Tuesday 6 February 2018

आरोग्य- काल, आज आणि उद्या

       आरोग्य- काल, आज आणि उद्या
डॉ प्रदीप आवटे
---------------------------------------------------------------------------------------------
                             माणूस हा बुध्दिमान प्राणी आहे, ही सर्वात मोठी अफवा वाटावी इतका वैद्यकशास्त्राचा इतिहास मनोरंजक आहे. आज अगदी सामान्य वाटणा-या गोष्टी समजण्यासाठी माणसानं शेकडोहजारो वर्षे घेतलेली आहेत. साधा कॉलरा म्हणजे पटकीसारखा आजार हा दूषित पाण्यामुळं पसरतो, हे उमगायला त्याला एकोणिसाव्या शतकाचं सहाव्या दशकापर्यंत वाट पहावी लागली आहे. तोवर जगातले यच्चयावत आजार हे दुर्गंधामुळं पसरतात, असं त्याला वाटायचं. त्यालाच इंग्रजीतमिऍस्मा थेरीअसं काहीसं मिस्टेरिकल नाव दिले गेले होते. एकूण काय तर माणसाच्या गतीमंदत्वाचे नमुने वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात ठायी ठायी विखुरलेले आहेत.

           मेडेरि (Mederi) या ग्रीक शब्दावरुन मेडिसीन म्हणजे वैद्यकशास्त्र हा शब्द निर्माण झाला. मेडेरि म्हणजे बरे करणे. आज जरी आपण  मारे थाटात वैद्यकशास्त्र असे म्हणत असलो तरी या शास्त्राचा उगम आणि उदय हा अंधश्रध्देतून झाला, हे मान्यच करावे लागेल. या अंधश्रध्दा अठराव्या शतकापर्यंत टिकून राहिल्या. आजचे जे वैद्यक शास्त्र आपण पाहतो आहोत, ते धर्म, अंधश्रध्दा यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस दाखवणा-या अनेक बंडखोरांचे कर्तॄत्व आहे. मध्ययुगीन अज्ञानकाळात वैद्यांकडून उपचार करुन घेणे , हेच मुळी धर्मविरोधी आणि अपवित्र मानले जात होते. वैद्यकीय उपचार धर्मगुरुंकडूनच करुन घेतले पाहिजेत, असा मुळी फतवाच काढण्यात आला होता. या सा-या अडथळयांवर मात करत वैद्यकशास्त्र इथंवर पोहचले आहे, ज्योतिषशास्त्राचा वैद्यकात वापर करु पाहणा-या आजच्या काळात आपण हे नीट समजून घेतले पाहिजे.
  आधुनिक वैद्यकशास्त्रात हिपोक्रॅटीस या ग्रीक डॉक्टरचे योगदान युगप्रवर्तक आहे. त्याला आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक म्हटले जाते. तो प्लुटो आणि अरिस्टॉटलचा समकालीन होता. आणि या दोघांच्या तत्वज्ञान विषयातील कार्यास तोडीस तोड असे कार्य त्याने वैद्यकात केले. सगळयात महत्वाचे मानवी आजाराची कारणे अमानवी शक्तीत नसून ती माणसात आणि त्याच्या परिसरात आहेत, हे त्याने प्रतिपादन केले. एका अर्थाने दैवी अथवा पारलौकिक अशा तत्कालिन वैद्यकास त्याने खरेखुरे भौतिक शास्त्र बनवले. निरिक्षण, अनुभव आणि तर्क या त्रिसूत्रीच्या आधारावर त्याने वैद्यकाला खरेखुरे शास्त्र बनविले
आपल्याकडेही वेदकालात वैद्यकविषयक ज्ञान हे अथर्ववेदात संकलित केलेले दिसत असले तरी ते फारसे शास्त्रोक्त नाही देव, राक्षस, जादूटोणा, होमहवन, मंत्र, उपवास ,पशुबळी ,नरबळी, प्रायश्चित, प्रार्थना इत्यादी बाबींवर त्यात भर दिलेला दिसतो.वैदिक कालखंडानंतर आयुर्वेदाचा विकास झालेला दिसतो. या मध्ये आरोग्याचा सर्वांगीण दृष्टीने विचार झालेला आहे. आचार, विचार, आहार, व्यायाम, स्नान, परिसर, ॠतुमान व हवामान या सर्व बाबींचा विचार आरोग्याच्या अंगाने झालेला दिसून येतो मात्र आयुर्वेद अपरिवर्तनीय आहे’, असे मानले गेल्यामुळे प्रयोगशीलता हरवल्याने तसेच ते उच्च जातीतच अडकून पडल्याने पंधरा सोळाव्या शतकानंतर त्याची प्रगती खुंटली असे दिसून येते.

