माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव,इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो मास्तर एक आठवडाभर मस्त नदी काठची रपेट मारुन आला आणि २६ ऑगस्ट १९७६ ला एकदम तापाने फणफणला. दवाखाना,उपचार सारे काही झाले पण ८ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्याला विषाणूजन्य रक्तस्त्रावी तापाने घेरले होते.हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरुन या नव्या विषाणूचे बारसे “इबोला विषाणू”असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण.त्या वर्षी झैरे (कांगो)मध्ये जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले.ही इबोलाची पहिली साथ. या नंतर इबोला अधून मधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दुःस्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला. १९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भिती एवढी सर्वव्यापी आहे की १९९५ साली वोल्फगॅंग पीटरसनने इबोला सदृश्य मोटाबा या काल्पनिक आजारावर “आऊटब्रेक” नावाची हॉलीवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भिती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली.
कांगो आणि युगांडा या देशात सध्या सुरु असलेल्या
इबोला उद्रेकास जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी (PHEIC) म्हणून
घोषित केले आहे. तथापी ही जागतिक महामारी ( पॅन्डेमिक ) नाही, हे ही जागतिक आरोग्य
संघटनेने स्पष्ट केले आहे.
आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय ?
सार्वजनिक आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी ( Public
Health Emergency of International Concern - PHEIC फिक) ही संकल्पना काय आहे, हे आपण
समजावून घेतले पाहिजे. वैश्विक आरोग्य परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य
नियमन असा एक कायदा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. १९६७ च्या या कायद्यात कॉलरा,
प्लेग आणि यलो फिवर हे तीनच आजार आंतरराष्ट्रीयदृष्ट्या नोटीफायेबेल होते. २००५ आली
या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आणि त्यामध्ये कोणत्याही आजारापेक्षा फिक
ही संकल्पना मांडण्यात आली. केवळ जैविक आजार हीच आरोग्य विषयक आणीबाणी असू शकत नाही
ही नवीन महत्त्वपूर्ण धारणा यामधून पुढे आली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय
आणीबाणी (फिक) यामध्ये चार बाबी महत्त्वाच्या आहेत:
१) असामान्य आणि अनपेक्षित घटना घडणे
२) या घटनेचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम
असणे.
३) या मध्ये आंतरराष्ट्रीय प्रसाराची शक्यता असणे
४) त्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार यावर निर्बंध
घालण्याची गरज लागू शकणे.
या चार पैकी कोणत्याही दोन किंवा अधिक बाबी होत असतील तर
अशा घटनेला जागतिक आरोग्य संघटना आणीबाणी म्हणून घोषित करते. सध्या सुरु असलेला
इबोला उद्रेक हा बुंडीब्युगो या उपप्रकारामुळे उदभवलेला आहे. या विषाणू प्रकाराविरुध्द
कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कांगोच्या उत्तरेकडील इटुरा या प्रांतात या उद्रेकाची
सुरुवात झालेली आहे. कांगोचा हा प्रांत खनिज समृध्द आहे आणि इथे स्थानिक अतिरेकी गटांमुळे
अशांतता , हिंसा अशा बाबी नियमितपणे घडत असल्याने तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दुबळी
असल्याने हा उद्रेक रोखणे कांगो करता आव्हानात्मक आहे तशात हा प्रांत उगांडा, सुदान
या देशाचा सीमावर्ती भाग असल्याने हा संसर्ग नव्या देशांमध्ये शिरकाव करण्याची शक्यता
वाढली आहे.
काय आहे हा इबोला ?
इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे.इबोलाचा हा
विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. या आजारातील
मृत्यूचे प्रमाण ५० ते ९०%इतके प्रचंड आहे.सध्या सुरु असलेल्या इबोला उद्रेकात
आतापर्यंत पाचशेहून अधिक संशयित आणि
सुमारे १०० मृत्यू झाले आहेत.
ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, घसादुखी, उलटी जुलाब, अंगावर रॅश उमटणे, रक्तस्त्राव ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारात मूत्रपिंड आणि यकृताच्या कामात बिघाड होतो.
इबोला पसरतो कसा?
वटवाघळाच्या
काही प्रजाती, चिपांझी,गोरिला, माकडे आणि इतर
प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो.ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीर
स्त्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित
प्राण्यांचे मांस खाणे हे देखील अनेकवेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते.
पण एकदा का आजार माणसात आला की तो एका
रुग्णापासून दुस-या निरोगी माणसाला होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा
प्रादुर्भावही मुख्यत्वे शरीर द्रव्यामार्फत होतो. रक्त आणि इतर शरीर
द्रव्यामार्फत या विषाणूचा प्रसार होत राहतो. मानवी वीर्यातही हा विषाणू सात
आठवड्यांपर्यंत सापडतो.त्यामुळे एच आय व्ही,कावीळ ब या प्रमाणेच
इबोला देखील शरीर संबंधांमार्फत पसरु शकतो.
रुग्णाची सेवा करणारे नातेवाईक तसेच डॉक्टर्स
आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना हा आजार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आणि म्हणूनच
रुग्णांवर उपचार करताना आणि त्यांची शुश्रुषा करताना त्यांच्या शरीरद्रव्याशी आपला
संबंध येणार नाही, याची दक्षता आरोग्य कर्मचा-यांनी घेणे आवश्यक आहे. या
उद्रेकात इबोलाची पहिली रुग्ण एक नर्सच होती.
