Sunday 29 May 2016

बरं चाललंय ना हे ? - संवाद श्याम मनोहरांशी ...



बरं चाललंय ना हे ?
- डॉ प्रदीप आवटे.
    त्यांचं घर सापडेल ना व्यवस्थित, शहराच्या या डोक्यात न शिरणा-या फाफटपसा-यात. माझ्या मनात नाही म्हटलं तरी धाकधूकच होती. मी ती श्रीरंजनला बोलूनही दाखवली.
“कुठल्या काळात वावरताय तुम्ही ? आता मोबाईलमध्ये जीपीएस सिस्टिम आहे.”
ते ही खरंच होतं आणि तसंच झालं श्रीरंजननं अगदी कुठंही न अडखळता दीपरेखा सोसायटीच्या दारात आणून उभं केलं. आणि विजयी नजरेनं माझ्याकडं पाह्यलं.
“जीपीएसनं पत्ता सापडला तरी माणूस सापडतोच, असं नाही,” असं मी बोललो तेव्हा श्रीनं माझ्याकडं चमकून पाह्यलं.
माणूस सापडण्यासाठी काय करायला हवं असा विचार करत अत्यंत उत्सुकतेनं मी श्याम मनोहरांच्या घरात घुसलो. ज्या माणसाची उत्सुकता झोपतानाही संपत नाही त्या माणसाला भेटण्याची मला कमालीची उत्सुकता होती. आम्ही आलोय हे कळल्यासारखे मनोहर दार उघडून उभे होते. आपण दारात आलोय,हे त्यांना कसं कळलं असावं,असा विचार मनात आला की याचीही काही पध्दत असावी,असं वाटलं तेव्हा  मला त्यांनी महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सांगितलेला एक प्रसंग मला आठवत होता..
एकदा एका चांदण्या रात्री सगळया कुटुंबियांसोबत मनोहर घराच्या छतावर बसले असतानाचा प्रसंग.सोबत त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीणही होती. ती सांगू लागली, “ लहानपणी आम्ही घराच्या माळवदावर बसलो की चांदण्या मोजायला सुरुवात करायचो. पण थोडया वेळानं एक गंमत व्हायची, आपण कोणत्या चांदणीपासून मोजायला सुरुवात केली हेच आम्ही विसरायचो, सगळंच मुसळ केरात..!” हा प्रसंग सांगून  श्याम मनोहर म्हणाले, चांदण्या मोजायची पध्दत आपण शोधून काढली पाहिजे, जगणं अर्थपूर्ण कसं करता येईल, याच्या पध्दती आपण शोधून काढल्या पाहिजेत. आणि बरंच काही. चांदण्या मोजायचा हा प्रसंग मला फारच आवडतो. माझ्या मोजायच्या राहिलेल्या चांदण्या मला आठवतात, म्हणून की काय कोण जाणे ? पण मोजायला कुठून सुरुवात करायची, हा प्रश्न आजही आहेच. श्याम मनोहरांशी बोलताना याची काही पध्दत सापडते का बघू, हा एक उद्देश होताच

  गप्पा सुरु होतानाच मी त्यांना माझ्याअडीच अक्षरांची गोष्टया सदराबद्दल माहिती दिली. सदरामागील संकल्पना स्पष्ट केली. खरं म्हणजे, श्याम मनोहरांसारखा सर्जनशील आणि फिक्शनकडे एक शोध म्हणून पाहणारा लेखक प्रेम या अमूर्त मानवी मूल्याकडे कसा पाहतो, हे मला समजावून घ्यायचे होते, त्यांच्या प्रेमाबद्दलच्या धारणा जाणून घ्यायच्या होत्या. आजही आपण उत्सुकतेने झोपतो पण उत्सुकतेने एकमेकांना भेटत नाही, बोलत नाही. अध्यात्मावर जन्मसिध्द अधिकार सांगताना आपण अजून शरीरावरील कातडी भेदू शकलो नाही, आपले प्रेम शरीरावरुन अंतर्मनाकडे  झिरपत नाही, असे का होत असावे, हे सारेच बोलायचे होते

सर्वाभूती प्रेम, ही खरं म्हणजे भारतीय सभ्यतेची धारणा आहे,” श्याम मनोहर बोलू लागले. त्यांचे बोलणे मुक्त प्रकट चिंतनासारखे होते. त्यात विधानार्थी वाक्यांपेक्षा जीव प्रश्नांच्या हुकाला जागोजागी अडकत होता.पण नवे कुतूहल घरटयातून प्रथमच बाहेर पाहत होते.