 या सगळया पार्श्वभूमीवर आरोग्याकडे पाहण्याची माणसाची दृष्टी आणि आरोग्याचा त्याला उमजलेला अर्थ कसकसा विकसित होत गेला, हे पाह्यला हवे. सूक्ष्मजीव आणि माणूस यांचा इतिहास आपण पाहिला तर जीवाणूंचे पृथ्वीतलावरील वास्तव्य हे अडीचशे ते पाचशे दशलक्ष वर्षांपासूनचे आहे त्या तुलनेत माणसाची गोष्ट ही तीन दशलक्ष वर्षांची आहे त्यातही होमो सेपियन नावाच्या आजच्या माणसाची गोष्ट दीड लाख वर्ष जुनी आहे. धर्माच्या नजरेतून पाहणारा माणूस अगदी अलिकडला असला तरी आरोग्याबद्दलची त्याची धारणा बराच काळ धर्माने निश्चित केलेली दिसते.  परमेश्वरी आज्ञेचा भंग केल्यामुळे मानवी जीवनात दुःख, व्याधी आणि मृत्यू हे सारे आले, असे अनेक धर्म वेगवेगळया मिथककथांद्वारे सांगताना दिसतात. बायबल मधील आदम ईव्हची गोष्ट सर्वज्ञात आहेच.  नको ती पेटी उघडल्यानं त्यातून सारी दुःखं , वेदना बाहेर पडल्या, असा आशय असणारी पॅन्डोराची ग्रीक पुराणातील गोष्ट ! या सा-यातून माणसाची आरोग्याबाबतची संकल्पना उत्क्रांत होत गेली आहे.
  माणसाची आरोग्याबाबतची समज कसकशी विकसित होत गेली हे पाहताना आपल्याला त्यात चार ठळक टप्पे दिसतात
१.     जैववैद्यकीय संकल्पना – ( Biomedical Concept) – एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी  ‘ जर्म थेरीविकसित झाली. लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉक यांनी आपल्या वेगवेगळया प्रयोगांच्या आधारे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सिध्द केले आणि आरोग्या संदर्भातील मानवी समजेला एक वेगळी दिशा मिळाली. आजार नसणे म्हणजे आरोग्य, या पारंपरिक समजेला बळ मिळाले. मानवी शरीर म्हणजे जणू एक मशीन आहे आणि त्यातील बिघाड म्हणजे आजार आणि मानवी शरीराची दुरुस्ती करणे, हे डॉक्टरांचे काम , अशी ही ढोबळ कल्पना होती. आरोग्यावर परिणाम करणा-या पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच मानसिक घटकांचा यात विचार करण्यात आलेला नव्हता. या अर्थाने ही संकल्पना संकुचित होती, अपुरी होती.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।। शरीर हेच धर्मनिर्वाहाचे साधन असल्याने त्याची निगा राखणे आवश्यक आहे, हाच याचा अर्थ.
२.      पारिस्थितीकीय संकल्पना ( Ecological Concept) – जैववैद्यकीय संकल्पनेतील कमतरतांना उत्तर देण्यासाठीच जणू आरोग्य विषयक ही नवी संकल्पना पुढे आलीया मध्ये मनुष्य आणि त्याचे पर्यावरण यांच्यामधील गतीमान संतुलन म्हणजे आरोग्य ही या मॉडेलची धारणा होती. “ वेदना ,त्रास यांपासून मुक्तता  आणि किमान कार्यात्मकता राखण्यासाठी आजूबाजूच्या पर्यावरणाशी समायोजन करणे,’ ही या संकल्पनेची आरोग्याची व्याख्या होती.
