Friday 28 July 2017

नवे नवे पाणी,नव्या जुन्या साथी



नवे नवे पाणी,नव्या जुन्या साथी
- डॉ प्रदीप आवटे
    
     मध्यपूर्वेतील येमेन या अवघ्या अडीच कोटी लोकसंख्येच्या देशात मागील तीन महिन्यापासून कॉलराने थैमान घातले आहे. या टीचभर देशात जवळपास पावणेचार लाख जणांना कॉलराची लागण झाली असून त्यात जवळपास दोन हजार जणांचा बळी गेला आहे. आजवरच्या मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा कॉलरा उद्रेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. कॉलरा सारख्या आजाराने एकविसाव्या शतकात एवढा हाहाकार माजवावा,हे आश्चर्यकारक आहे.१८५४ मध्ये जॉन स्नोच्या प्रयत्नाने कॉलरा प्रसार कसा होतो आणि कॉलरा प्रतिबंधाकरता काय करायला हवे,हे आपल्या ध्यानात आले.स्नोनंतर दीडशे वर्षांनीही असे होणार असेल तर काय म्हणावे ? पण येमेन मधील कॉलरा उद्रेकाला राजकीय कारणे आहेत.सध्या या देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. सौदी नेतृत्वाखालील सैन्याने येमेनवर हल्ला केला आहे. नागरी भागात बॉम्बवर्षाव होताहेत,अन्न पाण्याचा मोठा तुटवडा लोकांना सहन करावा लागतो,अशा अवस्थेत सहज आवरता येणारा कॉलरा अनावर झाला आहे. रुडाल्फ विरचो जे म्हणाला ते अशावेळी आठवते, ‘Medicine is a social science and politics is nothing else but medicine on a large scale’ आपल्याला अनेकदा युध्दाची खुमखुमी येते आणि युध्दाच्या पोटात किती भयंकर साथी लपलेल्या असतात,हे आपण विसरुन जातो. 
इसलिए ऐ शरीफ इंसानो,
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभी के आँगन में
शमा जलती रहे तो बेहतर है
साहिरच्या या शब्दाचे अर्थही आपल्याला कळेनासे होतात. आंतरराष्ट्रीय दळणवळण प्रचंड वाढलेल्या या काळात जीवाणू आणि विषाणू देखील आपल्याच सोबत विमानमार्गे वेगवेगळया देशात पोहचू शकतात आणि एका देशातील साथ जगभरासाठी महामारी ठरु शकते, हे ही आपण ध्यानात घ्यायला हवे. येमेन मध्ये कॉलरा पेटलेला असताना डोकलाम मध्ये आपली कुरापत काढू पाहणा-या चीनमध्ये इन्फ्लुएंझा ए एच ७ एन ९ या विषाणूच्या सहा नवीन केसेस आढळल्या आहेत तर मलेरियाला चले जाव म्हणणा-या शेजारच्या श्रीलंकेत डेंग्यूच्या तब्बल ऐंशी हजाराहून अधिक केसेस आढळल्या असून २१५ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.  मागील वर्षात युरोपात गोवर सारख्या लसीकरणाने पूर्णपणे टाळता येणा-या आजाराने ३५ जणांचा बळी घेतला आहे. 

संसर्गजन्य आजाराविरुध्दचे युध्द मानवाने जिंकले आहे,’ अशी दर्पोक्ती अमेरिकेचा सर्जन जनरल असलेल्या विल्यम स्टेवर्टने पन्नास वर्षांपूर्वी केली होती. हे ऐकून सारे सूक्ष्मजीव पोट धरुन  हसले असतील किंवा त्यांनी परस्परांना ‘LOL’ असा मेसेज केला असेल. पण अशी दर्पोक्ती करणारा विल्यम एकटा नव्हता साथीचे आजार आता इतिहासजमा झाले आहेत,’ असे नोबेल विजेत्या मॅक बर्नेटलाही १९६२ साली वाटले होते. संसर्गजन्य आजाराबाबतचे आपले भाकीत असे वारंवार चुकले आहे.सूक्ष्मजीवांची नेमकी ताकद ओळखण्यात आपण अपुरे पडले आहोत, हे नक्की !
