Showing posts with label लोकप्रभा. Show all posts
Showing posts with label लोकप्रभा. Show all posts

Friday, 26 September 2014

जागतिकीकरणाच्या फांदीला ‘इबोला’चे वटवाघूळ



जागतिकीकरणाच्या फांदीला इबोलाचे वटवाघूळ
-- डॉ.प्रदीप आवटे.

             माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव,इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो मास्तर एक आठवडाभर मस्त नदी काठची रपेट मारुन आला आणि २६ ऑगस्ट १९७६ ला एकदम तापाने फणफणला. दवाखाना,उपचार सारे काही झाले पण ८ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्याला विषाणूजन्य रक्तस्त्रावी तापाने घेरले होते.हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरुन या नव्या विषाणूचे बारसे “इबोला विषाणू”असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण.त्या वर्षी झैरे (कांगो)मध्ये जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले.ही इबोलाची पहिली साथ. या नंतर इबोला अधून मधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दुःस्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला. १९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भिती एवढी सर्वव्यापी आहे की १९९५ साली वोल्फगॅंग पीटरसनने इबोला सदृश्य मोटाबा या काल्पनिक आजारावर “आऊटब्रेक” नावाची हॉलीवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भिती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली.

  .... आणि ७ ऑगस्ट २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सध्या पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सुरु असणारा इबोला उद्रेक ही सार्वजनिक आरोग्यातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित केले आणि इबोला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा आणि काळजीचा विषय झाला.
काय आहे हा इबोला ?
    इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे.इबोलाचा हा विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. या आजारातील मृत्यूचे प्रमाण ५० ते ९०%इतके प्रचंड आहे.
   आज सुरु असलेला इबोलाचा उद्रेक हा डिसेंबर २०१३ पासून सुरु झाला आहे. गिनी,सिएरा लिओन, लायबेरिया आणि नायजेरिया या चार देशांसोबत आता कांगोमध्येही हा उद्रेक सुरु आहे. २८ ऑगस्ट २०१४ पर्यंत या देशांमध्ये ३०६९ इबोला रुग्ण आढळले असून त्यापैकी १५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या आजवरच्या सर्वात मोठ्या इबोला उद्रेकात मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे ५३%च्या आसपास आहे. गिनी मध्ये ते ६६%आहे तर सिएरा लिओन मध्ये ४२ % आहे.
ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, घसादुखी, उलटी जुलाब, अंगावर रॅश उमटणे, रक्तस्त्राव ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.  या आजारात मूत्रपिंड आणि यकृताच्या कामात बिघाड होतो.