२०१४
मधील उद्रेकातील
उदाहरण म्हणजे सिएरा लिओन देशातील डॉ.शेख उमर खान हे होय. २९ जुलै २०१४ रोजी ते इबोलाने गेले.हा माणूस सुमारे दहा वर्षे
इबोला रुग्णांवर उपचार करत होता.त्यांनी शंभरहून अधिक इबोला रुग्णांवर उपचार केले
होते. या सा-यांमधील धोका त्यांना कळत होता पण तरीही एका प्रचंड निष्ठेने ते हे
काम करत होते. “माझे माझ्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे.इबोला रुग्णावर उपचार
करण्यातला धोका मला समजतो आणि म्हणूनच मी सर्वप्रकारची काळजी घेतो.हे काम करताना
होणारा आनंद या धोक्यापेक्षा कितीतरी मोठा आहे,” आपल्या मृत्यूपूर्वी
दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते. इबोला भोवती दाटलेले भयाचे वलय
त्यांना पुसायचे होते आणि म्हणूनच आपल्या केमेना येथील रुग्णालयातील ब-या होऊन
जाणा-या इबोला रुग्णाला ते ‘जादूची झप्पी’ देऊन निरोप द्यायचे.
त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाळीत टाकू नये, हा उद्देश त्यामागे
असायचा. पण इबोलाशी लढणारा जिद्दी योध्दा या लढाईत कामी आला. “आम्ही आज आमचा नॅशनल
हिरो गमावला,” या शब्दांत
सिएरा लिओनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेव्हा त्यांना श्रध्दांजली
वाहिली होती.
घातक आणि धोकादायक आजार हे वैद्यक
शास्त्रासमोरचे आव्हान नेहमीच होते. कॉलरा काय किंवा प्लेग काय सा-यांमध्येच ही
भिती होती पण येथे पळपुटी माणसे कामाची नसतात. आपल्या व्यवसायाप्रती कमालीची
निष्ठा, धैर्य आणि
त्या सोबतच आवश्यक ती खबरदारी घेणारी माणसेच या आणीबाणीच्या प्रसंगी महत्वाची
ठरतात. आणि म्हणूनच इबोला रुग्णांवर उपचार करताना पीपीई सारखी संरक्षक साधने
वापरणे,रुग्णाच्या
दूषित गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे (जैववैद्यकीय
कच-याचे व्यवस्थापन) या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. इबोला हा आजार स्वाईन फ्ल्यू
सारखा हवेतून पसरत नाही त्यामुळे तो खूप वेगाने पसरु शकत नाही, हे ही
महत्वाचे..! स्वाईन फ्ल्यूने अवघ्या अडीच महिन्यात सारे विश्व पादाक्रांत केले
होते.
या आजाराचा अधिशयन कालावधी २ ते २१ दिवस आहे.
आजमितीला या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. काही प्रायोगिक औषधे वापरण्याची
परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे खरे पण आजमितीला रुग्णाला लक्षणाधारित
उपचार देण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. आपल्याकडे राष्ट्रीय विषाणू
विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्था,नवी दिल्ली
येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
इबोला
भारतात येऊ शकतो काय,हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा आणि चिंतेचा विषय. इबोला ज्या
प्रकारे पसरतो हे लक्षात घेतल्यास,व्यवसाय किंवा पर्यटनासाठी या देशांमध्ये
गेलेल्या प्रवाशांना इबोलाची बाधा होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डब्ल्यू एच ओ
ने ही स्पष्ट केले असले तरी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
वटवाघुळ हे इबोला विषाणू प्रसारामध्ये
महत्वाची भूमिका बजावते,असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आज १९७६ च्या
तुलनेत शहरीकरण झालेल्या आफ्रिकेत पूर्वी इतक्या सहजतेने इबोलाचा उद्रेक थांबताना
दिसत नाही. एखाद्या गावात झालेला उद्रेक ते संपूर्ण गाव विलग करुन आटोक्यात आणणे
सोपे होते पण आज मात्र आफ्रिकन देशांच्या शहरी आणि मोठ्या प्रमाणात ये जा असणा-या
भागात इबोलाची लागण होताना दिसते आहे आणि म्हणूनच मागील आठ महिन्यापासून हा उद्रेक
थांबायचे नाव घेत नाही आहे. जागतिकीकरणाच्या फांदीला हे इबोलाचे उलटे वटवाघूळ
लटकले आहे.ते जणू आपल्या सा-या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीला वाकुल्या दाखवित आहे. आज
आपल्या हातात आहे दक्षता आणि पायासमोर आहे मानवी हितासाठी अनेकांच्या त्याग आणि
समर्पणाने सिध्द झालेली विज्ञानाची पाऊलवाट...! आज आपल्या सर्वांना खाली मुंडी वर
पाय करायला लावणा-या या करामती वटवाघळाच्या शीर्षासनावरही उद्या उपाय सापडलेच पण
तोवर हातात हात घेऊन चालू या. परस्परांची काळजी घेऊ या.










.jpg)

