Friday, 18 July 2014

आरोग्याचे ‘अच्छे दिन’ कधी ?





आरोग्याचे अच्छे दिन कधी ?
- डॉ.प्रदीप आवटे.
                  सन १९९० हा भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक मैलाचा दगड. जागतिक अर्थकारणात झालेली उलथापालथ. रशियाच्या शतखंडीत होण्यासोबत एक ध्रुवीय झालेले जग, या पार्श्वभूमीवर विकसनशील अशा भारतासमोर नवी आव्हाने वासून उभी होती. या अत्यंत संदिग्धतेच्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर भारताचे आर्थिक नेतृत्व करणारे डॉ. मन मोहनसिंग १९९१ चा अर्थसंकल्प सादर करताना बोलले होते,“I do not minimize the difficulties that lie ahead on the long and arduous journey on which we have embarked. But as Victor Hugo once said, "no power on earth can stop an idea whose time has come". I suggest to this august House that the emergence of India as a major economic power in the world happens to be one such idea. Let the whole world hear it loud and clear. India is now wide awake. We shall prevail. We shall overcome.”  नव्या एन. डी. . सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केला तेव्हा मनमोहनसिंग यांच्या या ऐतिहासिक विधानाची पुन्हा एकदा आठवण झाली. युनियन बजेटला आपण मराठीत अर्थसंकल्प म्हणतो. आपली देश म्हणून, एक समाज म्हणून असणारी दिशा, आपले संकल्प आणि आशा यांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पडत असते. व्हिक्टर ह्युगोच्या ज्या विधानाचा उल्लेख मनमोहन सिंगांनी केला होता त्यातील आणखी एकानव्या आयडियाचा उगम कधी होणार, याची प्रतिक्षा भारतीय जनमानस करत आहे. ही आयडिया सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आहे. ‘युनिव्हर्सल हेल्थ कवरेजनावाची संकल्पना आपली राजकीय बांधिलकी म्हणून आपण स्वीकारणार आहोत का, आपण गंभीरपणे घेणार आहोत का या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर नव्या सरकारच्या अर्थसंकल्पात शोधायला मी उत्सुक होतो. ‘वॉट ऍन आयडिया सरजी, आयडिया कॅन चेंज युवर लाईफ…!” हे जाहिरातीच्या युगात जगणा-या आपल्यापैकी प्रत्येकाला ठावे आहे पण अस्सल, -या अर्थाने आयुष्य बदलून टाकणारी आयडिया आपल्या रेंजमध्ये येत नाही किंवा आपण तिच्या रेंजमध्ये जात नाही, असे काहीतरी सतत घडते आहे. युनिव्हर्सल हेल्थ कवरेज या संकल्पनेच्या बाबतीत हे शतप्रतिशत खरे आहे. 
   सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आपण आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे पाहिले तर काय दिसते? पहिला ठळक मुद्दा असतो, किती पैसा मिळाला ? २०१०-११ पासून आजपर्यंत सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद २२ हजार कोटींवरुन ३४ हजार कोटींवर आलेली दिसते. अर्थात आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या तीन टक्के तरतूदीपेक्षा कितीतरी कमी. गेले कितीतरी वर्षांपासून नियोजन आयोगाच्या विविध समित्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत सर्वजण सार्वजनिक आरोग्यासाठी जीडीपीच्या किमान तीन टक्के तरतूद असावी म्हणून कंठशोष करत आहेत. पण आरोग्याच्या ताटात एवढे वाढप करण्याचे धाडस कोणीही करावयाला तयार नाही. गाडी दीड पावणेदोन टक्क्यांच्या पुढे जायला तयार नाही. खरे तर देशभरात सार्वजनिक आरोग्याची स्थिती चिंता करण्याजोगी आहे. अमर्त्य सेन यांच्या गतवर्षी प्रकाशित झालेल्याऍन अनसर्टन ग्लोरीइंडिया ऍंड इटस् कॉन्ट्राडिक्शनस्या ग्रंथातील एका निबंधाचे शीर्षकच मोठे बोलके आहे – ‘इंडियाज् हेल्थ केअर क्रायसिस’..! म्हणजेच आज सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सा-या समस्येवर कल्पकतेने मार्ग काढणे आवश्यक आहे. या सा-या पार्श्वभूमीवर नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात काय दिसते, हे पाहणे महत्वाचे ठरावे

