Saturday, 12 July 2014

ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी – ईश्वर डॉट कॉम



ईश्वर,धर्म आणि परंपरेच्या वेबसाईटसना धक्का देणारी
 – ईश्वर डॉट कॉम
-  डॉ.प्रदीप आवटे
       


 आजच्या उत्तर आधुनिक जगातील व्यक्ती,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सा-यांचेच आपल्या वस्तुनिष्ठ अस्तित्वासोबतच एक आभासी अवकाश देखील अस्तित्वात आहे. जग व्यापून टाकणा-या इंटरनेटच्या डब्ल्यूच्या बाराखडीत सगळ्यांची आभासी संकेतस्थळं दडली आहेत. ईश्वर – खरे तर ज्याच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाचाच कोणताही पुरावा नाही त्याने व्यापलेले अवकाश मात्र मानवी अस्तित्वाच्या वर्ल्ड वाईड वेबमध्ये सर्वाधिक आहे आणि त्याच्या भोवती धर्म, संस्कृती, श्रध्दा,परंपरा यांची सर्वशक्तीमान बेटे तयार झाली आहेत. मानवी जगण्यावर या सर्वशक्तिमान संकेतस्थळांची सत्ता सार्वभौम म्ह्णावी इतकी व्यापक आहे ईश्वर डॉट कॉम या कादंबरीत या संकेतस्थळांची कोड लॅंग्वेज डिकोड करत ही मुळातच फेक असलेली वेबसाईट मोडीत काढण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न विश्राम गुप्ते यांनी केला आहे.
   देवनगरी नावाच्या एका काल्पनिक शहरात घडणारी ही कथा गुप्ते यांनी अगदी नर्म विनोदी शैलीत सांगितली आहे आणि म्हणूनच अत्यंत गंभीर विषयावर तितक्याच गांभीर्यपूर्वक भाष्य करत असूनही कादंबरी आपल्याला अत्यंत खेळकरपणे टपल्या मारत आपल्या जुनाट पण सवयीच्या झालेल्या टोप्या उडवते आणि जागोजागी खळकन हसवते,हसवता हसवता पुन्हा अंतर्मुखही करते. खरे तर ही कादंबरी म्हणजे देवनगरीतील एका इंटेल्युक्चियल स्टडी सर्कलची गोष्ट आहे. सर्कल इज अ सर्कल जिकडं सरकल, तिकडं सरकल’, अशी सर्कलची एक गंमतशीर व्याख्या केली जाते,गुप्तेंचे स्टडी सर्कल या व्याख्येचे मूर्तिमंत रुप आहे. प्रोफेसर व्हिक्टर डिसुझा हा कॉमर्सचा प्राध्यापक असलेला गृहस्थ या स्टडी सर्कलचा सर्वेसर्वा...! बुध्दिमान विदूषक मेंडीस,सॉसेजचा इनसायक्लोपिडीया असलेला जॉन,जमीनदार कुळातून आलेला रॉय ,ऑन केलेल्या मिक्सरसारखे सतत डोके व्हायब्रेट होणारा पीटर, दलित लाडू, सतत धाप लागणारा पण फ्रेश फिशची पारख असणारा साविओ, छुपी कट्टरता बाळगणारा सिरील, त्या शिवाय हिंदू संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणारा दत्ताराम, विशीतला परशुराम आणि मेंडेलिन, लुईझा, शांती आणि रेश्मा ही उत्साहाने फुरफुरणारी महिला ब्रिगेड...हे सारे या स्टडी सर्कलचे सदस्य ! या सर्कलचा प्रत्येक नमुना ऑफ बीट आहे. या सा-यात आपल्याला गोष्ट सांगणारा निवेदक, तो ही या सर्कलचा भाग आहे. जगण्याच्या प्रत्येक खिडकीत डोकावण्याची बालसुलभ उत्सुकता असलेला आणि प्रत्येक नव्या दर्शनासोबत युरेका युरेका म्हणत आर्किमिडीज उत्साहाने नागव्याने नाचणारा आणि जे त्याला गवसले, दिसले ते तितक्याच स्फटिक स्वच्छ पध्दतीने आपल्या पर्यंत पोहचविणारा निवेदक हे या कादंबरीचे बलस्थान आहे. “लौकरच चार तरुण मुली प्रोंच्या सर्कलमध्ये सामील झाल्या.पण ती गंमत पुढे येईलच,” अशा परंपरागत ह.ना.आपटे शैलीत बोलणारी ही कादंबरी प्रत्यक्षात मात्र परंपरेचा हरेक पापुद्रा कांदा उलगडावा तशी उलगडत जाते.शैली आणि आशय यांच्यातील हे कॉन्ट्रास्ट मॅचिंग वेधक आहे.