३.     मनोसामाजिक संकल्पना (Psychosocial Concept) – अलिकडील काळातील सामाजिक शास्त्रातील विकासासोबत तज्ञांच्या हे लक्षात आले की आरोग्य ही केवळ जैववैद्यकीय बाब नसून अनेक सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटक हे आरोग्यावर परिणाम करत असतात. आरोग्याची व्याख्या करताना तसेच त्याचे मोजमाप करताना या घटकांची दखल घेणे क्रमप्राप्त आहेआरोग्य हा जैविक आणि सामाजिक फेनोमेना असल्याचे या संकल्पनेने स्पष्ट केले.
४.    सर्वंकष संकल्पना ( Holistic Concept) – आरोग्याची सर्वंकष संकल्पना ही वरील सर्व संकल्पनांची गोळाबेरीज आहेआरोग्यावर परिणाम करणा-या सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटकांची दखल या मॉडेल मध्ये घेण्यात आली आहे. ही संकल्पना बरीचशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या व्याख्येशी जुळणारी आहे. साऊंड माईन्ड इन साऊंड बॉडी .. ! समाजातील प्रत्येक विभागाचा आरोग्याशी संबंध आहे, हे लक्षात घेऊन आरोग्याचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. आजही आपल्याकडे अनुसूचित जाती जमातीमध्ये बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. झोपडपट्टीमध्ये राहणा-या मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. असंघटित क्षेत्रातील मजूरांची मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही किंवा ती सरकारी शाळांमध्ये शिकतात तर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले खाजगी शाळांमध्ये जातात. स्त्री भ्रुण हत्या, मुलींच्या पोषणाकडे असलेले दुर्लक्ष अडाणी अशिक्षित समाजातील बालविवाहाच्या प्रथा या सा-या बाबी सामाजिक, शैक्षणिक आर्थिक घटक हे आरोग्याचे निर्धारक कसे असतात, हे स्पष्ट करतात.
            फेब्रुवारी १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करायचे ठरवले आणि आपल्या  आर्थिक आणि सामाजिक परिषदेला त्या साठी घटना तयार करायला सांगितले तेव्हा आरोग्याची व्याख्या करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेत नमूद करण्यात आले की,
“Health is state of complete physical, mental & social well being and not merely the absence of disease or infirmity. थोडक्यात , आरोग्य म्हणजे शाररिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टया सदृढ असणं. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे !”

