Tuesday 29 November 2016

आंतरजातीय आणि जातीय अंतर (लेखाजोखा आंतरजातीय विवाहांचा)



आं


 तरजातीय आणि जातीय अंतर
           (लेखाजोखा आंतरजातीय विवाहांचा)
                                                                                            - डॉ प्रदीप आवटे.



 २१ जून २०१५.
आजपासून मी तुला माझी भार्या कबूल करुन…..” , सम्यकचा आवाज एक नवी आशा पल्लवित करत होता. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. जणू फुलांसोबत पाण्याचे तुषारही अक्षता म्हणून उधळले जात होते. 
आणि सम्यक विमल मसू आणि अर्चना कुलकर्णी हे तरुण जोडपे अनेक मित्र मैत्रिणींच्या साक्षीने विवाहबध्द होत होते. सम्यक दलित तर अर्चना ब्राम्हण. त्यांचा आंतरजातीय विवाह सत्यशोधक पध्दतीने पुण्यात पार पडला तेव्हा मी तिथं उपस्थित होतो आणि मला आठवलेविजय तेंडूलकरांचेकन्यादान’. ‘ कन्यादान आले ते साल होते १९८३. त्याला तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेला होता. या तीस वर्षांमध्ये पूलाखालून किती तरी पाणी वाहून गेले होते. अरुण आठवले तर तेव्हा विजय तेंडूलकरांनाही नीटसा झेपला नव्हता पण त्याच्या सोबत लग्न करणा-या ज्योती देवळालीकरला अखेरीस आपण आपल्या गांधीवादी वडिलांच्या रोमॅन्टिक प्रयोगातील गिनी पिग झालो आहोत, ही भावना प्रबळ झाली होती. या सा-याच थिएट्रीकल रुपडयापासून किती दूरचा पल्ला गाठलाय आपण. ‘कन्यादान ही पुरुषसत्ताक नोशन नामशेष करत, स्त्रीचं दान देणारं तिचं वस्तूकरण नाकारत ही नवी पिढी आपली वाट डोळसपणे निवडते आहे, याचं अपार समाधान देणारा तो क्षण होता.
     पण.. आंतरजातीय विवाहाच्या स्वरुपात मागील पंचवीस वर्षांमध्ये झालेले बदल टिपताना एकटया दुकटया घटनेकडे पाहून चालणार नाही.हा पट अधिक व्यापकपणे न्याहळणे आवश्यक आहे.    आंतरजातीय विवाहांचे मागच्या पावशतकातील बदलणारे स्वरुप नेमके पणाने मांडणे, हे अनेक कारणांनी मोठे अवघड काम आहे. मुळात आंतरजातीय विवाहांच्या अनुषंगाने देशभराचे तर सोडा पण आपल्या राज्यापुरते  देखील संपूर्ण सर्वेक्षण कोणी केलेले नाही. या बाबतीत मोठया प्रमाणावर समाजशास्त्रीय दृष्टया काही संशोधन झालेलेही दिसत नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ( एन एफ एच एस ) तसेच इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हे अशा काही मर्यादित सर्वेक्षणावर अवलंबून राहणे भाग आहे. अशा परिस्थितीत आंतरजातीय विवाहांच्या बदलत्या स्वरुपावरील भाष्य बरेचसे ढोबळ निरिक्षण आणि व्यक्तिगत अनुभवाच्या पातळीवर राहणे स्वाभाविक आहे.
  आंतरजातीय विवाहाच्या बदलत्या स्वरुपाकडे पाहण्याची निकड का आहे, हे मात्र आपण सुरुवातीलाच समजून घ्यायला हवे. महाराष्ट्रासह भारतात सजातीय विवाहाची पध्दत रुढ आहे, हे आपण सारेच जाणतो. आंतरजातीय विवाहाचे समाजशास्त्रीय विवेचन हे विवाह केवळ वेगळया आणि अभिनव प्रकारात मोडतात किंवा ते प्रचलित व्यवस्थेला छेद देतात, म्हणून करावयाचे आहे ,असे नव्हे. भारतीय समाज जाती आणि पोटजातींमुळे अनेक तुकडयात विभागला गेला आहे.  हे जातवास्तव आपल्या सामाजिक ऐक्याला आणि पर्यायाने आपल्या सर्वांगीण प्रगतीला बाधक आहे, याची जाणीव आपल्याला अनेक समाज सुधारकांनी आणि विचारवंतांनी करुन दिली आहे. महात्मा बसवेश्वरापासून ते गांधी आंबेडकरांपर्यंत सर्वांनी या बाबतीत आपल्या समाजाला सावध केले आहे.
