Sunday, 9 March 2014

. . . मोठी त्याची सावली..!
-- प्रदीप आवटे
------------------------------------------------------------------
   अवघा दहा बारा वर्षाचा असताना को-या करकरीत देशी दारुची चव त्याने चाखली
त्याच वयात पोटफाडीच्या रुममध्ये मृत स्त्री देहासोबत चाललेले ओंगळवाणे प्रकार त्याने पाहिले
पैशाची सुगी अनुभवली आणि गरीबीचे चटकेही…!
शाळा कशीबशी सुरुच होती पण दहावीच्या उंबरठ्यावर गणिताचे माप ओलांडताना त्याचा जीव मेटाकुटीस आला
पण कोणत्याच उंबरठ्यात अडकायचा त्याचा स्वभाव नव्हता आणि आजही नाही
सारं निळंशार आभाळ मुठीत घेऊ पाहणा-या जीवाला कसल्या भिंती, कसल्या चौकटी आणि कसले उंबरे…!
पण
तो आरशात पाहत होता आणि आपलं काळं, येडंइद्र रुपडं त्याला डाचत होतं
त्याला आपलं खरं रुप दावणारा आरसा अजून गवसायचा होता, तेव्हाची गोष्ट..!
तो राजहंस एक …!”,हे सांगणारा आत्मसाक्षात्कारी क्षण अजून उगवायचा होता
विशी - पंचविशीत तो महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाला. का कोण जाणे,आतली घुसमट थांबत नव्हती... जीव कुठंच लागत नव्हता... आपण कदाचित जगायलाच नालायक असू .. मन स्वतःलाच कुरतडत होतं... काही महिन्यातच आपली ट्रंक,बाडबिस्तारा गुंडाळून आणि सोन्यासारख्या नोकरीला राम राम ठोकून त्यानं गाव गाठलं... घरी दारी नोकरी गमावली म्हणून पोटभर शिव्या खाल्ल्या...
गरज पडली तेव्हा सेक्युरिटी गार्डची नोकरीही केली, इस्त्रीचे दुकानही चालविले...
जहां नही चैना,वहां नही रहना’,असं म्हणत चालणं सोपं असतं पण ते समाधानाचं संतुष्टीचं स्टेशन गाठणं, मुख्य म्हणजे, स्टेशन आलेलं कळणं महाकठीण...!
अशाच वाटचालीत तो मला भेटला...
त्याची माझी पहिली भेट कधी झाली, मी आठवू लागतो
  खरं तर तो मला पहिला भेटला “संचार” नावाच्या एका छोट्या स्थानिक वर्तमानापत्रातून...! मला आठवते, २००१-०२ च्या आसपासची गोष्ट असावी. “संचार” मधल्या एका छोट्या बातमीचा मथळा होता –  “जेऊरच्या काव्यस्पर्धेत नागराज मंजुळे प्रथम...”  कवितेच्या क्षेत्रात एवढं रस्टीक नाव ऐकायची माझ्या मध्यमवर्गीय अभिरुचीला सवय नव्हती. मी मनाशीच हसलो आणि म्हणालो, जेऊरच्या सोकॉल्ड महाविद्यालयाची काव्यस्पर्धा...! मग त्यात नागराज मंजुळे काय आणि कुणी काय... चालायचंच !त्याची कविता अजून माझ्या कानावर पडायची होती आणि तो ही योग लवकरच आला...!