   जगभरातील अशा विचित्र साथरोग परिस्थितीत मान्सून आपल्याकडे आला आहे.  सोनू तुला मान्सूनवर भरोसा नाय का ?’अशी पॅरोडी गावी अशी खरं म्हणजे मान्सूनची अवस्था आहे. भारतीय मान्सूनचे स्वरुप मागील काही वर्षांपासून बदलते आहे. १५०० किमीची आपली पश्चिम घाटाची पर्वतीय रांग एखाद्या हिरव्यागर्द रिबिनीसारखी दक्षिण पश्चिम अशी पसरली आहे. युनेस्कोनं या पर्वतरांगेला हेरीटेज साईट म्हणून घोषित केले आहे. भारतीय मान्सून संपूर्णपणे या पर्वतरांगेवर अवलंबून आहे. पण मागील काही वर्षांपासून मान्सूनच्या पर्जन्यमानात १०-२० % ची घट झाल्याचे दिसून येते आहे तर मान्सूननंतर आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडणा-या पावसात वाढ होताना दिसते आहे.  तर पश्चिम घाटाशी संबंधित कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,गोवा,गुजरात आणि महाराष्ट्र  या सहा राज्यांतील सरासरी तपमानात वाढ होताना दिसते आहे.  या बदलत्या वातावरणाचा परिणाम या राज्यातील वनस्पती जीवन, शेती आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यावर होतो आहे. कोकणात शेतीची नासधूस करणारे हत्ती आणि ऐन उन्हाळयात म्हणजे चक्क एप्रिल मे मध्ये वाढत्या इन्फ्ल्युएंझा केसेस हे चित्र बदलत्या मान्सूनमुळे अधिक ठळक होताना दिसते आहे.  अर्थात वातावरणातील बदल आणि साथरोग या संदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे. 

 पावसाळा हा अनेक साथरोगांचा महत्वाचा पारेषण कालावधी आहे.या कालावधीत वाढणा-या साथरोगाचे वर्गीकरण मुख्यत्वे दोन विभागात करता येणे शक्य आहे. एक म्हणजे पाण्यामुळे पसरणारे आजार अर्थात जलजन्य आजार.या गटात डायरीया,डिसेंट्री,कॉलरा,गॅस्ट्रो अशा आजारांसोबतच विषमज्वर (टायफॉईड),कावीळ अशा आजारांचा समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिस हा ही याच काळात बळावणारा एक आजार. दुस-या गटात अप्रत्यक्षपणे पाण्यामुळे पसरणारे म्हणजे कीटकजन्य आजार. कारण पाणी साठल्यामुळे डासोत्पत्ती स्थाने निर्माण होऊन डासांमुळे होणा-या आजारातही वाढ होते ती याच काळात ! यामध्ये मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया आणि  डासांमुळे पसणा-या इतर आजारांचा समावेश होतो. या शिवाय हवेवाटे पसरणारा इन्फ्लुएंझा हा आजार देखील मान्सून काळात डोके वर काढतो. एकूण काय, पावसाळा नवे जीवन,नवे चैतन्य देतो हे खरेच पण –
उसळत घुसळत फेसाळत
जळ धावे दाही दिशांनी
आले नवे नवे पाणी !
असं वाजत गाजत आलेलं हे नवं नवं पाणी ,आपल्या सोबत नव्या जुन्या आजारांच्या साथी देखील घेऊन येते. पावसाचा अंतर्विरोध आपल्या अवघ्या जगण्याच्या अंतर्विरोधाचाच एक भाग,आणि काय !