“The real remedy for breaking Caste is inter-marriage. Nothing else will serve as the solvent of Caste,” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १९४६ चे उद्गार आंतरजातीय विवाहाची समाज परिवर्तनातील महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट करणारे आहे. १९२१ च्या आसपास जातीतल्या जातीत विवाह प्रथेचे समर्थन करणारे गांधी १९४६ मध्ये, “ माझ्या इच्छेला काही मान असेल तर माझ्या प्रभावाखाली येणा-या सर्व हिंदू मुलींना हरिजन नवरे निवडण्यास मी प्रवृत्त करीन,” इथंवर आले होते.एवढेच नव्हे तर केवळ अशा आंतरजातीय विवाहांनाच आपला आशीर्वाद मिळेल,असेही त्यांनी घोषित केले होते. गांधीजीच्या विचारातील हा बदल व्हायला तब्बल वीस ते पंचवीस वर्षे लागली,असे दिसते. व्यक्तिगत वैचारिक परिवर्तन हे समाजाच्या वैचारिक परिवर्तनापेक्षा जलद होते,हे लक्षात घेतले तर मागील पंचवीस वर्षात  आंतरजातीय विवाहांचे बदलते स्वरुप तपासून काय मोठे हातात येईल,असे वाटणे स्वाभाविक आहे आणि तरीही असा तपास,असे विवेचन अनेक अर्थाने उदबोधक ठरेल,हे ही निश्चित..!

   मागील काही वर्षात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढले आहे,असे जरी असले तरी त्याचे नेमके प्रमाण अचूकपणे सांगणे कठीण आहे.  मागील पाव शतकाचा काळ हा भारताच्या दृष्टीने जागतिकीकरणानंतरचा काळ आहे. १९९१ नंतर जगभरातील बाजाराचे दरवाजे उघडले गेले.जागतिकीकरणासोबत त्याची दोन भावंडे खाजगीकरण आणि उदारीकरण आपल्या अंगणात खेळू लागली. सॅम पित्रोदा नावाच्या माणसाच्या टेलिफोन क्रांतीमुळं गावागावांत उगवलेल्या पिवळयाधम्मक एस टी डी बूथचं कौतुक वाटेपर्यंत हातात मोबाईल आला आणि टेलिव्हिजनच्या डायरेक्ट टू होम प्रकरणामुळं रामायण महाभारत मालिकांचे वेळी ओस पडणारे रस्ते आणि गावागणिक उपटलेले व्हिडीओ पार्लर बघता बघता इतिहासजमा झाले. शिक्षणाचे प्रमाण वाढले. २००५ ते २०१५ या दशकातच स्त्री साक्षरतेचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले.शहरी भागात ही वाढ १५ % एवढी लक्षणीय होती. महाराष्ट्रात शहरीकरण वेगाने होत होते. खेडी कामाच्या ओढीनं शहराकडे धावत होती आणि धावत आहेत.या सा-या सामाजिक,आर्थिक बदलांचा परिणाम मानवी जगण्यावर विविध बाबतीत होणे स्वाभाविक होते. १९१० च्या आसपास युरोपात आधुनिकतेचा प्रवेश झाला तेव्हा व्हर्जिनिया वुल्फने लिहले होते,On or about December 1910, human character changed. I am not saying that one went out, as one might into a garden, and there saw that a rose had flowered, or that a hen had laid an egg. The change was not sudden and definite like that. But a change there was, nevertheless; and, since one must be arbitrary, let us dates it about the year 1910.   भारतासाठी हे वर्ष १९९१ होते की काय कोण जाणे ?