  कुर्डूवाडीला माझे सर्जन मित्र डॉ.दिनेश कदम दरवर्षी त्यांच्या वडलांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्य पुरस्कार देत.एके वर्षी या कार्यक्रमाला नारायण सुर्वे आले होते आम्ही आजूबाजूचे सारे साहित्यिक साहित्य रसिक या कार्यक्रमाला हजर होतो. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर रात्री उपस्थितांचे काव्यसंमेलन सुरु झाले. मी कोणती कविता वाचली ते आठवत नाही पण माझ्या काव्यवाचनानंतर सूत्रसंचालन करणा-या राजेंद्र दास यांनी पुढील नाव पुकारले,” नागराज मंजुळे” त्याचा परिचय करुन देताना दास सर काय म्हणाले,हे मला आज आठवत नाही पण मी उत्सुकतेने पाहू लागलो.एक उंचेला,शिडशिडीत,धारदार नाकाचा सावळा तरुण पुढे आला आणि आपल्या धीरगंभीर आवाजात कविता म्हणू लागला,
“ पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती...
म्हणूनच की काय
वेळी अवेळी
रस्त्याने येता जाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायाची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकी समोर
कोसळत राहायचा
तासन तास.....!”
      कविता बरसू लागली, पावसाच्या अफलातून प्रतिमेतून उलगडत जाणारी “एका पावसाची गोष्ट” त्याच्या आवाजात ऐकताना आपणच पावसात भिजतो आहोत असा भास मला झाला.पाऊस माझ्या डोळ्यातून झरु लागला. या एका कवितेने, या एका क्षणाने आम्हां दोघांना आमच्या सनातन नात्याची आठवण करुन दिली. कविसंमेलनानंतर आम्ही कधीतरी पहाटे घरी परतलो. जेऊर येईपर्यंत आम्ही बोलत होतो... बॅकड्रॉपला पाऊस पडतोय असा भास सारखा होत होता. मध्यरात्र उलटून गेली होती आणि पूर्वेकडे लाली पसरु लागली होती.एका विलक्षण क्षणी नागराज आणि त्याचे शब्द मला भेटले होते.
आणि मग आम्ही भेटत राहिलो.
साहित्यात रमणारा दुसरा कोणी मित्र भेटला तरी नागराजचा विषय निघाला नाही असे कधी झाले नाही. अगदी नागपूरला यशवंत मनोहर भेटले तरी नागराजचा विषय होताच…!
नागराज सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचा..! करमाळ्यापासून १८-२० किलोमिटरवरील मध्यरेल्वेचे छोटे स्टेशन असलेले हे गाव,आठ दहा हजार लोकसंख्येचे...! रेल्वे लाईनला लागूनच वडार समाजाची काही घरं,नागराजचे घरही याच वस्तीत...!
  आप्पा,भारत,नागराज आणि भूषण ही चार भावंडे...! आप्पा गवंडी काम करतो. फॅण्ड्रीतील जब्याचे घर त्यानेच तर उभारले आहे. भारत आणि भूषण ही दोन्ही भावंडे पोलिस खात्यात ...! वडार समाजात दगड फोडणा-या आई बापांच्या पोटी जन्माला आलेल्या नागराजच्या जगण्याची चित्तरकथा उचल्या ,’उपराआणि बलुतंचा पुढचा अध्याय आहे.
लहान असतानाच नागराज आपल्या चुलत्यांना दत्तक गेला म्हणून त्याचं बरंचसं बालपण करमाळ्याला गेलं.या दत्तक जाण्याचा काही परिणाम त्याच्या एकूणच मानसिक जडणघडणीवर झाला असावा. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’, या म्हणीप्रमाणे त्याची जी भावनिक उपासमार या कोवळ्या वयात झाली त्याचे व्रण त्याच्या कवितेत आणि चित्रकृतीतही दिसतात. घर आणि समाज या दोन्ही पातळीवर आलेला भावनिक एकाकीपणा या संवेदनशील मनाला कासाविस करत होता,हे मला त्याच्या प्रत्येक भेटीत जाणवत होते. “कविता लिहण्याची प्रक्रिया ही विहिरीत श्वास रोखून बुडी मारुन तळचा दगड आणण्यासारखी दमछाक करणारी आहे”, असे नागराज नेहमी म्हणतो तेव्हा त्याच्या कवितेची सेंद्रियताच तो स्पष्ट करत असतो. जगतात,भोगतात अनेक जण पण त्या जगण्याचा,भोगण्याचा नेमका तळ किती जणांना गवसतो? किती जणांना ही पुनःनिर्मितीमधली दमछाक सोसते.