इन्फ्लुएंझा ए एच१ एन १
आपण याला स्वाईन फ्ल्यू म्हणून ओळखतो.पण खरे तर याला या नावाने हाक मारणे योग्य नाही कारण याचा आणि स्वाईनचा म्हणजे डुकराचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही.आता तो आपल्याकडे सिझनल फ्ल्यू सारखाचा वागतो आहे. २०१५ मधील मोठया उद्रेकानंतर २०१६ मध्ये या आजाराचा फारसा प्रादुर्भाव नव्हता.मात्र यावर्षी इन्फ्ल्युएंझाने पुन्हा डोके वर काढले असून भारतात आता पर्यंत साडेसहाशेहून अधिक मृत्यू या आजाराने झाले आहेत. आपल्या राज्यात फ्ल्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. जवळपास तीन हजार जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून तीनशेहून अधिक मृत्यू या आजाराने झाले आहेत.
एप्रिल मे पर्यंत मुंबईसह आपला कोकणपट्टीच्या प्रदेशात या आजाराचा फारसा प्रभाव नव्हता पण पावसाच्या आगमनापासून मुंबई,ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर,वसई विरार,कल्याण डोंबवली या सा-या शहरी भागात इन्फ्लुएंझा मोठया प्रमाणावर दिसतो आहे. या आजाराने काही जणांनी आपला जीवही गमावला आहे. 

फ्ल्यू प्रसाराचा वेग
 हा -या अर्थानेआंतरराष्ट्रीयआजार आहे. तो जगातल्या सर्व देशात आढळतो. फ्ल्यू इतक्या वेगाने कसा काय पसरु शकतो, याची काही महत्वपूर्ण कारणे आहेत.
   फ्ल्यूचा अधिशयन कालावधी ते सात दिवस एवढा कमी आहे. हा आजार पसरतो हवेवाटे, रुग्णाच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून उडणा-या थेंबातून..! एका साध्या वाटणा-या शिंकेत सुमारे चाळीस हजार थेंब असतात, हे आपण लक्षात घेतले तर हा प्रसार किती वेगात होऊ शकतो हे आपल्या ध्यानात येईल. त्यात थंड हवामानात वा-याचा वेग कमी असल्याने हे थेंब हवेत अधिक काळ तरंगतात त्यामुळे प्रसाराचा वेग अजून वाढतो. फ्ल्यू झाल्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही अत्यंत अल्पजीवी असते. ती केवळ - महिने टिकते त्यामुळे एका सिझनला आपल्याला फ्ल्यू झाला तरी पुढल्या सिझनसाठी आपल्याला इम्युनिटी मिळत नाही. शिवाय ही इम्युनिटी त्या त्या विषाणू पुरती असते म्हणजे एच१एन१ ची इम्युनिटी एच३एन२ साठी उपयोगी पडत नाही. लक्षणे आढळणा-या फ्ल्यू रुग्ण जेवढे आढळतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोक हे फ्ल्यू विषाणू शरीरात जाऊनही लक्षणविरहित असतात. अशा अनेक कारणांमुळे फ्ल्यू खूप वेगाने पसरतो. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशात त्याचा प्रसाराचा वेग अधिकच वाढतो. ग्रामीण भागापेक्षा तो शहरी भागात अधिक सापडतो त्याचे कारणही तेच आहे. प्रौढांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण -१०% तर मुलांमध्ये २०-३०% एवढे आहे. आजही दरवर्षी जगभरात अडीच ते पाच लक्ष लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्ल्यू विषाणूमुळे मृत्यूमुखी पडतात असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. अमेरिकेत फ्ल्यू हे मृत्यूचे सहाव्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे.
इन्फ्लुएंझा इतका गंभीर आजार आहे का ?
राज्यात तीनशेहून अधिक जणांनी आपला जीव गमावावा,इतका हा आजार गंभीर आहे का ? याचं खरं उत्तर खरं म्हणजे नाही असं आहे. हा आजार सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाचा आहे. थोडासा ताप, घसादुखी,अंगदुखी,खोकला असं याचं स्वरुप असतं, अनेकजण तर २-३ दिवसात आपोआपच बरे होतात.
