Wednesday 19 March 2014

भेदाभेद भ्रम अमंगळ
               तिसरी चौथीत असेन तेव्हाची गोष्ट. मला मराठी किंवा इतिहासात संत ज्ञानेश्वरांवर एक धडा होता. त्या मध्ये 'संन्याशाची मुले म्हणून लोकांनी ज्ञानेश्वरांच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले,' अशा आशयाचे एक वाक्य होते. 'वाळीत टाकणे,' या शब्दप्रयोगाने माझ्या बालबुध्दीला चांगलेच गोंधळात टाकले होते. माझी आईच माझी शिक्षिका होती. तिने मला अनेक पध्दतीने या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडत नव्हता. 'सामाजिक संबंध तोडणे,' वगैरे संकल्पना माझ्या बालजगाच्या प्रतलाबाहेरील होत्या. पण मग आईने वेगळ्या भाषेत मला 'वाळीत टाकणे'चा अर्थ समजावून सांगितला आणि मला या वाकप्रचारातील दाहकता समजली. आई म्हणाली,"अरे,वाळीत टाकणे म्हणजे सगळ्यांनी कट्टी करणे." मला आजही आठवते, माझ्या सर्वांगावर शहारा आला. माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले, मी वर्गात एका कोप-यात अंग आकसून बसलो आहे आणि वर्गातील कोणीच माझ्याशी बोलत नाहीय्ये. सारे दंगा करताहेत,मौजमस्ती करताहेत पण माझ्याकडे कोणीही पाह्यलाही तयार नाही आणि पाह्यलं तरी अत्यंत कुत्सितपणे,वेडयावल्यासारखे! मला कल्पनेनेच खूप भिती वाटली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी 'वाळीत टाकणे' हा शब्दच वाळीत टाकला आहे. 
   ....पण आज या नकोशा वाटणा-या शब्दाची पुन्हा एकदा आठवण झाली. निमित्त फेसबुकवरील एका पोस्टचे. परवा माझ्या धाकट्या भावाने संजूने फेसबुक वर एक पोस्ट टाकली त्याने लिहले होते," एचआयव्ही पॉझिटिव्ह चिमुरड्यांना नवा पॉझिटिव्ह रस्ता देणारे सेवालय नावाचे आनंदवन रवी बापटले या आमच्या मित्राने लातूरजवळ सुरु केले ... त्यानंतर संघर्षाचे कित्येक क्षण वाट्याला आले... पण, रवीने एक मोठी प्रशासकीय लढाई आज जिंकली आहे. म्हणजे तशी सुरुवात झाली आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्त मुला-मुलींसाठी सरकारी शाळा-वसतिगृहात पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे शासनाने मान्य केले आहे. आता तशा अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. इथे ही अशीमुले राहतात, म्हणून सेवालयाला आग लावण्यापासून ते असल्याशाळेत आम्ही आमची मुलं पाठवणार नाही, इथपर्यंत सारं सहन करत सेवालय धीरोदात्तपणे चालत आहे आणि रोज नवी लढाई जिंकत आहे! रवी, ग्रेट!"
तसं पाह्यलं तर अत्यंत पॉझिटीव अशी ही पोस्ट पण तिने पुन्हा मला माझ्या नावडत्या शब्दाची आठवण करुन दिली,'वाळीत टाकणे'.
    रवी बापटले, उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा या छोट्याशा गावातला तरुण,पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेला. खरे तर त्याला सैन्यात जायचे होते पण त्याची उंची अपुरी पडली आणि त्याची सैन्यात निवड झाली नाही पण रवीच्या मनाची भरारी गगनचुंबी होती. त्याला समाजासाठी काही करायचे होते, चिमण्या कावळ्याच्या स्क्वेअर फुटी संसारात त्याला रस नव्हता. त्याच्या धोंडी हिप्परगा गावात एका दहा-अकरा वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला. त्याच्या प्रेताला कोणीही हात लावायला तयार नव्हते. रवीला ही गोष्ट कळली. तो आणि त्याच्या काही मित्रांनी त्या लहानग्याला माणूसकीला शोभेल असा अखेरचा निरोप द्यावयाचे ठरविले. रवी सांगतो,'मी त्या लेकराचे प्रेत हातात घेतले तेव्हा त्या इवल्या देहाला किड्यामुंग्या लागल्या होत्या. वाटले, जो समाज मरणानंतरही या एच आय व्ही बाधित लेकरांना अशा प्रकारे वागवितो तो त्यांचे जिवंतपणी काय करत असेल ?' रवीचा तिथेच निर्णय झाला आता आपले आयुष्य या लेकरांसाठी वेचायचे. २००७ मध्ये त्याने औसा लातूर जवळच्या माळरानावर 'सेवालय' सुरु केले. आज त्याच्या जवळ अशी ४२ एच आय व्ही बाधीत मुले आहेत.या मुलांचे पूर्ण संगोपन 'सेवालय' मोफत करते,कोणत्याही शासकिय मदतीशिवाय! गावातल्या शाळेत 'सेवालय'च्या एच आय व्ही बाधीत मुलांना प्रवेश दिला म्ह्णून आम्ही आमची मुले शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका गावक-यांनी घेतली पण रवीने हार मानली नाही. सा-या प्रस्थापितांना तोंड देत त्याने आपल्या लेकरांचा ('माझी लेकरं' हा खास रवीचा शब्द !) शिक्षणाचा हक्क मिळविला. गेल्या वर्षी 'सेवालया'ची पहिली मुलगी दहावी झाली आणि तिला पुढील शिक्षणासाठी लातूरला येणे भाग पडले कारण गावात फक्त दहावी पर्यंतची शाळा! पण त्या मुलीला कोणत्याही खाजगी वसतिगृहात ती एच आय व्ही बाधित असल्याने प्रवेश मिळेना आणि ती मुलगी खुल्या प्रवर्गातील असल्याने तिला शासकिय वसतीगृहातही प्रवेश मिळेना. लातूर विभागाचे समाजकल्याण सहायक आयुक्त श्री दाणे यांच्या सहकार्याने अखेरीस या मुलीला वसतिगॄह मिळाले खरे पण रवी समोर नवीन प्रश्न निर्माण झाला. पुढील वर्षी सेवालयातील तीन लेकरं दहावी होताहेत,त्यांचे काय? आणि मग त्याने समाज कल्याण विभागाला शासकिय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधे एच आय व्ही बाधित मुलांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवाव्यात ,असा एक प्रस्ताव सादर केला. समाज कल्याण विभागाने या प्रस्तावाची मनःपूर्वक दखल घेतली. या प्रस्तावाच्या सर्व बाजू तपासून लवकरच असा शासन निर्णय घेतला जाईल. रवी आणि त्याच्या लेकरांचा हा एक मोठा विजय आहे.                              मला मॅजिक जॉन्सन या अमेरिकन बास्केटबॉलपटूची आठव्ण झाली. जॉन्सन हा १९९२ साली ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अमेरिकन संघाचा मुख्य खेळाडू. पण १९९१ साली त्याला एच आय व्ही ची बाधा झाली. 'वाळीत टाकणे' या दुष्ट शब्दाचा जीवनानुभव त्याने घेतला पण तो उमेद हरला नाही. १९९६ साली तो मैदानावर परत उतरला. वयाच्या ३६ व्या वर्षीदेखील या एच आय व्ही बाधीत खेळाडूने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले. 'जगातील सर्वात्कॄष्ट पन्नास खेळाडू'त त्याची गणना झाली. आपल्या निवृत्तीनंतर आज जॉन्सन अमेरिकेतला एक मान्यवर उद्योगपती आहे. 'अत्यंत प्रभावी कृष्णवर्णीय उद्योगपती' असा किताबही त्याला नुकताच मिळाला आहे. म्हणजे एच आय व्ही ची बाधा झाल्यानंतरही गेली २२ वर्षे स्वतःसाठी आणि समाजासाठी देखील अत्यंत फलदायी आयुष्य जॉन्सन जगतो आहे. मागे मी मॅजिक जॉन्सनचे उदाहरण देत एक लेख लिहला होता. एच आय व्ही बाधित व्यक्तींशी आपण माणुसकीने,आत्मीयतेने,प्रेमाने वागले पाहिजे, हा माझ्या लेखाचा सारांश होता. या माझ्या लेखावर मला खूप पत्रे आली. ब-याच जणांनी माझी खरडपट्टी काढली होती. ज्यांना एच आय व्ही झाला ते सर्व त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा भोगताहेत आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची काहीही गरज नाही, असा एकूण या पत्रांचा आशय होता. जणू काही ज्यांना एच आय व्ही झाला नाही, त्यांनी कधी आयुष्यात चुकाच केल्या नव्हत्या. एका पापी (?) स्त्रीला भर चौकात दगडाने मारणारे लोक आणि 'ज्यांनी आयुष्यात एकही पाप केले नसेल त्याने पहिला दगड मारावा,' असे सांगणारा येशू मला आठवला.
  जागतिकीकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रही मार्केटच्या विळख्यात सापडले नसेल तरच नवल ! अशा बाजारकेंद्री आरोग्य व्यवस्थेत सारा भर असतो तो 'क्युअर' (Cure) वर पण अशा वातावरणात रुग्ण व्यवस्थापनात क्युअर इतकेच 'केअर' (Care) लाही महत्व आहे, हे आपल्याला एच आय व्ही /एडसने शिकविले. आणि केअर मध्ये वैद्यकिय व्यावसायिकांपेक्षाही अधिक वाटा असतो तो कुटुंबाचा,समाजाचा ! शुश्रुषा काय चमत्कार घडवू शकते, हे आपल्याला 'लेडी विथ द लॅंप' फ्लॉरेन्स नाईटिंगेलने समजावले पण आपण केवळ पाठांतर वीर, आपण कोणतीही ओवी अनुभवत का नाही ?
   १९८६ साली भारतातला पहिला एच आय व्ही रुग्ण आढळला,आज त्याला पंचविस वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे तरीही आपले एच आय. व्ही बद्दलचे गैरसमज तसेच आहेत. आजही एच आय व्ही रुग्णांकरिता शाळा, वसतिगृहात राखीव जागा ठेवण्याची वेळ यावी, ही गोष्ट संस्कृतीच्या गप्पा मारणा-या आपल्या देशाला आणि महान संत परंपरा सांगणा-या महाराष्ट्राला भूषणावह नाही. एखादा आजार आपली प्रतिकार शक्ती हिरावून घेतो, इथवर ठीक आहे पण त्याने जर आपले माणूसपणही हिरावून घेतले तर काय करावे?
   असे का होते? बरं हे केवळ एच आय व्ही बद्दलच होते अशातला भाग नाही. १९९४ मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा मी पाहिले आहे, माझे काही डॉक्टर मित्र पेशंटला हात लावायलाही तयार नव्हते. 'काखेत गाठ आली आहे', असे म्हणत पेशंट आला की यांच्या पोटात भितीचा गोळा येई. फार लांबचे कशाला, अगदी २-३ वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ आली तेव्हा त्यात पल्लवी नावाच्या एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. सालाने शेतावर काम करणा-या मजूराची मुलगी . बापाच्या काळजावर मुलीच्या मृत्यूचा घाव बसलेला पण गावक-यांनी त्याला त्याच्या कुटुंबासह गावातून हाकलून दिले. का तर तुझ्या घरामुळे आमच्या गावात स्वाइन फ्ल्यूची साथ पसरायला नको.
   जगण्याच्या अपरिमित हव्यासापायी आपले माणूसपणच हरविलेली ही माणसं जगतात तरी कशापायी? आणि मग १८९६ च्या पुण्याच्या प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा शुश्रुषा करता करता मरण पावलेल्या सावित्रीबाई फुले आठवतात. कोणत्याही जिवाणू विषाणूने आपले माणूसपण संपविता कामा नये, हा ही धडा आपण या पहिल्या स्त्री शिक्षिकेकडून घ्यायला हवा. 'विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म l भेदाभेद भ्रम अमंगळ ll ',असे म्हणणारा तुका आपण डोईवर घेऊन नाचतो खरे पण वागतो असे?
असे का, याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

