Monday 6 November 2023

एक वेडा आणि बिघडलेली हवा - डॉ. प्रदीप आवटे.


    जानुल्का ग्रिमाल्डा (Gianluca Grimalda) असं उच्चारायला कठीण नाव असणारा एक माणूस. पण या माणसाचे केवळ नावच उच्चारासाठी कठीण आहे असे नाही तर त्याचे आचरण देखील आपल्यासारख्या निव्वळ बोलभांड लोकांसाठी अनुकरणे कठीण आहे.
 

“ येत्या सोमवार पर्यंत जर्मनीतील आपल्या ऑफिसमध्ये पोहचा नाही तर तुम्हांला आम्ही नोकरी वरुन काढून टाकू,” असा दम देणारा आदेश या जानुल्का ग्रिमाल्डाच्या  संस्थेने त्याला दिला होता. आणि हा गृहस्थ पुढील सोमवार पर्यंत म्हणजे पाच दिवसात जर्मनीला पोहचायला काही करता तयार नव्हता. याला सुट्टी हवी होती की काय की हा भलताच कामचुकार माणूस आहे? आपल्या मनात आणखी काय येणार ? पण गोष्ट अगदी निराळी आणि आपणां सर्वांचे डोळे  खाडकन उघडावी, अशी आहे. जानुल्का ग्रिमाल्डा हा सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे. मागील काही वर्षांपासून तो ‘क्लायमेट चेंजचे सामाजिक परिणाम’ या विषयावर एका जर्मन संस्थेमध्ये संशोधन करतो आहे. क्लायमेट चेंजवरील त्याचे संशोधन निव्वळ तोंडपाटीलकी नाही, तो ‘ बोले तैसा चाले’ शैलीचा माणूस आहे. आपल्या कार्बन फूटप्रिंटस कमी व्हाव्यात म्हणून या वेडया माणसाने मागील दहा वर्षांपासून विमानाने प्रवास करणे बंद केले आहे. आताही मागील सहा महिन्यांपासून तो जर्मनीपासून सुमारे १५ हजार मैल दूर असणा-या पापुआ न्यू गिनिआ या बेटावर क्लायमेट चेंज संदर्भात काम करत होता. तिथं जातानाही तो बोट, रेल्वे असे पोहचला. आता तेथील काम संपल्यावर मात्र त्याच्या जर्मन संस्थेने त्याला तात्काळ बोलावले पण हा विमानाने यायला तयार नाही. विमानाने निघाला तर तो अवघ्या ३२ तासांमध्ये जर्मनीत पोहचेल पण त्यासाठी दरडोई ५.३ टन कार्बन वातावरणात सोडला जाईल. आणि त्याच्या पध्दतीने तो बोट, रेल्वे असे आला तर त्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ लागेल पण अवघा ४०० किलो कार्बन सोडला जाईल. तो म्हणतो, “ ५.३ टन कार्बन म्हणजे सर्वसामान्य माणसामुळे संपूर्ण वर्षात जेवढा कार्बन सोडला जातो त्याहूनही किती तरी जास्त. आजच्या क्लायमेट क्रायसिसच्या काळात आपण हे पाच टन कार्बन उत्सर्जन कमी करणे अधिक महत्वाचे आहे.”  गार्डियन या दैनिकात तो पुढे लिहितो, “ ही पृथ्वी अधिक सुंदर करण्याच्या माझ्या प्रयत्नात माझ्या नोकरीची किंमत काहीच नाही.”

आपण या माणसाला वेडा, मॅड, सर्किट अशा शेलक्या शब्दांत नावाजू आणि दिल्ली, मुंबई , पुण्यातील वायू प्रदूषणाबाबत आपल्या कारमधून ऑफिसकडे जाताना कोणाशी तरी बोलताना काळजी व्यक्त करत राहू. पण खरेच या जानुल्का ग्रिमाल्डाला वेडा नाही तर काय म्हणणार ? सगळं वारंच बिघडलेलं असताना हा एकटा वेडा पीर आपल्या मुठीत वारा पकडून त्याची दिशा बदलू पाहतो आहे. तो एकटा काय करणार ? त्याच्या मुठीसोबत आपण आपल्याही मुठी आवळल्या तर काही होऊ शकते. पण आपल्याला नेमके काय बिघडले आहे, हे तरी कळलंय का ?

खरे तर आपल्या सारख्या देशात तर अशा वेडया माणसांची गरज सर्वाधिक आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये आपला क्रमांक दुसरा लागतो. जगातील सर्वाधिक वायू प्रदुषित ३० शहरांपैकी २० शहरे भारतीय आहेत . भारतातील सर्वसामान्य व्यक्तीचे सरासरी आयुष्य वायुप्रदूषणामुळे ५.२ वर्षांनी कमी होते असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो आणि हेच आपण दिल्ली किंवा लखनौ सारख्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राहत असू तर आपले आयुर्मान सुमारे नऊ ते दहा वर्षांनी कमी होते. हे सारे लक्षात घेतले तर, “मी माझी स्वतःची कार, बाईक वापरणार नाही. सायकल  किंवा  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीन,” अशी मॅड शपथ घेणारे जानुल्का आपल्याला घराघरात हवे आहेत.

आता हिवाळा सुरु झाला आहे. हिवाळयात वा-याची गती मंदावते आणि हवेतील सूक्ष्मकण बराच काळ तरंगत राहतात. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरात परिस्थिती बिकट झालेली आहे. दिल्ली मध्ये तर या वायू प्रदूषणामुळे शाळा १० नोव्हेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारसाठी पुन्हा सम विषम दिवस पध्दत कदाचित लवकरच सुरु करण्यात येईल, असे दिसते. पण या सगळयाच तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत.