   अरुण जेटली यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यावरील तरतूदीत जरी फारमोठी घसघशीत वाढ केलेली नसली तरी आधीच्या सरकारने सुरु केलेल्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित ठेवतानाच काही नवीन महत्वपूर्ण योजनांचे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे. सुमारे सात हजार कोटींचा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा नव्या सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे जवळपास निम्मी लोकसंख्या शहरात राहते तिथे या प्रकल्पाचे मोल अधिक आहे. अर्थात या करिता सार्वजनिक आरोग्य सुविधा हा स्मार्ट सिटी संकल्पनेचा एक गाभाभूत घटक असणे,आवश्यक आहे. त्याची स्पष्टता अजून व्हावयाची आहे. देशातील कुपोषणासंदर्भात मिशन मोड मध्ये काम करण्यासाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा ही या अर्थसंकल्पाची जमेची बाजू होय. अनेकवेळा आरोग्याकरिता तरतूद करणे म्हणजे केवळ नवनवीन मेडीकल कॉलेज काढणे,एम्स सारख्या संस्था काढणे या पलिकडे नियोजकांचा विचार जात नाही पण या अर्थसंकल्पात ४ एम्स सारख्या संस्था आणि १२ वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य सेवा संदर्भात काही महत्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९ पर्यंत प्रत्येक घराला शौचालय सुविधा पुरविणे ही योजना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. जलजन्य आजार,इतर साथरोग, आरोग्य संवर्धन अशा अनेक बाबींवर याचा विधायक परिणाम होणार आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घर ही योजना देखील अशीच आरोग्य बाह्य वाटली तरी ती सार्वजनिक आरोग्याचीच योजना आहे,असे म्हणणे वावगे ठरु नये. पाण्याचे रासायनिक प्रदुषण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद तसेच मुलींच्या शाळेत पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था या साठी केलेली तरतूद विशेष उल्लेखनीय आहेत. मासिक पाळी सुरु झालेल्या मुलींसाठी शाळेत स्वच्छ शौचालय असणे,हे त्यांना या वयात आवश्यक असणा-या प्रायवसी साठी गरजेचे आहे. वयात येणा-या मुलींसाठी शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था नसणे हे अनेकवेळा त्यांच्या शाळा सोडण्याचे कारण असू शकते,हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे.त्यामुळे अर्थसंकल्पातील या तरतुदीला आरोग्यासोबतच स्त्री शिक्षणाचे एक सामाजिक अंगही आहे, लक्षात घ्यायला हवे. बेटी बचाओ,बेटी पढाओया योजनेचेही याच भूमिकेतून स्वागत व्हायला हवे. मला चॉकलेट शेअर करायला आवडत नाही पण २०१४ च्या अर्थसंकल्पानंतर मात्र मला सिगारेट शेअर करणे आवडणार नाही,” असे ओमर अब्दुल्लांनी विनोदाने म्हटले असले तरी तंबाखूजन्य उत्पादनावरील करवाढ ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
      मोठ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मेट्रो रेल्वेची कल्पना मांडली गेली पण या अनुषंगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करताना ऍटोमोबाईल धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. रस्त्यावरील कार आणि स्वयंचलित दुचाकींची संख्या कमी व्हावी आणि त्यातून पर्यावरणावरील विघातक परिणामांना आळा घालता यावा,यासाठी ऍटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना देण्याच्या आपल्या धोरणाचा आपल्याला पुनर्विचार करावा लागेल.शेतीपेक्षा कारसाठीची कर्ज सहज उपलब्ध असणे,आपल्याला कसे परवडू शकते? आपल्या कार्बनच्या पाऊलखुणा कमी करण्यासाठी धाडसी निर्णय अपेक्षित आहेत. जैवइंधनासाठी कोळशावरील टॅक्स वाढविणे,हा एक उपाय झाला आपल्याला त्या पुढे जावे लागेल.