       २००५ मधील एका अभ्यासात भारतात एकूण विवाहापैकी सुमारे पाच टक्के विवाह हे आंतरजातीय किंवा मिश्र स्वरुपाचे असतात,असे निरिक्षण नोंदविले आहे. मागील पंचवीस वर्षात हे प्रमाण दुपटीने वाढूनही ते अवघे पाच टक्के असावे,हे निश्चितच निराशाजनक आहे. काही वर्षांपूर्वी प्रिन्सटन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात हे प्रमाण अकरा टक्के इतके आढळले. आंतरजातीय विवाहांचे सर्वाधिक प्रमाण गोवा आणि ईशान्य भारतात आढळले.महाराष्ट्रात ते सुमारे सतरा टक्के एवढे आहे. मागील पाचेक वर्षांची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात दलित – सवर्ण विवाहाचे प्रमाण हळू हळू वाढताना दिसते आहे.२००८ ते २०१२ या कालावधीत महाराष्ट्रात झालेल्या दलित – सवर्ण विवाहांची संख्या १०१७ वरुन २२९६ पर्यंत गेलेली दिसते पण इथे लोकसंख्येत कमी असूनही आंध्र आणि केरळ महाराष्ट्रावर आघाडी घेताना दिसतात. महाराष्ट्राच्या सुमारे बारा कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात आणि दरवर्षी होणारी एकूण लग्ने विचारात घेता दोन सव्वा दोन हजाराचा आकडा फारसा मोठा नाही.पण सोनई,जवखेडे,कोपर्डी या सारख्या घटनांनी अंधारुन येत असताना ही क्रमाक्रमाने वाढत जाणारी आकडेवारी किमान दिलासा देणारी तरी आहे, एवढेच काय ते !  नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिकल रिसर्चच्या २०११-१२ च्या अहवालानुसार ८७ टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या मिझोराममध्ये आंतरजातीय लग्नाचे प्रमाण ५५ %टक्के आहे तर मेघालयात ४६ %.  जम्मू काश्मिरमध्ये देखील हे प्रमाण ३५ टक्के आहे. ऑनर किलिंगमुळे बदनाम असणा-या पंजाब हरियाना या भागात देखील  आंतरजातीय विवाहांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र मध्य प्रदेश ,हिमाचल प्रदेश,राजस्थान या प्रांतात मात्र ते एक ते दोन टक्के एवढे कमी आहे. 
 शहरीकरण,शिक्षण,आधुनिक व्यवसायात नोकरी करणा-या स्त्रियांचे वाढते प्रमाण, उभरता मध्यम वर्ग यांसारख्या अनेक कारणांमुळे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण भारतभर वाढताना दिसत आहे. जोडीदार निवडी बाबत स्त्री अधिक आग्रही भूमिका घेताना दिसते आहे. मिश्र विवाहात आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण मात्र दोन टक्क्यांच्या आगेमागे आहे. भारताची घटना,सर्वोच्च न्यायालय हे सारे आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देण्यासाठी उभे असतानाही या प्रकारच्या विवाहांचे प्रमाण म्हणावे तसे वाढताना दिसत नाही. जात व्यवस्था हा भारतीय समाजाला शाप आहे.तिचे निर्मूलन करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्यायला हवे. ऑनर किलिंग ही दुष्ट प्रथा असून तिचा बिमोड करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत ,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी करुनही त्याचा ठळकपणे जाणवावा,असा परिणाम दिसत नाही.