   असे हे सर्कल प्रत्येक आठवड्याला नियमितपणे भेटते आहे. काळाला बारकाईने वाचू पाहणा-या प्रो.डिसुझांना नवं काही घडावं असं सतत वाटत राहतं. नव्या युगातला माणूस ईश्वर,श्रध्दा, तथाकथित संस्कृती आणि परंपरांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे,यासाठी त्यांचा अवघा चर्चा प्रपंच आहे. पण या सर्कलाला कोणताही विषय वर्ज्य नाही. ईश्वरी साक्षात्कारापासून ते समलिंगी संबंधापर्यंत सारे काही चहा बिस्किटासोबत चगळले जाते.  आजूबाजूला घडणा-या प्रत्येक घडामोडीवर खमंग चुरचुरीत चर्चा झडते आहे. सतत इकडे तिकडे भरकटणारे हे चर्चेचे जहाज हरेकवेळी योग्य मार्गावर आणण्याचे म्हत्कार्य प्रोंचे आहे. अर्थात हे भरकटणे निव्वळ बिटिंग अबाऊट द बुश नाही, ते आपल्याला अनेकदा योग्य रस्ता शोधण्याला मदत करणारे आहे. मेंडीस, जॉन आणि रॉय या त्रिकुटांच्या गमती जमतीतून अंतर्मुख करणारे निरिक्षण आपल्यापर्यंत पोहचते. अजगराची उशी करुन झोपणारा शीर्षासन स्पेशॅलिस्ट अवलिया पॉल,  रात्रीच्या गोंगाट करणा-या बीचवरील पार्ट्या बंद पडाव्यात म्हणून एग बॉम्ब फेकणारा सनातनी हेकट नथन अंकल, करिष्माटिक ग्रुपची विल्मा या सा-या पात्रांनी या चर्चात्मक कादंबरीला नवा नवा आयाम दिला आहे. स्टडी सर्कलच्या अनेक वादविवादातून, निवेदनातून अनेक नवी दृष्टी देणारी वाक्ये लोण्याच्या गोळ्यासारखी आपल्या हातात पडतात. “श्रद्धा ही अंडरवेअरसारखी खाजगी गोष्ट असते.ये अंदर का मामला है...” ,”आमच्या शहरातले सगळी चर्च, सगळ्या मशिदी आणि सगळी देवळं कायम नवी कोरी दिसतात.माणसाची त्वचाही भिंतीसारखी दणदणीत,रंगोत्सुक आणि रंगशोषक असायला हवी होती.मग माणसं जुनी दिसलीच नसती.आली दिवाळी किंवा ख्रिसमस किंवा ईद की मारला त्वचेला नवा रंग,न्यू मॅनहोणं किती सोपं झालं असतं मग !” हे त्याचे काही मासले. परंपरा,जुनाट तर्कदुष्ट श्रध्दा,देवभोळेपण या सा-यांचे जुनाट पापुद्रे खरवडून काढून नवं होण्याची असोशी,तगमग या कादंबरीच्या गुदगुल्या होत असलेल्या कातडीखाली वाहते आहे. आणि म्हणूनच रुढार्थाने कोणताही प्रोटागोनिस्ट नसलेल्या या कादंबरीचा अवतीभवती पसरलेला परंपराग्रस्त समाज हाच खरा नायक आहे.
 पण प्रो. डिसुझांच्या पत्नी कॅरलने म्हटल्याप्रमाणे केवळ “टॉक टॉक आणि टॉकणा-या या कंपूला पॉल,नथन अंकल अशा अनेकांनी टोचल्यानंतर आपल्या टॉक प्रमाणे काही वॉक वॉक वॉक ण्याचीही इच्छा होते. त्यानुसार पूर्वाश्रमीच्या दलित ख्रिश्चनांना आजही चर्चमध्ये मागे बसावे लागते, या छुप्या जातीयतेविरुध्द सर्कल बंड पुकारते पण दलितवाड्यातील हे बंड सेंट जेरॉम चर्च पर्यंत न पोहचताच थंड होते त्यानंतर वेताळबाबाच्या बड्डेला हजारो वर्षांपासून होत असलेल्या रेडा बळीची प्रथा बंद पाडण्यासाठी स्टडी सर्कल सरसावते आणि गनिमी काव्याचा वापर करुन यशस्वीही होते. कादंबरीच्या कथेचा ऐवज म्हटले तर एवढाच आहे पण रानात पळून गेलेल्या रेड्यासारखा धर्म,परंपरा,श्रध्दा आणि संस्कृती यांच्या खुंटीला युगानुयुगे बांधलेला आपला विवेकही ते दावे तोडून मोकळा होऊन विशाल मानवतेच्या रानात मोकळा श्वास घेऊ पाहतो,हे या कलाकृतीचे यश आहे.
    विश्राम गुप्तेंची शैली अत्यंत लक्षवेधक आहे. वरवर पाहता केवळ बौध्दिक चर्चांचा भरणा असलेली कादंबरी कोठेही कंटाळवाणी होणार नाही,याची दक्षता गुप्तेंच्या नर्म विनोदी आणि खेळकर शैलीने घेतली आहे. त्याचवेळी मुळात फारसे काहीच घडत नसलेल्या या कथेत वाचकांनी खिळून राहण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली पॉल,नथन अंकल, विल्मो, नताशा,पीटर ही स्वतःभोवती धुक्यासारखी विरविरित गूढता पांघरणारी पात्रे साह्यभूत ठरतात आणि त्याचवेळी कादंबरीच्या मध्यवर्ती चर्चेला पुढे नेतात. पीटरचे शांग्रीलाहे घर,त्याची पियानो वाजविणारी बहीण नताशा,तिचे चुंबकीय लावण्य या सा-यांचे वर्णन करताना गुप्तेंची नर्म विनोदी लेखणी रोमॅंटिक,गूढरंजनवादी कवितेसारखी वाहू लागते. कादंबरीतील हे भाग कमालीचे वाचनीय झाले आहेत. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ अर्थपूर्ण  आणि मार्मिक आहे.
