Saturday 22 February 2014

मर्यादेच्या अंगणाला इंद्रधनुची कमान
                -डॉ.प्रदीप आवटे

     डॉक्टरांनी कन्यारत्न झाल्याचं सांगितलं. आम्हां दोघांनाही मुलगीच हवी होती. त्यामुळं आम्ही खूष होतो. तिस-या दिवशी बाळाला अचानक फिटस येऊ लागल्या.  डॉक्टरांनी तपासलं, काही क्षण कुणीच काही बोललं नाही मग डॉक्टरांनी सुरुवात केली, " तुमची मुलगी 'नॉर्मल ' नाही. शी इज मेंटली रिटार्डेड ! अशी मुलं सांभाळणं खूप कठीण असतं. खूप तडजोडी कराव्या लागतात. मला असं वाटतं, बेटर यू फरगेट द बेबी."  डॉक्टरांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याबरोबर अंगातून सणकन वीज चमकून गेली, अवसानच गेलं. हे नक्की काय आहे, हे कशामुळं झालं, याची कारणं काय , असले प्रश्न  त्याक्षणी मला पडले नाहीत. फक्त एकच प्रश्न होता, " व्हॉट डू यू मीन बाय बेटर यू फरगेट द बेबी..?"
  आपल्या पोटी जन्माला आलेला इवलासा, गोजिरा जीवच जेव्हा डॉक्टर विसरायला सांगतात तेव्हा त्या आईबापांच्या काळजाला किती इंगळ्या डसत असतील याची कल्पनाच केलेली बरी. 'मर्यादांच्या अंगणात वाढताना' या पुस्तकातील अरुण लोहकरे यांचे मनोगत वाचत होतो.  पत्रकार अरुण आणि एक संवेदनशील कवयत्री असलेल्या सुजाता लोहकरे या जोडप्याचे पहिले अपत्य - त्यांची मुलगी सई ही मतिमंद असल्याचे, मंगोल असल्याचे निदान होते आणि  या धक्क्याने क्षणभर जगण्याचं अवघं अवसानच हरवल्यासारखं झालं तरी हे समंजस, कल्पक जोडपं आपल्या जगण्याची अवघी ऊर्जा सईकडे वळविते आणि मर्यादांच्या या अंगणात सईच्या धिम्या पण आश्वासक विकासाची आनंददायी पावलं उमटू लागतात, मर्यादा आणि अपरिहार्यतेच्या कुंपणाला हिरवीकंच पाने फुटू लागतात.  आणि मंगोल म्हणजेच डाऊन्स सिंड्रोम असलेल्या सई सोबत आपणच माणूस म्हणून वाढत आहोत, असा ह्र्द्य अनुभव अरुण सुजाताला प्रत्येक क्षणी येऊ लागतो. या मर्यादेच्या अंगणात वाढण्याची कहाणी या जोडप्याने या पुस्तकात मांडली आहे.  सईच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या या विचारपूर्वक धडपडीने एक विलक्षण प्रेरणा आपल्यापर्यंत पोहचते आणि म्हणूनच हे पुस्तक अशा विशेष मुलांच्या आईबाबांनी तर वाचले पाहिजेच पण ते इतरांनीही वाचले पाहिजे. आपल्या माणूसपणाच्या सीमारेषा विस्तारण्याची ताकद या पुस्तकात आहे. ' बेटर यू फरगेट द बेबी', असा चुकीचा सल्ला देणा-या डॉकटरांसाठीही ते मार्गदर्शक आहे.  पण या विलक्षण प्रेरणेसोबतच समाजातल्या इतर अनेक सईंसाठीचे प्रश्नोपनिषिदही या पुस्तकाने कळत नकळत आपल्या भेटीला येते. या सईला तिच्यावर तिच्या सा-या मर्यादांसह जीवापाड प्रेम करणारा बाबा मिळाला, शिक्षण  आणि कला यांचा मेळ घालून तिच्या अडखळत्या पावलांना गती देणारी सर्जनशील आई मिळाली, आई बाबांच्या प्रयत्नातून योग्य शाळा, व्यावसायिक संस्था मिळाल्या पण आपल्या समाजात वाढणा-या सगळ्याच सई इतक्या भाग्यवान कुठे असतात, त्यांचे काय?

        नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार भारतात अशा प्रकारे विविध कारणांनी विकलांग असणा-या व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे दोन टक्के आहे, निव्वळ आकडा सांगायचा तर सुमारे दोन कोटी. भारतात २००० सालापासून सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, मतिमंदत्व आणि इतर विकलांगतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील ट्रस्ट काम करतो आहे. पालकांचे आणि समाजाचे पबोधन, या मुलांसाठी काम करणा-या संस्थाचा समन्वय, शाररिक तसेच मानसिक विकलांग व्यक्तींच्या हक्कांसंदर्भात केलेल्या कायद्यांची माहिती, आरोग्य विमा, आधार नसलेल्या विकलांग व्यक्तीस संरक्षण ,विकलांगता टाळण्यासाठी गरोदर पणात तसेच बाळाच्या नवजातपणाच्या काळात काय खबरदारी घ्यावी या संदर्भात लोकशिक्षण, आपल्या मर्यादांवर मात करुन समाजास महत्वपूर्ण योगदान देणा-या विकलांगाचा गुणगौरव, शिक्षण, प्रशिक्षण अशा विविध महत्वाच्या बाबींवर हा ट्रस्ट काम करित आहे. तरीही सर्वांपर्यंत सा-या गोष्टी पोहचतातच असे नाही. मी उत्तर प्रदेश मध्ये असतानाची एक बातमी मला अजून आठवते आणि मन अस्वस्थ करुन टाकते. हातावर पोट असलेले एक मजूर कुटूंब आणि त्यांचा एक मुलगा मतिमंद. रोज कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मग या मुलाची सोय ती काय करायची. बिच्चारे आईवडील चक्क या मुलाला जनावराला बांधतो तसे एकाद्या पायाला दाव्याने बांधून जायचे. आणि त्या दाव्याच्या लांबीनुसार तो दिवसभर गोल गोल रिंगण घालत फिरत राह्यचा. ह्रदय द्रवून जावे, अशी घटना. अशा मतिमंद मुलांच्या विकासाची आणि आनंददायी जगण्याची सुरुवात होते ती मुळात आई वडील त्यांचा मनापासून स्वीकार करतात तेव्हा..! आपले मूल लपवून ठेवावे किंवा आपल्याला त्याची लाज वाटावी, असे काहीच नाही, काहीच नसते. अनेक पालक आपली मुले घरात लपवून ठेवतात, त्यांना पाहुण्यारावळ्यांसमोर आणत नाहीत, सार्वजनिक ठिकाणी नेत नाहीत.  'The only disability in life is bad attitude,’  आपल्या चुकीच्या धारणेइतके आपल्याला विकलांग करणारे दुसरे काहीही नसते, हे आपण समजावून घेतले पाहिजे. समाजाने आपले मूल स्वीकारणे हा त्या पुढील टप्पा आहे. आणि एकदा तुम्ही तुमचे मूल मनःपूर्वक स्वीकारले की समाजातील एखाद्या व्यक्तीने चुकीची प्रतिक्रिया दिली म्हणून आपले काहीच बिघडत नाही, हे ही तितकेच खरे. पण समाज म्हणून आपण ही विकलांग मुले आणि त्यांच्या विकासाबाबत संवेदनशील असणे तेवढेच आवश्यक आहे. विकलांगाच्या पुनर्वसनाच्या बाबतीत माझ्या पूर्वजन्मातील पापाचे फळ अशा खुळचट पारंपारिक धारणेपासून ते  केवळ वैद्यकीय आणि धर्मादाय मॉडेल पासून निखळ मानवी हक्कांच्या मॉडेल पर्यंत आज आपण आलो आहोत.  बिवाकोचे आंतरराष्ट्रीय मॉडेलही आपल्याला हेच सांगत आहे. मानवी हक्कांच्या पायावर उभे असलेले हे मॉडेल विकलांगांना सर्व सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळाव्यात, हे उच्च रवाने सांगते.