    आरोग्यासाठी हे सारे असूनही हा अर्थसंकल्प सार्वजनिक आरोग्याला काही नवी दिशा देतो,असे म्हणता येणार नाही. अर्थमंत्री हेल्थ फॉर ऑल ची घोषणा करतात पण ती इतकी वरवरची आहे की सर्वांसाठी आरोग्याच्या गावाला जाण्याच्या रस्त्याचे दिशा निर्देशन ते करत नाहीत. सर्वांना मोफत औषधे आणि निदान व्यवस्था देण्याची ते घोषणा करतात पण त्यासाठी नव्याने उभा करण्यात येणा-या वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय संस्थांचा उल्लेख करतात तेव्हा ही हेल्थ फॉर ऑलची घोषणा तरी ती अर्धवट शिजलेली आहे,याची कल्पना येते. थायलंड, ब्राझील आणि मेक्सिको सारखे आपल्याच किंवा आपल्यापेक्षा कमकुवत आर्थिक प्रकृती असणारे देश युनिव्हर्सल हेल्थ कवरेजची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी होत असताना आपण मात्र अजूनही या संकल्पनेकडे पुरेशा गांभीर्याने पाह्यला तयार नाही. आरोग्यासाठी पुरेशा निधी,आरोग्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, सार्वजनिक आरोग्य योजनातील लोकसहभाग, औषधांची सहज व स्वस्त उपलब्धता,लसीकरण तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन –संस्थात्मक सुधारणा या कळीच्या मुद्द्यांबाबत अळीमिळी गुपचिळी घालून आपण सारे आरोग्याच्या गावाला कसे पोहचणार,हा प्रश्न या अर्थसंकल्पाने अधिक गडद होत जातो. श्रीनाथ रेड्डी समितीचा अहवाल या संदर्भात मार्गदर्शक ठरावा.
   युनिव्हर्सल हेल्थ कवरेज सारख्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणा-या अडथळ्यात सरकार इतकेच आपण सारे जबाबदार आहोत. १९७३ मध्ये मिलिटरी सरकारच्या जोखडातून मुक्त झालेला आणि तरीही सातत्याने राजकीय अस्थैर्याचा सामना करणारा इवलासा थायलंड हे करुन दाखवू शकतो कारण तिथे हा प्रश्न राजकीय अजेंड्यावरील विषय झाला. २००१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत तिथल्या लोकांनी युनिव्हर्सल हेल्थ कवरेज ची मागणी लावून धरली. देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही थाई राक थाई या पक्षाने ही मागणी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केली आणि याच प्रमुख मुद्द्यावर निवडणूकही जिंकली आणि सरकारी तिजोरीत पैसे अपुरे असतानाही,आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ युनिव्हर्सल हेल्थ कवरेज संकल्पना राबविणे शक्य नाही,असे सांगत असतानाही त्यांनी ही योजना प्रभावी व्यवस्थापन, कल्पकता,लोकसहभाग आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केली. आपल्यालाही राजकीय अजेंड्यावर युनिव्हर्सल हेल्थ कवरेज चा मुद्दा येण्यासाठी जनमताचा रेटा निर्माण करावा लागेल अन्यथा फ्लाय ओवर्स, मेट्रो आणि बुलेट ट्रेनच्या झंझावातात आपण आपले आरोग्य मात्र हरवून बसू...!
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे,”हा अर्थसंकल्प संजीवक आणि नवा अरुणोद्य दाखविणारा आहे.” सार्वजनिक आरोग्याचे आभाळ मात्र या संजीवक अरुणोदयाच्या प्रतिक्षेत आहे. नव्या सरकारला थोडा वेळ  तर द्यायलाच हवा आणि आरोग्याचे अच्छे दिन कधी येतील याची पावसाप्रमाणेच संयमाने वाटही पाह्यला हवी.

( लोकप्रभा -25 जुलै 2014 )

Saturday, 12 July 2014

ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी – ईश्वर डॉट कॉम



ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी
 – ईश्वर डॉट कॉम
-  डॉ.प्रदीप आवटे
       


 आजच्या उत्तर आधुनिक जगातील व्यक्ती,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सा-यांचेच आपल्या वस्तुनिष्ठ अस्तित्वासोबतच एक आभासी अवकाश देखील अस्तित्वात आहे. जग व्यापून टाकणा-या इंटरनेटच्या डब्ल्यूच्या बाराखडीत सगळ्यांची आभासी संकेतस्थळं दडली आहेत. ईश्वर – खरे तर ज्याच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाचाच कोणताही पुरावा नाही त्याने व्यापलेले अवकाश मात्र मानवी अस्तित्वाच्या वर्ल्ड वाईड वेबमध्ये सर्वाधिक आहे आणि त्याच्या भोवती धर्म, संस्कृती, श्रध्दा,परंपरा यांची सर्वशक्तीमान बेटे तयार झाली आहेत. मानवी जगण्यावर या सर्वशक्तिमान संकेतस्थळांची सत्ता सार्वभौम म्ह्णावी इतकी व्यापक आहे ईश्वर डॉट कॉम या कादंबरीत या संकेतस्थळांची कोड लॅंग्वेज डिकोड करत ही मुळातच फेक असलेली वेबसाईट मोडीत काढण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न विश्राम गुप्ते यांनी केला आहे.