मागील ४ वर्षांपासून युनो ७ सप्टेंबर हा दिवस , निळ्याभोर आभाळासाठी स्वच्छ हवा दिवस म्हणून साजरा करते आहे. क्लीन एअर डे फॉर ब्ल्यू स्काइज, किती सुंदर वाटते ना, निव्वळ वाचूनही. पण नुसते दिवस साजरे करुन काय होणार ? या क्लीन एअर डेचे घोषवाक्य आहे, टुगेदर फोर क्लीन इयर! अर्थात आपली हवा स्वच्छ होण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपल्या हातात काय आहे ?

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शासन, समाज आणि व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाच्या स्तरावर २०१९ सालापासून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पंधराव्या वित्तआयोगाने पुढील पाच वर्षासाठी १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी रक्कम वायू प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी मंजूर केलेली आहे. आपल्या देशातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांनी आपल्या वायू प्रदूषणाची पातळी दरवर्षी किमान १५ टक्क्यांनी कमी कमी करत न्यावी, असे आपले नियोजन आहे. याशिवाय राष्ट्रीय क्लायमेट चेंज आणि मानवी आरोग्य कार्यक्रम असा एक महत्त्वाचा कार्यक्रम देखील केंद्र सरकारने सुरू केला आहे.

          आपणही व्यक्तिगत पातळीवर अगदी साध्या सोप्या गोष्टी करुन वायू प्रदूषण कमी करण्यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो –

(१) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर - व्यक्तिगत वाहनांचा वापर कमी करून सर्वांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे.

(२)  इलेक्ट्रीक वाहनांचा वापर

(३) एल ई डी चा वापर -  घरी कामाच्या ठिकाणी साध्या विजेच्या दिव्या ऐवजी एलईडी चा वापर करणे.

(४) पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर -  शक्य तिथे सर्वत्र सौरऊर्जा किंवा इतर अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र वापरणे.

(५)  ऊर्जेची काटकसर करणे.  ज्या खोलीत आपण बसलो आहोत केवळ तिथलेच दिवे आणि पंखे चालू ठेवणे. सरकारी किंवा इतर कार्यालयातील दिवे, पंखे एसी गरज नसताना बंद करणे. लिफ्ट ऐवजी जिना वापरणे.

(६)  घरगुती कच-याचे ओला , सुका असे वर्गीकरण करणे. कचरा न जाळता खत निर्मिती किंवा ऊर्जा निर्मितीसाठी वापरणे.

(७)  धुम्रपान टाळा.

(८)  घरगुती इंधन म्हणून एल पी जी चा वापर करणे. गरीब कुटुंबास एल पी जी घेण्यासाठी आवश्यक मदत करणे.

(९)  फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे. फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अधिकच कमी होते. कोविड साथीमुळे अनेकांची फुप्फुसे कमकुवत झाली आहेत. या सगळया पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी आपल्या सगळयांच्या भल्यासाठी आवश्यक आहे.

 

जानुल्का ग्रिमाल्डा सारखे आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न केले तर आपणही या दिवाळीत ‘ ये हवा मेरे संग संग चल,’ असं मनापासून गुणगुणू शकू पण त्यासाठी आपल्याला प्राणवायू पुरवणा-या आपल्या अवतीभवतीच्या हवेवर आपल्याला मनापासून प्रेम करता यायला हवे.  

 

-         डॉ. प्रदीप आवटे.

मोबाईल  - ९४२३३३७५५६

 

******* 

16 comments:

  1. Really an eye opener...

    ReplyDelete
    Replies
    1. अर्चना मोरे8 November 2023 at 19:17

      कधी कधी अशा बाबी खूप आदर्श म्हणून सोडून दिल्या जातात.
      जानुल्का ग्रेटच.
      लिफ्ट, दिवाळी फटाके नाही, विद्युत वाहन अजून तरी आवाक्यात आहे असे वाटत नाही.
      दैनंदिन जगण्यात पर्यावरणाबाबत सजगता वाढवू हिच दिवाळीची सदिच्छा 🌹

      Delete
  2. धन्यवाद जग्गुदादा. आम्ही विद्युत वाहने वापरतो, एलसीडी दिवे वापरतो, दिवाळीत फटके उडवत नाही

    ReplyDelete
  3. Prashant Gurav above coment

    ReplyDelete
  4. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आता हा आपल्या जगण्यामरण्याचा प्रश्न झाला आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

      Delete
  5. अतिशय सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. खरे म्हणजे हे खूप गंभीर आहे. आपण ही आता ' बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे वागण्याची गरज आहे.

      Delete
  6. Dr saheb, khup chan
    Main & important subject written so softly
    & easily to open every eye...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot for your kind words.

      Delete
    2. संभाजी गिरमे, आपण सर्वांनी हे आता गांभीर्याने घ्यायला हवे.

      Delete
  7. सुंदर लेखन आणि प्रेरणादायी प्रवास Janulka ह्या संशोधकाचा. लेखात लिहिल्याप्रमाणे बहुतेक गोष्टी मी आचरणात आणतो आहे जसे सायकल वापर, सार्वजनिक वाहतूक, कमीत कमी विमानप्रवास वगैरे. पण पूर्णपणे हे टाळणे शक्य आहे का याचा गांभीर्याने विचार करून पावले उचलेन याची खात्री देतो. धन्यवाद आवटे सर.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण जे करता आहात ते सर्वांनी करावयाची गरज आहे, आपण अगदी कडेलोटाच्या बिंदूपाशी उभे आहोत. मनापासून धन्यवाद.

      Delete