Wednesday 21 June 2017

शोधावा विठ्ठल आपापला



शोधावा विठ्ठल आपापला ...
- डॉ प्रदीप आवटे


  फार जुनी गोष्ट नाही, काल परवाची तर आहे. मी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना पंढरीला जाणारी वाट माझ्या आरोग्य केंद्रावरुनच जायची. त्यामुळेइठ्ठोबा रखुमाई’ ‘ ग्यानबा तुकारामचा गजर करत अनेक दिंडया आमच्या आरोग्य केंद्रात येत. अनेक वारकरी छोटा मोठया उपचारासाठी दवाखान्यात येत. आषाढी वारीच्या काळात आमचे आरोग्य केंद्र पहाटेपासूनच कामाला लागे. खरे तर आमची आषाढीची तयारी आषाढी एकादशीच्या दीड दोन महिने आधी सुरु होई. प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर एक बैठक होई. त्यात विविध दिंडयांचे कार्यक्रम प्रत्येकाला दिले जात. दिंडीचा मार्ग लक्षात आला म्हणजे त्या मार्गावरील सारे पाणी स्त्रोत शोधणे, त्यांचे पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळेत तपासायला पाठविणे. सर्व पाणी स्त्रोतांचे नियमित शुध्दीकरण करणे, डासोत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, दिंडीच्या आगमन प्रस्थानाच्या वेळी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक करणे, एक ना दोन आमची अगदी लगीनघाई उडून जाई.
माझ्या आरोग्य केंद्राला चांगले मोठे पटांगण होते. चार झाडंही होती. प्रत्येक वारीच्या वेळी अनेक वारकरी आमच्या आरोग्य केंद्राच्या प्रांगणात येत. झाडांखाली थोडासा विसावा घेत, आराम करत. काही किरकोळ दुखल्या खुपल्यासाठी औषधोपचार घेत आणि पुढे चालू लागत. एकदा एक थकला भागला, अगदी वयोवृध्द वारकरी माझ्याकडं आला. चालून चालून त्याच्या पायाला फोड आले होते, हातापायाला गोळे आले होते. मी औषधोपचार केले आणि म्हणालो, “ बाबा, कशाला या वयात वारीला चाललाय? झेपणारंय का तुम्हांला ? हे पायाचे फोड तुम्हांला चालू देणार नाहीत. बघा विचार करा.” म्हाता-यानं माझ्याकडंयेडा की खुळाअशा नजरेनं पाह्यलं आणिदेह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो,’ अशा निश्चयानं म्हातारा काठी आणि तोल सांभाळत पंढरीच्या दिशेनं चालू लागला. त्या म्हाता-या, पाठमो-या आकृतीकडे काही काळ मी भान हरपून पाहत राह्यलो. मनात विचार आला, किती काळापासून ही पावलं अशीच अव्याहत चालत आहेत ! आज तरी थोडयाफार आधुनिक सोयींमुळं काही मदत होते आहे पण ज्या काळी यातल्या कोणत्याच सुविधा नव्हत्या तेव्हाही ही पावलं अशीच चालत होती. ‘ जाय जाय तू पंढरी , होय होय वारकरी,’ ही आतून उमलणारी उर्मी तेव्हाही होती, आजही आहे. आधुनिकतेचे चष्मे घालून पाहणा-यांना हा सारा वेडेपणा वाटणे स्वाभाविक आहे. वेडयासारखे लाखो लोकांनी त्या पंढरपूरला का जायचे ? पंढरपूरच्या सा-या नागरी व्यवस्थेवर पडणारा कमालीचा ताण, तिथे होणारी घाण, गलिच्छपणा ! हे मुद्दे अगदीच वावगे नाहीत पण तरीही या झापडबंद शहाणपणाला डावलत प्रत्येक आषाढीला आभाळातील घनगर्द मेघदिंडीसोबत पंढरीच्या वाटेवर भक्तदिंडी फुलून येते. आणि दिवसेंदिवस ती वाढते आहे, विस्तारते आहे, शिकल्या सवरल्या पुस्तकी शहाण्यांनाही दिंडीचा हा मनोहारी स्पर्श आपल्या कोरडया मध्यमवर्गीय जिण्याला हवाहवासा वाटू लागला आहे. असे काय दडले आहे या दिंडीत ? शतकानुशतके चाललेला हा लोकोत्सव, आनंदोत्सव, निव्वळ एक वेडाचार म्हणून मोडीत कसा काढता येईल

वारक-यांची थकलेली शरीरे पण प्रसन्नतेने फुलून आलेले चेहरे पाहिले की आषाढी वारी म्हणजे मला अक्षय आरोग्याची साधना वाटते. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करताना म्हटले आहे
“ Health is a state of complete physical, mental and social wellbeing and not merely absence of disease or infirmity.”
