Wednesday, 20 May 2026

सार्वजनिक आरोग्याची नवी आणीबाणी – इबोला

 


 माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव,इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो मास्तर एक आठवडाभर मस्त नदी काठची रपेट मारुन आला आणि २६ ऑगस्ट १९७६ ला एकदम तापाने फणफणला. दवाखाना,उपचार सारे काही झाले पण ८ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्याला विषाणूजन्य रक्तस्त्रावी तापाने घेरले होते.हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरुन या नव्या विषाणूचे बारसे “इबोला विषाणू”असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण.त्या वर्षी झैरे (कांगो)मध्ये जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले.ही इबोलाची पहिली साथ. या नंतर इबोला अधून मधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दुःस्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला. १९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भिती एवढी सर्वव्यापी आहे की १९९५ साली वोल्फगॅंग पीटरसनने इबोला सदृश्य मोटाबा या काल्पनिक आजारावर “आऊटब्रेक” नावाची हॉलीवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भिती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली.

 कांगो आणि युगांडा या देशात सध्या सुरु असलेल्या इबोला उद्रेकास जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी (PHEIC) म्हणून घोषित केले आहे. तथापी ही जागतिक महामारी ( पॅन्डेमिक ) नाही, हे ही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय ? 

सार्वजनिक आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी ( Public Health Emergency of International Concern - PHEIC फिक) ही संकल्पना काय आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे. वैश्विक आरोग्य परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन असा एक कायदा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. १९६७ च्या या कायद्यात कॉलरा, प्लेग आणि यलो फिवर हे तीनच आजार आंतरराष्ट्रीयदृष्ट्या नोटीफायेबेल होते. २००५ आली या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आणि त्यामध्ये कोणत्याही आजारापेक्षा फिक ही संकल्पना मांडण्यात आली. केवळ जैविक आजार हीच आरोग्य विषयक आणीबाणी असू शकत नाही ही नवीन महत्त्वपूर्ण धारणा यामधून पुढे आली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी (फिक) यामध्ये चार बाबी महत्त्वाच्या आहेत:

१) असामान्य आणि अनपेक्षित घटना घडणे

२) या घटनेचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम असणे.

३) या मध्ये आंतरराष्ट्रीय प्रसाराची शक्यता असणे 

४) त्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार यावर निर्बंध घालण्याची गरज लागू शकणे.

या चार पैकी कोणत्याही दोन किंवा अधिक बाबी होत असतील तर अशा घटनेला जागतिक आरोग्य संघटना आणीबाणी म्हणून घोषित करते. सध्या सुरु असलेला इबोला उद्रेक हा बुंडीब्युगो या उपप्रकारामुळे उदभवलेला आहे. या विषाणू प्रकाराविरुध्द कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कांगोच्या उत्तरेकडील इटुरा या प्रांतात या उद्रेकाची सुरुवात झालेली आहे. कांगोचा हा प्रांत खनिज समृध्द आहे आणि इथे स्थानिक अतिरेकी गटांमुळे अशांतता , हिंसा अशा बाबी नियमितपणे घडत असल्याने तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दुबळी असल्याने हा उद्रेक रोखणे कांगो करता आव्हानात्मक आहे तशात हा प्रांत उगांडा, सुदान या देशाचा सीमावर्ती भाग असल्याने हा संसर्ग नव्या देशांमध्ये शिरकाव करण्याची शक्यता वाढली आहे.

काय आहे हा इबोला ?

    इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे.इबोलाचा हा विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. या आजारातील मृत्यूचे प्रमाण ५० ते ९०%इतके प्रचंड आहे.सध्या सुरु असलेल्या इबोला उद्रेकात आतापर्यंत  पाचशेहून अधिक संशयित आणि सुमारे १०० मृत्यू झाले आहेत.

ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, घसादुखी, उलटी जुलाब, अंगावर रॅश उमटणे, रक्तस्त्राव ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.  या आजारात मूत्रपिंड आणि यकृताच्या कामात बिघाड होतो.

इबोला पसरतो कसा?

   वटवाघळाच्या काही प्रजाती, चिपांझी,गोरिला, माकडे आणि इतर प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो.ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीर स्त्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित प्राण्यांचे मांस खाणे हे देखील अनेकवेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते.

