Friday 31 May 2013


मानो तो मैं गंगा मां हूं ...!
            
              मागच्या आठवडयात मान्सून अंदमानमध्ये येऊन धडकला आहे आणि जूनच्या पहिल्या आठवडयात तो केरळला येऊन पोहचेल आणि मग मुंबईत पाऊसधारा कोसळू लागतील. जीवघेणा उन्हाळा पावसाच्या पाण्यात वाहून जाईल आणि या दुष्काळाने दिलेले चटके, शिकविलेले धडे आपण नेहमी प्रमाणे विसरुन जाऊ. कारण आपल्या आजोबा वडिलांच्या पिढीची एकच कविता आपल्याला माहित आहे - 'नेमेचि येतो मग पावसाळा..!' भले आपण सारे नेम, नियम तोडत जाऊ,मोडत जाऊ पावसाने मात्र आपला नियम पाळायला पाहिजे, अशी आपली अपेक्षा..! कधी कधी प्रश्न पडतो,खरेच का आपल्याला पाण्याचे महत्व कळले आहे? 'अरे काय पाण्यासारखा पैसा खर्च करतो आहेस?', आपण किती सहज म्हणून जातो इतके आपण पाण्याला कःपदार्थ लेखले आहे. पाण्याविना तोंडचे पाणी पळायची वेळ आली तरी आपल्या डोक्यात प्रकाश पडायला तयार नाही. ज्या पध्दतीने आपण पाण्याचा वापर करतो आहोत आणि आपल्या नद्यांची जी अवस्था झाली आहे, ती पाहिली तर आपण स्वतः बसलेल्या फांदीवरच कु-हाडीचे घाव घालणा-या शेखचिल्लीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
     पाणी आणि आरोग्य यांचा संबंध इयत्ता पाचवीचे चिमुरडेही सांगेल पण आपली अवस्था कळते पण वळत नाही, अशी झाली आहे. मानवाला होणा-या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी ८५ टक्के आजार पाण्याच्या वाटेने आपल्यापर्यंत येतात, हे का आपल्याला माहित नाही? अतिसार या पाण्यामुळे होणा-या एकाच आजाराचे नाव पाणी आणि आरोग्याचा निकट संबंध सांगण्याकरिता पुरेसे आहे. अतिसार हे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडे तीन लाख मुले अतिसारामुळे मृत्यूमुखी पडतात. ही साधी सरळ माहिती आपण पाण्याच्या गुणवत्तेशी खेळतो तेव्हा आपल्याच आयुष्याशी, नव्हे नव्हे तर आपल्या लाडक्या लहानग्यांच्या आयुष्याशी खेळत असतो,हे आपल्या कानी कपाळी ओरडून सांगत असते. कावीळ, विषमज्वर (टायफॉईड),कॉलरा,पोलिओ अशी पाण्यामुळे होणा-या आजाराची यादी वाढतच जाते. २०१० मध्ये सोलापूर शहरात उद्भवलेली कॉलराची साथ आणि गेल्या वर्षी इचलकरंजी या महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर मध्ये आलेली काविळीची मोठी साथ आपण आपल्या पाण्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नाही,हेच सिध्द करतात.

   भारतात जगाच्या १७ टक्के लोकसंख्या राह्ते पण जगात उपलब्ध ताज्या पाण्यापैकी केवळ ४ टक्के पाणी साठे भारतात आहेत, ही लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध पाण्याची कमतरता लक्षात घेऊन आपण वागायला हवे पण "पाण्याचे दुर्भिक्ष, त्याची जीवनधारक क्षमता आणि आर्थिक मूल्य याची पुरेशी जाणीव नसल्याने आपण पाण्याचे नीट व्यवस्थापन करत नाही,पाणी वाया घालवतो,पाणी प्रदुषित करतो," असे चक्क राष्ट्रीय पाणी बोर्डाचे २०१२ चे निरिक्षण आहे आणि या साठीच आपल्याला एक राष्ट्रीय पाणी धोरण आखण्याची गरज या बोर्डाने अधोरेखित केली आहे. आज वातावरणातील विपरित बदलांमुळे जागतिक तापमानात वाढ होते आहे,त्यामुळे सागराच्या पातळीत वाढ होते आहे. या सा-याचा परिणाम आपले भूजल खारवण्यात होणार आहे. आणि म्हणूनच हे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी करण्यात येणारे उपाय आपले पाणी साठे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. आपले ऑटोमोबाईल धोरण बदलणे, ही काळाची गरज आहे. आज आपण प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन हवे, या पाश्चात्य धोरणाची री ओढतो आहोत. पण हे धोरण आपल्याला महागात पडणार आहे कारण या धोरणामुळे हरित गृह वायूंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन जगाचे तापमान वाढण्यास हातभार लागणार आहे. या साठी आपल्याला आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल पण असे होताना दिसत नाही आणि म्हणूनच प्रत्येक शहरांमध्ये वैयक्तिक वाहनांची संख्या बेसुमार वाढते आहे. आपण टकमक टोकावरुन कोसळण्याची का वाट पाहत आहोत?