खरे तर या व्याख्येत आरोग्याच्या आणखी एका आयामाचा उल्लेख नाही आणि तो म्हणजे आध्यात्मिक आयामाचा ! शारिरिक,मानसिक,सामाजिक आरोग्यासोबतच आध्यात्मिक आरोग्याचा समावेश या व्याख्येत केला जावा,या साठी अनेक मंडळी १९७० पासून प्रयत्नशील आहेत. हेल्थ प्रमोशन ‘, संबंधीच्या बॅन्कॉक जाहीरनाम्यातही  आध्यात्मिक आरोग्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पण आध्यात्मिकतेची संकल्पना आधुनिक शास्त्राला किचकट,दुर्बोध वाटते.आध्यात्मिक आरोग्य आधुनिक निर्देशांकात मोजता येत नाही. अनेकवेळा शरीररचनाशास्त्र,शरीरक्रियाशास्त्र या शास्त्रांना ओलांडून ते अनाकलनीयतेच्या प्रदेशात प्रवेश करते पण म्हणून ते नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. व्यक्तीच्या आध्यात्मिक जडणघडणीचा स्वाभाविक परिणाम तिच्या शारिरिक आरोग्यावर होत असतो,हे अनेक छोटया मोठया अभ्यासातून पुढे आले आहे.  आणि म्हणूनच आरोग्याची संकल्पना जैववैद्यकीय,पर्यावरणीय,मनोसामाजिक अवस्थांमधून उत्क्रांत होत आज सर्वंकष ( होलिस्टिक) आरोग्यापर्यंत येऊन पोहचली आहे. ज्या लॅटिन शब्दापासून स्पिरिच्युलिटीशब्द तयार झाला आहे,त्या शब्दाचा  अर्थच  मुळी श्वासअसा होतो. आणि म्हणूनच आध्यात्मिकता आपल्या असण्याचा श्वासाइतका सहजभाग आहे. या आध्यात्मिकतेचा धर्माशी काहीही संबंध नाही.तुम्ही निधर्मी असतानाही आध्यात्मिक असू शकता आणि कट्टर धर्मवादी असतानाही ख-या अध्यात्मापासून शेकडो मैल दूर असू शकता.
पंढरीची वारी ही अशीच एक ख-या अर्थाने सेक्युलरपरंपरा आहे,हे आपण ध्यानात घ्यायला हवे. आणि म्हणूनच तर जैतुनबी आक्का महाराजांसारखी जन्माने मुस्लिम स्त्री या परंपरेत आपले जीवन व्यतीत करते,एवढेच नव्हे तर पंढरीच्या वाटेवर असतानाच आपला देह ठेवते, तुकाराम –नामदेवाचे अभंग शीखांच्या ग्रंथसाहेबाचा अविभाज्य भाग बनतात आणि जनरल ग्राण्टला तुकारामाच्या गाथेत डेव्हीडची गाणी दिसू लागतात.घरादाराची,प्रपंचाची चिंता काही काळ दूर ठेवून पंढरीला जाणा-या या आनंदयात्रेत सहभागी होणे,हा एक प्रकारचा आध्यात्मिक अभ्यास आहे. वेस्टगेटने आध्यात्मिक आरोग्याची चार वैशिष्टये सांगितली आहेत  - आयुष्याचा अर्थ आणि उद्देश गवसणे,जीवनमूल्यांचा शोध,सामाजिक नातेसंबंध श्रीमंत होत जाणे आणि अलौकिकाचा अनुभव येणे ! पंढरीची वारी आध्यात्मिक आरोग्याच्या  या चारही वैशिष्टयांचे प्रात्यक्षिक आहे,सराव आहे,असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. पंढरीच्या वारीमध्ये जागोजागी होणा-या कीर्तन प्रवचनातून मनावर बसलेली धूळ पुसली जाऊन आयुष्याचा अर्थ आणि उद्देश हळूहळू गवसू लागतो. नाचू कीर्तनाचे रंगी,ज्ञानदीप लावू जगी,’ ही नामदेवाची ओळ अंतरंगात नवा प्रकाश देऊ लागते आणि वाळवंटात वैष्णवांनी मांडलेल्या या मनोरम खेळात गर्व,अभिमानाच्या समीधा पडू लागतात,जगण्याचे भान उजळू लागते. कुछ लेना न देना,मगन रहना,’ ही कबीराची साधी सोपी ओळ आध्यात्मिक आरोग्याकडे जाणारी गुप्त वाट दाखवून देते. 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याची गरजच काय,तो तर सर्वत्र भरला आहे,असे अनेक पुस्तकी पंडितांना (त्यात मीही आलोच) वाटते पण हे वारक-यांना ठावे नसते,अशातला भाग नसतो. तीर्थी धोंडा पाणी,देव रोकडा सज्जनी’, हे तुकारामांनी त्यांना केव्हाच सांगितले आहे,फुललेल्या मळयात,डवरलेल्या घामात विठ्ठलाला पाहणारा सावता माळी त्यांना ठावा असतो. त्यांनाही हा आत दडलेला विठोबा शोधायचा असतो. भेदाभेद भ्रम अमंगळ,’ म्हणणा- तुकारामापासून ते ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा,’ म्हणणा-या चोखामेळयापर्यंत प्रत्येकजण आपली जीवनमूल्ये घडवित असतो,आपले माणूसपण अधिकाधिक निखारत असतो. गोरा कुंभार,सावता माळी, जनाबाईसोबत जाते ओढणारा विठू या सा-या प्रतिमा कर्मवादाचा अमिट ठसा आपल्या जीवनमूल्यांवर उमटवित असतात. वाळवंटात तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ,भाकरी घेऊन पळणा-या कुत्र्यामागे तूपाची वाटी घेऊन धावणारे नामदेव परोपकाराचा,भूतदयेचा आणि सुखी जगण्याचा मंत्र आपल्याला देत असतात.