   देवनगरी नावाच्या एका काल्पनिक शहरात घडणारी ही कथा गुप्ते यांनी अगदी नर्म विनोदी शैलीत सांगितली आहे आणि म्हणूनच अत्यंत गंभीर विषयावर तितक्याच गांभीर्यपूर्वक भाष्य करत असूनही कादंबरी आपल्याला अत्यंत खेळकरपणे टपल्या मारत आपल्या जुनाट पण सवयीच्या झालेल्या टोप्या उडवते आणि जागोजागी खळकन हसवते,हसवता हसवता पुन्हा अंतर्मुखही करते. खरे तर ही कादंबरी म्हणजे देवनगरीतील एका इंटेल्युक्चियल स्टडी सर्कलची गोष्ट आहे. सर्कल इज अ सर्कल जिकडं सरकल, तिकडं सरकल’, अशी सर्कलची एक गंमतशीर व्याख्या केली जाते,गुप्तेंचे स्टडी सर्कल या व्याख्येचे मूर्तिमंत रुप आहे. प्रोफेसर व्हिक्टर डिसुझा हा कॉमर्सचा प्राध्यापक असलेला गृहस्थ या स्टडी सर्कलचा सर्वेसर्वा...! बुध्दिमान विदूषक मेंडीस,सॉसेजचा इनसायक्लोपिडीया असलेला जॉन,जमीनदार कुळातून आलेला रॉय ,ऑन केलेल्या मिक्सरसारखे सतत डोके व्हायब्रेट होणारा पीटर, दलित लाडू, सतत धाप लागणारा पण फ्रेश फिशची पारख असणारा साविओ, छुपी कट्टरता बाळगणारा सिरील, त्या शिवाय हिंदू संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणारा दत्ताराम, विशीतला परशुराम आणि मेंडेलिन, लुईझा, शांती आणि रेश्मा ही उत्साहाने फुरफुरणारी महिला ब्रिगेड...हे सारे या स्टडी सर्कलचे सदस्य ! या सर्कलचा प्रत्येक नमुना ऑफ बीट आहे. या सा-यात आपल्याला गोष्ट सांगणारा निवेदक, तो ही या सर्कलचा भाग आहे. जगण्याच्या प्रत्येक खिडकीत डोकावण्याची बालसुलभ उत्सुकता असलेला आणि प्रत्येक नव्या दर्शनासोबत युरेका युरेका म्हणत आर्किमिडीज उत्साहाने नागव्याने नाचणारा आणि जे त्याला गवसले, दिसले ते तितक्याच स्फटिक स्वच्छ पध्दतीने आपल्या पर्यंत पोहचविणारा निवेदक हे या कादंबरीचे बलस्थान आहे. “लौकरच चार तरुण मुली प्रोंच्या सर्कलमध्ये सामील झाल्या.पण ती गंमत पुढे येईलच,” अशा परंपरागत ह.ना.आपटे शैलीत बोलणारी ही कादंबरी प्रत्यक्षात मात्र परंपरेचा हरेक पापुद्रा कांदा उलगडावा तशी उलगडत जाते.शैली आणि आशय यांच्यातील हे कॉन्ट्रास्ट मॅचिंग वेधक आहे.