     आपल्याला पाण्याचे नेमके मोल कळलेले नाही,हे सिध्द करायला फार दूर जायची गरज नाही. भारतातल्या नद्या पाहिल्या तरी हे लगोलग समजते. मानवी संस्कृती नद्यांकाठी वसली. नदीला माता म्हणायची आपली प्रथा..  गंगामैया ..! पण आज गंगेची अवस्था काय आहे? १९८५ पासून गंगा शुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला पण आज सुमारे २८ वर्षांनंतरही गंगेच्या पाण्याची गुणवत्ता हवी तशी सुधारली नाही. आजही सुमारे ६६ कोटी गॅलन सांडपाणी गंगेत कोणतेही प्रक्रिया न करता सोडले जाते. "मानो तो मैं गंगा मां हूं,ना मानो तो बहता पानी...!" असं दुःखाने म्हणणारी गंगा आज केवळ एक वाहणारे गटार मात्र झाली आहे. आपल्या दांभिकतेचे आणखी कोणते उदाहरण द्यावे? महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही. केंद्रीय प्रदुषण बोर्डाच्या दोन वर्षापूर्वीच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदुषित आहेत आणि त्या खालोखाल गुजरातमधील! तथाकथित विकासासोबत आपण या बाबतीतही गुजरातशी स्पर्धा करतो आहोत हे बाकी खरे! आपल्याकडील नद्या सर्वाधिक प्रदुषित आहेत कारण आपण सर्वाधिक विकसित (?) राज्य आहोत. पंचमहाभूतांपैकी एक असणा-या पाण्याचेच बारा वाजवून आपण कोणता शाश्वत विकास साधणार आहोत, ते एक आमचे नियोजनकर्तेच जाणोत. पुण्याची मुळामुठा या विकासाची फळे भोगते आहे. हा तथाकथित विकास तिच्या मुळावर आल्याने बिचारी जीव मुठीत घेऊन वाहते(?) आहे. शहरातून वाहणा-या अनेक नद्यांमधून केवळ औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी वाहते आहे. शुध्दीकरणानंतरही वापरता येणार नाही,इतके हे पाणी गये बिते झाले आहे. हे तुमच्या माझ्या आधुनिक शहरी जीवनाचे प्रतिबिंब तर नाही ना, अशी कधी कधी शंका येते. केंद्र स्तरावर राष्ट्रीय नदी बचाव योजना कार्यरत आहे पण तिच्या अंतर्गत देशातील फक्त ३९ तर महाराष्ट्रातील केवळ ४ नद्या येतात. आणि केवळ कागदावर योजना आखून काय होणार? त्याची यथायोग्य अंमलबजावणी नको?