खरं म्हणजे आरोग्याची ही व्याख्या मागील सुमारे सत्तर वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाते पण तरीही तिच्यामुळं आरोग्याचे सारे आयाम कवेत आले आहेत, अशातला भाग नाही. शाररिक, मानसिक, सामाजिक या आरोग्याच्या तीन आयामासोबतच आध्यात्मिक, भावनिक, व्यावसायिक आणि इतर अनेक आयाम आता चर्चेत येताहेत. शारिरिक,मानसिक,सामाजिक आरोग्यासोबतच आध्यात्मिक आरोग्याचा समावेश या व्याख्येत केला जावा,या साठी अनेक मंडळी १९७० पासून प्रयत्नशील आहेत. हेल्थ प्रमोशन ‘, संबंधीच्या बॅन्कॉक जाहीरनाम्यातही  आध्यात्मिक आरोग्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पण आध्यात्मिकतेची संकल्पना आधुनिक शास्त्राला किचकट,दुर्बोध वाटते.आध्यात्मिक आरोग्य आधुनिक निर्देशांकात मोजता येत नाही. अनेकवेळा शरीररचनाशास्त्र,शरीरक्रियाशास्त्र या शास्त्रांना ओलांडून ते अनाकलनीयतेच्या प्रदेशात प्रवेश करते पण म्हणून ते नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. व्यक्तीच्या आध्यात्मिक जडणघडणीचा स्वाभाविक परिणाम तिच्या शारिरिक आरोग्यावर होत असतो,हे अनेक छोटया मोठया अभ्यासातून पुढे आले आहे.  आणि म्हणूनच आरोग्याची संकल्पना जैववैद्यकीय,पर्यावरणीय,मनोसामाजिक अवस्थांमधून उत्क्रांत होत आज सर्वंकष ( होलिस्टिक) आरोग्यापर्यंत येऊन पोहचली आहे. ज्या लॅटिन शब्दापासून स्पिरिच्युलिटीशब्द तयार झाला आहे,त्या शब्दाचा  अर्थच  मुळी श्वासअसा होतो. आणि म्हणूनच आध्यात्मिकता आपल्या असण्याचा श्वासाइतका सहजभाग आहे. या आध्यात्मिकतेचा धर्माशी काहीही संबंध नाही.तुम्ही निधर्मी असतानाही आध्यात्मिक असू शकता आणि कट्टर धर्मवादी असतानाही ख-या अध्यात्मापासून शेकडो मैल दूर असू शकता. वेस्टगेटने आध्यात्मिक आरोग्याची चार वैशिष्टये सांगितली आहेत  - आयुष्याचा अर्थ आणि उद्देश गवसणे,जीवनमूल्यांचा शोध,सामाजिक नातेसंबंध श्रीमंत होत जाणे आणि अलौकिकाचा अनुभव येणे ! एकूण काय आरोग्य व्याख्येच्या मुठीत सापडत नाही, असे दिसते. बेंझामिन डिझरायली सारखे विचारवंत, “आय हेट डेफिनेशन्स,” असं का म्हणतात, हे ही अशावेळी ध्यानात येतं.
जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या कितीही सर्वव्यापक वाटली तरी तज्ञांचे त्यावर काही आक्षेप आहेत. खरं म्हणजे ही व्याख्या नको तितकी रुंद, व्यापक आहे. या आरोग्याला कोणतेही मापदंड नाहीत, ते मोजायचे कसे ? आणि जर ते मोजता येत नसेल तर काय फायदा ? एका अर्थाने ही व्याख्या त्यामुळे अव्यवहार्य होऊन बसतेया व्याख्येतील स्टेट म्हणजे अवस्था या शब्दालाही अनेकांचा आक्षेप आहे. कारण आरोग्य ही काही अवस्था नाही, तर ती सतत चालणारी एक प्रक्रिया आहे, आरोग्य ही एक गतीमान संकल्पना आहे.आणखी एक म्हणजे ही व्याख्याकम्प्लिट वेल बिईंगहा शब्द वापरते. असे निरपेक्ष, निरपवाद आरोग्याची कल्पना करताना नकळत समाजाच्या वैद्यकीकरणास ही व्याख्या हातभार लावते, असा अगदी गंभीर असा आरोपही या व्याख्येवर केला जातो. संपूर्ण आरोग्य गाठणे कठीण असल्याने आपण सतत आजारीच आहोत, ही सर्वसामान्य माणसाची भावना वाढीस लागून ड्रग कंपन्यांची नफाखोरी वाढते.
          दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागील काही वर्षांमध्ये आपल्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये बदलताहेत. लोकसंख्येतील विविध वयोगटांचे प्रमाण बदलते आहे. आजारांचे स्वरुप बदलते आहे. क्रोनिक किंवा दीर्घ काळ टिकणारे आजार वाढताहेत. जीवनातील शाररिक, भावनिक, सामाजिक आव्हानांना तोंड देऊन , क्रोनिक आजारांशी सामायोजन करुन या सगळया व्याधींसह हसतमुख जगण्याची जी मानवी शक्ती आहे, ती या व्याख्येत पूर्णपणे दुर्लक्षित झाली आहे. ‘ व्यक्तीची स्व-व्यवस्थापनाची आणि समायोजनाची क्षमता’, या घटकाचा अंतर्भाव केल्याशिवाय आरोग्याची कोणतीही व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीने जर आपल्या जगण्यातील व्याधींशी समायोजन करण्याच्या यशस्वी आणि प्रभावी उपाययोजना अंगिकारल्या तर व्याधी असूनही तो जीवन ज्या दृष्टीने पाहतो ती अधिक सकारात्मक असल्याने जगण्याची गुणवत्ता वधारते. यालाचडिसऍबिलिटी पॅराडॉक्सअसे म्हणतात. इथं पद्मजा फाटक यांच्याहसरी किडनीया पुस्तकाची आठवण होणे स्वाभाविक आहे. वयाच्या पंचेचाळीशीत त्यांना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आजाराने गाठले आणि किडनीच्या कामावर विपरित परिणाम झाला. आजारी पडण्यापूर्वी अत्यंत ऍक्टिव्ह आयुष्य जगणा-या पद्मजा फाटक या आजाराला ज्या रित्या सामोरे जातात ते त्यांच्या स्वव्यवस्थापनाची आणि समायोजनाची झेप स्पष्ट करणारे आहेएके ठिकाणी त्या लिहतात , “ रोगी सोडून इतर सगळ्यांच्या पाळ्या असतात. रोग्याला मात्र सतत त्याच भावनेत जगायला लागते. अश्या वेळेस रेशमाचा किडा जसे स्वतःतून धागा काढतो तसे आपण आपल्यातूनच आत्मबळ शोधायचे असते.” स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्यासाठी त्या स्वतःच तयार केलेली आनंदोपचारपॅथी वापरतात त्यामुळंच टर्मिनल स्वरुपाचे दुखणे असतानाही त्यांची शेवटची वर्षेदेखील आनंदात व्यतित झाली. केवळ स्वतःलाच नव्हे तर त्यांनी इतरांनाही उभारी दिली. आयुष्यात संकटे येणारच पण आपण जॉय ऑफ एक्झिटन्स गमावायचा नाही, या विचारांनी त्या चालत राहतात. डिसऍबिलिटी पॅराडॉक्सचे हे उत्तम उदाहरण ..!
आरोग्याला नव्याने व्याख्यांकित करताना या सा-या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. आरोग्य संवर्धनाच्या नवनव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर नवनवीन परिषदा भरताहेत. आरोग्याचे वेगवेगळे आयाम समजून घेण्याचा प्रयत्न सारे करताहेत. शिक्षण, व्यवसाय, आहार, राजकीय परिस्थिती, लिंगभाव , सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असे आरोग्याचे नवनवे निर्धारक समोर येताहेत. आज आरोग्याकडे मानवी हक्क, आंतरविभागीय समन्वय, सामाजिक गुंतवणूक, श्वाश्वत विकासाच्या नजरेतून पाहिलं जाते आहे. आणि तरीही एखाद्या मृगजळासारखे आरोग्य आपल्याला हुलकावणी देतंय. आणि मग चक्रधर स्वामींची लीळाचरित्रामधील हत्ती आणि चार आंधळयांची गोष्ट आठवते. आपले आंधळेपणदिसूलागते.. शाररिक आरोग्य, भावनिक आरोग्य , सामाजिक आरोग्यमग कुणीतरी बोलते, ‘ हा आरोग्याचा एकु एकु अवयवू होवे परि आरोग्य नोहे..’
 आरोग्याची सर्वंकष कल्पना अजून आपल्याला नेमकी गवसायची आहे. तीच आपल्याला इथल्या प्रत्येक घरांपर्यंत न्यावयाची आहे. पण आरोग्य हा मानवी जगण्याचा किती महत्वाचा विषय आहे, हे समजावून घ्यायला रुडाल्फ विरचो जे म्हणाला ते पुरेसे आहे, ‘Medicine is a social science and politics is nothing else but medicine on a large scale.’ आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा केंद्रक आरोग्याने व्यापणे, यातच आपणां सर्वांचे हित सामावले आहे.

- डॉ प्रदीप आवटे
( ' विश्रांती ' दिवाळी अंक २०१७ )