इबोला पसरतो कसा?
   वटवाघळाच्या काही प्रजाती, चिपांझी,गोरिला, माकडे आणि इतर प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो.ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीर स्त्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित प्राण्यांचे मांस खाणे हे देखील अनेकवेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते.
  पण एकदा का आजार माणसात आला की तो एका रुग्णापासून दुस-या निरोगी माणसाला होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा प्रादुर्भावही मुख्यत्वे शरीर द्रव्यामार्फत होतो. रक्त आणि इतर शरीर द्रव्यामार्फत या विषाणूचा प्रसार होत राहतो. मानवी वीर्यातही हा विषाणू सात आठवड्यांपर्यंत सापडतो.त्यामुळे एच आय व्ही,कावीळ ब या प्रमाणेच इबोला देखील शरीर संबंधांमार्फत पसरु शकतो.
   रुग्णाची सेवा करणारे नातेवाईक तसेच डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना हा आजार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आणि म्हणूनच रुग्णांवर उपचार करताना आणि त्यांची शुश्रुषा करताना त्यांच्या शरीरद्रव्याशी आपला संबंध येणार नाही, याची दक्षता आरोग्य कर्मचा-यांनी घेणे आवश्यक आहे. या उद्रेकात खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचारी इबोलाला बळी पडताना दिसत आहेत.
   अगदी ताजे उदाहरण म्हणजे सिएरा लिओन देशातील डॉ.शेख उमर खान हे होय.  २९ जुलै २०१४ रोजी ते इबोलाने गेले.हा माणूस गेले दहा वर्षे इबोला रुग्णांवर उपचार करत होता.त्यांनी आजवर शंभरहून अधिक इबोला रुग्णांवर उपचार केले होते. या सा-यांमधील धोका त्यांना कळत होता पण तरीही एका प्रचंड निष्ठेने ते हे काम करत होते. “माझे माझ्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे.इबोला रुग्णावर उपचार करण्यातला धोका मला समजतो आणि म्हणूनच मी सर्वप्रकारची काळजी घेतो.हे काम करताना होणारा आनंद या धोक्यापेक्षा कितीतरी मोठा आहे,” आपल्या मृत्यूपूर्वी दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते. इबोला भोवती दाटलेले भयाचे वलय त्यांना पुसायचे होते आणि म्हणूनच आपल्या केमेना येथील रुग्णालयातील ब-या होऊन जाणा-या इबोला रुग्णाला ते जादूची झप्पी देऊन निरोप द्यायचे. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाळीत टाकू नये, हा उद्देश त्यामागे असायचा. पण इबोलाशी लढणारा जिद्दी योध्दा या लढाईत कामी आला. “आम्ही आज आमचा नॅशनल हिरो गमावला,” या शब्दांत सिएरा लिओनच्या आरोग्य मंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
   घातक आणि धोकादायक आजार हे वैद्यक शास्त्रासमोरचे आव्हान नेहमीच होते. कॉलरा काय किंवा प्लेग काय सा-यांमध्येच ही भिती होती पण येथे पळपुटी माणसे कामाची नसतात. आपल्या व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा, धैर्य आणि त्या सोबतच आवश्यक ती खबरदारी घेणारी माणसेच या आणीबाणीच्या प्रसंगी महत्वाची ठरतात. आणि म्हणूनच इबोला रुग्णांवर उपचार करताना पीपीई सारखी संरक्षक साधने वापरणे,रुग्णाच्या दूषित गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे  (जैववैद्यकीय कच-याचे व्यवस्थापन) या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. इबोला हा आजार स्वाईन फ्ल्यू सारखा हवेतून पसरत नाही त्यामुळे तो खूप वेगाने पसरु शकत नाही, हे ही महत्वाचे..! स्वाईन फ्ल्यूने अवघ्या अडीच महिन्यात सारे विश्व पादाक्रांत केले होते.