Tuesday 18 March 2014

एकविसाव्या शतकाची अभद्र त्रयी
n  डॉ.प्रदीप आवटे.
                               ‘दिल्लीत डेंग्यूने ओलांडला चार हजारांचा आकडा’, ‘मुंबईत डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ’, ‘डेंग्यूने घेतला डॉक्टरचाच बळी’, ‘नागपूरात पसरतंय डेंग्यूचे साम्राज्य’ अशा हेडींगच्या बातम्या वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि न्यूज चॅनेलवरुन नियमितपणे प्रसारित होतायेत. मोदी, नितिशकुमार आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांनी देशभरात ‘इलेक्शन फिवर’ संचारत असताना देखील माध्यमे व्यापण्याच्या बाबतीत डेंग्यूने या सा-यांना मागे टाकलेले दिसते. या सा-या पार्श्वभूमीवर डेंग्यूचे आहे ते चार विषाणू कमी होते म्हणून की काय डेंग्यूचा नवीन विषाणू सापडल्याचा दावा नुकताच काही शास्त्रज्ञांनी केला आहे. बॅंकॉकमध्ये झालेल्या डेंग्यू संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या स्वरुपाचा शोधनिबंध सादर करण्यात आला ज्याला अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी अनुमोदन दिले आहे. “साला एक मच्छर........!”, हा नानाचा एके काळचा गाजलेला डायलॉग शब्दशः खरा असल्याची प्रचिती हा सामान्य मच्छर तुम्हांला मला रोज देतो आहे. या डेंग्यूचं करायचं काय, हा प्रश्न स्थानिक पातळी पासून जागतिक पातळीवर सर्वांसमोर आ वासून उभा राहिला आहे.

   दुस-या महायुध्दानंतरच्या काळात डेंग्यू आजाराचे प्रमाण आणि भौगोलिक विस्तार वेगाने वाढताना दिसतो आहे. १९५० च्या पूर्वी हा आजार मुख्यत्वे उष्ण कटिबंधातील मोजक्या देशांमध्ये आढळत होता.मुळात शहरीकरणाचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याने त्याचे प्रमाण लक्षणीय नव्हते.  आणि त्या काळी आंतरराष्ट्रीय वाहतूकही बहुतांशी सागरी मार्गाने होत असल्याने या आजाराचा भौगोलिक प्रसार होण्यास ब-याच मर्यादा होत्या मात्र दुसरे महायुध्द या विषाणूच्या आणि त्याचे वहन करणा-या एडीस डासाच्या पथ्यावर पडले. या महायुध्दात आशिया- पॅसिफिक  खंडात आलेले जपानी आणि इतर राष्ट्रांच्या सैन्यातील हजारो सैनिक डेंग्यूने आजारी पडले आणि ते आपापल्या देशात परतले तेव्हा त्यांच्या खांद्यावरील बंदुकीसोबतच स्वतःच्याच लोकांविरुध्द लढणारे घातक हत्यार त्यांच्या रक्तात ते वाहून नेत होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. हे हत्यार होते – डेंग्यूचा विषाणू...! आणि सैन्यदलाच्या अनेक छोट्यामोठ्या कंटेनर्समधून इवलासा काळपट पण अंगापायावर पांढरे पट्टे असणारा आणि ज्याची स्वतःची धाव पन्नास मीटरपेक्षा जास्त नाही असा एडीस डासही सुहास्यवदने प्रवास करत होता. आणि या सा-याचा व्हायचा तोच परिणाम झाला. १९५० ते १९७० या काळात डेंग्यूचे मोठे उद्रेक फिलिपाईन्स, थायलंड, ब्रम्हदेश,इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशात झाले. १९५० नंतर आर्थिक प्रगतीलाही वेग आला होता आणि १९९० नंतरच्या जागतिकिकरणाच्या चरमसीमेनंतर तर या इवल्याशा विषाणूने सा-या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या. जगातल्या एका कोप-यातला हा आजार आज सुमारे सव्वाशे देशात पसरला आहे. जगातील जवळपास साडेतीन अब्ज लोकसंख्या या आजाराच्या छायेत राहते आहे. दरवर्षी सुमारे २० कोटी रुग्ण, पाच लाख गंभीर गुंतागुंती आणि वीस हजार मृत्यू असे भयप्रद जागतिक रेकॉर्ड या डेंग्यू विषाणूच्या नावावर आहे. डयुआन गुबलर हे डेंग्यू आजाराचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मानले जातात. ‘ट्रॉपिकल मेडीसिन ऍण्ड हेल्थ’ या मासिकात प्रसिध्द झालेल्या त्यांच्या एका लेखाचे शीर्षक मोठे बोलके आहे – ‘Dengue, Urbanization & Globalization – The Unholy Trinity of the 21st Century’. अर्थात या एकविसाव्या शतकाचे त्रिदेव आहेत – डेंग्यू, शहरीकरण आणि जागतिकीकरण...! शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या युतीतूनच डेंग्यूचे विश्वव्यापी आव्हान आज आपल्यासमोर उभे ठाकले आहे.