“अद्वेष्टा सर्व भूतानाम.  कोणत्याही सजीवाबद्दल द्वेष नको.द्वेषाची गैरहजेरी म्हणजे प्रेम. प्रेम हे एखाद्या दोन बाजू असणा-या कॉईनसारखं आहे.एका बाजूला प्रेम आहे आणि दुस-या बाजूला अप्रेमाच्या विविध छटा आहेत. मग ते नकोसं वाटणं असेल,तिरस्कार असेल,सेपरेशनची भावना असेल आणि अगदी कुणी तरी आपला सूड घेतोय म्हणून येणारे प्रत्युत्तर असेल. स्वतःचा अनुभव आणि इतरांबद्दलची निरिक्षणं करत असताना आपल्याला काय जाणवतं ?आपल्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी धडपडणा-या नेत्यांकडं मी पाहतो,किंवा राजकारणात असणा-या दोन भावांकडे मी पाहतो.. सुरुवातीला सत्तेवर असणा-या भावासमोर दुय्यमत्व घेऊन सेक्रेटरी स्वरुपाची कामं करणारा भाऊ नंतर त्या भावालाच टसल देऊ लागतो. हे सगळं व्यवहारात दिसणारं प्रेम आहे.हे सगळं पाहताना प्रेम ही कालातीत गोष्ट माणसाला सापडलेली नाही की काय,असा प्रश्न मला पडतो.” तळजाई टेकडीवरुन अंधाराचा काळा मठ्ठ बैल हळूहळू खाली उतरु लागला होता. तरीही खिडकीतून आल्हाददायक वारा आत येत होता.काळया मठ्ठ बैलाला न घाबरता मन एका नव्या आशेने समोरुन येणा-या आवाजाकडे पाहत होते.
“मला माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.या करिता माझी क्षमता आणि माझ्यावर प्रेम करणारे लोक यांची मदत मी मागतो.जर माझ्या प्रेमाच्या लोकांनी मला मदत केली तर माझं जगणं सुकर करणा-या या लोकांवर माझ्रे प्रेम बसते.ही प्रेमाची बाहेरची व्यवस्था आहे.पण प्रेमाची आतली व्यवस्था देखील आहे.प्रेम घर्षण नाहीसं करतं.प्रेम नांदणा-या मनात घर्षण उरत नाही” मानवी जगणे ही एक भौतिक घटना आहे का ? शोधावं लागेल, पण श्याम मनोहर एका भौतिकीच्या नजरेतून जगण्याचा पट पाहत असतात.
“आता एक गंमतीचा भाग.सुदामा आणि अर्जुन दोघंही कृष्णाचे मित्र होते. पण या दोघांना कृष्णाने काय दिले ? कृष्णाने सुदाम्याला भौतिक संपत्ती दिली कारण तो अत्यंत गरीब होता पण कृष्णाने त्याला गीता दिली नाही आणि अर्जुनाला गीता दिली. गीता ही सुदाम्याची गरजच नव्हती की काय?प्रेमाची अभिव्यक्ती ज्याच्यावर प्रेम करायचे तो कोणत्या स्थितीत आहे,त्यानुसार असते की काय,असा एक प्रश्न मला पडतो,” श्याम मनोहर आणखी एक प्रश्नजाल टाकतात.
भारतीय सभ्यतेत आई आणि मुलाचे प्रेम प्रामुख्यानं मांडलं गेलेलं आहे. आज दिसणारं स्त्री पुरुष प्रेम हे आधुनिक काळात पुढं येताना दिसत आहे,हे सर स्प्ष्ट करतात. आणि तरीही स्त्री पुरुष प्रेमाचे विविधांगी कंगोरे कला साहित्यात दाखविले जात नाहीत,याच खंतही ते व्यक्त करतात. आणि मधूनच आम्हां दोघांकडे पाहत सर विचारतात “बरं चाललंय ना हे?”