   या आजाराचा अधिशयन कालावधी २ ते २१ दिवस आहे. आजमितीला या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. काही प्रायोगिक औषधे वापरण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे खरे पण आजमितीला रुग्णाला लक्षणाधारित उपचार देण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. आपल्याकडे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्था,नवी दिल्ली येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.





इबोला भारतात येऊ शकतो काय?
  हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा आणि चिंतेचा विषय. आज जवळपास पंचेचाळीस हजार भारतीय पश्चिम आफ्रिकेतील देशात आहेत. इबोला आपल्या देशात येऊ नये,यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. या देशातून येणा-या प्रवाशांची यादी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरोग्य यंत्रणा संबंधित राज्य आरोग्य विभागाला देत असून या प्रवाश्यांचे त्यांनी इबोला ग्रस्त देश सोडल्यापासून पुढील तीस दिवस दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पैकी कोणाला इबोला सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.
  आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या आणि विशेषतः इबोला ग्रस्त भागातून येणा-या प्रवाशांना त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात येत आहे. इबोला ग्रस्त भागातून आल्यानंतर जरी त्यांना काही लक्षणे नसतील तरी या आजाराचा अधिशयनक कालावधी २१ दिवसाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला जनसंपर्क कमीत कमी ठेवला पाहिजे आणि आलेल्या दिवसापासून एक महिन्याच्या काळात त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून त्यांना दिलेल्या मार्गदर्शक पत्रकातील फोन क्रमांकावर फोन करुन त्याची कल्पना द्यायला हवी. हे त्यांच्या,कुटुंबाच्या  आणि  संपूर्ण समाजाच्या आरोग्या करिता आवश्यक आहे.
   इबोला ज्या प्रकारे पसरतो हे लक्षात घेतल्यास,व्यवसाय किंवा पर्यटनासाठी या देशांमध्ये गेलेल्या प्रवाशांना इबोलाची बाधा होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डब्ल्यू एच ओ ने ही स्पष्ट केले असले तरी ही सारी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
   वटवाघुळ हे इबोला विषाणू प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावते,असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आज १९७६ च्या तुलनेत शहरीकरण झालेल्या आफ्रिकेत पूर्वी इतक्या सहजतेने इबोलाचा उद्रेक थांबताना दिसत नाही. एखाद्या गावात झालेला उद्रेक ते संपूर्ण गाव विलग करुन आटोक्यात आणणे सोपे होते पण आज मात्र आफ्रिकन देशांच्या शहरी आणि मोठ्या प्रमाणात ये जा असणा-या भागात इबोलाची लागण होताना दिसते आहे आणि म्हणूनच मागील आठ महिन्यापासून हा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही आहे. जागतिकीकरणाच्या फांदीला हे इबोलाचे उलटे वटवाघूळ लटकले आहे.ते जणू आपल्या सा-या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीला वाकुल्या दाखवित आहे. कॉन्स्पिरसी थेरी मानणा-या अनेकांना हा बायोटेरीरीझमचा भाग वाटतो तर काहींना औषध कंपन्यांनी केलेला बनाव वाटतो. कोणीच आज या बाबत अंतिम सत्य उमगले आहे, अशा थाटात भाष्य करु शकत नाही. आज आपल्या हातात आहे दक्षता आणि पायासमोर आहे मानवी हितासाठी अनेकांच्या त्याग आणि समर्पणाने सिध्द झालेली विज्ञानाची पाऊलवाट...! आज आपल्या सर्वांना खाली मुंडी वर पाय करायला लावणा-या या करामती वटवाघळाच्या शीर्षासनावरही उद्या उपाय सापडलेच पण तोवर हातात हात घेऊन चालू या. परस्परांची काळजी घेऊ या.