   असे हे सर्कल प्रत्येक आठवड्याला नियमितपणे भेटते आहे. काळाला बारकाईने वाचू पाहणा-या प्रो.डिसुझांना नवं काही घडावं असं सतत वाटत राहतं. नव्या युगातला माणूस ईश्वर,श्रध्दा, तथाकथित संस्कृती आणि परंपरांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे,यासाठी त्यांचा अवघा चर्चा प्रपंच आहे. पण या सर्कलाला कोणताही विषय वर्ज्य नाही. ईश्वरी साक्षात्कारापासून ते समलिंगी संबंधापर्यंत सारे काही चहा बिस्किटासोबत चगळले जाते.  आजूबाजूला घडणा-या प्रत्येक घडामोडीवर खमंग चुरचुरीत चर्चा झडते आहे. सतत इकडे तिकडे भरकटणारे हे चर्चेचे जहाज हरेकवेळी योग्य मार्गावर आणण्याचे म्हत्कार्य प्रोंचे आहे. अर्थात हे भरकटणे निव्वळ बिटिंग अबाऊट द बुश नाही, ते आपल्याला अनेकदा योग्य रस्ता शोधण्याला मदत करणारे आहे. मेंडीस, जॉन आणि रॉय या त्रिकुटांच्या गमती जमतीतून अंतर्मुख करणारे निरिक्षण आपल्यापर्यंत पोहचते. अजगराची उशी करुन झोपणारा शीर्षासन स्पेशॅलिस्ट अवलिया पॉल,  रात्रीच्या गोंगाट करणा-या बीचवरील पार्ट्या बंद पडाव्यात म्हणून एग बॉम्ब फेकणारा सनातनी हेकट नथन अंकल, करिष्माटिक ग्रुपची विल्मा या सा-या पात्रांनी या चर्चात्मक कादंबरीला नवा नवा आयाम दिला आहे. स्टडी सर्कलच्या अनेक वादविवादातून, निवेदनातून अनेक नवी दृष्टी देणारी वाक्ये लोण्याच्या गोळ्यासारखी आपल्या हातात पडतात. “श्रद्धा ही अंडरवेअरसारखी खाजगी गोष्ट असते.ये अंदर का मामला है...” ,”आमच्या शहरातले सगळी चर्च, सगळ्या मशिदी आणि सगळी देवळं कायम नवी कोरी दिसतात.माणसाची त्वचाही भिंतीसारखी दणदणीत,रंगोत्सुक आणि रंगशोषक असायला हवी होती.मग माणसं जुनी दिसलीच नसती.आली दिवाळी किंवा ख्रिसमस किंवा ईद की मारला त्वचेला नवा रंग,न्यू मॅनहोणं किती सोपं झालं असतं मग !” हे त्याचे काही मासले. परंपरा,जुनाट तर्कदुष्ट श्रध्दा,देवभोळेपण या सा-यांचे जुनाट पापुद्रे खरवडून काढून नवं होण्याची असोशी,तगमग या कादंबरीच्या गुदगुल्या होत असलेल्या कातडीखाली वाहते आहे. आणि म्हणूनच रुढार्थाने कोणताही प्रोटागोनिस्ट नसलेल्या या कादंबरीचा अवतीभवती पसरलेला परंपराग्रस्त समाज हाच खरा नायक आहे.
 पण प्रो. डिसुझांच्या पत्नी कॅरलने म्हटल्याप्रमाणे केवळ “टॉक टॉक आणि टॉकणा-या या कंपूला पॉल,नथन अंकल अशा अनेकांनी टोचल्यानंतर आपल्या टॉक प्रमाणे काही वॉक वॉक वॉक ण्याचीही इच्छा होते. त्यानुसार पूर्वाश्रमीच्या दलित ख्रिश्चनांना आजही चर्चमध्ये मागे बसावे लागते, या छुप्या जातीयतेविरुध्द सर्कल बंड पुकारते पण दलितवाड्यातील हे बंड सेंट जेरॉम चर्च पर्यंत न पोहचताच थंड होते त्यानंतर वेताळबाबाच्या बड्डेला हजारो वर्षांपासून होत असलेल्या रेडा बळीची प्रथा बंद पाडण्यासाठी स्टडी सर्कल सरसावते आणि गनिमी काव्याचा वापर करुन यशस्वीही होते. कादंबरीच्या कथेचा ऐवज म्हटले तर एवढाच आहे पण रानात पळून गेलेल्या रेड्यासारखा धर्म,परंपरा,श्रध्दा आणि संस्कृती यांच्या खुंटीला युगानुयुगे बांधलेला आपला विवेकही ते दावे तोडून मोकळा होऊन विशाल मानवतेच्या रानात मोकळा श्वास घेऊ पाहतो,हे या कलाकृतीचे यश आहे.