मात्र काही व्यक्तींमध्ये मात्र हा आजार गंभीर स्वरुप धारण करताना दिसतो. मागील काही वर्षांच्या अभ्यासानुसार इन्फ्ल्युएंझा संदर्भात हा अतिजोखमीचा गट खालीलप्रमाणे आहे –
·      मधुमेह,उच्च रक्तदाब असणा-या व्यक्ती
·      हृदय आणि फुफ्फुसाचे विकार असणा-या व्यक्ती
·      किडनी,लिव्हर आधी बाबतीत इतर जुनाट आजार असणा-या व्यक्ती
·      गरोदर माता
·      स्थूल व्यक्ती
·      धुम्रपान करणा-या किंवा धुम्रपान करणा-या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती
या अतिजोखमीच्या गटातील व्यक्तीने फ्ल्यू संदर्भात अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणताही सर्दी खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांचा सल्ला विनाविलंब घ्यावा. फ्ल्यू वरील ऑसेलटॅमीवीर ( टॅमीफ्ल्यू ) हे औषध लक्षणे सुरु झाल्यापासून दोन दिवसांमध्ये सुरु केल्यास अधिक गुणकारी ठरते हे लक्षात घेतले तर वेळेवर उपचार सुरु करण्याची निकड आपल्या लक्षात येईल.
आपण काय केले पाहिजे ?
  इन्फ्ल्युएंझा आपल्यासोबत राहणारच आहे. आपण काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्न…! आपल्या हातात आहे, शहाणपणाने वागणे. लोकशाही आणि आरोग्य या दोन्ही मध्ये  ही एक गोष्ट कॉमन आहे. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी सातत्यशील प्रयत्नांची गरज असते. आरोग्य म्हणजे आदल्या रात्री क्लासच्या नोटस वाचून परीक्षा देण्यासारखी इन्संट गोष्ट नाही. आपल्याला आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. याला कोणताच शॉर्टकट नाही.
फ्ल्यु काय किंवा सध्या आपल्यासमोर वासून उभा राहिलेला टीबी सारखा जीवघेणा प्रश्न काय,आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे शिंकण्या खोकण्यातून पसरतात. त्यात आपण इतस्ततः थुंकत राहतो, यामुळे यांच्या प्रसाराला बळ मिळते. आपण ही साधी सवय बदलली तरी या आजारांचे प्रमाण कमी व्हायला किती तरी मदत मिळणार आहे. ज्याला आपण रेस्पिरेटरी एटीकेटस म्हणतो, त्या आपण पाळायला हव्यात. शिंकताना खोकताना नाका तोंडावर रुमाल धरणे, हात पुन्हा पुन्हा स्वच्छ धुणे, आपल्याला फ्ल्यूची लक्षणे असतील तर आपला जनसंपर्क कमी करणे, या साध्या साध्या गोष्टी आपले फ्ल्यू पासून रक्षण करतील. महत्वाचे म्हणजे आहार आणि विहार. शारिरिक मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे, धुम्रपान टाळणे आणि हस्तांदोलनाऐवजी आपला खणखणीत भारतीय नमस्कार घालणे फ्ल्यूलाराम रामकरण्याकरिता आवश्यक आहे.