    आपल्या कवितेची जगण्याची नाळ त्याने पुन्हा पुन्हा तपासून घेतली आहे,ती त्याच्या जगण्याची जणू पूर्वअटच आहे. कौटुंबिक अडचणी, नोकरी नाही,पैशाची चणचण अशा अवस्थेत कवितेची सोबत सोपी नव्हती.नागराज नेहमी गंमतीने सांगतो,”माझी कविता छापलेली नियतकालिके नाना अभिमानाने पाहत,इतरांना दाखवत पण आईने मात्र एकदाच मार्मिक प्रश्न विचारला,याचे किती पैसे मिळतात?” बाभळीला झोके घेत घेत उपाशीपोटी झोपी गेलेली त्याची मलूल कविता पोट भरायचे साधन नव्हतीच पण ती जगण्याचे विलक्षण इंधन देणारी होती आणि आहे. आणि म्हणूनच माझ्या समानधर्मी मित्राने आत्महत्या केली,मी मात्र कविता केली असे तो लिहतो तेव्हा कविता नेमका कशाचा पर्याय असते,जगण्याचा की मरण्याचा असा तिरपांगडा प्रश्न तो आपल्या उशाशी ठेवून जातो.
  नागराज रुढार्थाने कोणत्याही चळवळीत नव्हता आणि नाही.पण त्याचे पुरोगामित्व त्याच्या जगण्यातून आणि त्याच्या चिंतनातून काळ्या वावरात उगवणा-या धानासारखे आपसूक उगवले आहे. नागराजचे वडील नाना हा त्याच्या भावजीवनाचा विलक्षण हळवा कोपरा आहे. आयुष्याचं सारं वादळ वारं सहजतेने अंगावर घेत असतानाही त्यांचं हसतमुख आणि जीवनाभिमुख असणं,नागराजला आजही वाट दाखवित राहतं. पण असे नाना गेले तेव्हा त्याने धर्मसंस्काराप्रमाणे केस कमी करण्यास नकार दिला.घरचे दारचे त्याची मनधरणी करु लागले, अखेरीस एक बट कापली तरी चालेल इथवर सारे आले पण हा बधला नाही. गावगाड्यातील जातपात,शिवताशिवत आणि देवभोळेपणा या सा-यांचा प्रचंड तिटकारा त्याला त्याच्या जीवनानुभवातून आला आहे. बंदुकीच्या गरम धूर ओकणा-या नळ्यांपेक्षा माणसं देवादिकांच्या तस्वीरींना अधिक घाबरतात,या तस्वीरी त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवितात,हे त्यानं  पाहिलं आहे,अनुभवलं आहे.