              १९५४ चा स्पेशल मॅरेज ऍक्ट हा आंतरधर्मीय लग्नासाठी पाठबळ देणारा एक महत्वाचा कायदा .वेगवेगळया धर्माचे जोडीदार या कायद्यानुसार आपापली धार्मिक ओळख न पूसता,म्हणजेच धर्मांतर  न करता लग्न करु शकतात. हिंदू विवाह कायदा किंवा मुस्लिम निकाह मध्ये हे स्वातंत्र्य नाही. पण आपल्या संसदेने सेक्युलर विवाहासाठी हा विशेष कायदा स्वातंत्र्यानंतर पहिल्या पाच-सात वर्षातच संमत केला. कायदा आहे पण तो राबवणारी नोकरशाही देखील तेवढी सेक्युलर आणि कायद्यामागील मूलभूत तत्वाची जाण असणारी असावी लागते.अनेकदा असे घडत नाही. आंतरधर्मीय आणि मिश्र विवाहाच्या संदर्भात महत्वपूर्ण काम करुन धनक नावाची एक चळवळच उभा करणा-या आसिफ इक्बाल आणि राणू कुलश्रेष्ठ यांनाही त्यांच्या विवाहाच्या वेळी हा अनुभव आला. देशाच्या राजधानीत ते स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार लग्न करु पाहत होते.त्यांच्याकडे लागणारी सर्व कागदपत्रे होती पण सरकारी यंत्रणा अनेक अडथळे निर्माण करत होती.नोएडाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा आहे,हे लक्षात येताच तिथल्या बाबूने साधा फॉर्म द्यायलाही नकार दिला. उपजिल्हाधिका-यांना ( एस डी एम) भेटायला सांगितले. या एस डी एम साहेबांनी या जोडीचे कौतुक केले.म्हणाले, “अरे वा,मला तुमच्या प्रेमाचे आणि धैर्याचे कौतुक वाटते.तुमच्या लग्नाच्या दस्तावेजावर मी स्वतः साक्षीदार म्हणून सही करतो.” हे दोघेही हरखले पण एस डी एम साहेब पुढं म्हणाले, “पण माझ्या कार्यक्षेत्रात तुम्ही लग्न करु नका.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.” अशा अनेक अडथळयांची शर्यत पार करत या कायद्याप्रमाणे लग्न करायला आसिफ आणि राणूला एक वर्षाहूनही अधिक काळ लागला. वास्तविक पाहता कायद्याप्रमाणे महिनाभरात हे सारे व्हायला हवे होते. मुळात वेगळया वाटेने जाणा-या परिवर्तनवादी तरुणाईला मदत करण्यासाठी आणि भारतातील धर्मनिरपेक्षता बळकट करण्यासाठी हा कायदा निर्माण झाला. पण अनेकदा व्यवस्थेच्या परंपरावादी वर्तनामुळे मूळ कायद्यालाच हरताळ फासला जातो.
  आंतरजातीय विवाहाबाबतीत एक महत्वाचे निरिक्षण म्हणजे या विवाहांपैकी जवळपास ९६.५% विवाह हे प्रेम विवाह आहेत.म्हणजे आजही ठरवून किंवा ऍरेंजड विवाहात जातीबाहेर विवाह करण्याचा विचार अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच केला जातो,असे दिसते. या सामाजिक धारणेचे प्रतिबिंब आपल्याला विवाह विषयक जाहिरातींमध्ये पडलेले दिसते. काही जाहिरातींमध्ये तर आंतरजातीय विवाहाला तयार पण एस सी क्षमस्व ,’ असे निर्लज्जपणे नमूद केलेले असते. जागतिकीकरणानंतर सारे जग हे ग्लोबल खेडे झालेले असताना, सा-या सीमा निरर्थक ठरलेल्या असताना जातीची सीमा मात्र आपल्या मानसिकतेत खोल रुतून बसलेली आहे. या मागे निव्वळ फोल असणारी वंशशुध्दतेची किंवा प्लेटोने मांडलेली तथाकथित युजेनिक्स (eugenics) अथवा सुप्रजनन शास्त्राची अशास्त्रीय  धारणाही आजच्या अनेक टेक्नोसॅव्ही मंडळींच्या डोक्यात आहे.  भारताचा जेनेटिक लॅण्डस्केप काढण्यासाठी एका देशव्यापी सर्वेक्षणाच्या प्रमुख असणा-या अनुवंश शास्त्रज्ञ डॉ मिताली मुखर्जी यांचे एक अवतरण येथे नमूद करणे आवश्यक वाटते.त्या लिहतात,   There’s no logic to talking about caste & sperm and which community has better genes. Indians all have opinions, but the caste system has no genetic basis.” म्हणजे आधुनिक कायदा आणि आधुनिक विज्ञान छतावर उभा राहून ओरडून सांगत असूनही आधुनिक शिक्षणाने न्हालेल्या भारतीय मनाला अद्याप जातीव्यवस्थेतील फोलपणा पुरेसा पटलेला नाही,हेच खरे. अर्थात आंतरजातीय विवाहात अनेकदा आर्थिक वर्ग देखील महत्वाची भूमिका बजावताना दिसतो. जात वेगळी असली तरी आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल तर समंजस पालकांचा विरोध मावळताना दिसतो.