  सर्वसाधारणपणे फ्ल्यू हा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. पण तरीही सर्दी खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यासोबतच गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हा उपचाराचाच एक भाग आहे, याचे विस्मरण होऊ नये. फ्ल्यू विरोधी लसीकरण हा ही एक महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

डेंग्यू ,चिकनगुनिया आणि इतर डासांमुळे पसरणारे आजार –
  गेल्या वर्षी भारतात डेंग्यूच्या सव्वा लाखाहून अधिक केसेस आढळल्या होत्या आणि त्या पैकी सुमारे अडीचशे रुग्णांचा मृत्यू या आजाराने झाला होता.या पैकी जवळपास सात हजार रुग्ण आणि ३३ मृत्यू हे महाराष्ट्रात झाले होते. या वर्षी आता पर्यंत राज्यात डेंग्यूचे सुमारे पाचशे रुग्ण आढळले आहेत.गेल्या वर्षी पेक्षा हे प्रमाण कमी आहे मात्र मुंबई आणि जवळच्या शहरी भागासोबतच कोल्हापूर,नाशिक आणि पुण्यात डेंग्यूच्या छोटया मोठया साथी सुरु आहेत. या सा-याच आकडयांकडे आपल्याला थोडे जपूनच पाहणे आवश्यक आहे. सर्वेक्षण व्यवस्थेच्या क्षमतेवर अधिक अचूक आकडेवारी मिळणे अवलंबून असते. या करिताच या ९ जूनला भारत सरकारने डेंग्यू नोटिफायेबल आजार म्हणून घोषित केला आहे. यामुळे खाजगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांना आपल्याकडील डेंग्यू रुग्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला कळविणे,बंधनकारक झाले आहे.या मुळे डेंग्यूची अधिक अचूक आकडेवारी मिळणे भविष्यात शक्य झाले आहे. अर्थात या करिता आवश्यक यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत मॅप बेस्ड अभ्यासातून जगभरातील सर्वाधिक डेंग्यूग्रस्त भागांचा शोध घेण्यात आला त्यात भारत सर्वाधिक डेंग्यूग्रस्त आढळला.दरवर्षी भारतात डेंग्यूचे सुमारे तीन कोटी रुग्ण आढळत असावेत, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. या अभ्यासातून आपली सर्वेक्षण व्यवस्था अजून बळकट करण्याची आवश्यकताच अधोरेखित होते आहे. 
या वर्षी सर्वाधिक भिती आहे ती चिकनगुनियाची !
ज्या डासांमुळे डेंग्यू पसरतो त्याच डासांमुळे चिकनगुनिया हा आजारही पसरतो मात्र चिकनगुनियाचा विषाणू हा एकाच प्रकारचा असल्याने एकदा तो झाला की व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारी प्रतिकार शक्ती मिळते.  त्यामुळे दरवर्षी चिकनगुनियाचा प्रभाव आढळत नाही.चिकनगुनियाची साथ साधारण दहा बारा वर्षाने येते,असा आजवरचा अनुभव आहे.या पूर्वी महाराष्ट्रात २००६ मध्ये चिकनगुनियाची मोठी साथ आली होती,त्यात लाखो लोकांना या आजाराने घेरले होते.या वर्षी पुन्हा चिकनगुनिया डोके वर काढतो आहे. या वर्षी पुणे आणि सातारा परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळत आहेत. डेंग्यू बद्दल बोलताना त्याच्या या धाकटया भावंडाबद्दलही सावध राह्यला हवे.हे दोघे एडीस डासाच्या पंखावर बसूनच येत असल्याने दोघांना रोखायचा मार्ग एकच आहे.

डेंग्यू आणि चिकनगुनियाचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठ्यात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठ्यात, कुंड्या, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, पक्ष्यांना/प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. या शिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, इतस्ततः पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपडया पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात –आठ दिवसाकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो. एडीस डासाची अंडी पाण्याशिवाय एक वर्षभरही टिकू शकतात. डेंग्यूवर कोणतेही औषध आज मितीला उपलब्ध नाही. लस निर्माण करण्यात यश आले असले तरी ती आपल्याकडे उपलब्ध व्हायला,अजून काही अवधी लागेल. तिच्या परिणामकारकतेबाबत आजच काही भाष्य करता येणार नाही. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण...!!!