   माझ्या बौध्द तत्वज्ञानावरीलधम्मधाराकाव्यग्रंथाला मूर्त रुप मिळण्यामध्ये नागराज आणि कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. २००९-१० मध्ये जवळपास दर विकेंडला नागराज, गार्गी, मिथुन, पूजा, कुतुब, प्रियांका, गणेश, निवास ही सारी मंडळी माझ्याकडे जमत आणि मग देर रात तक आमची मैफिल रंगे. याच मैफिलीत मी कधीतरी माझ्याधम्मधारातील रचना वाचून दाखविल्या. नागराजला त्या इतक्या आवडल्या. तो म्हणाला, “ डॉक्टर, अहो, हे विचार, या रचना प्रत्येक घराघरापर्यंत जायला हव्यात, तुम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा.” “धम्मधाराचा देखणा प्रकाशन समारंभ सुध्दा या मंडळींनी पार पाडला
      पाच सात वर्षांपूर्वी नानांचा मृत्यू झाला आणि नागराज खूप हलला. जगण्यामरण्याच्या दोन ध्रुवावर त्याचा लंबक झोके घेऊ लागला. कौटुंबिक अडचणी त्यात नानांचे जाणे यामुळे नागराज उदासीच्या प्रचंड भोव-यात सापडला. भोक पडलेल्या रांजणात पाणी भरावे तसे दिवस जात होते,आशयशून्य,निरर्थक ...! सारेच संपवावे असे वाटणारे क्षण आले पण मित्र ही नागराजचे मोठे भांडवल ...! त्याचे शिक्षक असलेल्या संजय चौधरींपासून संजय साठे,राम पवार,संतोष झांजुर्णे, मिथुन चौधरी,हनुमंत लोखंडे, गणेश जसवंत असे एक ना अनेक.. हे मित्र त्याच्यासोबत होते, आणि तो कुठेही असो कविता सोबत होतीच. त्याच दरम्यान  त्याचा मित्र मिथुन चौधरीला नगर कॉलेजला मास कम्युनिकेशन विभागात लेक्चरर म्हणून नोकरी लागली. पुण्याबाहेरचे कॉलेज, त्यात मास कम्युनिकेशन सारखा विषय, विभागाला विद्यार्थी मिळावेत म्हणून मिथुन आणि मिथुनचे मित्रच आपल्या परिचितांना या कोर्स करता ऍडमिशन घ्या म्हणून विनंती करु लागले. नागराजही आपल्या जवळच्या मित्रांना या कोर्ससाठी प्रेरित करु लागला. त्यातला कोणी तरी एक जण नागराजलाच म्हणाला, “अरे तू आम्हांला सांगतोयस, तू स्वतःच का घेत नाहीस प्रवेश या कोर्ससाठी ? “
   नागराजने हा विचार तोवर केलाच नव्हता पण मग सगळ्यांनीच आग्रह केला आणि नागराज मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी बनला. त्याचा मित्र मिथुनच त्याचा शिक्षक…! सारं मोठ्या अनौपचारिकरित्या सुरु झालं आणि रेस्ट इज हिस्ट्री….! नागराजच्या हातात आता नवे साधन आले होतेकॅमेरा…! दोन डोळ्यांत मावणा-या त्याच्या दुःखाला, त्याच्या अवघ्या जगण्याला सामावून घेण्यासाठी त्याला जणू तिसरा डोळा मिळाला होता. त्यानेच लिहले आहे ना -
माझ्या हाती
नसती लेखणी
 तर
तर असती छिन्नी
सतार……. बासरी
 अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला….! “
आता हा कोलाहल उपसण्यासाठी एक नवीनच साधन त्याच्या हातात आले होते. सिनेमाची भाषा, नवी चित्रलिपी त्याने लिलया आत्मसात केली आणि कोर्सचा भाग म्हणून तयार केलेल्यापिस्तुल्याया त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या हातातला कॅमे-याला पोपटी पालवी फुटली, एक नवा दिग्दर्शक जन्माला आला आहे, हे त्यालाही उमगले होते. ‘फॅण्ड्रीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

 नागराज प्रत्येक क्षण मनमुराद जगणारा अदिवासी आहे. त्याला मराठी साहित्य क्षेत्रातला मानाचा मानला जाणारा दमाणी पुरस्कार मिळाल्यावर मी त्याच्यासोबत जेऊरला गेलो होतो. जेऊरवासियांनी आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणा-या त्याच्या मित्रांनी हलगी ताशाच्या तालावर त्याची मस्त मिरवणूक रेल्वे फाटका पासून त्याच्या घरापर्यंत काढली होती. लॉन्ड्रीवाला, चहा टपरीवाला, फिटर, कापड दुकानदार त्याला येऊन हार घालत होते, फेटा बांधत होते, गावातील सानथोर हलगीवर नाचत होते. नागराजचीही पावले थिरकत होती. उद्या अनेकांना ज्ञानपीठ ही मिळेल पण ही आपल्या माणसांची अशी उत्कट पोचपावती किती जणांना पावेल माहीत नाही. अत्यंत सटल पध्दतीने कवितेतून व्यक्त होणारा, आपल्या चित्रपटात कोणतीही लाऊड गोष्ट टाळणारा नागराज आणि आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणा-या चाहत्यांसोबत रस्त्यावर हलगीच्या तालावर नाचणारा नागराज ही एकाच माणसाची दोन विलोभनीय रुपे आहेत.