 जागतिकीकरणानंतरचा काळ हा अंतर्विरोधांनी भरलेला आहे. एकीकडे जग भौगोलिक दृष्टया जवळ येत असताना जात-पंथीय,धार्मिक आणि प्रांतीय अस्मिता मात्र टोकदार होत असल्याचा अनुभव सर्वत्र येतो आहे. जात किंवा धर्म हे पुन्हा कुटुंब व्यवस्थेचे एक्सटेन्शन असल्याने या पुरुषप्रधान व्यवस्थेत आपापल्या जाती –धर्मातील स्त्रीची सो कॉल्ड सुरक्षा त्या त्या जातीतील मोरल पोलिस घेताना दिसत आहेत. यातूनच अलिकडील काळातील लव्ह जिहाद सारखे प्रकरण पुढे आले. आपल्या जात धर्मातील मुलीने कोणाच्या प्रेमात पडावे,कोणाशी लग्न करावे, याचा निर्णयही या मॉडर्न जात आणि धर्म पंचायती घेऊ लागल्या आहेत. एकीकडे जुन्या जात पंचायती आणि खाप सारख्या  सनातनी संस्थांना कायद्याने बंदी घालण्याची भाषा होत असताना या सारख्या संस्था नव्या स्वरुपात म्युटेट होताना दिसत आहेत. हे केवळ हिंदू अथवा मुस्लिम धर्मापुरते मर्यादित नाही. तामीळनाडू मधील पी एम के या नव्याने नावारुपाला येत असलेल्या राजकीय पक्षाचे संस्थापक एस रामदास यांचे हे विधान पुरेसे बोलके आहे ,  Dalit Youth are luring girls from intermediate castes into marriage that develops into an abusive relationship.” २००९ मध्ये झालेल्या बहुभाषिक ब्राम्हण संमेलनात आपण आपल्या जातीचे शुध्दत्व राखण्यासाठी आपल्या मुलामुलींचे विवाह जातीतच करायला हवेत,’असा ठराव संमत करण्यात आला होता. याच संमेलनात स्त्री साठी ड्रेस कोड आणि तिच्या कौटुंबिक जबाबदा-या स्पष्ट करणारा ठारावही होता.एकीकडे दलित तरुण आपल्या मुलींना फशी पाडत आहेत,असे उच्च जातींना वाटत असताना दलितांमधील विशिष्ट वर्गाला आपल्या जातीतील शिकल्या सवरलेल्या मुलांना पटकावणा-या ब्राम्हण मुली विषकन्या वाटत आल्या आहेत. अगदी आंबेडकरांनी ब्राम्हण स्त्रीशी लग्न करायला नको होते,’अशी खंत खाजगीत बोलून दाखविणारे कार्यकर्तेही भेटतात.  एकूण ही छुपी जात पंचायत प्रत्येक जात सांभाळून आहे.  मुळात परजातीतील मुले आपल्या जात धर्मातील मुलींना फशी पाडतात,असे म्हणताना मुलींची समज कमी असते,त्या सहज कोणा चुकीच्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकतात,त्यामुळे तिच्या वतीने पुरुष वर्गालाच त्यासंबंधीचे निर्णय घेणे आवश्यक आहे,हे पुरुषी वर्चस्व अध्याहृत आहे. वास्तविक पाहता ज्या समाजातील अधिकाधिक मुली विवाहासह आपल्या जगण्यासंदर्भातील विविध महत्वाचे निर्णय स्वतः घेत असतील तर ते त्या समाजाच्या प्रागतिकतेचे लक्षण आहे,ना की मागासलेपणाचे ..! पण मूलतत्ववादी वृत्तीच्या मोरल पोलिसांच्या हे लक्षात येत नाही आणि अशा विवाहांनी त्यांच्या जातीय आणि धार्मिक अभिमानाला (?) ठेच पोहचते.