नव्यानं गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळलेला झिका हा आजार आणि जो भारतात कधीही येऊ शकतो अशी धास्ती असलेला यलो फिवर हा आजार देखील याच डासामुळे पसरतात,हे लक्षात घेतले तर एडीस डास नियंत्रणाची गरज किती आहे,हे आपल्या लक्षात येईल.
डेंग्यू का वाढतोय ?
डेंग्यू इतक्या वेगानं वाढतोय,त्याचे कारण काय ? मागच्या पन्नास वर्षात तो तीस पट वाढला आहे. डेंग्यूच्या या वाढीकरिता अनेक कारणे आहेत. ही सारी कारणे आरोग्यबाह्य आहेत. त्या मुळे त्याची उत्तरे देखील आपल्याला सर्वसमावेशक धोरणात्मक नियोजनाने शोधावी लागतील,ती केवळ आरोग्य व्यवस्थेत सापडणार नाहीत.
अत्यंत वेगाने होत असलेले नियोजन शून्य शहरीकरण हे याचे एक प्रमुख कारण. वाढती लोकसंख्या,प्रचंड प्रमाणात होत असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर, वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण, अपु-या नागरी सुविधा, नॉन बायोडिग्रेडेबल वस्तूंचा (बाटल्या,डिस्पोजेबल कप,प्लास्टिक वस्तू,टायर्स इ.) यांचा मोठया प्रमाणावरील वापर या व अशा अनेक कारणांनी डेंग्यूचे प्रमाण वाढण्यात हातभार लावला आहे.
  वातावरणात होणा-या बदलाने,ग्लोबल वॉर्मिंगने या आजाराला हातभार लावला आहे. साधारणपणे २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान आणि ७०-८० आर्द्रता ही डेंग्यू डासाच्या वाढीकरिता आवश्यक असते.या प्रकारच्या वातावरणात अंडी ते प्रौढ डास हा प्रवास सात ते आठ दिवसात पूर्ण होतो. तापमान कमी असल्यास अंडी उबण्याचा हा कालावधी वाढतो. जगातल्या सव्वाशेहून अधिक देशांना हैराण करणा-या या डासाचे आयुर्मान असते अवघे चार आठवडयांचे ! मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानात डासाचे जीवन चक्र अधिक वेगात पूर्ण होते,त्या मुळे त्यांची उत्पत्ती वाढते,डासाच्या शरीरातील विषाणूंची वाढही अधिक वेगात होते,डासांचे चावण्याचे प्रमाणही वाढते. तापमान वाढीमुळे पूर्वी ज्या भागात एडीस आढळत नव्हता त्या भागातही या डासाला थारा मिळतो. 
पावसामुळे डेँग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते. खूप जोराचा पाऊस झाला तर डासांची उत्पत्तीस्थाने वाहून जातात.मात्र रिमझिम पावसाने मात्र घराभोवती एडीस डासाच्या उत्पत्तीसाठी योग्य स्थाने निर्माण होतात. दुष्काळी परिस्थितीत लोकांची पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते,हे ही डास वाढीला कारणीभूत ठरते.
डेंग्यू आणि इतर सर्वच कीटकजन्य आजार नियंत्रणासंदर्भात महाराष्ट्रासमोरील प्रश्न नेमके काय आहेत, याचा विचार करणे आवश्यक आहे.कारण डेंग्यूवर मात करायची असेल तर वैयक्तिक पातळी बरोबरच आपल्याला धोरणात्मक पातळीवरही काही प्रयत्न करावे लागतील.
तुम्ही आणि मी काय करु शकतो ?
                    प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये, घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलणे किंवा कुंड्यात डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणे, बिल्डिंगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असणे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, अवती भोवती/ घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू , इतर खोलगट वस्तू असतील त्या नष्ट करणे अथवा नष्ट करणे शक्य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पध्दतीने ठेवणे, खराब टायर्समध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे या व अशा सारख्या गोष्टी आपण सा-यांनी करणे, नियमितपणे करणे आवश्यक आहे. विशेषतः सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवणे, पाण्याची भांडी मोकळी करुन पालथी घालून ठेवणे, नळ ठिबकून अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.