    विश्राम गुप्तेंची शैली अत्यंत लक्षवेधक आहे. वरवर पाहता केवळ बौध्दिक चर्चांचा भरणा असलेली कादंबरी कोठेही कंटाळवाणी होणार नाही,याची दक्षता गुप्तेंच्या नर्म विनोदी आणि खेळकर शैलीने घेतली आहे. त्याचवेळी मुळात फारसे काहीच घडत नसलेल्या या कथेत वाचकांनी खिळून राहण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली पॉल,नथन अंकल, विल्मो, नताशा,पीटर ही स्वतःभोवती धुक्यासारखी विरविरित गूढता पांघरणारी पात्रे साह्यभूत ठरतात आणि त्याचवेळी कादंबरीच्या मध्यवर्ती चर्चेला पुढे नेतात. पीटरचे शांग्रीलाहे घर,त्याची पियानो वाजविणारी बहीण नताशा,तिचे चुंबकीय लावण्य या सा-यांचे वर्णन करताना गुप्तेंची नर्म विनोदी लेखणी रोमॅंटिक,गूढरंजनवादी कवितेसारखी वाहू लागते. कादंबरीतील हे भाग कमालीचे वाचनीय झाले आहेत. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ अर्थपूर्ण  आणि मार्मिक आहे.
   ही कादंबरी घडते देवनगरी या काल्पनिक शहरात..! पण हे शहर आहे कोठे ? गुप्ते म्हणतात,तुमच्या माझ्या सभोवती. असे असले तरी ही देवनगरी म्हणजे गोवा आहे,हे कोणाही चाणाक्ष (?आत्मस्तुती) वाचकाच्या सहज लक्षात येईल. समुद्र किनारा, ख्रिश्चनबहुल लोकसंख्या, बीचवर अत्यल्प कपड्यात फिरणारे परदेशी पर्यटक हे सारे असल्यावर आणि काय असणार ? आणि म्हणूनच धर्म आणि ईश्वर या विषयाभोवती फिरणारी ही कादंबरी मुख्यत्वे ख्रिश्चन आणि हिंदू धर्माभोवती फिरते. वास्तविक पाहता भारत नावाच्या देवनगरीत अवघे राजकारण हिंदू –मुसलमान या द्वैताभोवती फिरत असताना कादंबरी मुस्लिम धर्माबाबत काही भाष्य करत नाही. प्रों.च्या स्टडी सर्कल मध्ये एकही मुस्लिम नाही. जी गोष्ट मुस्लिम धर्माची तीच बौध्द धर्माची..! ईश्वर नाकारणा-या विचारवंताचे ईश्वरीकरण कसे होत जाते,या परिप्रेक्षातही बुध्द या चर्चेत अनिवार्य ठरतो. राजकारण आणि  धर्म – संस्कृतीच्या आंतरसंबंधाबद्दल ही कादंबरी नेमके भाष्य करायचे टाळते. जातीव्यवस्थेचा उल्लेख असला तरी आरक्षण आणि त्याचे राजकारण या दलदलीत शिरायचे धाडस कादंबरीकार करत नाही. प्रस्थापित धर्म आणि परंपरा यांना ढुसण्या देणारा व्हिक्टर डिसुझा हा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. शिक्षणसंस्थांमध्ये नोकरी करताना या प्रकारचे काम करताना होणारा त्रास, शिक्षणसंस्था,विद्यार्थी संघटना आणि राजकारण या सा-या बाबींकडे डोळेझाक झाली आहे. दैनिक भंबेरी आणि दंडेली सारख्या वर्तमानपत्रांच्या उदाहरणातून आजच्या जगातील माध्यमांची दिवाळखोरी गुप्ते दाखवितात पण २०१२ मधल्या या देवनगरीत २४ × ७ चालणारे,टॉक शोंचे गु-हाळ चालविणारे एकही न्यूज चॅनेल नसावे याचे आश्चर्य वाटते. कथानकातील सोशल मिडिया आणि त्यावरील स्टेटस युध्द यांचा अभावही खटकतो.
   पण या सा-या मर्यादा मान्य करुनही “बर्फाची लादी झालेला  देवनगरीतला हा अनादी अनंत काळ केव्हा तरी वितळेल.मग इथली माणसं नवी होऊन झरझर,झुळूझुळू वाहू लागतील.तेव्हा कुठे इथे नवी संवेदना जन्म घेईल,”असं म्हणणा-या प्रो.डिसुझांचा आशावाद आपल्या आजच्या गोठलेल्या काळात रुजविण्यासाठी आणि ही बर्फाची लादी वितळविण्यासाठी ही कादंबरी एक प्रामाणिक आच, एक ह्रदयस्पर्शी, हवीहवीशी वाटणारी ऊब निर्माण करते, हेच तिचे ईप्सित आहे आणि यातच तिचे वेगळेपण दडले आहे. 
(मुक्त शब्द - जुलै २०१४)