   ही कादंबरी घडते देवनगरी या काल्पनिक शहरात..! पण हे शहर आहे कोठे ? गुप्ते म्हणतात,तुमच्या माझ्या सभोवती. असे असले तरी ही देवनगरी म्हणजे गोवा आहे,हे कोणाही चाणाक्ष (?आत्मस्तुती) वाचकाच्या सहज लक्षात येईल. समुद्र किनारा, ख्रिश्चनबहुल लोकसंख्या, बीचवर अत्यल्प कपड्यात फिरणारे परदेशी पर्यटक हे सारे असल्यावर आणि काय असणार ? आणि म्हणूनच धर्म आणि ईश्वर या विषयाभोवती फिरणारी ही कादंबरी मुख्यत्वे ख्रिश्चन आणि हिंदू धर्माभोवती फिरते. वास्तविक पाहता भारत नावाच्या देवनगरीत अवघे राजकारण हिंदू –मुसलमान या द्वैताभोवती फिरत असताना कादंबरी मुस्लिम धर्माबाबत काही भाष्य करत नाही. प्रों.च्या स्टडी सर्कल मध्ये एकही मुस्लिम नाही. जी गोष्ट मुस्लिम धर्माची तीच बौध्द धर्माची..! ईश्वर नाकारणा-या विचारवंताचे ईश्वरीकरण कसे होत जाते,या परिप्रेक्षातही बुध्द या चर्चेत अनिवार्य ठरतो. राजकारण आणि  धर्म – संस्कृतीच्या आंतरसंबंधाबद्दल ही कादंबरी नेमके भाष्य करायचे टाळते. जातीव्यवस्थेचा उल्लेख असला तरी आरक्षण आणि त्याचे राजकारण या दलदलीत शिरायचे धाडस कादंबरीकार करत नाही. प्रस्थापित धर्म आणि परंपरा यांना ढुसण्या देणारा व्हिक्टर डिसुझा हा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. शिक्षणसंस्थांमध्ये नोकरी करताना या प्रकारचे काम करताना होणारा त्रास, शिक्षणसंस्था,विद्यार्थी संघटना आणि राजकारण या सा-या बाबींकडे डोळेझाक झाली आहे. दैनिक भंबेरी आणि दंडेली सारख्या वर्तमानपत्रांच्या उदाहरणातून आजच्या जगातील माध्यमांची दिवाळखोरी गुप्ते दाखवितात पण २०१२ मधल्या या देवनगरीत २४ × ७ चालणारे,टॉक शोंचे गु-हाळ चालविणारे एकही न्यूज चॅनेल नसावे याचे आश्चर्य वाटते. कथानकातील सोशल मिडिया आणि त्यावरील स्टेटस युध्द यांचा अभावही खटकतो.
   पण या सा-या मर्यादा मान्य करुनही “बर्फाची लादी झालेला  देवनगरीतला हा अनादी अनंत काळ केव्हा तरी वितळेल.मग इथली माणसं नवी होऊन झरझर,झुळूझुळू वाहू लागतील.तेव्हा कुठे इथे नवी संवेदना जन्म घेईल,”असं म्हणणा-या प्रो.डिसुझांचा आशावाद आपल्या आजच्या गोठलेल्या काळात रुजविण्यासाठी आणि ही बर्फाची लादी वितळविण्यासाठी ही कादंबरी एक प्रामाणिक आच, एक ह्रदयस्पर्शी, हवीहवीशी वाटणारी ऊब निर्माण करते, हेच तिचे ईप्सित आहे आणि यातच तिचे वेगळेपण दडले आहे. 
(मुक्त शब्द - जुलै २०१४)

Sunday, 11 May 2014

हत्तीरोगाला बाय बाय करण्यासाठी....!