हम साथ साथ है ...
   लोकसहभागाशिवाय कीटकजन्य आजार रोखणे कठीण आहे. या बाबतीत इंडोनेशियाच्या सव्वा दोन लाख लोकवस्तीच्या पुर्वोकेरटो शहरात राबवलेले मॉडेल आपल्याला उपयोगी ठरेल. या शहरात आरोग्य विभागाने दर दहा घरांचा एक समूह (दसविस्मा)केला. प्रत्येक घरातील जबाबदार व्यक्तीला डेंग्यूचा डास , त्याच्या अळ्या कशा ओळखायच्या,कशा पाह्यच्या याचे प्रशिक्षण दिले.दर आठवडयाला एका घराने इतर नऊ घराचे सर्वेक्षण करायचे आणि किती घरात डेंग्यू डासाच्या अळया सापडतात,याची नोंद करायची. विहित फॉर्म भरुन आरोग्य विभागाला सादर करायचा.या मध्ये एका घराला दहा आठवडयांतून केवळ एकदा सर्वेक्षण करावे लागते. पण या अभिनव योजनेचा खूप चांगला फायदा झाला. योजनेच्या सुरुवातीला सुमारे २० टक्के घरात एडीस डासाच्या अळया सापडत,काही दिवसातच ते प्रमाण अवघ्या दोन टक्क्यांवर आले.
आपले स्वच्छ भारत अभियान हा या सा-यावरील महत्वाचा उपाय आहे.
धोरणात्मक बदलांची गरज
   डेंग्यू हा मुख्यत्वे शहरी भागात आढळतो आहे.आज महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले महत्वाचे राज्य आहे.आपल्याकडे २७ महानगरपालिका आहेत तर अडीचशेहून अधिक नगरपालिका-नगरपरिषदा आहेत. महानगरपालिका या नगरविकास विभागाकडे येतात तर नगरपालिका नगर प्रशासनाचा भाग आहेत .आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची पायाभूत यंत्रणा ही मुख्यत्वे ग्रामीण भागात आहे. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये ही यंत्रणा  काही अपवाद वगळता उत्तम प्रकारे विकसित झाली आहे. मात्र शहरी भागातील आरोग्य यंत्रणा ही त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरी विभागात पायाभूत आरोग्य यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.पण आत्ताशी कुठे त्याला सुरुवात झाली आहे. अर्थात केंद्र सरकारच्या या मदतीवर सर्वस्वी अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. घटनात्मक दृष्टया आरोग्य हा राज्याचा विषय असल्याने या बाबतीत राज्याने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरी भागातील आरोग्य यंत्रणा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विकसित होणे आवश्यक आहे. या करिता सार्वजनिक आरोग्य ,नगर विकास आणि नगर प्रशासन या विभागांना एकत्रित येऊन समन्वयाने काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आज जुन्या मनपा वगळता इतर मनपा क्षेत्रात सार्वजनिक आरोग्याची यंत्रणा अभावानेच आढळते.नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील परिस्थिती काळजी करावी, अशी आहे. या शहरी भागात पायाभूत सार्वजनिक आरोग्याचे जाळे विस्तारणे हे केवळ डेंग्यू करिताच नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या अनेक प्रश्नांकरिता आवश्यक आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मदतीने हे आपण अधिक वेगाने करु शकतो.