  पण एकदा का आजार माणसात आला की तो एका रुग्णापासून दुस-या निरोगी माणसाला होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा प्रादुर्भावही मुख्यत्वे शरीर द्रव्यामार्फत होतो. रक्त आणि इतर शरीर द्रव्यामार्फत या विषाणूचा प्रसार होत राहतो. मानवी वीर्यातही हा विषाणू सात आठवड्यांपर्यंत सापडतो.त्यामुळे एच आय व्ही,कावीळ ब या प्रमाणेच इबोला देखील शरीर संबंधांमार्फत पसरु शकतो.

   रुग्णाची सेवा करणारे नातेवाईक तसेच डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना हा आजार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आणि म्हणूनच रुग्णांवर उपचार करताना आणि त्यांची शुश्रुषा करताना त्यांच्या शरीरद्रव्याशी आपला संबंध येणार नाही, याची दक्षता आरोग्य कर्मचा-यांनी घेणे आवश्यक आहे. या उद्रेकात इबोलाची पहिली रुग्ण एक नर्सच होती.  

२०१४ मधील उद्रेकातील उदाहरण म्हणजे सिएरा लिओन देशातील डॉ.शेख उमर खान हे होय.  २९ जुलै २०१४ रोजी ते इबोलाने गेले.हा माणूस सुमारे दहा वर्षे इबोला रुग्णांवर उपचार करत होता.त्यांनी शंभरहून अधिक इबोला रुग्णांवर उपचार केले होते. या सा-यांमधील धोका त्यांना कळत होता पण तरीही एका प्रचंड निष्ठेने ते हे काम करत होते. “माझे माझ्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे.इबोला रुग्णावर उपचार करण्यातला धोका मला समजतो आणि म्हणूनच मी सर्वप्रकारची काळजी घेतो.हे काम करताना होणारा आनंद या धोक्यापेक्षा कितीतरी मोठा आहे,” आपल्या मृत्यूपूर्वी दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते. इबोला भोवती दाटलेले भयाचे वलय त्यांना पुसायचे होते आणि म्हणूनच आपल्या केमेना येथील रुग्णालयातील ब-या होऊन जाणा-या इबोला रुग्णाला ते जादूची झप्पी देऊन निरोप द्यायचे. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाळीत टाकू नये, हा उद्देश त्यामागे असायचा. पण इबोलाशी लढणारा जिद्दी योध्दा या लढाईत कामी आला. “आम्ही आज आमचा नॅशनल हिरो गमावला,” या शब्दांत सिएरा लिओनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेव्हा त्यांना श्रध्दांजली वाहिली होती.

   घातक आणि धोकादायक आजार हे वैद्यक शास्त्रासमोरचे आव्हान नेहमीच होते. कॉलरा काय किंवा प्लेग काय सा-यांमध्येच ही भिती होती पण येथे पळपुटी माणसे कामाची नसतात. आपल्या व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा, धैर्य आणि त्या सोबतच आवश्यक ती खबरदारी घेणारी माणसेच या आणीबाणीच्या प्रसंगी महत्वाची ठरतात. आणि म्हणूनच इबोला रुग्णांवर उपचार करताना पीपीई सारखी संरक्षक साधने वापरणे,रुग्णाच्या दूषित गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे  (जैववैद्यकीय कच-याचे व्यवस्थापन) या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. इबोला हा आजार स्वाईन फ्ल्यू सारखा हवेतून पसरत नाही त्यामुळे तो खूप वेगाने पसरु शकत नाही, हे ही महत्वाचे..! स्वाईन फ्ल्यूने अवघ्या अडीच महिन्यात सारे विश्व पादाक्रांत केले होते.

   या आजाराचा अधिशयन कालावधी २ ते २१ दिवस आहे. आजमितीला या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. काही प्रायोगिक औषधे वापरण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे खरे पण आजमितीला रुग्णाला लक्षणाधारित उपचार देण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. आपल्याकडे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्था,नवी दिल्ली येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

इबोला भारतात येऊ शकतो काय,हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा आणि चिंतेचा विषय. इबोला ज्या प्रकारे पसरतो हे लक्षात घेतल्यास,व्यवसाय किंवा पर्यटनासाठी या देशांमध्ये गेलेल्या प्रवाशांना इबोलाची बाधा होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डब्ल्यू एच ओ ने ही स्पष्ट केले असले तरी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

