निवडणूका आणि आरोग्य
नुकतीच इंग्लंडमध्ये निवडणूक
पार पडली आणि तेथील १४ वर्षाची हुजूर पक्षाची राजवट
संपुष्टात आली आणि मजूर पक्षाला तेथील जनतेने भरघोस बहुमताने निवडून दिले. एका अर्थाने हा मोठा ऐतिहासिक सत्तापालट या देशामध्ये झाला. हुजूर पक्षाचा पराभव होण्या पाठीमागे नेमकी काय कारणे आहेत, याचा जेव्हा विचार आपण करू लागतो तेव्हा
तेथील सुमारे ४१ टक्के लोकांनी ढासळती आरोग्य व्यवस्था हे
हुजूर पक्षाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. एखाद्या
देशातील सत्तांतर हे निव्वळ आरोग्याच्या मुद्द्यावरून होणे हे खरोखरच
आम्हां भारतीयांसाठी तर अगदीच कल्पनेपलीकडील आहे असे म्हणायला हरकत
नाही. अगदी कोविड महामारी सुरू असताना देखील त्या कालावधीत
झालेल्या काही राज्यांच्या
निवडणुकांमध्ये आरोग्य हा विषय कधीही राजकारणाचा महत्त्वाचा विषय आपल्याकडे ठरला
नाही. कोविडच्या महामारीनंतर जी लोकसभा निवडणूक नुकतीच पार
पडली त्यात देखील आरोग्याचा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडयावर नव्हता, हे आपण अनुभवले आहे. असे असताना ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षांहून अधिक राज्य केले त्या
देशातील निवडणूक मात्र आरोग्याच्या मुद्द्यावर लढली जाते, हे
आपणा सर्वांसाठी महत्वाचे आहे. विकसित देशातील राजकारण आणि
आपल्यासारख्या विकसनशील देशातील राजकारणामध्ये हाच मूलभूत फरक आहे का, असाही विचार आपण करावयाला हरकत नाही.
राष्ट्रीय आरोग्य सेवा अर्थात
नॅशनल हेल्थ सर्विस ही सरकारी यंत्रणा इंग्लंड मधील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य
सेवा पुरविते. निगेल लॉसन यांनी म्हटल्याप्रमाणे," इंग्लिश जनतेसाठी राष्ट्रीय आरोग्य सेवा जणू धर्मासारखी अत्यंत जवळची
गोष्ट आहे." बार्बरा कॅसल आणि अनेकांनी नॅशनल हेल्थ सर्विस हे जणू इंग्लिश
जनतेचे सेक्युलर चर्च आहे, अशी भावनाही वेळोवेळी व्यक्त केली
आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या आरोग्य सेवेची परिस्थिती अत्यंत कठीण
झालेली आहे सुमारे ७६ लाख लोक या वर्षाच्या सुरुवातीला
राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या वेटिंग लिस्टवर असून त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट
वेळेत मिळत नाही आहे.२०१० पासून या वेटिंग लिस्टमध्ये
तिपटीने वाढ झाली आहे. सुमारे तीन लाख लोकांना एक वर्षाहूनही
अधिक काळ डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्याकरता वाट पाहावी लागते, असे तेथील आकडेवारी सांगते अर्थात डॉक्टरांची
अपॉइंटमेंट मिळण्यासाठीचा सरासरी कालावधी आहे सुमारे १४ आठवडे. विकसित देशांमध्ये लोक आपल्या आरोग्यवस्थेचे मूल्यांकन करण्याकरता विविध
निर्देशांक वापरतात. तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी
तुम्हाला किती काळ वाट पाहावी लागते, हा निर्देशांक देखील
यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. तातडीची वैद्यकीय सेवा
मिळण्यासाठी जर रुग्णाला चार तासांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागत असेल तर ते
आरोग्यवस्थेचे फार चांगले लक्षण नाही. २०११ मध्ये केवळ सहा टक्के इंग्लिश रुग्णांना तातडीच्या
वैद्यकीय सेवेसाठी चार तासांपेक्षा अधिक काळ लागे पण तेच प्रमाण सध्या ४५ टक्क्यांवर गेले आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठीची
आर्थिक तरतूद मजूर पक्षाचे सरकार असताना दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढत असे तथापि
हुजूर पक्षाच्या या चौदा वर्षांच्या कालावधीमध्ये ही वार्षिक वाढ केवळ दोन
टक्क्यांची आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात
या पक्षाने राष्ट्रीय आरोग्य सेवेकरता पुरेसा निधी दिला नाही, अशी ही नागरिकांची एक रास्त तक्रार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये काम