           डेंग्यू,चिकनगुनिया,मलेरिया हे सारेच कीटकजन्य आजार असल्याने या आजाराच्या नियंत्रणात कीटकशास्त्रज्ञांची (मेडिकल इन्टोमॉलॉजिस्ट) भूमिका अत्यंत महत्वाची असते. डासांच्या जातींचा अभ्यास करणे,त्यांचे वर्तन अभ्यासणे, कीटकनाशकांची परिणामकारकता तपासणे, त्या नुसार योग्य कीटकनाशकाची निवड करणे, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करुन संभाव्य उद्रेकाची कल्पना देणे,अशी महत्वाची कामे या विषयातील तज्ज्ञ करत असतात.  मात्र आज कीटकशास्त्र ही पूर्ण शाखाच दुर्लक्षित झाली आहे,असे दिसते. डेंग्यूच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला कीटकशास्त्र शाखा पुनरुज्जीवीत करणे आवश्यक आहे.केवळ धूरफवारणी ही धूळफेक आहे.डेंग्यू नियंत्रण याने साधणार नाही.
जलजन्य आजार आणि आपण –

  एकूण साथरोगांपैकी बहुतांश आजार पाण्याच्या वाटेने आपल्या पर्यंत पोहचतात. स्वच्छ पाण्याचा पुरवठा ही स्थानिक स्वराज्य संस्थाची महत्वाची जबाबदारी आहे. दूषित पाण्यामुळे डायरिया,गॅस्ट्रो,कॉलरा,टाईफॉईड, कावीळ असे आजार पसरतात. राज्यातील प्रत्येक पाणी स्त्रोत वर्षातून दोन वेळा तपासण्यात येतो. पावसाळयापूर्वी आणि पावसाळयानंतर असे दोन वेळा राज्यभर साथरोग सर्वेक्षण करण्यात येते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतीला हिरवे,पिवळे आणि लाल असे कार्ड देण्यात येते. मुंबई सारख्या शहरात फेरवाले,पदपथावर खाद्यपदार्थ विकणारे यांच्याकडील पाणी आणि बर्फ यांची देखील तपासणी नियमित करणंयात येते. मागील वर्षी मुंबईतील फूटपाथवरील विक्रेत्यांकडील बहुतांश बर्फ नमुने दूषित आढळले होते. मुंबईत जलजन्य कावीळीचे प्रमाणही लक्षणीय आहे, हे लक्षात घेतले तर आपण सर्वांनी आपल्या पाण्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.  रहमन पानी राखिये,बिन पानी सब सुन,’ या सुप्रसिध्द दोह्यानुसार पाणी राखलंच पाहिजे पण ते शुध्द असणेही तेवढंच आवश्यक आहे.

   पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते आणि असे पाणी उंदराच्या अथवा जनावरांच्या मूत्रामुळे दूषित होते. या पाण्यातून गेल्याने लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार पसरतो. कोकणात भात शेतीमध्ये काम करणा-या शेतक-यांमध्येही भात लावणीच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव होतो.  ताप,अंगदुखी,कावीळ,खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत. २०१५ मध्ये एकटया मुंबईत या आजाराने १७ जण मृत्यूमुखी पडले.या वर्षीही राज्यात या आजाराने पाच मृत्यू झाले आहेत. भात शेती करणारे शेतकरी,पशुपालक,कत्तलखान्यातील कामगार,ड्रेनेजची सफाई करणारे, ट्रक ड्रायव्हर अशा व्यावसायिकांना हा आजार विशेषतः होतो. आपल्या पायाला जखमा असताना पावसाच्या पाण्यातून जाताना काळजी घेणे, शेतात काम करताना हॅण्ड ग्लोज आणि गम बूटचा वापर करणे  आवश्यक आहे.उंदीर नियंत्रण, गाईगुरांचे गोठे,घोडयांचे तबेले यांची स्वच्छता हा ही लेप्टो नियंत्रणाचा एक आवश्यक भाग आहे.
  एकूण काय, पावसाळा सुंदर खराच पण आवश्यक खबरदारी घेऊन जेव्हा आपण पाऊसधारा झेलू लागतो तेव्हा तो आणखी सुंदर होऊन जातो.
अशा आणखी एका सुंदर पावसाळयासाठी हार्दिक शुभेच्छा !

http://epaper.lokprabha.com/1297513/Lokprabha/04-08-2017#page/13/1
 
*********