   वटवाघुळ हे इबोला विषाणू प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावते,असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आज १९७६ च्या तुलनेत शहरीकरण झालेल्या आफ्रिकेत पूर्वी इतक्या सहजतेने इबोलाचा उद्रेक थांबताना दिसत नाही. एखाद्या गावात झालेला उद्रेक ते संपूर्ण गाव विलग करुन आटोक्यात आणणे सोपे होते पण आज मात्र आफ्रिकन देशांच्या शहरी आणि मोठ्या प्रमाणात ये जा असणा-या भागात इबोलाची लागण होताना दिसते आहे आणि म्हणूनच मागील आठ महिन्यापासून हा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही आहे. जागतिकीकरणाच्या फांदीला हे इबोलाचे उलटे वटवाघूळ लटकले आहे.ते जणू आपल्या सा-या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीला वाकुल्या दाखवित आहे. आज आपल्या हातात आहे दक्षता आणि पायासमोर आहे मानवी हितासाठी अनेकांच्या त्याग आणि समर्पणाने सिध्द झालेली विज्ञानाची पाऊलवाट...! आज आपल्या सर्वांना खाली मुंडी वर पाय करायला लावणा-या या करामती वटवाघळाच्या शीर्षासनावरही उद्या उपाय सापडलेच पण तोवर हातात हात घेऊन चालू या. परस्परांची काळजी घेऊ या.

-         डॉ.प्रदीप आवटे.



Tuesday, 14 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म

 एक अस्पृश्य हिंदू म्हणून मी दुर्दैवाने जन्माला आलो. मी कोणत्या जातीत जन्माला यावे, हे काही माझ्या हाती नव्हते मात्र मला माणूस म्हणून अपमानित करणारी ही जात, हा धर्म मी फेकून देऊ शकतो आणि माझ्या परिस्थितीत सुधारणा करू शकतो आणि मी असं करू शकतो, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही .मी तुम्हा सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगतो, मी स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा माणूस म्हणून मरणार नाही,"

दिनांक १३ ऑक्टोबर १९३५  येवला जिल्हा नाशिक येथे आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते.  धर्मांतराबद्दलची घोषणा इतक्या सुस्पष्टपणे बाबासाहेब प्रथमच करत होते. ती रात्रीची वेळ होती आणि प्रत्यक्षात धर्मांतराचा तो क्रांतिकारी पहाटक्षण यायला अजून २१ वर्षांचा अवधी होता.



महात्मा गांधींसह अनेकांना बाबासाहेबांची ही घोषणा आश्चर्यकारक वाटली.नुकत्याच ऑगस्ट  १९३५  मध्ये गुजरात मधील आणंद जिल्ह्यातील एका गावात अस्पृश्य लोक आपली मुले शाळेत पाठवतात याचा राग येऊन तेथील गावकऱ्यांनी अस्पृश्य मंडळींवर सामाजिक बहिष्कार टाकला होता. त्यांना रोजंदारीची कामे देणे बंद केले. त्यांच्या पाणी पिण्याच्या विहिरीत केरोसीन टाकले. या त्रासाने नमून अखेरीस, ‘आम्ही आमची मुले शाळेत पाठवणार नाही,’ असे या अस्पृश्यांना   नाईलाजाने लिहून द्याव लागले. बाबासाहेबांची येवल्यातील घोषणा ही या घटनेच्या रागातून आणि भावनेच्या भरात केलेली घोषणा आहे, असे गांधीसह अनेकांना वाटले; परंतु बाबासाहेब भावनेच्या भरात एवढा मोठा सामाजिक निर्णय घेणारी व्यक्ती नव्हते. या साध्या वाक्यापाठीमागे त्यांचे, त्याच्या समाजाचे शेकडो वर्षांचे जगणे आणि त्यांचा स्वतःचा अवघा वैचारिक प्रवास दडलेला होता. बाबासाहेबांच्या या विलक्षण क्रांतिकारी घोषणे मागे कोणतेही तत्कालीन कारण नव्हते.

"आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥

जन्म गेला उष्टे खातां । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥

आमचे घरीं भात दहीं । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥

म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।कासया जन्म दिला मला ॥४॥"

असा रोखठोक प्रश्न १४  व्या शतकात साक्षात विठोबाला विचारणारा कर्ममेळा हा त्यांचा पूर्वसुरी होता. अस्पृश्य जातीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या तळहातावर हा प्रश्न जणू कोरलेला होता. बाबासाहेबांचे अवघे आयुष्य हा या प्रश्नाचा पाठलाग आणि त्याची सोडवणूक होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आणंद या जिल्ह्यातील अस्पृश्य समाजावरील  अन्यायाची घटना बाबासाहेबांनी स्वतः अनुभवलेल्या अनेक घटनांपैकी एक होती. जन्मल्यापासून ते परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतरही बडोदा संस्था, सिडेनहेम कॉलेज आणि इतरत्रही त्यांनी स्वतः अस्पृश्यतेचे चटके सोसले होते. वेटिंग फॉर अ व्हिसा’, या आपल्या १९३५  च्या पुस्तकात त्यांनी यासंदर्भातील सहा आठवणी लिहिल्या आहेत . जातीय विषमतेने भारतीय हिंदू समाज हा किती पोखरलेला आहे, हे ते हरघडी, हरदिवशी पहात होते, अनुभवत होते. साताऱ्यात खंडीभर न्हावी असताना देखील आपणा सर्व भावंडांचे केस आपल्या थोरल्या बहिणीलाच का कापावे लागतात, हा बालभीमाला पडलेला प्रश्न आता भीमकाय होऊन परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या विद्वान बाबासाहेबांना  पडला होता आणि त्याचे विश्लेषण एक समाजशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब करत होते.

बाबासाहेबांच्या मते, जातीय विषमतेने भारतीय समाजाचे केलेले नुकसान दुहेरी आहे. या विखारी विषमतेमुळे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आणि हीन मानल्या घेणाऱ्या गेलेल्या दोन्हीही जातीय गटांमध्ये कोणतेही नैतिक बळ आणि क्षमता उरलेली नाही या विषमतेमुळे शूद्र-अतिशूद्र जाती-जमातींमध्ये हीनतेची, अपमानाची भावना निर्माण झालेली आहे तर उच्च वर्णीयांमध्ये  नाहक बडेजाव तसेच खुनशीपणाची भावना निर्माण झालेली आहे. या व्यवस्थेमुळे कोणत्याच सामाजिक स्तराकडून आपल्याला उत्तुंग आणि उत्कृष्ट कार्य होताना दिसत नाही कारण चांगले पीक येण्यासाठी जमीन देखील तेवढीच कसदार असावी लागते, परंतु हिंदू धर्मातील विषमतामूलक वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि इतर देशांच्या तुलनेत आपण येथील समाजाला कित्येक शतके मागे नेऊन ठेवले आहे. फ्रान्समध्ये एका चांभाराचा मुलगा असलेला नेपोलियन सत्तास्थानी विराजमान होऊ शकतो, ब्रिटनमध्ये ज्याच्या आई-वडिलांचा पत्ता नाही असा रॅमसे मॅकडोनाल्ड सारखा मनुष्य पंतप्रधान होतो. युरोपमध्ये स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत  पण भारतामध्ये मात्र स्त्री शूद्र अतिशूद्रांना आजही साधेहे पवित्र अक्षर उच्चारण्याचे देखील स्वातंत्र्य नाही.