“प्रेमाची तीव्रता कमी जास्त असते की काय? आणि पुन्हा ही तीव्रता व्यक्तीनिष्ठ नसून कालनिष्ठ असते आणि म्हणूनच काल परवा पर्यंत त्याच्याशिवाय जगणार नाहीम्हणणारे कोणी विपरित परिस्थितीत त्याच्याशिवाय ही जगताना दिसते. वरवर पाहता वाटली तरी ही विसंगती नसते,” सरांचे मनन प्रेमाला चहूबाजूंनी चाचपू लागते.
श्याम मनोहर आणि डॉ प्रदीप आवटे

आजही सहजप्राप्य वाटणारं प्रेम मिळवण्यासाठी भारतीय तरुणांना  किती उर्जा खर्ची घालावी लागते,त्याचं काय ? जात धर्माच्या नावाखाली आपण प्रेमाचे सीमांतीकरण केले आहे,मी माझी खंत  श्याम मनोहरांना सांगतो.
“ लग्नाच्या संदर्भात जात धर्म ओलांडा,असं सांगणारा विचार प्रवाह आहे आणि तो छोटा का असेना ठळक होताना दिसतो आहे. कला आणि साहित्यातून त्याला बळ मिळताना दिसते आहे. पण आपल्या समाजातील आर्थिक विषमता ही अशा लग्नातील खरी मेख आहे. धर्म वेगळा आहे तरी करा लग्न,हे जोरात बोलता येईल,जात वेगळी आहे तरी करा लग्न हे जोरात बोलता येईल आणि बोललेही पाहिजे पण आर्थिक विषमता आहे तरी करा लग्न म्हणणं व्यावहारिक दृष्टया अवघड आहे. एखाद्या माणसाच्या क्षमता कमी असतील तरी त्याला जगायच्या सगळया सोयी सुविधा मिळतील,अशी समाजरचना अजून झालेली नाही.त्यामुळं प्रेमात ही धाकधूक अजून आहेच.”
आर्थिक वर्गाच्या दृष्टीनं सारखेपणा असल्यानं सहजपणे झालेल्या आंतरजातीय विवाहाची उदाहरणे श्याम मनोहर सांगतात.आणि अचानक ते ट्रॅक बदलतात, “ जगणं प्रधान आणि महत्वाचं आहे.जगणं सुकर व्हावं म्हणून प्रेमही आवश्यक आहे. पण प्रेम किती असावं ? सध्या मी नवीन कादंबरी लिहतो आहे. या कादंबरीत एक तरुण आहे.त्याच्या घरात तीन विचित्र घटना घडल्या आहेत.परस्परांवर निरतिशय प्रेम असणारे दोघं तिघं वारलेत.म्हणजे तीन जोडप्यांपैकी एक पार्टनर गेला की दुसरा विरहाने,अन्नत्याग करुन गेला आहे. या मुळं या तरुणाला धक्का बसला आहे.मला जास्त प्रेम करणारं कोणी नको,ही त्याची भावना झाली आहे.योग्य प्रेम म्हणजे किती प्रेम,याचा शोध मी या कादंबरीत घेतो आहे. खरं म्हणजे,पराकोटीचं तीव्रतर प्रेम ही आपली मानसिक भूक आहे.कलाकृती मधून आम्हांला ते पाहयला आवडतं.प्रत्यक्ष जगताना आम्ही जगू तडजोडी करत पण जीवनाचं आणखीन शुध्द स्वरुप काय आहे,हे आम्हांला निदान बुध्दीनं जाणायचं आहे म्हणून असं प्रेम आम्हांला कलाकृतीमधून पाह्यला,वाचायला आवडतं.जीवनाचं शुध्द स्वरुप पाहण्याची ही माणसाची इच्छा टिकून राह्यली पाहिजे,असं मला वाटतं.”