उन्हापावसात चालता चालता आषाढी मेघांचा रंग विठूरायाच्या सावळेपणात मिसळून जातो,रानात फुललेला हिरवागार पट्टा विठूमाऊलीचा भरजरी शेला होऊन जातो आणि आपल्या लौकिक जगण्याला अलौकिकाचा स्पर्श होऊ लागतो. आपले पंढरीला असलेले माहेर असे इथे तिथे भेटू लागते आणि आपले मातीतले जगणे सावळया विठूचे राऊळ बनून जाते.असे चहूअंगांनी फुलून येणारे आध्यात्मिक आरोग्यमार्केटमधील फुटपट्टयांनी मोजता येत नाही,त्याला कोण काय करणार ? पण ते रोजच्या जगण्यात दिसू लागते,डोळयांतून ओसंडू लागते.
पंढरपूरातील विठ्ठलाची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे का,असाही वाद कधी उसळला. ख-या वारक-यांना त्याने काही फरक पडत नाही.कारण तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे –
विठ्ठल विस्तारला जनी
सप्तही पाताळे भरुनी
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी
    विठ्ठल मुनिमानसी
पंढरीला  विटेवर उभा असणारा विठूराया तर केवळ एक प्रतिक आहे.प्रत्येकाला आपला विठ्ठल शोधावा लागतो. एकदा तो सापडला की रोजचे चालणे पंढरीची वारी होऊन जाते. पंढरीला पोहचलेला वारकरी विठ्ठल दर्शनासाठी दर्शन मंडपातील रांगेत थांबत नाही.मंदीराच्या कळसाला तो हात जोडतो कारण सा-या प्रवासात तो सावळा विठूराया त्याच्या सोबत तर असतो,तो गाभा-यात कुठे सापडणार ? चालण्याचे श्रेय आहे,अन्य धर्माचार नाही,’ हे त्या अडाणी जीवाला नेमके उमगलेले असते. या विठ्ठल शोधाकरता तर असते ही वारी,ही वेडी पायपीट !कुणाला तो फुललेल्या शेतात गवसतो तर कुणाला नव्यानं घडणा- या प्रत्येक मडक्यात हसताना दिसतो. विठ्ठल वित्त,गोत चित्त’,असे सारे होऊन जाते  आणि जगण्याचा प्रत्येक क्षण,प्रत्येक श्वास,प्रत्येक काम विठ्ठलमय होऊन जाते तरी प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा असतो.त्याच्या त्याच्या मनीच्या रमणीय रंगाने तो खुललेला असतो.विठ्ठलाचा हा स्पर्श किती संजीवक असतो.त्याचा स्पर्श होतो आणि दमलेल्या जनीत प्रसन्नता संचारते.पाण्यातून तो वाहू लागतो आणि म्लान झालेली हिरवी पाने आनंदाने टाळया पिटू लागतात. विठ्ठल म्हणजे जगण्याचे प्राणतत्व म्हणतात.इंग्रजीतही त्याला ‘ Vital’ म्हणजे विठ्ठलच म्हणतात की ! आणि म्हणूनच विठ्ठलाची भक्ती,विठ्ठलाचा शोध म्हणजे आपल्या जगण्यात नवा प्राण भरणं आहे.हा विठ्ठल तुम्हांला कोणी आयता शोधून देत नाही. आपल्यालाच तो शोधावा लागतो. म्हणजे मग जगणे निरामय आनंदाचे गाणे होऊन जाते,आध्यात्मिक आरोग्याचे सदृढ ठाणे होऊन जाते. तुकारामांची एक सुंदर ओळ आहे –
गाऊ,नाचू विठो,
तुझा करु अनुवाद
विठ्ठलाचा अनुवाद !किती विलक्षण कल्पना आहे ,नाही ? पण हे किती नेमके आहे.ज्ञानेश्वर,तुकारामांना गवसलेल्या सावळया विठूचा आपल्या जीवनात अनुवाद करणे,हीच तर आध्यात्मिक आरोग्याच्या पंढरीची पायवाट आहे. या वाटेने गेलो तर आपल्यालाही ,’जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद !’, हे घडोघडी  जाणवेल.
जगण्याला आणि काय हवं !!!