हिंदू समाजातील जातीय विषमतेबद्दलचे इतके मूलगामी निरीक्षण नोंदवूनही बाबासाहेब लगोलग धर्मांतराची गोष्ट करत नाहीत. आपण जर बाबासाहेबांचा वैचारिक प्रवास नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येते की, धर्मांतरासंदर्भातील बाबासाहेबांचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. तो हळूहळू उत्क्रांत होत गेलेला निर्णय आहे. १ फेब्रुवारी १९२९ रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिले होते की," धर्मांतर हा काही अस्पृश्यतेवरील तोडगा नाही. व्यक्तिगत पातळीवर तो तोडगा असू शकतो पण सर्व अस्पृश्यांसाठी मात्र तो मार्ग योग्य असेल, असे नाही. आपण ही ब्राह्मणी धार्मिक व्यवस्था मुळापासून नष्ट करू इच्छितो," असं सांगून बाबासाहेब म्हणतात की," खरा पुरुषार्थ हा खुल्या मैदानात अस्पृश्यतेशी दोन हात करण्यात आहे, तिच्यापासून दूर पळून जाण्यात नाही." याचा अर्थ बाबांसाहेबांची सुरुवातीची भूमिका ही हिंदू समाजासुधारणेची होती, हे स्पष्ट होते.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना जॉन ड्युई हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. जॉन ड्युई यांचा वैचारिक प्रभाव बाबासाहेबांवर निश्चितपणे जाणवतो. त्यांचे 'डेमोक्रसी अँड एज्युकेशन 'हे बाबासाहेबांचे एक आवडते पुस्तक. आदर्श समाजातील सहमतीपूर्ण जीवनाची 'असोसिएटेड लिविंग' ची संकल्पना आपल्या पुस्तकात ड्युई यांनी मांडली आहे. आपण त्याला आदर्श सामुदायिक जीवन असे देखील म्हणू शकतो. जॉन ड्युई  यांच्या मते आदर्श समाजात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्याचं कारण हे असोसिएटेड लिविंग.  या समाजात वेगवेगळ्या सामाजिक घटकांमधील सुसंवादासाठी अनेक प्लॅटफॉर्म, अनेक खिडक्या उपलब्ध असतात. ज्या समाजामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेली असते त्याच समाजामध्ये हे खरेखुरे सामुदायिक जीवन आपण अनुभवू शकतो. मात्र ज्या समाजामध्ये वर्ग आणि जातींमध्ये समाज विभागलेला असतो आणि एखाद्या  विशिष्ट वर्ग अथवा जातीकडे सत्ता केंद्रित झालेली असते तेव्हा हा वर्ग किंवा जात समाजातील इतर घटकाचे शोषण करत राहतो. अशा समाजात हे आदर्श सामुदायिक जीवन अभावानेच आढळते. जॉन ड्युई यांची असोसिएटेड लिव्हिंगची ही कल्पना बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामध्ये अनेकदा उधृत केलेली आढळते. अर्थात बाबासाहेबांनी अनेक पाश्चात्य आणि भारतीय लेखकांचे साहित्य वाचलेले असले तरी त्यांनीच म्हटल्याप्रमाणे यातील कोणताही लेखक हा त्यांचा हिरो नव्हता. याबाबतीत बाबासाहेब अत्यंत चोखंदळ आणि निवडक होते. जे योग्य आहे,समाजहिताचे आहे, तेच निवडून स्वतःच्या विचाराशी जोडून घेणे, ही बाबासाहेबांची खासियत!  कुणी कितीही थोर महान असले तरी बाबासाहेबांनी त्याचे अंधानुकरण केले नाही. त्यातील निवडक भाग वेचून,तो स्वतःच्या व्यक्तिमत्वात मुरवून त्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सहजभाव करणे, हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. बाबासाहेबांच्या संपूर्ण चरित्राचे अवलोकन करत असताना आपल्याला हे जागोजागी जाणवते की त्यांनी भारतीय समाजाचे रूपांतर एका आदर्श समाजात करण्यासाठी वेगवेगळ्या जातसमूहामध्ये संवादाचे नवनवे प्लॅटफॉर्म्स, खिडक्या कशा तयार करता येतील याचा विचार त्यांनी सदोदित केला. समाजात माणूसकी कशी नांदेल आणि  माणूस म्हणून प्रत्येक व्यक्ती अधिक कशी होईल, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महाडचा सत्याग्रह किंवा विविध ठिकाणी झालेले मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह या चळवळीतील विविध घटना हा एका अर्थाने हिंदू समाजाला खडबडून जागे करण्याचा अत्यंत तळमळीने केलेला प्रयत्न होता. दुर्दैवाने हे प्रयत्न समाजात फार दूरपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असलेला समाज निर्माण करण्याच्या बाबासाहेबांच्या प्रयत्नात इथल्या सनातनी समाजाने वारंवार अडचणी आणल्या.

हिंदू समाजात राहून जेव्हा लोकशाही पूरक अशा आदर्श समाजाची निर्मिती करण्याचे प्रयत्न विल होतात तेव्हा बाबासाहेब धर्मांतराच्या पर्यायाकडे गांभीर्याने पाहू लागतात कारण मुळात समाजासाठी धर्माची आवश्यकता आहे हे त्यांना मान्य आहे. धर्म आणि धर्माच्या सामाजिक प्रभावाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एखाद्या विद्युत प्रवाह वाहत असलेल्या जिवंत तारेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे, असा इशारा ते देतात आणि कार्ल मार्क्सप्रमाणे धर्माकडे नकारात्मक दृष्टीने पहात नाहीत.