- डॉ.प्रदीप आवटे

            
       माणसांप्रमाणेच आजारांमध्ये देखील काही जातीय उतरंड असावी. वेगवेगळ्या आजारांना मिळणारे प्राधान्य,महत्व किंवा एखाद्या आजाराकडे समाजाचेच नव्हे तर नियोजनकर्त्यांचेही होणारे अक्षम्य दुर्लक्ष हे सारे पाहिले की हा संशय अगदी प्रबळ होतो. नियती,नशीब किंवा दैव अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा कोणी प्रत्येक आजार आपापले नशीब घेऊन जन्माला येतो,असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.खरे तर असे काहीच नसते. असते ते आपले अज्ञान आणि निखळ अर्थकारण.आणि म्हणूनच समाजातल्या मुख्यत्वे आहे रे वर्गाचे आजार औषध कंपन्याचे विशेष लक्ष वेधून घेतात कारण या वर्गाची क्रयशक्ती अधिक असते. या आजारांवर अधिक संशोधनही केले जाते, औषध कंपन्यांच्या सत्तेच्या कॉरिडॉर मधील लॉबिंगमुळे नियोजनकर्त्येही त्यात सामील होतात. आणि अनेकदा सर्वसामान्यांचे आजच्या भाषेत बोलायचे तर आम आदमीचे आजार दुर्लक्षित राहतात. आजारांच्या प्राधान्याचा हा पिरॅमिड असा अनेक कारणांनी उलटा सुलटा होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेलाही याची कल्पना आहे आणि म्हणूनच गेल्या मे महिन्यात झालेल्या जागतिक आरोग्य असेम्ब्लीने जगभरातील १७ आजारांची गणना दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय आजार अशी केली आहे आणि या आजारांच्या प्रभावी प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन सर्व देशांना जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
    
      हत्तीरोग (Filaria) हा या सतरा आजारांपैकी एक. खरे तर या वर्षीचे जागतिक आरोग्य दिनाने डंख छोटा,धोका मोठाअशी घोषणा देऊन यापूर्वीच सर्व जगाचे लक्ष कीटकांमुळे होणा-या आजारांकडे वेधले आहे मात्र तरीही या आजारांच्या प्रकारात जे लक्ष हिवताप किंवा डेंग्यू या आजारांना मिळते त्या प्रमाणात हत्तीरोगाची चर्चा कोणी करताना दिसत नाही. याचे मुख्य कारण अर्थातच आजाराचे उपद्रव्य मूल्य मोजण्याची आपली म्हणजे सर्वसामान्य माणसाची पध्दत. हत्तीरोगामुळे कोणाचाही मृत्यू होत नाही त्यामुळे या रोगाची तीव्रता म्हणावी त्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहचत नाही. पण हा आजार हत्तीरोग रुग्णाचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य ज्या प्रकारे उध्वस्त करतो ते पाहता मरणाहूनी वोखटे दुसरे काय असू शकते,याची आपल्याला कल्पना येते.
   खरे तर हत्तीरोग हा काही नवा आजार नाही. सहाव्या शतकातील सुश्रुत संहितेतदेखील या आजाराचा उल्लेख आढळतो. आज जगभरातील सुमारे ८३ देशात या रोगाचे रुग्ण आढळतात. जगाची एक पंचमांश लोकसंख्या या आजाराच्या छायेखाली जगते आहे. जगभरात या आजाराचे सुमारे बारा कोटी रुग्ण आहेत त्यातील सत्तर टक्के प्रादुर्भाव हा भारत,नायजेरिया, बांगला देश आणि इंडोनेशिया या चार देशात आढळून येतो,या वरुन या आजाराचे नियंत्रण आपल्या साठी किती मह्त्वाचे आहे,हे लक्षात यावे. आपल्या देशात वीस राज्यातील जवळपास अडीचशे जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. देशातील जवळपास साठ कोटी जनता या आजारांसाठी संवेदनशील असलेल्या भागात राहते आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आपल्या सतरा जिल्ह्यांमध्ये या रोगाची समस्या आढळून येते. राज्यातील जवळपास तीन कोटी जनता या भागात राहते. विदर्भातील वाशिम बुलढाणा वगळता सारे जिल्हे, म्रराठवाड्यातील लातूर,नांदेड,उस्मानाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक विभागातील जळगाव व नंदूरबार तर कोकणातील ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचे रुग्ण विशेष करुन आढळतात. चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,नांदेड या जिल्ह्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र स्वरुपाची आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तर एक गल्लीच हत्ती गल्ली म्हणून प्रसिध्द आहे. पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या कडेला असलेल्या खंदकामध्ये साचलेल्या पाण्यात वाढणा-या डासांमुळे ही गल्ली अशी कुप्रसिध्द झाली आहे.
   हत्तीरोग हा जंतासारख्या एका विशिष्ट परजीवीमुळे होणारा आजार आहे. या परजीवीचा प्रसार क्युलेक्स या डासामुळे होतो. क्युलेक्स हा डास सांडपाणी,सेप्टीक टॅंक,गटारी अशा घाण पाण्यात मुख्यत्वे वाढतो. मात्र असे पाणी उपलब्ध झाले नाही तरी तुलनेने स्वच्छ असलेल्या पाण्यातही तो वाढू शकतो म्हणजे त्याची समायोजन शक्ती अनुकरणीय आहे. या डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात.तेथे त्यांचे रुपांतर मोठ्या कृमी मध्ये होते. यातील मादी पुन्हा पुन्हा नव्या नव्या पिलावळीला जन्म देते. एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी माणसाच्या शरीरात पाच ते आठ वर्षे,अगदी क्वचित पंधरा वर्षे देखील राहू शकतो.  प्रौढ कृमी लसिका ग्रंथी व लसिका वाहिन्यात राहतो. मायक्रोफायलेरिया हा बाल कृमी मात्र दिवसा फुप्फुसातील रक्तवाहिन्यामध्ये दडून बसतो व रात्री मुख्य रक्त प्रवाहामध्ये सापडतो.त्याच्या या सवयीमुळेच सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावयाच्या पध्दतीत रुग्णाचे रक्त रात्रीच्या वेळी घेणे योग्य निदाना करिता आवश्यक असते.