                     आज महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर आपली जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या शहरात राहते. वेगाने होणारे बेसुमार आणि अनियंत्रित शहरीकरण यामुळे नव्याने वाढणा-या शहरी भागामध्ये पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा आणि सार्वजनिक आरोग्याच्या नव्या नव्या समस्या उत्पन्न होताना आपण पाहतो आहोत. निमशहरी भागात अपु-या मूलभूत सोयींमुळे, पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याकडे लोकांचा कल वाढतो आणि त्यातूनच डेंग्यूच्या डासाला वाढण्यासाठी उत्तम कुरण मिळते. त्यामुळेच डेंग्यूकडे मुख्यत्वे शहरी आजार म्हणून पाहिले जाते अर्थात म्हणून तो ग्रामीण भागात बिलकुल आढळतच नाही अशातला भाग नाही. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक मागील पन्नास वर्षात कैक पटीने वाढली आहे,या सा-यामुळे डेंग्यूचा विषाणू आणि एडीस डास पूर्वीच्या डेंग्यूमुक्त भागामध्ये सुखनैव पसरतो आहे, जग जिंकण्याची ईर्षा बाळगणा-या अलेक्झांडर सारखा डेंग्यू रोज नवे नवे प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणतो आहे. २००८ मध्ये ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरोमध्ये डेंग्यूचा एवढा प्रचंड प्रकोप झाला की सरकारला सैन्याची मदत घ्यावी लागली. जवळपास तशीच परिस्थिती दोन वर्षापूर्वी लाहोरमध्ये निर्माण झाली. २०११ या एका वर्षात लाहोरमध्ये डेंग्यूचे एकवीस हजाराहून अधिक रुग्ण आढळले तर चक्क ३५० मृत्यू..! आपल्या सो कॉल्ड विकासाच्या नशेत, ग्लोबल तंद्रीत जर आपण असेच आंधळ्यासारखे चालत राहिलो तर हे घडणार, पुन्हा पुन्हा घडणार..! डेंग्यूचा हा अश्वमेध कोणी आणि कसा रोखायचा हा कळीचा मुद्दा आहे.
   डेंग्यूचा हा अश्वमेधाचा घोडा रोखायला कोणी अवतार पुरुष येणार नाही की केवळ एखाद्या जादूई लसीने डेंग्यूसारख्या अनेक विषाणूंमुळे निर्माण झालेले आव्हान एका रात्रीत संपणार नाही. आपल्यालाच आपला सामूहिक पराक्रम जागवावा लागेल तरच आपण हे आव्हान पेलू शकू कारण आपल्या ग्लोबल गावाच्या विकासाने वरवर चाललेला तापमानाचा काटादेखील आता डेंग्यूच्या बाजूने झुकला आहे. क्लायमेट चेंजमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि त्याचा अनुकूल परिणाम डासांच्या आणि विषाणूच्या वाढीवर होतो आहे. नव्या वातावरणात डास ‘अंडी ते प्रौढ डास हे आपले जीवनचक्र अधिक लवकर पूर्ण करताना दिसत आहेत.
    डेंग्यूचा डास म्हणजे एडीस एजिप्ती किंवा अल्बोपिक्टस हा एक छोटासा किटक. त्याच्या अंगापायावर असलेल्या पांढ-या पट्ट्यांमुळे तो सहज ओळखू येतो. या पांढ-या पट्ट्यांमुळेच त्याला टायगर मॉस्कीटो असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा सर्वसाधारणपणे दिवसा चावतो. या डासाच्या मादीला आपली अंडी उबविण्यासाठी मानवी रक्ताची गरज असते आणि म्हणून ती चावते. असे चावतानाच ती एका डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरातील विषाणू दुस-या निरोगी माणसाकडे पोहचविते आणि डेंग्यूचा प्रसार सुरु राहतो आणि आजच्या जेट युगात इतक्या वेगाने आणि इतक्या नव्या नव्या भागात की ज्या युरोपमध्ये १९२६ पासून एकही डेंग्यू उद्रेक आढळला नव्हता तिथेही मागील काही वर्षांमध्ये फ्रान्स, पोर्तुगाल सारख्या देशामध्ये डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.
    डेंग्यूचे चार प्रकारचे विषाणू आहेत. तीव्र ताप,सांधेदुखी,स्नायुदुखी, डोळ्यांमागे वेदना होणे, उलट्या होणे,पोटात दुखणे, रक्तस्त्राव ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. रक्तस्त्रावी डेंग्यू ही जीवावर बेतणारी बाब आहे. शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने रक्तस्त्रावाची संभावना वाढते आणि काही वेळा रुग्ण दगावतोही. डेंग्यूमुळे होणा-या मृत्यूमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते, ही त्यातील सर्वात काळजी करावी अशी गोष्ट..! भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे वाढला असला तरी डेंग्यू समाजवादी आहे, तो सा-यांना समान लेखतो आणि म्हणून तो निमशहरी झोपडपट्टी भागात जसा आढळतो तसाच उच्चभ्रू वस्तीत देखील आढळतो. २००६ च्या दिल्ली उद्रेकात पंतप्रधानांच्या नातवांना देखील डेंग्यू झाला होता आणि गेल्या वर्षी मुंबईत ‘जब तक है जान ‘ निर्माण करणा-या यश चोप्रा यांचे निधनही डेंग्यूनेच झाले.
    डेंग्यूच्या या समतावादी वर्तनाचे कारण त्याच्या उत्पत्तीस्थानात दडले आहे. डेंग्यूचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठ्यात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठ्यात, कुंड्या, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, पक्ष्यांना/प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. या शिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, इतस्ततः पडलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लास्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी एडीस जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपड्या पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात –आठ दिवसाकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो.
  आता अशा बहुप्रसव डेंग्यू डासाचा लगाम खेचायचा कसा? डेंग्यूवर कोणतेही औषध आज मितीला उपलब्ध नाही. लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत पण .. त्यालाही वेळ आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण...!!! एकात्मिक किटक व्यवस्थापन असा एक किचकट शब्दप्रयोग यासाठी वापरला जातो. हे प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागाची आत्यंतिक आवश्यकता आहे. भाई, सिर्फ सरकार यहां कुछ नहीं कर सकती. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये, घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलणे किंवा कुंड्यात डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणे, बिल्डिंगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असणे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, अवती भोवती/ घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू , इतर खोलगट वस्तू असतील त्या नष्ट करणे अथवा नष्ट करणे शक्य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पध्दतीने ठेवणे, खराब टायर्समध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे या व अशा सारख्या गोष्टी आपण सा-यांनी करणे, नियमितपणे करणे आवश्यक आहे. आपल्या घरात, घराभोवती एडीसचे बारसे घातले जाणार नाही याची काळजी आपण डोळ्यात तेल घालून घेतली पाहिजे कारण एडीसचे बारसे म्हणजे आपले मरण हे विसरता कामा नये. विशेषतः सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवणे, पाण्याची भांडी मोकळी करुन पालथी घालून ठेवणे, नळ ठिबकून अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

    शहरी भागात साप्ताहिक स्वरुपात अळीनाशकाचा वापर, गप्पीमाशांचा वापर आणि नागरिक - विकासक यांच्यासाठी डासोत्पत्ती प्रतिबंधक सिविक बाय लॉजचा वापर या शासकीय पातळीवरील बाबी देखील प्रभावी डास नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहेत. शहरीकरण आणि जागतिकीकरणाचा गाडा आता कोणीही परत फिरवू शकणार नाही आणि ते योग्यही ठरणार नाही मात्र या अभद्र त्रयीतील डेंग्यूचा बिमोड करणे मात्र आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपली काठी डेंग्यूमुक्तीच्या गोवर्धनाला लावली पाहिजे अन्यथा डयुआन गुबलर यांनी म्हटल्याप्रमाणे, “ We don’t do anything until there is crisis & then we try to react to it and it’s always too little, too late,” अशी आपली गत होऊ नये. 

Monday 17 March 2014

आपले आरोग्य
-    डॉ.प्रदीप आवटे.