   नागराज दिग्दर्शक म्हणून किती मोठा आहे, हे येणारा काळ अधिकाधिक स्प्ष्ट करेलच पण तितकेच त्याचे माणूसपणही उबदार आहे. “फॅण्ड्रीच्या शूटींगच्या वेळी किशोर कदम सारख्या स्टार कलाकाराइतकीच केमहून आलेल्या हलगी वादकांची किंवा करमाळ्याहून आलेल्या वडार मंडळींची काळजी घेणारा नागराज आपल्यासोबतच्या प्रत्येकाची डिग्निटी जपणारा प्रतिभावंत आहे. चित्रपटातील कलाकारांसोबतचे त्याचे नाते केवळ कलाकृतीपुरते मर्यादित राहत नाही, ते त्याहून अधिक खोल, अधिक गहिरे आणि कलाकृतीतील आशयाला कृतीशील करणारे असते. ‘पिस्तुल्या त्याने पारधी समाजाच्या आणि पालावर राहणा-या सूरज पवारला प्रमुख भूमिका दिली. सूरजने या भूमिकेसाठी राष्ट्रपती पदक पटकाविले पण नागराज येथेच थांबत नाही. वडलांच्या छत्रछायेशिवाय वाढणा-या या सूरजच्या शिक्षणाची सोय तो पाहतो. आजही सूरज नागराज सोबत राहतो आहे. नव्या शहरी वातावरणात त्याने नीट जुळवून घ्यावे म्हणून नागराज आणि कंपनी त्याला पर्सनल कोचिंग देते आहे. जी गोष्ट सूरजची तिचफॅण्ड्रीतील सोमनाथ अवघडेची…!
  नागराज कधी कधी मला अतीव प्रेमाने म्हणतो, “ डॉक्टर, तुम्ही सावली देणारं झाड आहात.”  स्तुती आवडणा-या ज्युलियस सीझरलाही आवडावं असं हे वाक्य…! मला माझं ठावं नाही नागराज..! “ संपूर्ण मी तरु की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावर जळून..! “, ही आरती प्रभूंची ओळ मी मनाशी म्हणतो आणि तुझ्याकडे पाहतोतुझ्या पारावर बघ किती मंडळी विसावलीत…! नागराज बघ तरी खरं , किती मोठी झालीय तुझी सावली…! तुला भिती होती
जाहिरातीच्या या बोलघेवड्या युगात
कोण ऐकेल माझ्या स्पंदनाची विराणी…!”

आज तुझी विराणी नव्या युगाचे, नव्या मनुचे गाणे झाले आहे. तुझ्या प्रकाशाने उजळणा-या पडद्यापुढे सारे डोळ्यांत प्राण आणून बसले आहेत. काळीज काढून ठेव बिनधास्त प्रत्येकाच्या तळहातावर….!
डॉक्टरांचा शुध्दलेखनाचा तास
-डॉ. प्रदीप आवटे.