 या सा-या सामाजिक वातावरणाचा परिणाम आंतरजातीय विवाहाच्या स्वरुपावर होणे स्वाभाविक आहे. आपल्या सामाजिक व्यवस्थेत मुलीला केवळ नव-या मुलीशी नव्हे तर त्याच्या कुटुंबाशीच लग्न करावयाचे असते,असे नेहमी म्हटले जाते.आंतर जातीय आणि आंतर धर्मीय विवाहाबाबतची सामाजिक संवेदनशीलता पाहता अशा लग्नात ती मुलगी जणू काही त्या संपूर्ण जाती धर्मालाच वरत असते की काय,असे वाटते.  आणि म्हणूनच आंतरजातीय विवाहांचे बदलते स्वरुप अभ्यासताना या विवाहाच्या केवळ संख्यात्मक बाजूकडे पाहून चालणार नाही तर त्यांचे गुणात्मक विश्लेषणही होणे गरजेचे आहे. मुळात बहुसंख्य आंतरजातीय अथवा मिश्र विवाह हे प्रेम विवाह असतात,हे ल्क्षात घेतले तर ही जोडपी प्रेमाच्या नैसर्गिक प्रेरणेने एकत्र आलेली दिसतात पण मग प्रस्थापित सनातनी समाज व्यवस्थेला विरोध आणि आधुनिक मूल्यांचा अंगीकार या दृष्टीने आपण या विवाहाकडे पाहतो,ते कितपत साध्य होते,हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. प्रेम आंधळे असते,असे गंमतीने म्हटले जाते पण त्यामुळे प्रेमात पडताना जात पात काही दिसत नाही. सुरुवातीचा विरोध मावळला की ही जोडपी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन जातात. त्यांना होणारी मुले बापाची जात अथवा धर्म लावत पुन्हा लग्नाच्या जातधर्माधिष्ठित बाजारात उभी राहतात,असेही अनेक वेळा दिसते. त्या मुळे मुळात अत्यल्प असणा-या या आंतरजातीय विवाहांपैकी किती जोडपी जात आणि पुरुष सत्ताक समाजव्यवस्था नाकारतात ,हे शोधले पाहिजे. आपल्या जोडीदाराला त्याच्या धर्मानुसार,जातीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य देणे, व्यक्तीगत व्यवहारात स्त्री पुरुष समतेचे तत्व अंगिकारणे या मूल्यांच्या आधारावर आंतरजातीय विवाहांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले पाहिजे. आणि मुख्य प्रश्न म्हणजे,अशा मिश्र विवाहातून जन्माला येणा-या मुलांनी आपली जात –धर्म कोणता सांगावा ?  या मुलांनी पुन्हा बापाचा जात धर्म सांगणे म्हणजे आंतरजातीय विवाहाचा मूळ हेतूलाच हरताळ फासण्यासारखे आहे. आपल्या मुलांनी आपला धर्म निवडायचे अथवा धर्म संपूर्णतः नाकारण्याचे  स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे. यातूनच आधुनिक मूल्यव्यवस्था घेऊन येऊ पाहणारा समाज वर्धिष्णू होईल. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह हे जाती प्रथा निर्मूलनाचे प्रमुख साधन आहे,हे म्हणतानाच जात ही एक नोशन आहे, हिंदू जनमानसावर आत्यंतिक प्रभाव टाकणारी एक संकल्पना आहे.आणि या नोशनचे मुळ आपल्या धर्मशास्त्रात आहे. ही धर्मशास्त्रे आपल्याला तर्क आणि विवेक यांना फाटा द्यायला शिकवितात.म्हणूनच जात आणि जातीय विषमता यांना थारा देणारी,त्याचवेळी स्त्रीला दुय्यम स्थान देणारी ही शास्त्रे समूळ नाकारणे,उद्याच्या स्वातंत्र्य,समता आणि बंधुताधिष्ठित समाज निर्मिती करता आवश्यक आहे. या करिता आंतरजातीय विवाहात प्रेम हवेच पण त्या सोबत मूल्य विचारही हवा,अन्यथा इतर विवाह आणि आंतरजातीय अथवा मिश्रविवाह यांच्यात काहीही  गुणात्मक फरक राहणार नाही. प्रेमासोबतच जात आणि लिंगभावावर आधारित विषमता नाकारणारी जोडपी नाहीतच असे नाही. सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असणारी अनेक जोडपी हा वस्तुपाठ समाजासमोर ठेवताना दिसतात. बाबरी मशीद पाडल्यानंतर अस्वस्थ होऊन जाणीवपूर्वक मुस्लिम मुलीशी विवाह करणारा उन्मेष बागवे सारखा कार्यकर्ता असेल किंवा निडरपणे दोन्ही कुटुंबाला सोबत घेउन नोंदणी पध्दतीने आंतरधर्मीय विवाह करणारी विशाल पोखरकर आणि डॉ. आरजू तांबोळी सारखी प्रेरणादायी जोडी असेल,अशी नवी उमेद जागवणारी उदाहरणे आजूबाजूला आहेत,नाही असे नाही.पण अनेकांच्या नात्याच्या पायाशी हे मूल्यभान नसतेच किंवा अनेकांचे हे मूल्यभान काळाच्या ओघात वाहून जाताना दिसते.