  
“माझ्या हस्ते एखाद्या हॉस्पिटलचे उदघाटन होईल आणि तेही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत...! माझ्या स्वप्नात देखील असे कधी वाटले नव्हते,” बिहारहून दिल्लीत आलेला आणि आता दिल्लीकर झालेला तो साठी ओलांडलेला रिक्षाचालक अगदी गदगदून बोलत होता. आपण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत एका हॉस्पिटलचे उदघाटन केले या प्रसंगाने त्याला भरुन आले होते. ही अगदी परवा परवाची गोष्ट...!आम आदमी पार्टीची सत्ता दिल्लीत आल्यापासून असे चमत्कार घडू लागले आहेत. या हॉस्पिटलच्या उदघाटनचे निमंत्रण अर्थातच फक्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना होते पण त्यांनी  स्वतःऐवजी एका रिक्षावाल्याचे हस्ते या रुग्णालयाचे उदघाटन करुन आपल्या राजकीय अजेंड्यावरील आम आदमीचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. अर्थात अशा सिम्बॉलिक घटना महत्वाच्या असल्या तरी त्या अनेकवेळा फसव्या असू शकतात. या प्रतिकांचे भाषांतर  प्रत्यक्ष धोरणात आणि कृतीत झाल्याशिवाय या प्रतिकात्मकतेला राजकीय कर्मकांडाशिवाय अधिक महत्व उरत नाही. आम आदमी पार्टीच्या उदयाने भारतीय राजकारणाला एक महत्वाची कलाटणी दिली आहे. आम जनतेपासून दूर गेलेल्या प्रचलित राजकारणाला नवा लोकाभिमुख पर्याय या निमित्ताने उभा राहताना दिसतो आहे,हे अत्यंत आशादायी चित्र आहे. मात्र असे असले तरी आप कडे कोणताही राजकीय विचार नाही, न-विचार (नॉन थॉट) हीच जणू त्यांची राजकीय विचारसरणी आहे,केवळ भ्रष्टाचाराच्या एकाच मुद्द्यावर राजकीय क्षितिजावर उदयाला आलेल्या या नव्या शक्तीकडे व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची दृष्टी नाही, अशा स्वरुपाची टीका अनेक जण करताना दिसत आहेत.
   दिल्लीच्या निवडणूकीपासून ते आप ने तेथील सत्ता हातात घेतल्या पासून विविध वादग्रस्त घटना, चर्चा, मुलाखती यांचे जणूच पेवच फुटले आहे. पण या सा-या चर्चेत सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा कधीही पृष्ठभागावर आलेला दिसत नाही. आपल्या पहिल्या महिन्यात आप सरकारने घेतलेले निर्णय पाहिले तर त्यात ही सार्वजनिक आरोग्याच्या कोणत्याही महत्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला आहे असे दिसत नाही. भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन, विज बिलासंबंधीचे प्रश्न ,पाणी वाटप ,नर्सरी प्रवेश, हंगामी कर्मचा-यांचा प्रश्न,व्हि आय पी संस्कृती संपविणे,१९८४ ची शीख विरोधी दंगलीची चौकशी पुन्हा सुरु करणे या स्वरुपाचे निर्णय आप सरकाराने मागील महिन्याभरात घेतले आहेत.अर्थातच पाणी विषयावरील निर्णय सोडला तर यातील कोणताही निर्णय सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील नाही. “ Health is virtually absent from public debates & democratic politics in India,”  हे अर्मत्य सेन आणि जेन ड्रेझ यांचे निरिक्षण आपच्या उदयामुळे तरी बदलणार आहे का,हा कळीचा मुद्दा आहे. आप दिल्लीत सत्तेवर येऊन उणापुरा महिना तर होतो आहे तोवर त्यांना लगेच सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काय केले आहे,असा प्रश्न विचारणे हास्यास्पद ठरेल. अर्थात असे अनेक विनोदी प्रश्न आपल्या चॅनेल वरील पत्रकार मित्रांनी विचारुन आपली राजकीय समज सप्रमाण सिध्द केली आहे. त्यामुळे आप च्या केवळ पहिल्या महिन्यातील कामकाजाकडे न पाहता आपल्याला आप च्या सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील धोरणाचा शोध त्यांच्याव्हिजन डॉक्युमेंटमध्ये घ्यावा लागेल.
 ‘ आपचे व्हिजन डॉक्युमेंटया पक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्थात या डॉक्युमेंटमध्ये मुख्य भर हाआपकार्यकारी मंडळ, विधीमंडळ आणि न्याय मंडळ या मध्ये काय बदल करु पाहते आहे यावर आहे. शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात अवघ्या तीनशे शब्दांत आपली व्हिजन आप ने मांडली आहे. ही Good Education & Healthcare For All’ अशा शीर्षकाखाली ही व्हिजन आहे ती अशी
 “ सध्या सरकारी शाळांप्रमाणेच सरकारी रुग्णालये देखील अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.पूर्वी सरकारी रुग्णालयांमध्ये निदान मोफत उपचार आणि औषधे तरी मिळायची आता मात्र सरकारी रुग्णालये देखील मोठ्या प्रमाणात फी आकारत आहेत. कुटुंबातील कोणी आजारी पडले तर गरीब कुटुंबाचे दिवाळे निघते, अनेक शेतकरी आजारापणामुळे झालेल्या खर्चामुळे आत्महत्या करतात.
  सरकारी रुग्णालये देखील खाजगी रुग्णालयांइतकी कार्यक्षम बनवली जातील, ती मोफत उपचार आणि औषधे देखील देतील. खाजगी रुग्णालय अथवा शाळा बंद करणे हा आमचा मनोदय नाही पण सरकारी रुग्णालये आणि शाळा जागतिक दर्जाची बनविणे,हा आमचा उद्देश आहे. पण त्या करिता पैसा कोठून आणावयाचा? वरवर पाहता,आज असे दिसते की सरकार शिक्षण व आरोग्यावर मुबलक पैसा खर्च करत आहे पण एकप्रकारे या पैशाची चोरीच होते आहे,त्याचे फायदे लोकांपर्यंत अपवादानेच पोहचत आहेत. आपण भ्रष्टाचार थांबवू शकलो तर आरोग्य आणि शिक्षणाला पैसा आपोआपच उपलब्ध होईल. आणि  तरीही  या सा-यासाठी देशभरातील तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात येईल. ही समिती सरकारी आरोग्य संस्था जागतिक दर्जाच्या बनविण्यासाठी किती पैसा लागेल आणि तो कसा उभा करावयाचा या संदर्भात रिपोर्ट देईल.
   सरकारी शाळा आणि रुग्णालये स्थानिक ग्रामसभा/मोहल्ला सभा यांच्या अधिपत्याखाली काम करतील. या मुळे या संस्था स्थानिक लोकांना उत्तरदायी राहतील. त्यामुळे डॉक्टर किंवा शिक्षक जर नीट काम करत नसतील तर स्थानिक ग्रामसभा/मोहल्ला सभा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु शकेल.”
 सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात आपने मांडलेली ही व्हिजन अत्यंत उथळ, अपु-या विश्लेषणावर आधारित आणि घाईगडबडीत ठरवलेली आहे, हे स्पष्ट आहे. या मांडणीत अनेक मूलभूत त्रुटी आहेत. मुळात या धोरणकर्त्याला सार्वजनिक आरोग्यासमोरील नेमक्या आव्हानांचे भान नाही. घोडा का अडला,पान का सडले,तलवार का गंजली,भाकरी का करपली या व अशा सा-या प्रश्नांची उत्तरे न फिरवल्यामुळे या एका शब्दात बिरबल देतो तेव्हा त्यात बौध्दिक चातुर्य आणि सूक्ष्म निरिक्षण तरी असते पण त्याच प्रकारे देशासमोरील सा-या प्रश्नांची उत्तरे भ्रष्टाचारामुळे या एका शब्दात देणे म्हणजे निव्वळ बाळबोधपणा आणि शहरी मध्यमवर्गीय सुलभीकरण आहे आणि याचेच प्रदर्शन या डॉक्युमेंटमध्ये ठायी ठायी दिसून येते.

