंडोनेशिया या चार देशात आढळून येतो,या वरुन या आजाराचे नियंत्रण आपल्या साठी किती मह्त्वाचे आहे,हे लक्षात यावे. आपल्या देशात वीस राज्यातील जवळपास अडीचशे जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. देशातील जवळपास साठ कोटी जनता या आजारांसाठी संवेदनशील असलेल्या भागात राहते आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आपल्या सतरा जिल्ह्यांमध्ये या रोगाची समस्या आढळून येते. राज्यातील जवळपास तीन कोटी जनता या भागात राहते. विदर्भातील वाशिम बुलढाणा वगळता सारे जिल्हे, म्रराठवाड्यातील लातूर,नांदेड,उस्मानाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक विभागातील जळगाव व नंदूरबार तर कोकणातील ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचे रुग्ण विशेष करुन आढळतात. चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,नांदेड या जिल्ह्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र स्वरुपाची आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तर एक गल्लीच हत्ती गल्ली म्हणून प्रसिध्द आहे. पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या कडेला असलेल्या खंदकामध्ये साचलेल्या पाण्यात वाढणा-या डासांमुळे ही गल्ली अशी कुप्रसिध्द झाली आहे.
   हत्तीरोग हा जंतासारख्या एका विशिष्ट परजीवीमुळे होणारा आजार आहे. या परजीवीचा प्रसार क्युलेक्स या डासामुळे होतो. क्युलेक्स हा डास सांडपाणी,सेप्टीक टॅंक,गटारी अशा घाण पाण्यात मुख्यत्वे वाढतो. मात्र असे पाणी उपलब्ध झाले नाही तरी तुलनेने स्वच्छ असलेल्या पाण्यातही तो वाढू शकतो म्हणजे त्याची समायोजन शक्ती अनुकरणीय आहे. या डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात.तेथे त्यांचे रुपांतर मोठ्या कृमी मध्ये होते. यातील मादी पुन्हा पुन्हा नव्या नव्या पिलावळीला जन्म देते. एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी माणसाच्या शरीरात पाच ते आठ वर्षे,अगदी क्वचित पंधरा वर्षे देखील राहू शकतो.  प्रौढ कृमी लसिका ग्रंथी व लसिका वाहिन्यात राहतो. मायक्रोफायलेरिया हा बाल कृमी मात्र दिवसा फुप्फुसातील रक्तवाहिन्यामध्ये दडून बसतो व रात्री मुख्य रक्त प्रवाहामध्ये सापडतो.त्याच्या या सवयीमुळेच सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावयाच्या पध्दतीत रुग्णाचे रक्त रात्रीच्या वेळी घेणे योग्य निदाना करिता आवश्यक असते.
    
         हत्तीरोगात रुग्णाचा मृत्यू होत नाही पण या परजीवींमुळे शरीरात ज्या घडामोडी घडतात त्यामुळे निर्माण होणारी चिन्हे रुग्णाला आयुष्यातून उठवितात,समाजातून विस्थापित करतात, त्याचे नातेसंबंध संपुष्टात आणतात, त्याची आर्थिक कुवत खुंटीत करतात. हा परजीवी असे नेमके करतो तरी काय ? हा कृमी मानवाच्या लसिका ग्रंथी आणि लसिका वाहिन्यांमध्ये राहत असल्याने हळूहळू यामुळे या लसिका वाहिन्या तुंबतात आणि ज्या भागातील लसिका वाहिन्या तुंबतात त्या भागाला हाताला आणि विशेष करुन पायाला सूज येऊ लागते. हा पाय सुजत जाऊन मोठा मोठा होत जातो. तो हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो आणि म्हणूनच या आजाराला हत्तीपाय असेही म्हटले जाते. मुख्य म्हणजे एकदा सूजलेला पाय पुन्हा पूर्ववत करावयाचे कोणतेही उपाय आजमितीस तरी नाहीत. या सूजलेल्या पायाला अनेकवेळा इतर जीवाणूंचे इन्फेक्शन होऊन तिथे असह्य वेदना होऊ लागतात,ताप येतो. हत्तीरोगात पायाला जशी सूज येते तशीच काही पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सूज येऊन अंडाशय कमालीचे मोठे होते.इंग्रजीत याला हायड्रोसिल म्हणतात. या प्रकारामुळे अनेकदा रुग्णाचे लग्न जमणे कठीण होऊन जाते. आज आपल्या राज्यात हत्तीपाय व अंडाशयवृध्दीचे सुमारे ऐंशी हजार रुग्ण आहेत.या पैकी जवळपास सत्तर टक्के रुग्ण विदर्भात आहेत. हायड्रोसिलचा त्रास आपण अगदी सोप्या अशा शस्त्रक्रियेद्वारे दूर करु शकतो.