खेकसत म्हणणे,आय लव्ह यू,’ ही श्याम मनोहरांची एक कादंबरी. या नावातला अंतर्विरोध पुरेसा बोलका आहे. त्याबद्दल विचारले असता श्याम मनोहरांनी आपली भूमिका स्पष्ट केली,  “ही खरं म्हणजे 'ती आणि तो'ची गोष्ट या कादंबरीतील त्या दोघांना परस्परांना आय लव्ह यू म्हणायचंय.पण साध्या साध्या व्यवहारातून त्या दोघांची मानसिक स्थिती विस्कटून जाते. प्रेमाची अभिव्यक्ती ही कृती अथवा भाषेतून होते.पण विस्कटलेल्या मानसिक स्थितीमुळे या अभिव्यक्तीत विरुपता येते.आणि म्हणून प्रेमाचा उदघोष खेकसत करायची वेळ येते.”
येळकोट या मनोहरांच्या नाटकातील एक पात्र म्हणते,”सामाजिक रुढी,नियम,संकेत,कायदे काहीही असू देत पण दोन व्यक्तींचे जर एकमेकांवर प्रेम असेल तर ते चोरुन मारुन,कोणत्याही मार्गे प्रेम करतच राहतील.” मनोहर सांगत असतात, “पण माणसाच्या मनात प्रेम आहे तसेच इतर वाईट भावनाही आहेत.या वाईट भावनांना काय शिस्त लावायची ?एकतर्फी प्रेमाला काय शिस्त लावायची,याचा पुरेसा विचार भारतीय सभ्यतेत झाला नाही,असे मला वाटते.एकतर्फी प्रेम ही आजची महत्वाची समस्या अहे.आणि याचा बराचसा त्रास स्त्रियांना सोसावा लागतो.आपल्या व्यवस्थेत स्त्री पुरुष दोघांनाही नियम आहेत.पण स्त्री विषयक नियम कठोर पणे  पाळले जातात मात्र पुरुषांना सूट मिळते कारण ते स्वतःच ही व्यवस्था इक्झेक्यूट करतात.”
“एकूणच स्त्रीपुरुष प्रेम,मित्रा मित्रांमधील प्रेम या सर्वच बाबतीत समाजात प्रेम व्यक्त करण्याची फ्रेक्वेन्सी कमी होत जाताना दिसते,प्रेमाची तीव्रताही कमी होताना दिसते. खरं म्हणजे, सार्वजनिक प्रेमाच्या अंगानेही प्रेमाकडे पाहिले पाहिजे.  मी आणि कंडक्टर किंवा मी आणि दुकानदार किती प्रेम करणार ? एक माणूस आणि दुसरा माणूस यांच्यात काही अंशांचं तरी प्रेम असलं पाहिजे. यासाठी पध्दती-रिती निर्माण करणे यातून सभ्यता निर्माण होत असते. व्यवहार सुकर होतील, अशा पध्दती आणणे, हे सार्वजनिक प्रेम आहे. या करिता व्यक्तीचा लोभ कमीत कमी ऑपरेट होईल, अशी पध्दती शोधली पाहिजे. भारतीय मन लोभी आहे पण त्याचे ऑपरेशन कसे होते, हे शोधण्यासाठी अमेरिकन मॉडेल उपयोगाचे नाही. मुळात प्रेम या गोष्टीकडे मी आणखी वेगळया नजरेने पाहतो, ज्ञानक्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना साह्यभूत होणे, क्रिएटीव्हिटीला साह्यभूत होणे म्हणजे प्रेम.”
समाजात जगणं आणि जीवन या बद्दलची समज वाढली पाहिजे. अहंकार जाणं आणि समज वाढणं उन्नत समाजाचं लक्षण आहे. समज वाढल्याने प्रेमाचा अविष्कार सहजगत्या होतो. आणि म्हणूनच सगळयांची समज वाढली पाहिजे. ‘लव्ह जिहादसारख्या गोष्टी सामाजिक समज भयाच्या छायेत नेतात.  लिव्ह इनरिलेशनशिप सैध्दान्तिक दृष्टया समज वाढल्याचे लक्षण आहे,” हे श्याम मनोहर मान्य करतात पण समाजाकडून ती कशाप्रकारे स्विकारली जात्येय यावर तिचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगतात.  चांगलं रुप, राह्यला बंगला, चांगले कपडे, उत्तम आरोग्य जरी नाही मिळालं, अगदी मरायचं क्षण आला तरी आपलं आपल्यावर प्रेम राह्यलं पाहिजे,’ हे 'बिनमौजेच्या गोष्टी' मधील वाक्य श्याम मनोहर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित करतात. इगोला नाहक उर्जा पुरवू नका पण स्वतःवर प्रेम पाहिजे.