    आपल्या किंवा परिवारातील कोणाच्या आजारपणामुळे गरीब लोक अधिक गरीब होतात,काही जण आत्महत्या करतात,हे वास्तव हे धोरण पत्र मांडते खरे पण त्यावरील उपाय सांगताना मात्र अपुरे पडते. केवळ सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारल्याने युनिव्हर्सल हेल्थ कवरेजचे स्वप्न कसे पूर्ण होणार,याचा विचार हे डॉक्युमेंट करत नाही. मुळात आज सरकारी रुग्णालयांच्या अकार्यक्षमतेच्या मुळाशी मनुष्यबळाची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकिय सेवेचे अंदाधुंद खाजगीकरण, त्यामुळे आरोग्याचे झालेले वस्तुकरण याबाबत आप चे हे धोरणपत्र ब्र देखील काढत नाही,याला काय म्हणावे? ग्रामसभा आणि मोहल्ला सभा यांच्याकडे डॉक्टरांचे नियंत्रण दिल्याने आरोग्य सेवा सुधारतील,असे स्वप्न पाहणारे कोणत्या नंदनवनात वावरत आहेत? आजही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आरोग्य सेवांचे सामाजिकीकरण हा एक हेतू आहेच,गावोगावी ग्राम आरोग्य समित्या देखील कार्यरत आहेत पण केवळ याने सारे काही होत नाही. अनियंत्रित खाजगी वैद्यकीय सेवेचे काय? आणि हे डॉक्युमेंट केवळ रुग्णालयीन सुविधापुरतेच बोलताना दिसते पण भारतासारख्या विकसनशील देशात आरोग्याचा प्रतिबंधात्मक आयाम अधिक मोलाचा आहे. आज  लसीकरणासारख्या पायाभूत बाबीत भारत इतर देशांच्या अगदी बांगला देशच्या ही तुलनेत मागे पडताना दिसतो आहे. पोषणाच्या बाबतीत ही आपल्याला अधिक प्रगती करावयाची गरज आहे. कुपोषित बालके आणि स्त्रिया यांच्याबाबत आपल्याला विचार करावा लागेल. पण दुर्दैवाने आपचे नियोजनकर्ते हॉस्पिटलमधून बाहेरच पडावयाला तयार नाहीत. ही आरोग्याची रुग्णालय केंद्री संकल्पना अत्यंत कोती आणि उथळ आहे. लसीकरण, सांडपाण्याची व्यवस्था,घनकचरा व्यवस्थापन, रोग सर्वेक्षण,अन्नसुरक्षा, कीटक व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण हे आरोग्याचे आयाम ध्यानात घेणे अधिक गरजेचे आहे. व्यक्तीची जात आणि लिंगानुसार समाजातील प्रतिष्ठा हाही आरोग्यावर परिणाम करणारा एक घटक आहे. सार्वजनिक आरोग्याकडे इतक्या सर्वव्यापकतेने पाहण्याची आवश्यकता आहे. या सा-या फूटपट्ट्यांवर आपचे हे धोरणपत्र कुठेच उतरत नाही, हे मान्य करायलाच हवे.
  एकूणच आपच्या या व्हिजन डॉक्युमेंटवर आपच्या थिंकटॅंकने पुनर्विचार करावयाची गरज आहे. देशाच्या राजकारणाला आपच्या प्रयोगाने एक नवी दिशा दिली आहे. भ्रष्टाचार मुक्ती आणि राजकीय प्रक्रियेत क्रियाशील लोकसहभाग या शिवाय आप कडे आज जरी कोणता निश्चित विचार – इझम नसला तरी कालानुरुप त्यांच्या या को-या पाटीवर वास्तववादी आणि लोकाभिमुख विचार उत्क्रांत होत जाईल,अशी आशा करायला निश्चित जागा आहे. एकूणच राजकारणाची या प्रकारे नवी मांडणी करताना आणि भारतीय राज्यघटनेतील पायाभूत मूल्ये व्यवहारात आणताना सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हा गाभाभूत मुद्दा आहे,या कडे आप च्या धुरिणांचे दुर्लक्ष होऊ नये तरच येणा-या काळात आपले आणि आपल्या राजकीय परिसंस्थेचे आरोग्य अधिक निरामय होऊ शकेल. 

Monday 10 March 2014

स्टॉप टीबीचे ब्रॅण्ड एम्बसिडर
-   डॉ.प्रदीप आवटे.

  “ताबडतोब पहिले विमान पकडा आणि घरी परत जा. टीबी रुग्णांना व्यवस्थित आणि नियमित औषधे मिळतील,याची प्रथम खात्री करा.टीबी नियंत्रण कार्यक्रमाची गुणवत्ता सुधारा...”
“शेम इंडिया...!”
“द टीबी जिनोसाईड मस्ट स्टॉप...!”
आक्टोबर – नोव्हेंबर २०१३ मध्ये पॅरिस येथे फुप्फुसाच्या आरोग्यासंदर्भात जागतिक परिषद भरली होती,तेथे ट्रीटमेंट ऍक्शन ग्रुप (टॅग)या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या शब्दांत परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या चमूची हेटाळणी केली. भारताचे अतिरिक्त आरोग्य सचिव भारतातील टीबी परिस्थिती संदर्भात बोलत असताना अशा मानहानीहारक घोषणा दिल्या. नुकतीच देवयानी खोब्रागडे प्रकरणात भारताची जागतिक पातळीवर नाचक्की झाल्याची भावना सर्व माध्यमे आणि राजकीय पक्ष आळवित असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दोन तीन महिन्यापूर्वी घडलेल्या आपल्या या मानहानीकडे मात्र कोणाचे म्हणावे तसे लक्ष गेलेले दिसत नाही. काही आंग्ल माध्यमात छोटीसी बातमी आली आणि बस्स..! या घटनेने जेवढे व्हावे तेवढे कोणी अंतर्मुख आपण झालो नाही पण आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्वाची आहे.आपण सर्वांनी म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या नियोजकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी याचा आपापल्या पातळीवर विचार करायला हवा.
   का ? एवढे काय घडले आहे,घडते आहे म्हणून आपण इतके हवालदिल होण्याची गरज आहे? पॅरिसला असे आंदोलन करुन आपला निषेध करणा-या टॅगच्या डॉ.बॅक्ट्रीन किलिंगो यांनाच विचारा ना.ते सांगतात,”भारत सा-या जगाची फार्मसी म्हणून तोरा मिरवतो पण तेथील टीबी रुग्णच औषधांपासून वंचित राहतात,असे का? औषधांचा नियमित पुरवठा, टीबी नियंत्रण कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि मॉनिटरिंग यात भारताने अजून सुधारणा करायला हवी.अन्यथा भारतात ड्रग रझिस्टंट (औषधांना न जुमानणारा) टीबी ची मोठी साथच येईल,” असा इशारा देताना डॉ.बॅक्ट्रीन वैश्विक भूमिका घेतात,” आम्ही विश्वाचे नागरिक आहोत आणि भारतातीलच काय पण कुठल्याही वैश्विक नागरिकांची अशी अवहेलना होणे,आम्हांला सहन होणार नाही.”
   डॉ.बॅक्ट्रीन आणि त्यांच्या सहका-यांनी ग्लोबल खेड्याच्या टेरेसवरून एवढे उच्चरवाने ओरडावे,असे काय झाले आहे? की हा आंतरराष्ट्रीय संघटनाचा आपल्या आरोग्यविषयक धोरणातील अर्थपूर्ण हस्तक्षेप आहे? आपण अंतर्मुख होण्याची गरज आहे,हे मात्र नक्की !