  
                 माझ्यासमोर बसलेले माझे मित्र शिंदे सर मी त्यांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनकडे अत्यंत निरखून पाहत होते. क्षणभर मला वाटले,आपले काही चुकले तर नाही. पण तेवढ्यात सर हसत हसत म्हणाले, डॉक्टरांनी लिहलेलं अक्षरं ना अक्षर कळतंय,हे प्रथमच होतंय...! तुम्ही डॉक्टर असूनही एवढे नीटनीटके अक्षर? प्रत्येक सूचना ..औषधांची नावे अगदी आंधळ्याला सुध्दा वाचता येतील इतकी सुवाच्य ..! छे..छे.. मला तुमच्या डिग्रीची खात्री केली पाहिजे..! “शिंदे सर गमतीगमतीत म्हणाले आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि मला कधी तरी ऐकलेला डॉक्टरांच्या हस्ताक्षराचा किस्सा आठवला.एका डॉक्टरने त्याच्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहले पण बिचारीला ते वाचताच येईना.बोलून चालून डॉक्टरचे अक्षर ते..! एखाद्या पुरातन शिलालेखासारखी ती त्या पत्राकडे पाहत राहिली पण फोड काही होईना मग कोणीतरी तिला उपाय सांगितला,’तू समोरच्या मेडिकल दुकानदाराकडे जा.तोच हे पत्र वाचू शकतो. इतर कोणाच्या बस की बात नहीं है यह...! काय करणार बिचारी ! गेली त्या मेडिकलवाल्याकडे..त्याच्या काऊंटर वर पत्र ठेवले.. मेडिकल दुकानदाराने पत्र पाहिले मात्र.. दुस-याच क्षणी त्याने दोन तीन प्रकारच्या गोळ्या काऊंटर वर टाकल्या आणि बोलला,”तीनशे सत्तावीस रुपये..!” बिचारी प्रेयसी ..तिने कपाळाला हात लावला. सरदारजी आणि डॉक्टरांचे हस्ताक्षर हे आपल्या विनोदवीरांनी बदनाम केलेले विषय..! परवा अगदी सचिन देखील म्हणाला,”अंजली डॉक्टर असूनही तिचे हस्ताक्षर वळणदार आहे.” म्हणजे जणू काही खराब हस्ताक्षर हे डॉक्टर असण्याचे इसेन्शिल क्वालिफिकेशन आहे.  मी नेहमी गमतीने म्हणतो,
“डॉक्टरांचे कैसे अक्षर l अक्षरास लागेना अक्षर l
जाणताही होय निरक्षर l क्षणार्धात ll
  मात्र माझे हस्ताक्षर चांगले होण्यात माझ्या वडलांचा म्हणजे आप्पांचा वाटा मोठा आहे.आप्पांच्या धाकाने शालेय जीवनात माझे नियमित शुध्दलेखन कधी चुकले नाही आणि  लिहताना एखादी जरी चूक झाली की शंभरीच भरली म्हणायचे म्हणजे  तो चुकलेला किंवा त्यासारखे शब्द शंभरवेळा लिहावे लागायचे.तसा अलिखित नियमच होता.पण माझ्या बालपणी माझ्या पिताश्रींने जे केले तसेच काही समस्त डॉक्टर मंडळींबाबत करण्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एम.एम.सी) ठरविले आहे. नो नो म्हणजे एम. एम. सी. समस्त डॉक्टरांचा शुध्दलेखनाचा तास सुरु करणार आहे,असे काही नाही पण यापुढे प्रत्येक डॉक्टरांनी आपली प्रिस्क्रिप्शनस कॅपिटल अक्षरात लिहायला हवीत असा फतवा एम.एम.सी.ने नुकताच काढला आहे. आहे. २३ जानेवारी रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नियमात/कायद्यात रुपांतर व्हायला अजून वेळ आहे पण डॉक्टरांनी दुहेरी रेघांच्या वह्यांमध्ये आपला शुध्दलेखन सराव आतापासूनच सुरु करायला हरकत नाही.

