Wednesday 13 December 2023

बाबासाहेबांचे निरोपाचे बोलणे - प्रदीप आवटे

आपल्या कुटुंबातील कोणतीही मोठी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपला निरोप घेताना तिने सर्व कुटुंबीयांना काय सांगितले हे पुन्हा पुन्हा त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांगत असतात. 'सुखाने राहा, एकमेकांची काळजी घ्या.' कुटुंबातील एखादी व्यक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ' तिची अधिक काळजी घ्या', असे ही जाणारी व्यक्ती कुटुंबीयांना सांगत असते. त्या शिकवणीची एकमेकांना आठवण करून देत ते कुटुंब आपली वाट चालण्याचा प्रयत्न करत असते.
देश ,समाज हे देखील कुटुंबाचेच एक मोठे रूप. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर नावाचा बाप माणूस आपल्याला सोडून गेला. आपला निरोप घेताना त्यांनी आपल्याला काय सांगितले, याची आठवण ही आज आपण एकमेकांना करून देण्याची गरज आहे.
आज बाबासाहेबांच्या ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांची आठवण काढताना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेसमोर बोलताना बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले ते आपण कोणीही विसरता कामा नये.
संविधान निर्मितीचे काम कसे पूर्ण झाले, त्यामध्ये काय अडथळे आले, या कामांमध्ये कुणी कुणी मदत केली,घटनेबद्दल वेगवेगळ्या लोकांचे काय आक्षेप आहेत आणि त्याबद्दल मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना काय वाटते, या सगळ्या बाबत बाबासाहेब या भाषणामध्ये बोलतात.



बाबासाहेबांना आपल्या भविष्याची काळजी:

आणि हे सगळं सांगून बाबासाहेब म्हणतात की, खरं म्हणजे इथं मी माझं भाषण संपवू शकतो पण मला अजून काही बोलायचं आहे. मला या देशाच्या भविष्याची काळजी वाटते आणि म्हणून मला आणखी काही गोष्टीबद्दल बोलायचे आहे, असं म्हणून बाबासाहेब आपल्या देशाने यापूर्वी स्वातंत्र्य कसे गमावले, याबद्दल सांगतात आणि येणाऱ्या काळात आपण कष्टाने मिळवलेले हे स्वातंत्र्य पुन्हा गमावू शकतो का, याबद्दल बोलू लागतात.

आपण आपले स्वातंत्र्य पुन्हा गमावू शकतो का?
आपल्या स्वातंत्र्य गमावण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते का, असा प्रश्न विचारत बाबासाहेब कमालीचे अस्वस्थ होतात आणि एक महत्त्वाचा इशारा ते आपणा सगळ्यांना देतात, आपल्या देशात वेगवेगळ्या पक्षांचे, राजकीय विचारधारांचे लोक आहेत परंतु आपला खरा शत्रू आहेत जात आणि धर्म.
"जेव्हा भारतीय म्हणून आपण कोणत्याही जात धर्माला देशापेक्षाही अधिक महत्व देऊ तेव्हा आपले स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते आणि आपण ते गमावू शकतो, कदाचित कायमचे. आणि म्हणूनच आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असे बाबासाहेब अगदी तळमळीने सांगतात.
आपल्या लोकशाहीचे काय होईल?
बाबासाहेबांना दुसरी काळजी वाटते, ती या देशातील लोकशाहीची. लोकशाही तत्त्व म्हणून आपल्याला खूप पूर्वीपासून माहित आहे हे बाबासाहेब नमूद करतात. गौतम बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये लोकशाहीचे दर्शन आपल्याला होते पण इतिहासाच्या क्रमात कधीतरी आपण या लोकशाहीच्या तत्वाला तिलांजली दिली. ही लोकशाही व्यवस्था आपण पुन्हा हरवून बसू का, याची भीती बाबासाहेबांना वाटते.
लोकशाही केवळ सांगाडा म्हणून उरता कामा नये तर ती प्रत्यक्षामध्ये आपल्या लोक जीवनात, सामाजिक जीवनात सतत अस्तित्वात असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. अन्यथा केवळ सांगाडा म्हणून असलेली लोकशाही एका वेगळ्या रूपात हुकूमशाहीला आमंत्रण देऊ शकते.



कोणाचेही भक्त बनू नका.▪️
बाबासाहेब जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताला उद्धृत करून सांगतात, 'आपण एखाद्या थोर व्यक्तीच्या पायाशी आपल्या स्वातंत्र्याची आहुती देणे किंवा सारी संस्थात्मक रचना दुय्यम करून टाकण्याचे अधिकार, सामर्थ्य त्याला प्रदान करणे ,' अत्यंत धोकादायक आहे. थोर व्यक्तींनी देशासाठी जे केले आहे, त्याबद्दल कृतज्ञ असणे आवश्यक आहे पण कृतज्ञतेला मर्यादा असायला हवी, असा इशारा बाबासाहेब देतात. डॅनिएल ओकॉनेल या आयरिश देशभक्ताचे वचन ते समोर ठेवतात," No man can be grateful at the cost of his honour , no woman can be grateful at the cost of her chastity and no nation can be grateful at the cost of its liberty." हा इशारा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतासाठी अधिक महत्त्वाचा असल्याचे बाबासाहेब नमूद करतात. कारण भारतामध्ये भक्ती आणि व्यक्तीपूजा यांची भलतीच चलती आहे. कुठल्याही देशापेक्षा भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर व्यक्तीपूजक आहेत. धर्माच्या क्षेत्रात भक्ती हा मुक्तीचा मार्ग असेल पण राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही निश्चितपणे आपल्या विनाशाची वाट आहे आणि यातूनच हुकूमशाही उदयाला येण्याची भीती आहे.

देश रक्षणासाठी स्वातंत्र्य, समता आणि सहभावाचे त्रिकुट :
आणि तिसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब नमूद करतात आपण केवळ राजकीय लोकशाहीमध्ये समाधान मानता कामा नये. आपली राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही देखील कशी होईल, याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही राजकीय लोकशाही तिला सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय टिकू शकत नाही. ज्या समाजामध्ये जीवनमूल्य म्हणून स्वातंत्र्य ,समता आणि सहभाव जगण्यामध्ये आवश्यक मानले जातात त्याच समाजामध्ये सामाजिक लोकशाही खऱ्या अर्थाने नांदू शकते. स्वातंत्र्याची समतेपासून फारकत होऊ शकत नाही, समता स्वातंत्र्यापासून घटस्फोट घेऊ शकत नाही आणि स्वातंत्र्य ,समता सहभावाशिवाय नांदू शकत नाहीत. घटना 'एक व्यक्ती, एक मत ,एक मूल्य,' असे म्हणते आहे पण आपल्या समाजात देखील प्रत्येक व्यक्तीची पत आणि मूल्य हे इतर कोणत्याही व्यक्ती एवढेच जेव्हा होईल तेव्हाच ही खरी सामाजिक लोकशाही अस्तित्वात येईल. आपले राजकारण आणि समाजकारण यातील हा अंतर्विरोध आपण जितक्या लवकर संपवू तितके आपले स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिक सुरक्षित राहील.
या भाषणात बाबासाहेबांच्या अवघ्या विचारांचा सारांश जणू उतरला आहे. हेच त्यांनी आपला निरोप घेताना, आपल्या सुखी जगण्यासाठी आपल्या हातात भारतीय संविधान ठेवताना आपणा सगळ्यांना सांगितले आहे.
या वाटेने चालणे हीच या महामानवाला खरीखुरी आदरांजली आहे.


May be an image of 1 person


All reaction

No comments:

Post a Comment