   नुकताच प्रसिध्द झालेला “ग्लोबल टीबी रिपोर्ट २०१३ “आपण वाचला तर भारतातील टीबीची परिस्थिती आपल्या ध्यानात येईल. खरे तर मागील १५ - १६ वर्षांमध्ये आपण टीबी नियंत्रणात लक्षणीय प्रगती केली आहे. १९९५ साली आपले यशस्वी टीबी उपचाराचे प्रमाण अवघे २५ % होते ते २०११ मध्ये ८८ % पर्यंत नेण्यात आपल्याला यश आले आहे. १९९७ साली आपण सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु केला आणि २००६ पर्यंत संपूर्ण देशभर त्याचा विस्तार केला. या सा-यामुळे लक्षावधी लोकांचे प्राण वाचविण्यात आपल्याला यश आले. पण हे सारे असले तरी आपली टीबी नियंत्रणाची वाट मोठी बिकट आहे आणि उद्या काही आक्रीत या देशात घडू द्यायचे नसेल तर आपल्याला सर्वस्व झोकून देऊन टीबी नियंत्रणासाठी काम करावे लागेल. पुढील आकडेवारीच आपल्यासमोरील आव्हानाचे स्वरुप स्पष्ट करेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३ च्या अहवालानुसार, जगभरात आढळणा-या एकूण टीबी रुग्णांपैकी २६ % टीबी रुग्ण (सुमारे २२ लाख) एकट्या भारतात आढळतात. भारतात दररोज २० हजार लोकांच्या शरीरात टीबीचा जंतू प्रवेश करतो,रोज नवीन पाच हजार टीबी रुग्ण सापडतात तर दरदिवशी सुमारे एक हजार लोक टीबी ने मृत्यूमुखी पडतात. आपण दरवर्षी एवढे टीबी रुग्ण शोधत असलो तरी अनेक जण आरोग्य संस्थेपर्यंत पोहचत नाहीत किंवा आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. जगभरात सुमारे २९ लाख निदान न झालेले टीबी रुग्ण आहेत आणि त्यापैकी एक तृतियांश अवघ्या बारा देशात आहेत, भारत त्यापैकीच एक ! निदान न झालेला हा प्रत्येक रुग्ण वर्षभरात आणखी दहा ते पंधरा जणांना टीबीचा संसर्ग देतो. भारतासारख्या देशात जिथे लोक अधिक दाटीवाटीने राहतात तिथे असे इन्फेक्शन होण्याची शक्यता कैक पटीने वाढते. म्हणूनच आपण खाजगी डॉक्टर तसेच रुग्णालयांनी टीबीचे रुग्ण सार्वजनिक आरोग्य संस्थेस कळविणे सक्तीचे केले आहे.
   टीबी आणि एच आय व्ही/एडस या आजारांची महायुती हे टीबी नियंत्रणातील आणखी एक आव्हान आहे. टीबीचा उपचार सुमारे सहा ते नऊ महिने घ्यावा लागतो. सर्वसामान्य रुग्णाच्या या उपचारात अनेक अडचणी येतात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत टीबी वरील औषधे मोफत मिळत असली तरी तिथली प्रचंड गर्दी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांची वागणूक ,तसेच आपल्याला टीबी झाला आहे ही लपवून ठेवण्याची वृत्ती या व अशा अनेक कारणांमुळे रुग्ण ब-याच वेळा खाजगी रुग्णालयात जाणे पसंत करतो. टीबीचा रुग्ण हा खाजगी डॉक्टर करिता मोठे कुरण असते कारण त्याला दीर्घकाळ उपचाराची आवश्यकता असते. टीबीची औषधे एक दोन महिने खाल्ली की रुग्णाला थोडेसे बरे वाटू लागते आणि त्याच वेळी औषध दवाखान्यावर होत असलेला खर्च ही त्याच्या खिशाला परवडेनासा होतो आणि आता आपल्याला बरे वाटत असल्याने तो उपचार घेणे बंद करतो आणि काही दिवसातच त्याचा आजार पुन्हा बळावतो. या व अशा अनेक कारणांनी अनियमित उपचार घेतल्याने टीबीचा जंतू औषधांची पोथी ओळखतो आणि ड्रग रझिस्टंट म्हणजे औषधांना न जुमानणारा होतो. गेल्या वर्षी मुंबईतच टीबीच्या कोणत्याही औषधाला न जुमानणारे बारा रुग्ण आढळले. संपूर्ण जगातील ही अशा प्रकारची केवळ तिसरी घटना होती. मग असे रुग्ण हा ड्रग रझिस्टंट जिवाणू आपल्या थुंकी खोकल्यावाटे संपर्कात आलेल्या इतरांनाही देत राहतात. मागील वर्षभरात अशा रुग्णांमध्ये वेगाने वाढ होते आहे. जगातील एकूण ड्रग रझिस्टंट टीबी रुग्णांपैकी निम्मे रुग्ण ब्रिक्स (ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि द.आफिका) देशांमध्ये आहेत.भारतात हे प्रमाण एकूण टीबी रुग्णांच्या तीन टक्के एवढे आहे. भारतातील एकूण टीबी रुग्णांची संख्या पाहता या रुग्णांची संख्या किती मोठी असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. या रुग्णांच्या उपचाराचा खर्च किमान दोन लाखाच्या घरात आहे त्यामुळे तो आणखी मोठा अडथळा ! १ जुलै हा दिवस दरवर्षी डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.गेल्या वर्षी सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दिनीच एका तरुण डॉक्टर मुलीचा मृत्यू ड्रग रझिस्टंट टीबी मुळे झाला. अशा प्रकारच्या घटनांमुळे स्वाभाविकपणे डॉक्टरांमध्येही एक भितीचे वातावरण आहे. ड्रग रझिस्टंट टीबीचे रुग्ण आपल्या आरोग्य व्यवस्थेतील नवे अस्पृश्य ठरु नयेत,यासाठीही आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे.

    टीबी नियंत्रणासाठी तुम्ही आम्ही काय करु शकतो ? या बाबतीत आपल्याला ब्रिटनचा कित्ता गिरवावा लागेल. ऐंशीच्या दशकात एच आय व्ही/एडसचा उदय झाला आणि ज्या ब्रिटनमध्ये टीबी रुग्ण अवचुकूनच आढळायचा तेथील टीबीचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढले. या टीबीच्या साथीला तोंड देताना तेथील सर्वसामान्य माणसाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. नियमित उपचार हा यशस्वी टीबी उपचाराचा पाया आहे.हे लक्षात घेऊन तेथील नागरिकांनी आपल्या परिसरातील टीबी रुग्ण दत्तक घेण्याची योजना राबविली. आपली नेहमीची कामे सांभाळतच आपण आपल्या परिसरातील टीबी रुग्णाला भेट देणे,त्याने आजची औषधे खाल्ली आहेत की नाही,याची चौकशी करणे आणि त्याला औषधे मिळण्यासाठी काही अडचण असल्यास आवश्यक ती मदत करणे,त्याचे मनोधैर्य वाढविणे आणि त्याला उत्तम आहार व नियमित उपचाराच्या मदतीने बरा होण्यासाठी मदत करणे या प्रकारची सामान्य वाटणारी पण अत्यंत प्रभावी अशी कामे ब्रिटिश नागरिकांनी आवडीने केली.या लोकसहभागामुळे या देशाने अवघ्या काही वर्षातच टीबीचे हे आक्रमण यशस्वीरित्या नियंत्रणात आणले. आपल्यालाही याच वाटेने जावे लागेल. औषधांचा पुरेसा व नियमित पुरवठा, निदानाची सोय या पायाभूत सुविधा शासन सर्व पातळीवर पोहचवित आहेच एक समाज म्हणून आपल्यालाही आपली जबाबदारी उचलण्याची गरज आहे. टीबी संशयित रुग्ण आरोग्य संस्थेपर्यंत पोहचण्यासाठी आणि त्याने नियमित उपचार घेण्यासाठी आपण समाज म्हणून,संवेदनशील शेजारी म्हणून खूप काही करु शकतो. मुळात अशा संसर्गजन्य आजाराने पिडीत माणसाला वाळीत टाकण्याची आपली जुनी खोड आपण सोडली पाहिजे. आजही आपल्याकडे दरवर्षी तीन लाख महिलांना टीबी मुळे घराबाहेर हाकलले जाते तर लाखभर पोरांना आपली शाळा सोडावी लागते. आजाराचा प्रसार होऊ नये या साठी काळजी घेणे वेगळे आणि माणूसपणच सोडणे वेगळे, हे आपल्याला कधी कळणार? आणि माणसांना वाळीत टाकणारे आपण टीबी प्रसार टाळण्यासाठी मात्र काही करतो का?अन्यथा आपल्या सार्वजनिक भिंती,प्लॅटफॉर्म,बसस्टॅण्ड आपल्या पान तंबाखूच्या पिचका-यांनी का रंगली असती ? पॅरिसमधल्या धिक्कारानंतर सारे जग आपण काय करतो आहोत,या कडे लक्ष लावून बसले आहे. केवळ राहुल द्रवीडच का, आपण सारेच स्टॉप टीबी मोहिमेचे ब्रॅण्ड ऍम्बसिडर बनू या...! काय म्हणालात, द्रवीडला त्याचे मानधन मिळते,आम्हांला काय? आपल्या आरोग्याइतके मौल्यवान मानधन दुसरे कोणते असेल?