  विनोद घडीभर बाजूला ठेवू पण खरोखरच एम.एम.सी.ने या बाबत नियम करावा इतकी ही बाब गंभीर आहे? दरवर्षी सुमारे सात हजार अमेरिकन औषध देण्याच्या चुकीमुळे आपला जीव गमावतात,असा  इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन या संस्थेचा अहवाल आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी मुळात स्वहस्ताक्षरात औषधे लिहूनच देऊ नयेत, त्यासाठी संगणकाचा वापर करावा, यासाठी अमेरिका युरोपातील अनेक स्वयंसेवी संस्था आग्रही आहेत. आपल्याकडे मुळात संगणकाचा असा आग्रह व्यवहार्य नसल्यानेच एम.एम.सी. कॅपिटल अक्षरावर थांबली आहे. अर्थात ही आपल्याला अगदी कॅपिटल पनिशमेट अशा नजरेने वैद्यकीय व्यावसायिकांनी याकडे पाहण्याची गरज नाही.या निर्णयामागील मतितार्थ समजावून घेणे आवश्यक आहे.
    मुळात प्रगत देशाप्रमाणे आपल्याकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचे ऑडीट फारसे होत नाही त्यामुळे डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षराचा फटका किती जणांना बसतो,हे नेमके कळत नसले तरी आपण सर्वांनीच हा विषय अधिक गांभिर्याने घ्यायला हवा. मुळात प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर तर चांगले आणि सुवाच्य तर हवेच कारण अनेकदा स्पेलिंगमधील एखादे अक्षर बदलले तरी त्या नावाचे दुसरे औषध रुग्णाला दिले जाण्याची शक्यता बळावते पण त्याही पुढे जाऊन प्रिस्क्रिप्शन लिहताना काही पथ्ये प्रत्येक डॉक्टरने पाळायला हवीत. आवश्यकता असेल तरच औषधे द्या.. Prescribe when necessary  हे हिपोक्रीटीसने सांगितलेले तत्व सर्वात महत्वाचे! पेशंटला फायदेशीर ठरेल तेच लिहून द्या,हे त्याचे दुसरे तत्व..! आता हे म्हणजे नेहमी खरे बोलावे या गुळगुळीत झालेल्या सुविचारा सारखे आहे. पण अनेक वेळा पेशंट पेक्षा औषध कंपन्या आणि आपले भले होण्याकरिता काही औषधे प्रिस्क्रिप्शन पॅडवर अवतरतात,हे टाळायला हवे. तिसरे  म्हणजे प्रत्येक डॉक्टरने आपल्या क्षमतेच्या,ज्ञानाच्या मर्यादा ओळखून प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.आपल्याकडे वेगवेगळ्या पॅथीची मंडळी ऍलोपॅथीची औषधे लिहून देतात त्यांनी हे विशेष लक्षात ठेवायला हवे. स्टिरॉईडच्या दिर्घकाळ प्रिस्क्रिप्शनने रुग्णाच्या किडन्या खराब करणारे महाभाग कमी नाहीत. प्रिस्क्रिप्शन देण्यापूर्वी रुग्णाला कोणत्या औषधांची ऍलर्जी आहे,सध्या तो इतर कोणती औषधे घेतो आहे का त्याच प्रमाणे त्याला इतर कोणते आजार आहेत का ,याची माहिती घेणे आवश्यक आहे. बहुसंख्य विकसित देशात औषधाबद्दलची माहिती देणारे छोटेसे लिफलेट रुग्णाला दिली जाते.महत्वाचे म्हणजे हे लिफलेट स्थानिक भाषेत असते.आपल्याकडे हे अद्याप आले नाही. आपण नेमकी कोणती औषधे घेत आहोत,त्याचे दुष्परिणाम आणि इतर माहिती रुग्णाला होण्याच्या दृष्टीने हे लिफलेट महत्वाचे ठरते.
   ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने डॉक्टरांसाठी प्रिस्क्रिप्शन कसे लिहावे या संदर्भात केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर पेशंटचे नाव,वय आणि वजन यांचा उल्लेख असावा. डॉक्टरांनी औषधांची जनरिक नावे वापरावीत. अपूर्णांक लिहताना ०. ५ ग्रॅम ऐवजी ५०० मिलीग्रॅम असे लिहावे, औषधाचे नाव किंवा डोस लिहताना संक्षिप्त रुपे वापरु नयेत,औषध नेमके किती दिवस घ्यावयाचे आहे याचा स्पष्ट उल्लेख प्रिस्क्रिप्शन वर असावा,तसेच औषध कधी म्हणजे जेवणानंतर ,उपाशीपोटी,दिवसाच्या कोणत्यावेळी घ्यावयाचे आहे या सारख्या पूरक सूचनांचा स्प्ष्ट निर्देश प्रिस्क्रिप्शनवर असणे आवश्यक आहे. औषधाच्या संभाव्य दुष्परिणामाबद्दल पेशंटला माहिती देणे आणि त्रास झाल्यास काय करावे,हे सांगणे गरजेचे आहे. आपल्या दवाखान्यात,रुग्णालयात औषध वाटपाचे काम करणा-या फार्मासिस्टना औषधा संदर्भात आवश्यक माहिती रुग्णांना कशी द्यावी या करिता प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. अनेकवेळा आपल्या ओळखीच्या रुग्णांना डॉक्टर मंडळी टेलिफोनवरुन औषधे सांगतात.अशा वेळी पलिकडल्या व्यक्तीला औषधाचे नेमके नाव कळले आहे ना याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. निव्वळ बोलण्यापेक्षा टेक्स्ट वापरलेले बरे..! खरे तर अशा प्रकारे देण्यात आलेल्या औषधांची नोंद तरी कशी ठेवणार? आणि म्हणूनच अशा टेलिफोनिक प्रिस्क्रिप्शनची जोखिम घेताना अधिक सावधान असायला हवे. उच्चारातील साधर्म्यामुळे देखील अनेक गफलती होऊ शकतात. राजकारणात काय आणि रुग्णोपचारात काय, हेतूपूर्वक काय आणि नकळत काय चा मा जीवावर बेतणाराच ठरतो. अमेरिकेत डॉक्टरांवर दाखल होणा-या मालप्रॅक्टीसच्या तक्रारीत औषधे देण्यातील चुका दुस-या नंबरला आहेत,यावरुन या प्रकारच्या चुकांची व्याप्ती लक्षात यायला हरकत नसावी.

  मागील काही वर्षांमध्ये औषधांच्या संख्येत सुमारे पाचशे पट वाढ झाली आहे.दरवर्षी हजारो नवी औषधे बाजारात येत आहेत आणि म्हणूनच प्रिस्क्रिप्शन देणे बाये हाथ खेल नक्कीच राहिला नाही. प्रिस्क्रिप्शन लिहताना डॉक्टर आर एक्स हे अक्षर एका विशिष्ट पध्दतीने लिहतात.यात आर अक्षराच्या पोटातील रेघ आडव्या रेघेने मोडून एक्स लिहलेले असते. हे रोमन दंतकथेतील ज्युपिटरचे प्रतिक आहे. या ज्युपिटरचे सामर्थ्य या प्रिस्क्रिप्शन मध्येही असते,अशी जुनी धारणा. ज्युपिटर म्हणजे आपल्याकडला गुरु. आपल्या प्रिस्क्रिप्शनमुळे तो कोणाच्या कुंडलीत वक्री जाऊन बसू नये,याची काळजी आपण घ्यायलाच हवी नाही का?  या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे  हे विधान आपण पुरेशा गांभिर्याने घेऊ या,Ensuring patient safety is not about fixing blame, it is about fixing problem in an increasingly complex system & about creating a culture of safety. “ आणि म्हणूनच आपल्याला आपले प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहायला लागणे, हा आपला अपमान आहे असे कोणी डॉक्टरने समजायचे कारण नाही. गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षेची संस्कृती निर्माण करण्याच्या आपल्या अथक प्रयत्नातील हे आणखी एक छोटेसे पाऊल आहे,इतकेच !