"यतो अभ्युदय निश्रेय सिद्धिः स धर्मः" हे महर्षी कणादांच्या वैशेषिक दर्शनातील एक पायाभूत संस्कृत सूत्र आहे . यानुसार धर्म म्हणजे अशी गोष्ट आहे जी ऐहिक समृद्धी/प्रगती (अभ्युदय) आणि सर्वोच्च आध्यात्मिक मुक्ती किंवा अंतिम कल्याण (निश्रेय) या दोन्हींकडे घेऊन जाते, जे एक सुसंवादी, संतुलित जीवन अधोरेखित करते. आंबेडकर या विधानाचा उल्लेख करून असं म्हणतात की, हे सगळे तत्त्वज्ञान जर व्यवहारांमध्ये आणायचे नसेल तर ते काय फक्त चाटायचे आहे काय?

समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी त्याला एकतर कायद्याची मान्यता हवी असते किंवा नैतिकतेची. या दोन्ही शिवाय समाज अनेक तुकड्यांमध्ये विभाजित होऊ शकतो सर्वच समाजांमध्ये कायदा याबाबतीत खूप छोटी भूमिका बजावतो, केवळ मूठभर लोकांना सामाजिक शिस्तीच्या परिघांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो पण बहुसंख्य त्यातून सुटून जातात. या बहुसंख्य लोकांनाही सामाजिक शिस्तीच्या परिघांमध्ये आणायचे असेल तर नैतिकतेची एक चौकट, एक अधिमान्यता गरजेची असते, धर्म ही ती नैतिकतेची जाणीव आहे आणि म्हणून समाज धारणा करणारे ते एक महत्त्वाचे तत्व आहे.

समाजासाठी धर्म आवश्यक आहे, असे सांगताना बाबासाहेबांनी हा धर्म कसा असला पाहिजे याबाबतही विवेचन केले आहे  आधुनिक काळातील धर्माने तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्या  पाहिजेत, असा बाबासाहेबांचा आग्रह आहे. यातील पहिली परीक्षा म्हणजे हा धर्म विज्ञानाची कास धरणारा असायला हवा, दुसरी परीक्षा या धर्माने घालून दिलेले नीतीनियम हे स्वातंत्र्य, समता आणि सहभाव या तीन मूलभूत मानवी तत्वांशी  मेळ राखणारे, त्यांची जाणीव ठेवणारे हवेत आणि तिसरी महत्त्वाची चाचणी म्हणजे या धर्माने दारिद्र्याचे गौरवीकरण करता कामा नये. बाबासाहेबांना या तीनही चाचण्या उत्तीर्ण करण्याची क्षमता गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये दिसून येते कारण बुद्ध स्वतःला परमेश्वर समजत नाही, तो ईश्वरावर विश्वासही ठेवत नाही, त्याचा धर्म हा विवेक, तर्क आणि अनुभवावर आधारित आहे आणि तो स्वतः विषमतामूलक अशा चातुर्वर्ण विरोधी  आहे. गौतम बुद्धाने  दारिद्र्याचे नाहक कौतुक केलेले नाही. ही सगळी पृथ्वी आपलीच आहे आणि आपणच तिचे मालक आहोत, असे गोडवे त्यांनी गायले नाहीत उलटपक्षी त्यांनी श्रीमंतीचे, समृद्धीचे स्वागत केले. त्यांचा मुद्दा आहे तो एवढाच की,ही श्रीमंती, ही समृद्धी विनयशासित म्हणजेच नैतिक नियमांनी साध्य केलेली असावी. तुकारामांच्या भाषेत ‘ जोडोनीया धन उत्तम व्यवहारे..’ हेच बुद्धाचे सांगणे आहे. बौद्ध धम्म ‘ कारणाविना काहीही घडत  नाही , हे खुलेपणाने सांगण्याइतका इतका निखळ विज्ञानवादी आहे. तसेच तो समतावादी आहे. बाबासाहेबांच्या तिन्ही परीक्षा हा धम्म उत्तीर्ण होतो.

ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही या परस्परविरोधी बाबी आहेत,  आपल्याला लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण नाहीसा झाला पाहिजे. आज हिंदू समाजाची अवस्था अत्यंत दुबळी अशी आहे. पोटाचा नगारा झालेल्या, हाडाच्या काड्या झालेल्या, गालफाड बसलेल्या, डोळे खोल गेलेल्या अशा एखाद्या व्यक्तीसारखी या समाजाची स्थिती आहे. अशा समाजामध्ये लोकशाहीचा गाडा हाकण्याची इच्छा असू शकते पण शक्ती अजिबात नाही. ही शक्ती मिळवण्यासाठी या समाजाला ब्राह्मणी धर्माच्या चिखलातून शेकडो वर्षांपासून रुतलेला आपला गाडा बाहेर काढावा लागेल. गौतम बुद्ध हा एकमेव डॉक्टर आहे, जो या रोग्याला बरे  करू शकतो. गौतम बुद्धाचे स्मरण आणि त्यांनी दिलेली औषध घेणे हाच भारतामध्ये लोकशाही रुजवण्याचा एकमेव मार्ग आहे, या विचारांपर्यंत बाबासाहेब आपल्या अभ्यासातून येतात, हे त्यांचा वैचारिक प्रवास स्पष्ट करतो. अगदी शाळकरी वयांपासून गौतम बुद्ध बाबसाहेबांचा सांगाती राहिलेला आहे. बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महार समाजाने त्यांचा सत्कार करायचे ठरवले तेव्हा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी पोर वयातील  बाबासाहेबांच्या हाती त्यांचे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भेट म्हणून सोपविले. बुद्धाची आणि बाबासाहेबांची ही पहिली भेट होती. या पुस्तकाचा परिणाम असा झाला की, बाबासाहेबांनी आपल्या घरातच वडिलांना मूर्तीपूजा, रामायण महाभारत या संदर्भात अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि वडिलांनी यापूर्वी आपल्याला गौतम बुद्धा संदर्भातील साहित्य वाचायला का दिले नाही, असा प्रश्न त्यांनी केला. शाळकरी वयातील हे छोटे बंडच बाबासाहेबांना १९५६ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत घेऊन गेले.

 


बाबासाहेबांना जो सामाजिक बदल हवा आहे तो त्यांना वरवरचा नको आहे, त्यांना कायम स्वरूपी , दीर्घकालीन बदल अपेक्षित आहे. तो हिंसक क्रांतीतून येणार नाही, याची त्यांना खात्री आहे. सामाजिक बदलासाठी बाबासाहेबांचा विश्वास हा क्रांतिकारी मार्गापेक्षा देखील अधिक संविधानिक मार्गावर होता. एडमंड बर्क याने फ्रेंच क्रांतीवर केलेली टीका उदृत करून बाबासाहेब म्हणतात, क्रांतिकारी मार्गाची अंतिम निष्पत्ती अनेकदा अनिश्चित स्वरूपाची असते. अनेकदा या पद्धतीच्या क्रांतीमधून गोंधळ आणि आपत्तीची अवस्था निर्माण होते. क्रांती केवळ एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता हस्तांतरित करते परंतु अस्पृश्य आणि वंचित समूहाला केवळ सत्तेचे हस्तांतरण नको आहे तर त्यांना समाजामध्ये सत्तेचे समान वाटप करणारा सकारात्मक बदल हवा आहे आणि हा बदल हा केवळ संविधानिक मार्गानेच येऊ शकतो. आणि केवळ राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळाल्याने वंचित समूहाच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही, त्यांच्या सामाजिक उन्नयनातच खऱ्या अर्थाने त्यांच्या मुक्तीचा मार्ग दडला आहे.

बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास करून अस्पृश्य आणि वंचित जातींसाठी अखेरीस बौद्ध धम्माची निवड केली. या पाठीमागे बाबासाहेबांची निश्चित अशी वैचारिक भूमिका होती. बाबासाहेबांना या वंचित समूहासाठी धर्म तर हवा होताच पण असा धर्म जो घटनात्मक मूल्यांची मेळ राखेल. तो कुठेही घटनात्मक मूल्यांच्या विरोधी जाणार नाही. ही शक्यता त्यांना गौतम बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये अधिक प्रमाणात दिसली आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला.