Sunday 9 March 2014

. . . मोठी त्याची सावली..!
-- प्रदीप आवटे
------------------------------------------------------------------
   अवघा दहा बारा वर्षाचा असताना को-या करकरीत देशी दारुची चव त्याने चाखली
त्याच वयात पोटफाडीच्या रुममध्ये मृत स्त्री देहासोबत चाललेले ओंगळवाणे प्रकार त्याने पाहिले
पैशाची सुगी अनुभवली आणि गरीबीचे चटकेही…!
शाळा कशीबशी सुरुच होती पण दहावीच्या उंबरठ्यावर गणिताचे माप ओलांडताना त्याचा जीव मेटाकुटीस आला
पण कोणत्याच उंबरठ्यात अडकायचा त्याचा स्वभाव नव्हता आणि आजही नाही
सारं निळंशार आभाळ मुठीत घेऊ पाहणा-या जीवाला कसल्या भिंती, कसल्या चौकटी आणि कसले उंबरे…!
पण
तो आरशात पाहत होता आणि आपलं काळं, येडंइद्र रुपडं त्याला डाचत होतं
त्याला आपलं खरं रुप दावणारा आरसा अजून गवसायचा होता, तेव्हाची गोष्ट..!
तो राजहंस एक …!”,हे सांगणारा आत्मसाक्षात्कारी क्षण अजून उगवायचा होता
विशी - पंचविशीत तो महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाला. का कोण जाणे,आतली घुसमट थांबत नव्हती... जीव कुठंच लागत नव्हता... आपण कदाचित जगायलाच नालायक असू .. मन स्वतःलाच कुरतडत होतं... काही महिन्यातच आपली ट्रंक,बाडबिस्तारा गुंडाळून आणि सोन्यासारख्या नोकरीला राम राम ठोकून त्यानं गाव गाठलं... घरी दारी नोकरी गमावली म्हणून पोटभर शिव्या खाल्ल्या...
गरज पडली तेव्हा सेक्युरिटी गार्डची नोकरीही केली, इस्त्रीचे दुकानही चालविले...
जहां नही चैना,वहां नही रहना’,असं म्हणत चालणं सोपं असतं पण ते समाधानाचं संतुष्टीचं स्टेशन गाठणं, मुख्य म्हणजे, स्टेशन आलेलं कळणं महाकठीण...!
अशाच वाटचालीत तो मला भेटला...
त्याची माझी पहिली भेट कधी झाली, मी आठवू लागतो
  खरं तर तो मला पहिला भेटला “संचार” नावाच्या एका छोट्या स्थानिक वर्तमानापत्रातून...! मला आठवते, २००१-०२ च्या आसपासची गोष्ट असावी. “संचार” मधल्या एका छोट्या बातमीचा मथळा होता –  “जेऊरच्या काव्यस्पर्धेत नागराज मंजुळे प्रथम...”  कवितेच्या क्षेत्रात एवढं रस्टीक नाव ऐकायची माझ्या मध्यमवर्गीय अभिरुचीला सवय नव्हती. मी मनाशीच हसलो आणि म्हणालो, जेऊरच्या सोकॉल्ड महाविद्यालयाची काव्यस्पर्धा...! मग त्यात नागराज मंजुळे काय आणि कुणी काय... चालायचंच !त्याची कविता अजून माझ्या कानावर पडायची होती आणि तो ही योग लवकरच आला...!
  कुर्डूवाडीला माझे सर्जन मित्र डॉ.दिनेश कदम दरवर्षी त्यांच्या वडलांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार देत.एके वर्षी या कार्यक्रमाला नारायण सुर्वे आले होते आम्ही आजूबाजूचे सारे साहित्यिक साहित्य रसिक या कार्यक्रमाला हजर होतो. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर रात्री उपस्थितांचे काव्यसंमेलन सुरु झाले. मी कोणती कविता वाचली ते आठवत नाही पण माझ्या काव्यवाचनानंतर सूत्रसंचालन करणा-या राजेंद्र दास यांनी पुढील नाव पुकारले,” नागराज मंजुळे” त्याचा परिचय करुन देताना दास सर काय म्हणाले,हे मला आज आठवत नाही पण मी उत्सुकतेने पाहू लागलो.एक उंचेला,शिडशिडीत,धारदार नाकाचा सावळा तरुण पुढे आला आणि आपल्या धीरगंभीर आवाजात कविता म्हणू लागला,
“ पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती...
म्हणूनच की काय
वेळी अवेळी
रस्त्याने येता जाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायाची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकी समोर
कोसळत राहायचा
तासन तास.....!”
      कविता बरसू लागली, पावसाच्या अफलातून प्रतिमेतून उलगडत जाणारी “एका पावसाची गोष्ट” त्याच्या आवाजात ऐकताना आपणच पावसात भिजतो आहोत असा भास मला झाला.पाऊस माझ्या डोळ्यातून झरु लागला. या एका कवितेने, या एका क्षणाने आम्हां दोघांना आमच्या सनातन नात्याची आठवण करुन दिली. कविसंमेलनानंतर आम्ही कधीतरी पहाटे घरी परतलो. जेऊर येईपर्यंत आम्ही बोलत होतो... बॅकड्रॉपला पाऊस पडतोय असा भास सारखा होत होता. मध्यरात्र उलटून गेली होती आणि पूर्वेकडे लाली पसरु लागली होती.एका विलक्षण क्षणी नागराज आणि त्याचे शब्द मला भेटले होते.
आणि मग आम्ही भेटत राहिलो.
साहित्यात रमणारा दुसरा कोणी मित्र भेटला तरी नागराजचा विषय निघाला नाही असे कधी झाले नाही. अगदी नागपूरला यशवंत मनोहर भेटले तरी नागराजचा विषय होताच…!
नागराज सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचा..! करमाळ्यापासून १८-२० किलोमिटरवरील मध्यरेल्वेचे छोटे स्टेशन असलेले हे गाव,आठ दहा हजार लोकसंख्येचे...! रेल्वे लाईनला लागूनच वडार समाजाची काही घरं,नागराजचे घरही याच वस्तीत...!
  आप्पा,भारत,नागराज आणि भूषण ही चार भावंडे...! आप्पा गवंडी काम करतो. फॅण्ड्रीतील जब्याचे घर त्यानेच तर उभारले आहे. भारत आणि भूषण ही दोन्ही भावंडे पोलिस खात्यात ...! वडार समाजात दगड फोडणा-या आई बापांच्या पोटी जन्माला आलेल्या नागराजच्या जगण्याची चित्तरकथा उचल्या ,’उपराआणि बलुतंचा पुढचा अध्याय आहे.
लहान असतानाच नागराज आपल्या चुलत्यांना दत्तक गेला म्हणून त्याचं बरंचसं बालपण करमाळ्याला गेलं.या दत्तक जाण्याचा काही परिणाम त्याच्या एकूणच मानसिक जडणघडणीवर झाला असावा. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’, या म्हणीप्रमाणे त्याची जी भावनिक उपासमार या कोवळ्या वयात झाली त्याचे व्रण त्याच्या कवितेत आणि चित्रकृतीतही दिसतात. घर आणि समाज या दोन्ही पातळीवर आलेला भावनिक एकाकीपणा या संवेदनशील मनाला कासाविस करत होता,हे मला त्याच्या प्रत्येक भेटीत जाणवत होते. “कविता लिहण्याची प्रक्रिया ही विहिरीत श्वास रोखून बुडी मारुन तळचा दगड आणण्यासारखी दमछाक करणारी आहे”, असे नागराज नेहमी म्हणतो तेव्हा त्याच्या कवितेची सेंद्रियताच तो स्पष्ट करत असतो. जगतात,भोगतात अनेक जण पण त्या जगण्याचा,भोगण्याचा नेमका तळ किती जणांना गवसतो? किती जणांना ही पुनःनिर्मितीमधली दमछाक सोसते.
    आपल्या कवितेची जगण्याची नाळ त्याने पुन्हा पुन्हा तपासून घेतली आहे,ती त्याच्या जगण्याची जणू पूर्वअटच आहे. कौटुंबिक अडचणी, नोकरी नाही,पैशाची चणचण अशा अवस्थेत कवितेची सोबत सोपी नव्हती.नागराज नेहमी गंमतीने सांगतो,”माझी कविता छापलेली नियतकालिके नाना अभिमानाने पाहत,इतरांना दाखवत पण आईने मात्र एकदाच मार्मिक प्रश्न विचारला,याचे किती पैसे मिळतात?” बाभळीला झोके घेत घेत उपाशीपोटी झोपी गेलेली त्याची मलूल कविता पोट भरायचे साधन नव्हतीच पण ती जगण्याचे विलक्षण इंधन देणारी होती आणि आहे. आणि म्हणूनच माझ्या समानधर्मी मित्राने आत्महत्या केली,मी मात्र कविता केली असे तो लिहतो तेव्हा कविता नेमका कशाचा पर्याय असते,जगण्याचा की मरण्याचा असा तिरपांगडा प्रश्न तो आपल्या उशाशी ठेवून जातो.
  नागराज रुढार्थाने कोणत्याही चळवळीत नव्हता आणि नाही.पण त्याचे पुरोगामित्व त्याच्या जगण्यातून आणि त्याच्या चिंतनातून काळ्या वावरात उगवणा-या धानासारखे आपसूक उगवले आहे. नागराजचे वडील नाना हा त्याच्या भावजीवनाचा विलक्षण हळवा कोपरा आहे. आयुष्याचं सारं वादळ वारं सहजतेने अंगावर घेत असतानाही त्यांचं हसतमुख आणि जीवनाभिमुख असणं,नागराजला आजही वाट दाखवित राहतं. पण असे नाना गेले तेव्हा त्याने धर्मसंस्काराप्रमाणे केस कमी करण्यास नकार दिला.घरचे दारचे त्याची मनधरणी करु लागले, अखेरीस एक बट कापली तरी चालेल इथवर सारे आले पण हा बधला नाही. गावगाड्यातील जातपात,शिवताशिवत आणि देवभोळेपणा या सा-यांचा प्रचंड तिटकारा त्याला त्याच्या जीवनानुभवातून आला आहे. बंदुकीच्या गरम धूर ओकणा-या नळ्यांपेक्षा माणसं देवादिकांच्या तस्वीरींना अधिक घाबरतात,या तस्वीरी त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवितात,हे त्यानं  पाहिलं आहे,अनुभवलं आहे.
   माझ्या बौध्द तत्वज्ञानावरीलधम्मधाराकाव्यग्रंथाला मूर्त रुप मिळण्यामध्ये नागराज आणि कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. २००९-१० मध्ये जवळपास दर विकेंडला नागराज, गार्गी, मिथुन, पूजा, कुतुब, प्रियांका, गणेश, निवास ही सारी मंडळी माझ्याकडे जमत आणि मग देर रात तक आमची मैफिल रंगे. याच मैफिलीत मी कधीतरी माझ्याधम्मधारातील रचना वाचून दाखविल्या. नागराजला त्या इतक्या आवडल्या. तो म्हणाला, “ डॉक्टर, अहो, हे विचार, या रचना प्रत्येक घराघरापर्यंत जायला हव्यात, तुम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा.” “धम्मधाराचा देखणा प्रकाशन समारंभ सुध्दा या मंडळींनी पार पाडला
      पाच सात वर्षांपूर्वी नानांचा मृत्यू झाला आणि नागराज खूप हलला. जगण्यामरण्याच्या दोन ध्रुवावर त्याचा लंबक झोके घेऊ लागला. कौटुंबिक अडचणी त्यात नानांचे जाणे यामुळे नागराज उदासीच्या प्रचंड भोव-यात सापडला. भोक पडलेल्या रांजणात पाणी भरावे तसे दिवस जात होते,आशयशून्य,निरर्थक ...! सारेच संपवावे असे वाटणारे क्षण आले पण मित्र ही नागराजचे मोठे भांडवल ...! त्याचे शिक्षक असलेल्या संजय चौधरींपासून संजय साठे,राम पवार,संतोष झांजुर्णे, मिथुन चौधरी,हनुमंत लोखंडे, गणेश जसवंत असे एक ना अनेक.. हे मित्र त्याच्यासोबत होते, आणि तो कुठेही असो कविता सोबत होतीच. त्याच दरम्यान  त्याचा मित्र मिथुन चौधरीला नगर कॉलेजला मास कम्युनिकेशन विभागात लेक्चरर म्हणून नोकरी लागली. पुण्याबाहेरचे कॉलेज, त्यात मास कम्युनिकेशन सारखा विषय, विभागाला विद्यार्थी मिळावेत म्हणून मिथुन आणि मिथुनचे मित्रच आपल्या परिचितांना या कोर्स करता ऍडमिशन घ्या म्हणून विनंती करु लागले. नागराजही आपल्या जवळच्या मित्रांना या कोर्ससाठी प्रेरित करु लागला. त्यातला कोणी तरी एक जण नागराजलाच म्हणाला, “अरे तू आम्हांला सांगतोयस, तू स्वतःच का घेत नाहीस प्रवेश या कोर्ससाठी ? “
   नागराजने हा विचार तोवर केलाच नव्हता पण मग सगळ्यांनीच आग्रह केला आणि नागराज मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी बनला. त्याचा मित्र मिथुनच त्याचा शिक्षक…! सारं मोठ्या अनौपचारिकरित्या सुरु झालं आणि रेस्ट इज हिस्ट्री….! नागराजच्या हातात आता नवे साधन आले होतेकॅमेरा…! दोन डोळ्यांत मावणा-या त्याच्या दुःखाला, त्याच्या अवघ्या जगण्याला सामावून घेण्यासाठी त्याला जणू तिसरा डोळा मिळाला होता. त्यानेच लिहले आहे ना -
माझ्या हाती
नसती लेखणी
 तर
तर असती छिन्नी
सतार……. बासरी
 अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला….! “
आता हा कोलाहल उपसण्यासाठी एक नवीनच साधन त्याच्या हातात आले होते. सिनेमाची भाषा, नवी चित्रलिपी त्याने लिलया आत्मसात केली आणि कोर्सचा भाग म्हणून तयार केलेल्यापिस्तुल्याया त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या हातातला कॅमे-याला पोपटी पालवी फुटली, एक नवा दिग्दर्शक जन्माला आला आहे, हे त्यालाही उमगले होते. ‘फॅण्ड्रीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