( सदर लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. http://issuu.com/lokprabha/docs/19_sept_2014_full_issue_for_web_new/c/sl7f242)

Tuesday, 22 April 2014

आरोग्याला 'घर घर'
- प्रदीप आवटे

घर हवे घर

                 मागील वर्षीची गोष्ट ...! संपूर्ण देशभरात डेंगूचा प्रकोप सुरू होता. आम्ही काही जण डेंगू संदर्भात राज्यातील सर्व वर्तमानपत्रात द्यावयाच्या आरोग्य शिक्षण विषयक जाहिरातीचा मसुदा तयार करत होतो. कोणत्याही साथरोगावर सुयोग्य नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसहभागाची आत्यंतिक आवश्यकता असते. प्रभावी आरोग्य शिक्षण ही लोकसहभागाची पूर्वअट असते. खरे तर खूप साध्या साध्या गोष्टी डेंगू सारख्या आजाराला आळा घालताना उपयोगी पडतात. लोकांना सहज समजतील आणि दैनंदिन व्यवहारात वागताना उपयोगात आणता येतील, अशा अगदी कॉमन सेन्सच्या बाबी आम्ही या जाहिरातीत समाविष्ट केल्या. उदाहरणार्थ - आपल्या घरातील पाणी साठवायची भांडी आठवड्यातून एकदा मोकळी करा, घासून पुसून स्वच्छ करा म्हणजेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा. घरांच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावा, डास चावू नयेत म्हणून पायघोळ कपडे घाला इत्यादी इत्यादी ...!
  रात्री मित्राचा फोन आला,"या जाहिराती आपण कोणाकरिता तयार करतो रे?"
 मी एकदम आश्चर्यचकित, म्हणालो, "का रे, एकदम असे विचारतोयस ते?"
 " अरे काल घराकडे परतताना एका झोपडपट्टी समोर ट्रॅफिक जाम झाला म्हणून खाली उतरून पाहतो तर रस्त्याच्या कडेला असलेल्या नळाला पाणी भरण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी. भांडी पार रस्त्यावर आलेली. नळाकडे पाहतो तर, लहान मुलाच्या करंगळीएवढी धार..! इतक्या मुष्कलीने मिळालेले पाणी दर आठवड्याला ओतून देणे, सोपे असते का रे?", तो बोलतच होता, मी ऐकत होतो," आणि अरे किती तरी झोपड्यांना धड एकही खिडकी नाही. आपण कोणत्या घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावायची भाषा करतो,यार?"
तो खूपच भावुक झाला होता. तो डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याला शोभावे , अशा भाषेत बोलत होता. पण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील नेमके वास्तव तो अधोरेखित करत होता. आपले आरोग्य हे आरोग्य क्षेत्राबाहेरील अनेक गोष्टींवर अवलंबून असते. 'घर' त्यापैकीच एक..! अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा...! निवारा म्हणजेच घर ही तुमची माझी तीन क्रमांकाची गरज...! आपल्या आहारा इतकेच आपले आरोग्य अवलंबून असते आपल्या घरावर..! आपले घर, त्याची पर्यावरण शास्त्रीय गुणवत्ता हे आपल्या आरोग्याचे महत्वपूर्ण निर्धारक आहेत.
  १९९०च्या दशकानंतर भारतात देखील शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला. एकीकाळी खेड्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या देशात आज एक तृतीयांश लोकसंख्या शहरात राहते आहे. महाराष्ट्रात तर आज जवळपास निम्मी लोकसंख्या शहरात राहते आहे.ग्रामीण भागातील शेतीच्या आणीबाणीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर असंघटित मजूर वर्ग शहराकडे वळतो आहे. १९९१ -२००१ या दशकात शहरी असंघटित मजूर वर्गात ३६० टक्क्यांनी वाढ झाली,ही आकडेवारी लक्षात घेतली तर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होत असलेल्या स्थलांतरचे प्रचंड प्रमाण आपल्या लक्षात येईल. शहराकडे धावणा-या या प्रचंड लोंढयाला जागा कोठे मिळणार? त्यामुळे झोपडपट्ट्यामध्ये राहणा-या लोकसंख्येमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ होते आहे. आज मुंबईतील जवळपास निम्मी लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते आहे. देशभरात ही लोकसंख्या शहरी लोकसंख्येच्या सुमारे तीस टक्के आहे. ही प्रजा ज्या पध्दतीच्या घरात राहते आहे, तिला घर म्हणावे का, असा प्रश्न आहे. "स्लम डॉग मिलिनियर" सारख्या चित्रपटातून या वास्तवाचे विदारक चित्र आपण पाहिले आहे.
आरोग्याला ' घर घर' 