करणाऱ्या नर्सेस आणि इतर मनुष्यबळांचे वेतन पुरेशा प्रमाणात न वाढणे आणि त्या
कारणामुळे मनुष्यबळाने या व्यवस्थेतून बाहेर पडणे हे देखील एक मोठे आव्हान
इंग्लंडच्या या सेक्युलर चर्च मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेसमोर उभे राहिले आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथील साथरोगशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. मायकल मार्मोट यांनी म्हटल्याप्रमाणे, आरोग्याच्या अनुषंगाने एका आव्हानात्मक वळणावर इंग्लंड येऊन ठेपले आहे. येथील लोकांच्या आरोग्यामधील सुधारणा जणू पॉज झाल्या आहेत आणि आरोग्यविषयक विषमता वाढते आहे. जणू काही
इंग्लिश लोक ज्या अवस्थेत जन्मले, वाढले आणि जगत आहेत, काम करत आहेत, वयोवृद्ध होत आहेत त्या अवस्थेमध्ये
सुधारणा होण्याचे थांबले आह. मार्मोट यांच्या
म्हणण्याप्रमाणे कोणत्याही देशाची सरकारे अनेकदा आपल्यासमोरील आव्हानांचे वर्णन
करताना आरोग्य हा त्यातील एक मुद्दा असल्याचे बोलतात आणि आर्थिक परिस्थिती, महागाई, शिक्षण, परवडणारी घरे, स्थलांतरित लोकसंख्या, गरिबी,
वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा बाबींना अधिक महत्त्व
असल्याचे सांगतात. सार्वजनिक आरोग्य तज्ञ असणारे डॉ. मायकेल मार्मोट अत्यंत मार्मिकपणे सांगतात
की, ‘इतर सारे मुद्दे हे आरोग्याचे सामाजिक
निर्धारक आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जनतेला गुणवत्तापूर्ण
अशी आरोग्यसेवा त्यातील विषमता दूर करून पुरवता त्यावेळी तुमच्या अर्थकारणासाठी
देखील निरोगी मनुष्यबळ मिळते.त्यामुळे त्याला अधिक गती
प्राप्त होते. निरोगी व्यक्ती शिक्षण,
रोजगार या क्षेत्रात अधिक उत्तम काम करू शकते म्हणजे तुमच्या एकूण राजकीय धोरणांचा
केंद्रबिंदू हा तुम्ही जनतेला पुरवीत असलेल्या आरोग्य सेवा असल्या पाहिजेत.
कारण त्या तुमच्या सर्व सामाजिक घटकांवर प्रभाव टाकतात.’
भारतासारख्या देशाला इंग्लंडमधील ही निवडणूक आणि त्या अनुषंगाने झालेली राजकीय
- सामाजिक चर्चा ही खूप काही शिकवणारी आहे.
आरोग्य आणि शिक्षण हे मुद्दे आपल्या राजकीय चर्चेमध्ये खूप अभावानेच डोकावतात. जणू ते आपल्या राजकीय चर्चेच्या अजेंडयावरच नसतात, अशी एकूण परिस्थिती आहे. आपल्यासमोर देखील
आरोग्याचे खूप मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. एकूण
जीडीपीच्या कसाबसा दीड टक्का आपण आरोग्यावर खर्च करतो आहोत.
त्यामुळे सार्वजनिक आरोग्यवस्था सक्षम होण्यासाठी खूप मोठा हातभार लागत नाही. आपल्या समाजात त्यामुळेच अनिर्बंध अशी खाजगी आरोग्य सेवा समांतर पद्धतीने
वाढताना दिसते आहे. आरोग्यावरील खर्चामुळे गरीबी रेषेखाली ढकलल्या जाणा-या
लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा काळात आपल्याला देखील
इंग्लंडच्या नागरिकांप्रमाणे आपल्या आरोग्यसेवा हाच आपला धर्म मानून त्याबद्दलची
चर्चा एकूण राजकीय सामाजिक कथनाच्या केंद्रस्थानी आणणे
अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्य हा केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजाच्या देखील व्यक्तिमत्त्वाचा आत्मा असतो हे सत्य केवळ सुभाषितांपुरते मर्यादित न राहता
ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरायला हवे. अनेकदा आपण वसाहतवाद आणि त्याचा प्रभाव आपण
पुसून टाकला पाहिजे असे म्हणतो परंतु गोऱ्या साहेबांकडून काही गोष्टी शिकण्याची
देखील गरज आहे, हे त्यांच्या नुकत्याच झालेल्या
ब्रिटनमधील निवडणुकांनी स्पष्ट केले आहे. इंग्रजांनी भारतात
पहिल्यांदा रेल्वे सुरु झाली तेव्हा ‘ सायेबाचा पोर मोठा अकली, बिन बैलाची गाडी
कशी ढकली,’अशी इथल्या जनतेची प्रतिक्रिया होती तसेच आता ‘ सायेबाचा पोर मोठा अकली,
आरोग्यावर निवडणूक कशी लढवी?,’ असे म्हणत त्यांचे सकारात्मक अनुकरण करण्याची
आवश्यकता आहे.