   वाढत्या शहरीकरणासोबत वाढत जाणारी बांधकामे,त्यामुळे होणारा अपरिमित वाळू उपसा यामुळे देखील नद्यांचे जीवन संपुष्टात आले आहे. वाळू उपश्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नाहीसा होतो, पात्रातील मोठ्मोठ्या खड्ड्यांमूळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढते, पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया मंदावल्याने भूजल पातळी खालावते,नदीची पुनर्भरण क्षमता कमी होते आणि महत्वाचे म्हणजे पाणी नैसर्गिक रित्या शुध्द होण्याची क्षमता हरवते.हे सारे ठावे असूनही गावोगावी वाळू माफिया वाढताहेत. कारखाने, शेतीमधून आलेल्या सांडपाण्यामुळे पाण्यातील फ्ल्युराईड,नायट्रेट,अर्सेनिक अशा घातक रसायनांचे प्रमाण वाढते. त्याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होतो. औष्णिक विद्युत केंदातील राख पाण्यात मिसळल्याने कर्करोगजन्य क्रोमियमचे पाण्यातील प्रमाण वाढते. किटकनाशके, प्लास्टिक पाण्यात मिसळल्यानेही अनेक दुष्परिणाम संभवतात. 
  आमचे राजकीय धुरीण अनेक कारणांकरिता परदेशी वा-या करतात पण तेथून काही शिकून येतात की नाही, याची शंका येते. सिंगापूरचेच उदाहरण घ्या, हे शहर सिंगापूर या नदीभोवती वसले आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे, उदयोगधंद्यांच्या सांडपाण्यामुळे,तेल गळतीमुळे, वराहपालनातील कच-यामुळे ही नदी एवढी गलिच्छ झाली होती की ती आपले नदीपणच हरवून बसली होती. पाण्यातील जीवसृष्टी नष्ट झाली होती.पण १९७७ मध्ये तेथील पंतप्रधानांनी एक स्वप्न बोलून दाखविले," आज पासून बरोबर दहा वर्षांनी आपण आपल्या सिंगापूर नदीत मासे पकडू...!" गटार झालेल्या नदीत मासेमारी...? हसावे की रडावे ! पण ते एका राजकीय नेत्याचे निवडणुकीतील आश्वासन नव्हते. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे सिंगापूर नदी स्वच्छतेचा प्लॅन तयार करण्यात आला. नदीकाठचे कारखाने, झोपडपट्ट्या हलविण्यात आल्या, दैनंदिन  कच-याचे व्यवस्थित संकलन सुरु झाले. नदीच्या पात्रात शेकडो टन कचरा गाळ म्ह्णून जमा झाला होता, तो काढण्यात आला. बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १९८७ साली नदीतील प्रदुषणाने नाहीशी झालेली जीवसृष्टी नदीच्या निवळशंख पाण्यात पुन्हा अवतरली. आज सिंगापूर नदीत नौकानयन आणि अनेक प्रकारच्या जलक्रीडा बहरात आल्या आहेत. कधीकाळी गटार झालेली नदी सिंगापूरवासियांकरिता आनंदाचा ठेवा झाली आहे. हे होऊ शकते पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, लोकसहभाग हवा. आणि हे शिकण्यासाठी सिंगापूरला जाण्याची तरी काय गरज आहे? राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात राजेंद्र सिंह आणि त्यांच्या सहका-यांच्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अरवरी नदी साठ वर्षांनंतर पुन्हा वाहू लागली, आता ती बारमाही झाली. हे पुण्याच्या मुळा मुठाचे का होऊ शकत नाही? कोल्हापूरच्या पंचगंगेचे का होऊ शकत नाही. नक्कीच होऊ शकते.आपल्यात, आपल्या धोरणातच आधुनिक भगिरथ दडला आहे. भूजल पुनर्भरण-संधारण, पाण्याचा पुनर्वापर, छतावरील पाणी गोळा करणे, नद्यांची स्वच्छता, पाणी व्यवस्थापन या केवळ शब्दांत नव्हे तर त्यांच्या कृतिप्रवण उच्चारात सारे सामर्थ्य दडले आहे.
   मानवी इतिहासात नद्यांचे स्थान खूप मोठे आहे. त्यांनी मानवी जीवनाला नवी उभारी, नवी गती दिली आहे. पण आज जलपर्णी आणि विविध  घातक रसायनांनी गळा आवळलेल्या आपल्या नद्यांना पाहून स्वतःशीच एक शपथ घेऊ -
"आपणच जपू या, आपलं पाणी ...!
मिळून गाऊ या,आरोग्याची गाणी...! "
-डॉ.प्रदीप आवटे.
सी-१०४ सुवर्णरत्न गार्डन सोसायटी,
कर्वेनगर,पुणे -५२.
---------------------------------------------------------------------------------------------