    
         हत्तीरोगात रुग्णाचा मृत्यू होत नाही पण या परजीवींमुळे शरीरात ज्या घडामोडी घडतात त्यामुळे निर्माण होणारी चिन्हे रुग्णाला आयुष्यातून उठवितात,समाजातून विस्थापित करतात, त्याचे नातेसंबंध संपुष्टात आणतात, त्याची आर्थिक कुवत खुंटीत करतात. हा परजीवी असे नेमके करतो तरी काय ? हा कृमी मानवाच्या लसिका ग्रंथी आणि लसिका वाहिन्यांमध्ये राहत असल्याने हळूहळू यामुळे या लसिका वाहिन्या तुंबतात आणि ज्या भागातील लसिका वाहिन्या तुंबतात त्या भागाला हाताला आणि विशेष करुन पायाला सूज येऊ लागते. हा पाय सुजत जाऊन मोठा मोठा होत जातो. तो हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो आणि म्हणूनच या आजाराला हत्तीपाय असेही म्हटले जाते. मुख्य म्हणजे एकदा सूजलेला पाय पुन्हा पूर्ववत करावयाचे कोणतेही उपाय आजमितीस तरी नाहीत. या सूजलेल्या पायाला अनेकवेळा इतर जीवाणूंचे इन्फेक्शन होऊन तिथे असह्य वेदना होऊ लागतात,ताप येतो. हत्तीरोगात पायाला जशी सूज येते तशीच काही पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सूज येऊन अंडाशय कमालीचे मोठे होते.इंग्रजीत याला हायड्रोसिल म्हणतात. या प्रकारामुळे अनेकदा रुग्णाचे लग्न जमणे कठीण होऊन जाते. आज आपल्या राज्यात हत्तीपाय व अंडाशयवृध्दीचे सुमारे ऐंशी हजार रुग्ण आहेत.या पैकी जवळपास सत्तर टक्के रुग्ण विदर्भात आहेत. हायड्रोसिलचा त्रास आपण अगदी सोप्या अशा शस्त्रक्रियेद्वारे दूर करु शकतो.
   दोन प्रश्न लाखमोलाचे...! एक प्रकारे व्यक्तीच्या सामाजिक मृत्यूला कारणीभूत ठरणा-या आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासन काय करते आहे ? आणि हा आजार मला होऊ नये म्हणून तसेच त्याचा प्रसार रोखण्यासाठी मी काय करु शकतो ?समाज म्हणून आपण सारे काय करु शकतो ? 
 
आपल्या देशात सन १९५५ पासून राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत आपल्या राज्यात सहा सर्वेक्षण पथके,सोळा नियंत्रण पथके आणि ३४ रात्र चिकित्सालये कार्यरत आहेत. ही सारी केंद्रे,चिकित्सालये आपापल्या क्षेत्रात हत्तीरोग नियंत्रणाचे काम करत आहेत. नव्वदच्या दशकात या हत्तीपायग्रस्त जिल्ह्यांमध्ये दरवर्षी करण्यात येणा-या विशेष सर्वेक्षणात हत्तीरोग जंतू आढळणा-या रुग्णांचे शेकडा प्रमाण चारच्या आसपास होते,आज हे प्रमाण बहुतेक जिल्ह्यात एक पेक्षा कमी आढळते आहे. सन २००२ च्या आरोग्य विषयक राष्ट्रीय धोरणात २०१५ पर्यंत हत्तीरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट गाठावयाचा निश्चय आपण केला आहे. सीमारेषा जवळ येऊन ठेपली आहे,आपण हे उद्दिष्ट साध्य करणार का,हा महत्वाचा प्रश्न आहे. नुकतेच आपण पोलिओला बाय बाय केले आहे, हत्तीरोगालाही दूर करणे आपल्याला अशक्य नाही. पण रामदासांच्या उक्तीत थोडासा बदल करुन सांगावयाचे तर –
“सामर्थ्य आहे चळवळीचे l
जो जो करील तयाचे ll
पण तेथे लोकसहभागाचे l
अधिष्ठान पाहिजे ll
हत्तीरोग दूरीकरण लोकसहभागाशिवाय संभवत नाही. हा डासांपासून पसरणारा आजार आहे. डास नियंत्रण हे तुमचे माझे सर्वांचे काम आहे. पाणी साचू न देणे,डबकी वाहती करणे,शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसविणे,शोष खड्ड्यांचा वापर करणे या तुमच्या माझ्या पातळीवरील उपायांनी आपण क्युलेक्स डासांची पैदास थांबवू शकतो.आपण हे काम मनापासून आणि गांभीर्याने करावयाची गरज आहे. आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्राम आरोग्य,स्वच्छता व पोषण समितीकडे निधी उपलब्ध आहे.या पैकी पंधरा टक्के निधी आपण डास नियंत्रणासाठी वापरु शकतो. नगरपालिका आणि इतर शहरी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवर पडणारा ताण,विकास कामे,घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न या सा-यांमुळे डास उत्पत्ती वेगाने होते आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमातून शहरी भागात हत्तीरोगासह सर्व कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणाचे प्रभावी काम होऊ शकते. मागील २- ३ वर्षात मुंबई मनपाने हे सप्रमाण सिध्द केले आहे.