  सईसारख्या मुलांच्या जीवनात त्यांच्या गरजानुसार आखलेल्या लवचिक शिक्षणाचा सहभाग खूप महत्वाचा आहे. सर्व शिक्षा अभियानात प्रत्येक तालुक्यात विशेष मुलांच्या संख्येनुसार विशेष शिक्षकाची तरतूद करत असले तरी 'समावेशक शिक्षण' संकल्पना म्हणून आदर्श असले तरी त्याची अंमलबजावणी सोपी नाही. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले आज विशेष शाळांमध्ये जाताना दिसत असली तरी खेड्यातील आणि निम्न आर्थिक स्तरातील मुलांची या बाबतीत कुचंबणाच होताना दिसते आहे. मुळात अशा मुलांसाठी शिक्षक, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ , समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट अशा तज्ज्ञांची एकजिनसी टीम हवी. हा टीम ऍप्रोचच त्यांच्यासाठी नव्या वाटा दाखवू शकेल.
  पुणे मुंबई रोडवरील असलेली तळेगाव जवळच्या कान्हे फाट्याजवळची जय वकील स्कूल ही शाळा अशा टीम ऍप्रोचचे सुंदर उदाहरण आहे. १९५८ पासून कार्यरत असलेली ही शाळा म्हणजे कान्हे परिसरातील ग्रामीण भागातील अनेक मुलांसाठी आशेचा किरण आहे. या शाळेत आल्यापासून मुलांच्या शारिरिक आणि बौध्दिक बाबतीत झालेल्या सुधारणा मुलांच्या आईबाबांच्या तोंडून ऐकताना या व अशा प्रकारच्या शाळांचे मोल आपल्याला उलगडत जाते. " आपल्या मतिमंद मुलाचा सहज स्वीकार त्याच्या आईबाबांनी करावा, म्हणून या शाळेत कार्यरत असलेला पालक गटाचा खूप फायदा होतो," या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या नयना डोळस सांगतात. या मुलांच्या शिक्षणासाठी खूप वेगवेगळ्या तंत्राचा वापर करावा लागतो. प्रत्येक मुलाच्या विकलांगतेच्या स्वरुपानुसार त्यामध्ये लवचिकताही आवश्यक असते. लसूण सोलणे, टोंमॅटो-बटाटे चिरणे, धान्य निवडणे अशा सारख्या नेहमीच्या कामातून मुलांच्या मोटार ( कारक) ऍक्टव्हिटीज मध्ये सफाईदारपणा यावा यासाठी प्रयत्न करण्यात येतो. भेटकार्डे, कागदी पिशव्या, हार तयार करणे अशा लहान लहान गोष्टींमधून ही मुले आपला विकास साधत जातात. संगीत, नृत्य, नाटक, स्केटींग, हास्य, बागकाम, शेतीकाम, पाळीव प्राण्यांशी खेळणे अशा अनेक बाबींचा कल्पकपणे थेरपी म्हणून उपयोग करुन घेतला जातो. यामुळे  शाळेत आल्यापासून आपले मूल अधिकाधिक स्वावलंबी होऊ लागले आहे, त्याचे आपल्यावरील अवलंबित्व कमी कमी होत चालले आहे, याचा सुखद अनुभव पालक घेत असतात. मुलांना साधे साधे व्यवहार कळावेत या साठी शाळेने एक लुटीपुटीचे स्टेशनरी - किराणा स्टोअर्सदेखील उघडले आहे. खोटे पैसे, नोटा घेऊन तिथे मुले खरेदी विक्री हिशोब पैसे परत घेणे अशा व्यवहारातील सोप्या सोप्या गोष्टी शिकत असतात. या शाळेची मुलं स्केटींग, नाटक, गाणं या प्रकारात अनेक बक्षिसे दरवर्षी मिळवतात. डोळस मॅडम सांगतात, "या मुलांना शिकविताना, त्यांच्यासोबत राहताना आपणच खूप गोष्टी शिकत जातो". आज या शाळेचे अनेक विद्यार्थी आपापल्या पालकांना त्यांच्या व्यवसायात मदत करत आहेत,काही जण तर शाळेतच वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडत आहेत. या सा-या मध्ये काही न सुटलेले प्रश्न आहेतच. या मुलांच्या लैंगिकतेचा प्रश्न हा त्यापैकीच एक. मुलांचे पालक आणि इतर तज्ज्ञ यांच्या संवेदनशील समन्वयातून याबाबतही काही नवे गवसत जाईलच...! मात्र अशी शाळा,अशा सुविधा प्रत्येक मुलापर्यंत पोहचायला हव्यात.
    प्रत्येक सईला अरुण – सुजाता सारखे आईबाबा आणि  डोळस मॅडम सारखे ख-या अर्थाने डोळस असलेले शिक्षक मिळायला हवेत. आपण आपल्या मुलांवर खरोखर प्रेम करत असू तर हे कठीण असले तरी आपण हे करायला हवे.आपल्या या एक्सप्रेस हायवे वरुन धावणा-या  गतीमान युगात मंदगतीने चालणा-या या जीवांकरिता आपल्याकडे वेळच नाही, असे नको व्हायला. संध्याकाळी माझ्या घराकडे येताना चौकात एक मंगोल मुलगा मला हमखास भेटतो. किती जन्माची ओळख असावी, तसा तो प्रत्येकाकडे बघून गोड हसतो आणि 'कुठे चाललात? ', अशा अर्थाची हाताची खूण करतो. मला वाटते, तो विचारतो जणू, अरे किती धावाल आणि कशासाठी ? माझ्यासाठी थांबाल थोडे ?’
  थोडे थांबू, थोडे सावकाश चालू आणि प्रेमाचे ढाई अक्षर प्रत्येक सईच्या डोळ्यांत वाचू...! तुमच्या माझ्या मर्यादेच्या अंगणाला इंद्रधनुची कमान बांधू...!

( हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या २८ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे.)

http://epaper.lokprabha.com/232156/Lokprabha/28-02-2014#dual/40/1