प्रेम करण्याच्या योग्य पध्दती शोधायला हव्यात , हे सांगताना श्याम मनोहर दोन अफलातून उदाहरणे देतात, “ माझ्या मनात एक गंमतीशीर प्रश्न आहे.  समजा एक बिल्डर आहे. त्याच्या धंद्यातला काळा व्यवहार तो टाळू शकत नाही. आता अशा व्यक्तीवर प्रेम करणा-या माणसाने काय करावे?  इथं फिक्शन किंवा कलाकृती टोकाची भूमिका घेताना दिसतात, बंड आणि व्यवस्थेशी लढाई दाखवली जाते. पण बहुसंख्यवेळा हे व्यवहार्य नसते. मला वाटते, प्रेम करणा-या व्यक्तीने सांगितले पाहिजे, ‘ तुला काळा व्यवहार टाळता येत नाही, हे ठिक आहे पण हे चुकीचं चाललं आहे हे आत आत ओळख. व्यवस्थेला टक्कर देण्याची तुझी ताकद नाही म्हणून तू हे सहन करतो आहेस, हे लक्षात ठेव. या काळया व्यवहारातून प्रॉपर्टी मिळव, एन्जॉय कर पण या सा-यातून मानसिक शक्ती आणि पर्यायाने सत्ता वाढवू नकोस.”
असेच दुसरे उदाहरण. माझे आणि मंत्र्यामध्ये प्रेम असायला हवे. मंत्री कदाचित माझ्याबद्दल अधिक प्रेम दाखवेल.मंत्र्याला दाखवावं लागेल प्रेम जनता म्हणून पण ते प्रेम दाखविताना मंत्री हा पॉवरफुल आहे ही भावना मला येते. पण त्या पॉवर त्या पदाच्या आहेत, व्यक्ती म्हणून त्याच्या नाहीत, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता डोक्यात जाता कामा नये.”
कम्युनिझम ज्या प्रमाणे सरप्लस उत्पन्नाची गोष्ट करतो त्याच प्रमाणे श्याम मनोहर सरप्लस सायकॉलॉजिकल पॉवरची गोष्ट करतात. “ सर, हा तुमचा सायकॉलॉजिकल कम्युनिझम दिसतोय,” असं मी गंमतीनं म्हटल्यावर सर हसले.
अहंकार गेला की एक नवीन जीवन सुरु होते,” हा भारतीय सभ्यतेनं लावलेला सर्वात मोठा शोध आहे, सर सांगू लागतात. आध्यात्मिक प्रेम ही एक वेगळीच संकल्पना आहे, वेगळया प्रतलावरील! आपले सारे नातेसंबंध आध्यात्मिक अर्थानं ऍटचमेन्ट किंवा आसक्ती ठरतात. म्हणून तर बुध्द सत्याच्या शोधात प्रेम लाथाडून नव्हे तर आसक्ती सोडून गेला, हे लक्षात घेतले पाहिजे. आध्यात्मिक प्रेम हे सर्वाभूती आहे. त्यात लाभ हानीचा विचार नाही.
जो खांडावया घाऊ घाली l
की लावणी जयाने केली ll
त्या दोहो एकचि सावली l वृक्ष दे जैसा ll
या जातकुळीचे हे प्रेम आहे.”
फूल बघितलं की त्याच्या सौंदर्याची प्रचिती येते. हवा छान पडली की सगळयांना त्याची प्रचिती येते. तसं काही तरी प्रेमाचं आहे, क्वांटिटी किती ते सोडून द्या पण त्याची प्रचिती येते.”
श्याम मनोहर बोलत होते. मधूनचबरं चाललंय ना हे’, असं विचारतही होते. घरात अंधार पडला होता पण दिवा लावण्याचे भान कोणालाच उरले नव्हते. हे सारं काही फारच बरं चालल्याची खूण होती. किती ते सोडा, पण एक उजळलेली समज घेऊन दीपरेखातून बाहेर पडत होतो. आता जीपीएसची आवश्यकता उरली नव्हती
( दिव्य मराठी ' रसिक' पुरवणी - २९ मे २०१६ मध्ये प्रकाशित)