माणसाला दुःखाच्या पलीकडे नेणारा हा धर्म खरे म्हणजे विज्ञानाची पहाट आहे. तो प्रतीत्य समुत्पाद या तार्किक मूल्यांवर आधारलेला आहे. एखाद्या वैज्ञानिकाला एखादा शोध लागावा तसा तो गवसला आहे. गौतम बुद्धाची आणखी एक खासियत म्हणजे तो स्वतःच्या चिकित्सेला खुली परवानगी देतो. मी उच्चारलेला शब्द हा अंतिम आहे, असे तो मानत नाही. म्हणजेच गौतम बुद्ध शब्दप्रामाण्य नाकारतो, तो त्याने स्वतः सांगितलेला धम्मदेखील कालानुरूप सुसंगत करण्यासाठी त्यातील बदल ग्राह्य मानतो आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारताना धम्माच्या मूळ तत्त्वज्ञानाचा कालसुसंगत असा अर्थ पुढे ठेवला.  हीनयान आणि महायान हे दोन पंथ बाबासाहेबांपूर्वी बौद्ध धम्मात होतेच; परंतु बाबासाहेबांनी जो धम्म स्वीकारला त्याला म्हणूनच नवयान असे म्हणतात. बाबासाहेबांनी सर्वप्रथम बुद्धाचा गृहत्याग आणि त्या संदर्भातील कथा, मिथके यांच्या पलीकडे जाऊन त्याच्या गृहत्यागाचे कारण हे शेजारील राज्याशी पाणी विषयक झालेल्या तंट्यातून कसे निर्माण झाले, हे स्पष्ट केले आहे. बुद्धाच्या पारंपारिक चरित्रापेक्षा हा भाग वेगळा आहे. बुद्ध ज्या दुःखाची गोष्ट करतो ते दुःख हे भौतिक दुःख आहे आणि त्याची कारणे सामाजिक आहेत, हे बुद्धाच्या वेगवेगळ्या शिकवणुकीतील बाबींचा आधार घेत बाबासाहेब स्पष्ट करतात. बुद्धाने पुन्हा पुन्हा वापरलेल्या कर्म या शब्दाचाही अत्यंत व्यावहारिक असा अर्थ बाबासाहेब लावतात.  गत जन्मीचे कर्म, पुनर्जन्म या बाबी बाबासाहेब नाकारतात.त्याचबरोबर बुद्धाच्या भिक्खू संघातील भिक्खूंच्या भूमिकेबद्दलही बाबासाहेब परिवर्तनशील भूमिका मांडतात. हे भिक्खू म्हणजे समाजामध्ये मिसळून समाजातील दोष दूर करणारे परिवर्तनशील दूत आहेत, ही बाबासाहेबांची भिक्खू संघाबद्दलची भावना आहे. गौतम बुद्धाला अपेक्षित असणारे सामाजिक परिवर्तन प्रत्यक्षात आणण्यासाठी बौद्ध भिक्खूंनी कार्यरत असले पाहिजे. त्यांनी धम्म कर्मकांड, पूजाअर्चा यामध्ये बांधून ठेवता कामा नये, हे बाबासाहेब सुस्पष्टपणे विशद करतात.

माणसाचे माणसासोबत असलेले नाते आणि माणसाचे पृथ्वीवरील जीवन हेच बौद्ध धम्माचे केंद्रीय आणि मूलभूत तत्व आहे, हे बाबासाहेब पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात. मनुष्याचे दुःख, वेदना, दारिद्र्य यासाठी बुद्धाने दिलेला प्रज्ञा, शील, मैत्र आणि करुणा यांचा मार्ग हा व्यावहारिक मार्ग आहे, हे आपण सर्वांनी समजावून घ्यायला हवे.

बाबासाहेबांनी दाखवलेल्या या बुद्धाच्या वाटेने जाण्यासाठी ‘धम्मधारा’ या माझ्या काव्यग्रंथात मी लिहिले आहे,

'तथागत पाहू, तथागत गाऊ

तथागत मार्गे, बोधिसत्व होऊ

मार्ग मित्रतेचा, मार्ग करुणेचा

बुद्ध दावी बघ, मार्ग माणसाचा! '

मित्रतेचा आणि करुणेचा हात हातात घेऊन माणसांच्या मार्गाने चालत जाणे हाच हीच बाबासाहेबांच्या स्मृतीला खरीखुरी आदरांजली आहे आणि हेच त्यांच्या लाडक्या तथागत गौतम बुद्धाचे स्मरण आहे हे आपण सर्वांनी ध्यानी ठेवले पाहिजे.


- प्रदीप आवटे