 नागराज प्रत्येक क्षण मनमुराद जगणारा अदिवासी आहे. त्याला मराठी साहित्य क्षेत्रातला मानाचा मानला जाणारा दमाणी पुरस्कार मिळाल्यावर मी त्याच्यासोबत जेऊरला गेलो होतो. जेऊरवासियांनी आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणा-या त्याच्या मित्रांनी हलगी ताशाच्या तालावर त्याची मस्त मिरवणूक रेल्वे फाटका पासून त्याच्या घरापर्यंत काढली होती. लॉन्ड्रीवाला, चहा टपरीवाला, फिटर, कापड दुकानदार त्याला येऊन हार घालत होते, फेटा बांधत होते, गावातील सानथोर हलगीवर नाचत होते. नागराजचीही पावले थिरकत होती. उद्या अनेकांना ज्ञानपीठ ही मिळेल पण ही आपल्या माणसांची अशी उत्कट पोचपावती किती जणांना पावेल माहीत नाही. अत्यंत सटल पध्दतीने कवितेतून व्यक्त होणारा, आपल्या चित्रपटात कोणतीही लाऊड गोष्ट टाळणारा नागराज आणि आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणा-या चाहत्यांसोबत रस्त्यावर हलगीच्या तालावर नाचणारा नागराज ही एकाच माणसाची दोन विलोभनीय रुपे आहेत.
   नागराज दिग्दर्शक म्हणून किती मोठा आहे, हे येणारा काळ अधिकाधिक स्प्ष्ट करेलच पण तितकेच त्याचे माणूसपणही उबदार आहे. “फॅण्ड्रीच्या शूटींगच्या वेळी किशोर कदम सारख्या स्टार कलाकाराइतकीच केमहून आलेल्या हलगी वादकांची किंवा करमाळ्याहून आलेल्या वडार मंडळींची काळजी घेणारा नागराज आपल्यासोबतच्या प्रत्येकाची डिग्निटी जपणारा प्रतिभावंत आहे. चित्रपटातील कलाकारांसोबतचे त्याचे नाते केवळ कलाकृतीपुरते मर्यादित राहत नाही, ते त्याहून अधिक खोल, अधिक गहिरे आणि कलाकृतीतील आशयाला कृतीशील करणारे असते. ‘पिस्तुल्या त्याने पारधी समाजाच्या आणि पालावर राहणा-या सूरज पवारला प्रमुख भूमिका दिली. सूरजने या भूमिकेसाठी राष्ट्रपती पदक पटकाविले पण नागराज येथेच थांबत नाही. वडलांच्या छत्रछायेशिवाय वाढणा-या या सूरजच्या शिक्षणाची सोय तो पाहतो. आजही सूरज नागराज सोबत राहतो आहे. नव्या शहरी वातावरणात त्याने नीट जुळवून घ्यावे म्हणून नागराज आणि कंपनी त्याला पर्सनल कोचिंग देते आहे. जी गोष्ट सूरजची तिचफॅण्ड्रीतील सोमनाथ अवघडेची…!
  नागराज कधी कधी मला अतीव प्रेमाने म्हणतो, “ डॉक्टर, तुम्ही सावली देणारं झाड आहात.”  स्तुती आवडणा-या ज्युलियस सीझरलाही आवडावं असं हे वाक्य…! मला माझं ठावं नाही नागराज..! “ संपूर्ण मी तरु की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावर जळून..! “, ही आरती प्रभूंची ओळ मी मनाशी म्हणतो आणि तुझ्याकडे पाहतोतुझ्या पारावर बघ किती मंडळी विसावलीत…! नागराज बघ तरी खरं , किती मोठी झालीय तुझी सावली…! तुला भिती होती
जाहिरातीच्या या बोलघेवड्या युगात
कोण ऐकेल माझ्या स्पंदनाची विराणी…!”

आज तुझी विराणी नव्या युगाचे, नव्या मनुचे गाणे झाले आहे. तुझ्या प्रकाशाने उजळणा-या पडद्यापुढे सारे डोळ्यांत प्राण आणून बसले आहेत. काळीज काढून ठेव बिनधास्त प्रत्येकाच्या तळहातावर….!