  दिवसेंदिवस घरांच्या किमती आभाळाला भिडताहेत. परवडणारे घर गुलबकावलीच्या फुलाइतके दुर्मिळ झाले आहे. १९५० ते १९९० च्या काळात निम्न वर्गासाठी परवडणा-या घरांचे पुरवठादार असणा-या सरकारने आता आपली भूमिका बदलली आहे. आता गोरगरिबांना परवडणारी घरे मिळावीत या करिता सुयोग्य आर्थिक धोरण तयार करणे, एवढीच सरकारची भूमिका आहे. जागतिकीकरणानंतर मुळातच शासनाला आपल्या "लोक कल्याणकारी "या विशेषणाचे विलक्षण ओझे झाले आहे. Provider पासून enabler होण्याची भूमिका कागदावर कितीही गोंडस वाटली तरी व्यवहारात गरीबांना नव्हे तर धन दांडग्यांना एनेबल करण्याचे धोरण स्पष्ट दिसते आहे.
   २०११ च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ८ कोटी लोकासाठी  अजून जवळपास ३ कोटी घरांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर परवडणारे घर सर्वसामान्यांना सहज घेता यावे, या साठी असणा-या गृहकर्ज योजना किंवा प्राप्ती करातील सूट या सारख्या गोष्टी केवळ मध्यम वर्गासाठी उपयुक्त ठरतात आणि गरीबी रेषेखाली जगणारे परिघावरील जीव "कुणी घर देता का घर ?" असे म्हणत शहरभर फिरत राहतात. या मुळे  नाइलाजाने या गरीब वर्गाला आपल्या घरासाठी शहरातील जोखमीच्या जागा शोधाव्या लागतात. टेकड्या, दलदलीच्या जागा,रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या जागा,मोकळे नदीपात्र, नाले अशा मिळेल त्या जागी झोपड्या बांधल्या जातात. पावसाळयात येथे पाणी साचते, पाण्याचा निचरा नीट होत नाही, मग उंदरामुळे होणारे लेप्टोस्पायरोसिस, प्लेग सारखे आजार,डासांमुळे होणारे हिवताप,डेंगू सारखे आजार, कावीळ, टायफॉइड,अतिसारासारखे जलजन्य आजार या विविध साथीच्या आजारांना ही जनता बळी पडते. टीबी, इन्फ्लुएंजा,गोवर ,घटसर्प या सारखे हवेवाटे पसरणारे आजार झोपडपट्टी भागातील गर्दी,दाटीवाटीमुळे वेगाने पसरतात. टीबी सारख्या गंभीर आजारामुळे दरवर्षी भारतात सुमारे तीन लाख मृत्यू होतात. याच आजाराचे मुंबईच्या झोपडपट्टी भागातील प्रमाण दर लक्ष लोकसंख्येमागे ६९० टीबी रुग्ण एवढे अधिक आहे. अधिकृत घर नसल्याचे इतरही अनेक दुष्परिणाम या लोकांना सोसावे लागतात. अनेक शासकीय योजनामध्ये त्यांची नोंदणी होत नाही,त्यामुळे त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही. एकात्मिक बाल विकास योजनेचेच उदाहरण घ्या, ग्रामीण भागातील ९८ टक्के मुले या योजनेतील पूरक आहाराचा फायदा घेतात पण हेच प्रमाण शहरात अवघे ४८ टक्के एवढे आहे. पाणीपुरवठा,वीज,घन कचरा व्यवस्थापन,शौचालये या सर्व सुविधा अशा वस्त्यामध्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. आणि देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात ठळक वाटा असणारे शहर, देशाच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य आधार असलेले श्रमिकांचे शहर अत्यंत निम्नस्तरीय जीवन कंठत राहते. घर,घराभोवतीचे वातावरण याचा संबंध केवळ शारीरिक आरोग्याशी नव्हे तर मानसिक आरोग्याशी ही निकटचा संबंध आहे,हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक निम्न स्तरातील कुटुंबाला जेव्हा त्याच्या खिशाला परवडेल असे घर मिळते,तेव्हा त्याचा विधायक परिणाम त्या घरातील मुले, स्त्रिया ,वृध्द व्यक्ति यांच्या आरोग्यावर कसा होतो, हे देखील अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार झाल्यानंतर त्याचा परिणाम स्व प्रतिष्ठा अधिक बळकट होऊन व्यक्तीचे मानसिक बळ वाढण्यात कसा होतो, हे ही अनेक समाज शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
   लॉरी बेकर सारख्या गांधीवादी आर्किटेक्टने सोशल हाऊसिंगची अथवा कम्युनिटी हाऊसिंगची कल्पना खूप पूर्वीच मांडली आहे. ग्लोबल वॉर्मिंग  च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी तंत्रज्ञानाचा वापर करून निम्न स्तरातील लोकाकरिता कल्पक पध्दतीने कामुनिटी हौसिंगच्या आर्थिक दृष्ट्या परवडतील अशा योजना प्रत्यक्षात आणणे शक्य आहे. पण या बाबतीत आपली राजकीय इच्छाशक्ती आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत राहून शहराच्या सर्विस सेक्टर मध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या या वर्गाकडे 'मतपेटी' पलीकडे पाहावयाची गरज आहे. त्यांच्या घराचा प्रश्न हा त्यांच्या आरोग्याशी,त्यांच्या  जगण्यामरण्याशी निगडीत आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.
  शहरी कमाल जमीन धारणा कायदा असेल नाही तर घरभाडे नियंत्रण कायदा असेल, आपण कायदे अनेक केले,तरी ही आज आपण प्रत्येक शहरात लँड माफीयांचे साम्राज्य पाहतो. ही मंडळी गोरगरिबांसाठी परवडणारी घरे बांधातील याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी सारे कायदे धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामाचे पीक प्रत्येक शहरात फोफावताना दिसते आहे. अवघ्या १६-१७ लाख लोकसंख्या असणा-या एका शहराचे आयुक्त परवा बोलताना म्हणाले,' माझ्या महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत बांधकामांची संख्या सुमारे पावणे दोन लाख आहे. ही सारी बांधकामे पाडावयाची म्हटली तर किमान ८६ वर्षे लागतील. कदाचित माझा खापर पणतू हे काम पूर्ण करू शकेल."
 आपण आपल्या शहरी घरांच्या धोरणाकडे इतके दुर्लक्ष करणे आपल्याला खूप महागात पडणार आहे.
मी माझ्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे,
" मी मागितली शहराकडे,
चतकोर भाकर, त्याच्या टोपल्यातली
आणि
विसावायला थोडीसी जागा
त्याच्या मांडीवर !
शहर तसेच चालत राहिले,
मला पाठमोरे होत...!"

 ज्या वाटेने आज आपली शहरे चालली आहेत, त्या वाटेने त्यांचे काय होईल आणि मुख्य म्हणजे या शहरातील तुमच्या आणि माझ्या आरोग्याचे काय होईल? परतीची वाट नसणा-या टकमक टोकावर आपण आपल्या शहरांना घेऊन चाललो आहोत का? शहरातील कोट्यवधी जनतेला पाठमोरे होत चालणा-या शहराची दिशा आपल्याला बदलायला हवी आणि यासाठी केवळ कागदावरील धोरणे उपयोगाची नाहीत. आवश्यकता आहे ती प्रामाणिक अंमलबजावणीची ...! 
(साप्ताहिक लोकप्रभात 'आरोग्य भान' स्तंभात प्रसिध्द झालेला लेख)