  २००४-०५ पासून हत्तीरोग नियंत्रणासाठी एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम (मास ड्र्ग ऍडमिनिस्ट्रेशन- एम. डी. ए.) सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यातील दोन वर्षावरील सर्व जनतेला हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येतात.गर्भवती माता आणि अति गंभीर रुग्ण यांना त्यातून वगळण्यात येते. अनेक वेळा मला या आजाराची कोणतीही लक्षणे नसताना मी या गोळ्या का खायच्या,असा विचार करुन लोक या गोळ्या खायच्या टाळतात. पण आपण सगळ्यांनी एकदिवस या गोळ्या खाल्ल्याने हत्तीरोगाचे प्रसारचक्र थांबायला मदत होणार आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी अत्यंत शास्त्रीय पायावर आखलेली ही योजना आहे. आपल्या भागातून हत्तीरोगाला बाय बाय करण्यासाठी आपण सर्वांनी या एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिमेस (मास ड्र्ग ऍडमिनिस्ट्रेशन-एम डी ए) सहकार्य करणे आवश्यक आहे. या सोबतच आपल्या भागातील हत्तीरोग रुग्णास मदत करणे,त्याचे मनोधैर्य वाढविणे, हायड्रोसिल रुग्णास शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणे,हत्तीपाय रुग्णास पायाची निगा घेण्यास शिकविणे अशी अनेक कामे आपण डॉक्टरांच्या,आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीने करु शकतो.
 हत्तीरोग इतिहास जमा होईलही पण इतिहास सरकारे नहीं बनाती,लोग बनाते है... इसे भी इतिहास गवाह है...! चला तर देवी,पोलिओ नंतर आणखी एका आजाराला निरोप द्यायला सिध्द होऊ या.
(  साप्ताहिक लोकप्रभा मध्ये १६ मेच्या अंकात प्रसिध्द झालेला लेख.)

Thursday, 24 April 2014

पोलिओ पॉलिटिक्स
-- डॉ.प्रदीप आवटे.

         दिनांक १३ जानेवारी २०११ पासून  मागील दोन वर्षात भारतात पोलिओचा एकही रुग्ण सापडलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव पुसले आहे. नायजेरिया , पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये आज मुख्यत्वे पोलिओची समस्या उरली आहे. २०११ मध्ये जगभरात  पोलिओचे ६५० रुग्ण आढळले होते. २०१२ मध्ये या रुग्ण संख्येत दोन तृतियांशने घट झाली आहे. जग पोलिओ मुक्तीच्या उंबरठ्यावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी पोलिओ मुक्तीच्या या वाटचालीत गंभीर अडथळा निर्माण केला आहे. डिसेंबरच्या दुस-या पंधरवड्यात पोलिओ निर्मूलन मोहिमेत काम करणा-या नऊ स्वयंसेवकांची तालिबान अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली.अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने या हत्या करण्यात आल्या असून या स्वयंसेवकांपैकी बहुसंख्य महिला आहेत. हत्या करण्यात आलेल्या सर्वात लहान महिला स्वयंसेविकेचे वय अवघे १७ आहे.
                             पाकिस्तानातील कराची, पेशावर या शहराच्या आसपास पाकिस्तानातील अदिवासी पट्ट्यात या घटना घडल्या आहेत. या हिंसक घटनांमुळे पाकिस्तान सरकारने सध्या सुरू असलेली पोलिओ लसीकरण मोहिम थांबवली आहे. येथून पुढे पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी काम करणा-या स्वयंसेवकांना पोलिस संरक्षण देण्याची वेळ येणार की काय,असे त्या देशातील चित्र आहे.मुस्लिम जगताचा पोलिओ लसीकरणास असलेला विरोध ही नवी गोष्ट नाही. पोलिओ लसीचे थेंब म्हणजे भावी मुस्लिम पिढीला नपुंसक बनविण्याचे कारस्थान आहे इथपासून ते ही पोलिओ लस म्हणजे माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे मूत्र आहे, इथपर्यंत काहीही अफवा या लसीबद्दल पसरविण्यात आल्या आहेत. भारतातही मुस्लिमबहुल प्रदेशात अशा अफवांचे नवे नवे पीक येत असते. या सा-यांचा  परिणाम म्हणून भारतात उत्तरप्रदेशात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान या मुस्लिम प्रदेशात पोलिओ निर्मूलनाची अंतिम लढाई लढावी लागत आहे.