  भारतीय मानसिकतेवरील जात व्यवस्थेचा प्रचंड प्रभाव पाह्यचा असेल तर मे २०१५ मध्ये मिड डेया इंग्रजी टॅबलॉईडमध्ये प्रकाशित झालेली ही जाहिरात वाचावी -
Seeking 25-40, Well placed, Animal Loving, Vegetarian GROOM for my SON (36, 5’ 11”)  who works with an NGO. Caste No Bar (Though IYER preferred.)”
लक्षपूर्वक वाचली तर लक्षात येईल की या जाहिरातीत एका मुला करिता मुलगा हवा,अशी ही जाहिरात आहे. म्हणजे हा मुलगा गे आहे. त्याच्या आईने ही जाहिरात दिली आहे. आपला मुलगा गे आहे, हे या आईने स्वीकारले आहे. अशा स्वरुपाची भारतात प्रसिध्द झालेली ही पहिली जाहिरात असावी.  पण आपल्या गे मुलासाठी जोडीदार शोधणा-या या आधुनिक आईला हा जोडीदार अय्यर असेल तर अधिक बरे,असे प्रकर्षाने वाटते आहे. गे मॅरेजसमध्ये वांशिक शुध्दतेचा नेहमी सांगितला जाणारा मुद्दा नाही,तरीही जातीचा आग्रह आहे. त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. जात ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये किती खोलवर इंबेडेड आहे,याचा ही जाहिरात म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. जाती सोबतच हा जोडीदार शाकाहारी असावा,हा आग्रह सुध्दा पुन्हा जातीकडेच अंगुलीनिर्देश करतो आणि सहजीवनात प्रत्येकाला आहार विहारासंदर्भात अपेक्षित असणारे स्वातंत्र्य नाकारु पाहतो.
 एकूणच, अत्याधुनिक मूल्यांचा स्वीकार करत जाताना नव्या मिलेनियममधील ग्लोबल सिटीजन  असणारे आपण जात-धर्माचा मुद्दा आला की सोळाव्या शतकात जाऊन दाखल होतो,हे अशा अनेक उदाहरणांवरुन लक्षात येते. आपल्या पैकी अनेकांना आरक्षणा पलिकडे जातीचे वास्तव उमगतच नाही. आणि म्हणून व पुं सारखा मध्यमवर्गीयांचा लाडका लेखकही, उद्या सवर्णांच्या काही टक्के मुली देखील मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवाव्या लागतील,’ अशा आशयाचं काही तरी आपल्या कथेत लिहून जातो.महात्मा गांधीना आपण राष्ट्रपिता म्हणतो.या राष्ट्रपित्याने केवळ आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांनाच माझा आशीर्वाद मिळेल,’ असे स्पष्टपणे सांगून सत्तर वर्षांचा काळ उलटून गेला तरी केवळ पाच टक्के आंतरजातीय विवाह  होत असतील आणि इंग्रजी दैनिकातील मॅट्रीमोनिअल्स अजूनही जातीचा आग्रह धरत असतील तर या देशातील बहुसंख्य विवाह आपल्याच राष्ट्रपित्याच्या आशीर्वादाशिवाय होत आहेत,हे वास्तव बोचरे आहे. आपापल्या जाती सांभाळत आपण या बापा ला हातात झाडू घेऊन रस्त्यात उभे केले आहे पण जी जातीय विषमतेची घाण आपण दूर करणे अपेक्षित आहे,त्याचे काय,हा प्रश्न उरतोच.
संदर्भ –
१.    ऍनहिलेशन ऑफ कास्ट –डॉ बाबासाहेब आंबेडकर
२.    गांधी –नलिनी पंडीत
३.    प्ले आणि प्रिजुडीस –इंटरकास्ट मॅरीजेस ऍण्ड विजय तेंडुलकर्स कन्यादान –गौरव सोमवंशी
४.    लव्ह जिहाद – ट्वेन्टी फाईव्ह एयर्स ऑन – शैलजा राव,आसिफ इक्बाल, वॅनेटी टयुईस्ट्रा
५.    नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ३ व ४
६.    इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हे २००५
७.    एन सी ए ई आर रिपोर्ट २०११-१२

(  पूर्व प्रसिध्दी - मिळून सा-याजणी - दिवाळी अंक - २०१६ )