   दोन प्रश्न लाखमोलाचे...! एक प्रकारे व्यक्तीच्या सामाजिक मृत्यूला कारणीभूत ठरणा-या आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासन काय करते आहे ? आणि हा आजार मला होऊ नये म्हणून तसेच त्याचा प्रसार रोखण्यासाठी मी काय करु शकतो ?समाज म्हणून आपण सारे काय करु शकतो ? 
 
आपल्या देशात सन १९५५ पासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत आपल्या राज्यात सहा सर्वेक्षण पथके,सोळा नियंत्रण पथके आणि ३४ रात्र चिकित्सालये कार्यरत आहेत. ही सारी केंद्रे,चिकित्सालये आपापल्या क्षेत्रात हत्तीरोग नियंत्रणाचे काम करत आहेत. नव्वदच्या दशकात या हत्तीपायग्रस्त जिल्ह्यांमध्ये दरवर्षी करण्यात येणा-या विशेष सर्वेक्षणात हत्तीरोग जंतू आढळणा-या रुग्णांचे शेकडा प्रमाण चारच्या आसपास होते,आज हे प्रमाण बहुतेक जिल्ह्यात एक पेक्षा कमी आढळते आहे. सन २००२ च्या आरोग्य विषयक राष्ट्रीय धोरणात २०१५ पर्यंत हत्तीरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट गाठावयाचा निश्चय आपण केला आहे. सीमारेषा जवळ येऊन ठेपली आहे,आपण हे उद्दिष्ट साध्य करणार का,हा महत्वाचा प्रश्न आहे. नुकतेच आपण पोलिओला बाय बाय केले आहे, हत्तीरोगालाही दूर करणे आपल्याला अशक्य नाही. पण रामदासांच्या उक्तीत थोडासा बदल करुन सांगावयाचे तर –
“सामर्थ्य आहे चळवळीचे l
जो जो करील तयाचे ll
पण तेथे लोकसहभागाचे l
अधिष्ठान पाहिजे ll
हत्तीरोग दूरीकरण लोकसहभागाशिवाय संभवत नाही. हा डासांपासून पसरणारा आजार आहे. डास नियंत्रण हे तुमचे माझे सर्वांचे काम आहे. पाणी साचू न देणे,डबकी वाहती करणे,शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसविणे,शोष खड्ड्यांचा वापर करणे या तुमच्या माझ्या पातळीवरील उपायांनी आपण क्युलेक्स डासांची पैदास थांबवू शकतो.आपण हे काम मनापासून आणि गांभीर्याने करावयाची गरज आहे. आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्राम आरोग्य,स्वच्छता व पोषण समितीकडे निधी उपलब्ध आहे.या पैकी पंधरा टक्के निधी आपण डास नियंत्रणासाठी वापरु शकतो. नगरपालिका आणि इतर शहरी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवर पडणारा ताण,विकास कामे,घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न या सा-यांमुळे डास उत्पत्ती वेगाने होते आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमातून शहरी भागात हत्तीरोगासह सर्व कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणाचे प्रभावी काम होऊ शकते. मागील २- ३ वर्षात मुंबई मनपाने हे सप्रमाण सिध्द केले आहे.
  २००४-०५ पासून हत्तीरोग नियंत्रणासाठी एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम (मास ड्र्ग ऍडमिनिस्ट्रेशन- एम. डी. ए.) सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यातील दोन वर्षावरील सर्व जनतेला हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येतात.गर्भवती माता आणि अति गंभीर रुग्ण यांना त्यातून वगळण्यात येते. अनेक वेळा मला या आजाराची कोणतीही लक्षणे नसताना मी या गोळ्या का खायच्या,असा विचार करुन लोक या गोळ्या खायच्या टाळतात. पण आपण सगळ्यांनी एकदिवस या गोळ्या खाल्ल्याने हत्तीरोगाचे प्रसारचक्र थांबायला मदत होणार आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी अत्यंत शास्त्रीय पायावर आखलेली ही योजना आहे. आपल्या भागातून हत्तीरोगाला बाय बाय करण्यासाठी आपण सर्वांनी या एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिमेस (मास ड्र्ग ऍडमिनिस्ट्रेशन-एम डी ए) सहकार्य करणे आवश्यक आहे. या सोबतच आपल्या भागातील हत्तीरोग रुग्णास मदत करणे,त्याचे मनोधैर्य वाढविणे, हायड्रोसिल रुग्णास शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणे,हत्तीपाय रुग्णास पायाची निगा घेण्यास शिकविणे अशी अनेक कामे आपण डॉक्टरांच्या,आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीने करु शकतो.
 हत्तीरोग इतिहास जमा होईलही पण इतिहास सरकारे नहीं बनाती,लोग बनाते है... इसे भी इतिहास गवाह है...! चला तर देवी,पोलिओ नंतर आणखी एका आजाराला निरोप द्यायला सिध्द होऊ या.
(  साप्ताहिक लोकप्रभा मध्ये १६ मेच्या अंकात प्रसिध्द झालेला लेख.)