                पोलिओ लसीकरणाच्या या विरोधाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा महत्वपूर्ण संदर्भ आहे. राजकारण आणि आरोग्य हे विषय वर वर पाहता अगदी वेगळे वाटले तरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण सार्वजनिक आरोग्यावर महत्वपूर्ण परिणाम घडवू शकते, हे विसरता कामा नये.कधी कधी सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील मुद्दे हाताशी घेऊन मुरब्बी राजकारणी आपले डावपेच आखताना दिसतात. बायोटेररिझमवर प्रमाणाबाहेर चर्चा करणा-या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इराक युध्दाला हातभार लावला, असा आरोप एका तज्ज्ञाने केला आहे.  "Health is political',या विधानाचे प्रत्यंतर असे अनेक बाबतीत येत असते. सध्या सुरु असलेली पोलिओ निर्मूलन मोहिम त्याचेच ठळक उदाहरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नव्वदच्या दशकात पोलिओ निर्मूलनाची मोहिम हातात घेतली. /११ च्या घटनेनंतर अमेरिका आणि मुस्लिम जगाच्या तणावपूर्ण संबंधाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पोलिओ लसीकरणावर दिसून येऊ लागला. या मोहिमेला अमेरिकेसह अनेक पाश्चात्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे असलेले आर्थिक पाठबळ मुस्लिम जगतातील मूलतत्ववाद्यांना खुपत होते आणि खुपते आहे. अमेरिकन आणि पाश्चात्य जगाची कोणतीही मदत पूर्णपणे नाकारण्याच्या वेडेपणातून पोलिओ लसीकरणासह सर्व प्रकारच्या मानवतावादी मदतकार्याला विरोध करण्याचा नतद्रष्टपणा या देशांमधील मूलतत्ववादी शक्ती करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच अशा प्रकारे मानवतावादी मदत कार्यांमध्ये काम करणा-या स्वयंसेवकांसाठी पाकिस्तान हा पहिल्या पाच देशांपैकी एक असुरक्षित देश आहेनुकत्याच एका स्विडिश सामाजिक कार्यकर्तीचा लाहोर मध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला तर रेड क्रॉसच्या एका डॉक्टरचे अपहरण करून त्याला क्रूरपणे मारण्यात आले. या प्रकारच्या खून अपहरणाचे प्रकार भयावह नियमिततेने पाकमध्ये घडत आहेत. रेड क्रॉस सारखी आंतरराष्ट्रीय संघटना देखील आपले पाक मधील विविध स्वरुपाचे मदतकार्य मर्यादित करते आहे.
       ह्या सा-या प्रकारामागे आणखी एक महत्वपूर्ण कारण आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेने राबविलेले चुकीचे धोरण, या सर्व हिंसाचाराला खतपाणी घालते आहे. २००१ पासून अनेकवेळा अमेरिकेने पाकवर ड्रोन हल्ले केले आहेत. मागील सहा वर्षात हजारो लोक या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या परदेशी मदतीवर येथील लोकांचा विश्वास उरलेला नाही.  "The brutal murder this week of five Karachi health workers involved in a UN-backed polio eradication drive says more about the wider effect of misguided US policy in the area than it does anything new about the Pakistani Taliban," हे बेंजामिन गिल्मोर यांचे वाक्य हेच कटू सत्य सांगते. ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी अमेरिकन गुप्तहेर संघटना सी.आय..ने डॉ. शकील आफ्रिदी या  पाकिस्तानी डॉक्टरच्या मदतीने अबोटाबाद येथे एक फसवी हिपाटायटीस बी लसीकरण मोहिम राबविली. या प्रकारामुळे तर स्थानिक लोक प्रत्येक लसीकरण मोहिमेकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले आहेत. " या स्वयंसेवकांची हत्या करणा-या स्थानिक अतिरेक्यांचा योग्य न्यायनिवाडा झालाच पाहिजे पण पोलिओ निर्मूलनात महत्वाचा भागीदार असलेला अमेरिका जर त्यांना हवा असणा-या 'मोस्ट वॉन्टेड'ला पकडण्यासाठी खोट्या लसीकरण मोहिमेचा आधार घेणार असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा, हे आम्ही पाक जनतेला कोणत्या तोंडाने सांगावयाचे ?",असा रास्त सवाल पाक ऍंम्बुलन्स सेवेचे सल्लागार बेंजामिन गिल्मोर यांनी केला आहे.
                         पोलिओ निर्मूलन हे एकविसाव्या शतकातील आरोग्य विषयक महत्वपूर्ण स्वप्न आहे. देवीनंतर जागतिक पातळीवरुन नाहीसा होणारा पोलिओ हा दुसरा महत्वाचा आजार ठरणार आहे. जवळपास एक शतकापासून मानवजात पोलिओमुक्त जगाच्या रम्य पहाटेचे स्वप्न पाहते आहे. ते साध्य करण्यासाठी पोलिओ निर्मूलनातील सारे छोटे मोठे भागीदार एकत्र येऊन पाकमध्ये निर्माण झालेल्या या अडथळ्यावर काही मार्ग निश्चितच काढतील. तशा हालचाली सुरुही झाल्या आहेत. लवकरच पाकमधील पोलिओ निर्मूलन मोहिम पूर्वपदावर येईल. पण या घटनेतून काही बोध आपण निश्चितपणे घ्यायला हवा. आपल्या स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतर राष्ट्रीय राजकारणात सार्वजनिक आरोग्यच घायाळ होऊ नये, याची दक्षता आपण घ्यायला हवी. एक चुकीचे राजकीय पाऊल हा कोट्यावधी लहान मुलांच्या मानवी हक्काचा प्रश्न असू शकतो. आज पोलिओ निर्मूलनाची गाडी रूळावरुन खाली घसरली तर येत्या दहा वर्षात पुन्हा लाखो मुले पोलिओमुळे अपंग होऊ शकतातजे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडू शकते तेच थोड्याफार फरकाने स्थानिक पातळीवरही घडू शकते.
     अगदी गाव पातळीवरील स्वार्थांध राजकारण कोणत्या स्तरावर जाऊ शकते, हे मी स्वतः अनुभवले आहे. एका छोट्याशा गावात गॅस्ट्रोची साथ उदभवली तेव्हाची गोष्ट. मी माझ्या टीम सह त्या गावात पोहचलो. गॅस्ट्रोची साथ म्हणजे दूषित पाणी, हे ओघाने आलेच. गावच्या पाणीपुरवठा पाईप लाईनला जागोजागी तडे गेलेले, ठिकठिकाणी गळती ! या सा-या गळत्या लगोलग दुरुस्त करणे, शक्य नव्हते म्हणून मी गावाला तात्पुरता टॅंकरने पाणी पुरवठा करावा, असे सरपंचांना सुचविले. तसा रिपोर्टही दिला. पण दोन-तीन दिवस झाले तरी टॅंकर सुरू व्हायचे चिन्ह दिसेना मला सरपंचाचा प्रचंड राग आला, " अहो, गावातल्या पन्नासहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. तुम्ही एखादा पेशंट दगावण्याची वाट पाहत आहात का ? टॅंकर का सुरू होत नाही अजून ?" यावर सरपंच जे बोलले ते भीषण होते. ते म्हणाले, " ते एखादा पेशंट गचकण्याचीच वाट पाहून राह्यल्यात..." मी चमकलोच. नंतर सरपंचांनी नीट समजावून सांगितले आणि गावपातळीवरील अनारोगी राजकारणाची कल्पना आली. या गावचे सरपंच हे तालुक्याच्या आमदाराच्या विरुध्द पार्टीचे त्यामुळे या सरपंचाचा नाकर्तेपणा सिध्द करण्याची आयती संधी या साथीने आमदारांना दिली होती. ही साथ धुमसत राहण्यात त्यांना रस होता. म्हणून ते गावाला टॅंकर देण्यात चालढकल करत होते. सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता वापरण्याच्या या राजकीय मुत्सेद्दीगिरीला काय म्हणावे?
                           सार्वजनिक आरोग्याचे सामाजिक,आर्थिक,मानसिक असे अनेक महत्वपूर्ण निर्धारक अखेरीस त्या समाजातील राजकीय व्यवस्थेवर अवलंबून असतात, हे विसरुन चालणार नाही.देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था रसातळाला गेली आहे, असे विधान मध्यंतरी जयराम रमेश यांनी केले आणि मला राम मनोहर लोहियांची आठवण झाली. देशातील राजकीय कार्यकर्त्यांनी ,नेत्यांनी स्वतःवरील उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा वापर केला पाहिजे, या बद्द्ल ते आग्रही असत. आज किती राजकीय नेते आपल्यावरील उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात येतात ? आपण आपल्या उपचारासाठी कुठे जातो, ही एक महत्वपूर्ण राजकीय कृती आहे, याचे भान हरवत चालले आहे. या कृतीचा स्वाभाविक परिणाम सार्वजनिक रुग्णालयांच्या गुणवत्तेवर होतो आहे. एकीकडे स्वतः सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उपयोग करावयाचा नाही आणि दुसरीकडे आपल्या गावात, मतदारसंघात आरोग्य केंद्र झाले पाहिजे म्ह्णून भांडावयाचे, असा दुटप्पीपणा मात्र पाहावयाला मिळतो. अगदी -१० किलोमिटरच्या टप्प्यात दुसरे आरोग्य केंद्र असले तरी ते आपल्या गावातही हवे, हा प्रतिष्ठेचा मुद्दा करावयाचा नंतर त्या आरोग्य केंद्राकडे ढुंकनही पाह्यचे नाही, तिथे डॉक्टर ,इतर स्टाफ राहतो की नाही, याची विचारपूस नाही. ही राजकीय समज (?) आपल्याला 'सर्वांसाठी आरोग्या'च्या गावाला कशी घेऊन जाईलअशा छोट्या मोठ्या स्थानिक प्रश्नापासून ते महत्वपूर्ण धोरणापर्यंत राजकारण आपल्या सार्वजनिक आरोग्याचे भवितव्य निश्चित करत आहे. वैद्यकीय शिक्षणाचे अनियंत्रित खाजगीकरण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील डॉक्टरांची रिक्त पदे या मधील कार्यकारणभाव समजण्यासाठी कोणत्याही थोर विश्लेषकाची आवश्यकता नाही. वैद्यकीय संशोधनाचे चुकलेले प्राधान्यक्रम, जीवनावश्यक औषधांच्या अव्वा की सव्वा किमती, कुपोषण, दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढणारी खाजगी आरोग्य व्यवस्था, तिच्यावरील सुयोग्य नियंत्रणाचा अभाव या सर्व गोष्टी राजकारण आणि सार्वजनिक आरोग्याची नाळ स्पष्ट करणा-या आहेत.

       आणि म्हणूनच,पक्षीय अभिनवेशाच्या पल्याड जाणा-या दूरदृष्टीच्या विधायक राजकारणाशिवाय 'सर्वांसाठी आरोग्या'चे स्टेशन येणे शक्य नाही मग ती अंजनडोह सारख्या खेड्यातील गॅस्ट्रोची साथ असो नाही तर पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन मोहिम !