Sunday 9 March 2014

डॉक्टरांचा शुध्दलेखनाचा तास
-डॉ. प्रदीप आवटे.
  
                 माझ्यासमोर बसलेले माझे मित्र शिंदे सर मी त्यांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनकडे अत्यंत निरखून पाहत होते. क्षणभर मला वाटले,आपले काही चुकले तर नाही. पण तेवढ्यात सर हसत हसत म्हणाले, डॉक्टरांनी लिहलेलं अक्षरं ना अक्षर कळतंय,हे प्रथमच होतंय...! तुम्ही डॉक्टर असूनही एवढे नीटनीटके अक्षर? प्रत्येक सूचना ..औषधांची नावे अगदी आंधळ्याला सुध्दा वाचता येतील इतकी सुवाच्य ..! छे..छे.. मला तुमच्या डिग्रीची खात्री केली पाहिजे..! “शिंदे सर गमतीगमतीत म्हणाले आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि मला कधी तरी ऐकलेला डॉक्टरांच्या हस्ताक्षराचा किस्सा आठवला.एका डॉक्टरने त्याच्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहले पण बिचारीला ते वाचताच येईना.बोलून चालून डॉक्टरचे अक्षर ते..! एखाद्या पुरातन शिलालेखासारखी ती त्या पत्राकडे पाहत राहिली पण फोड काही होईना मग कोणीतरी तिला उपाय सांगितला,’तू समोरच्या मेडिकल दुकानदाराकडे जा.तोच हे पत्र वाचू शकतो. इतर कोणाच्या बस की बात नहीं है यह...! काय करणार बिचारी ! गेली त्या मेडिकलवाल्याकडे..त्याच्या काऊंटर वर पत्र ठेवले.. मेडिकल दुकानदाराने पत्र पाहिले मात्र.. दुस-याच क्षणी त्याने दोन तीन प्रकारच्या गोळ्या काऊंटर वर टाकल्या आणि बोलला,”तीनशे सत्तावीस रुपये..!” बिचारी प्रेयसी ..तिने कपाळाला हात लावला. सरदारजी आणि डॉक्टरांचे हस्ताक्षर हे आपल्या विनोदवीरांनी बदनाम केलेले विषय..! परवा अगदी सचिन देखील म्हणाला,”अंजली डॉक्टर असूनही तिचे हस्ताक्षर वळणदार आहे.” म्हणजे जणू काही खराब हस्ताक्षर हे डॉक्टर असण्याचे इसेन्शिल क्वालिफिकेशन आहे.  मी नेहमी गमतीने म्हणतो,
“डॉक्टरांचे कैसे अक्षर l अक्षरास लागेना अक्षर l
जाणताही होय निरक्षर l क्षणार्धात ll
  मात्र माझे हस्ताक्षर चांगले होण्यात माझ्या वडलांचा म्हणजे आप्पांचा वाटा मोठा आहे.आप्पांच्या धाकाने शालेय जीवनात माझे नियमित शुध्दलेखन कधी चुकले नाही आणि  लिहताना एखादी जरी चूक झाली की शंभरीच भरली म्हणायचे म्हणजे  तो चुकलेला किंवा त्यासारखे शब्द शंभरवेळा लिहावे लागायचे.तसा अलिखित नियमच होता.पण माझ्या बालपणी माझ्या पिताश्रींने जे केले तसेच काही समस्त डॉक्टर मंडळींबाबत करण्याचे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एम.एम.सी) ठरविले आहे. नो नो म्हणजे एम. एम. सी. समस्त डॉक्टरांचा शुध्दलेखनाचा तास सुरु करणार आहे,असे काही नाही पण यापुढे प्रत्येक डॉक्टरांनी आपली प्रिस्क्रिप्शनस कॅपिटल अक्षरात लिहायला हवीत असा फतवा एम.एम.सी.ने नुकताच काढला आहे. आहे. २३ जानेवारी रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नियमात/कायद्यात रुपांतर व्हायला अजून वेळ आहे पण डॉक्टरांनी दुहेरी रेघांच्या वह्यांमध्ये आपला शुध्दलेखन सराव आतापासूनच सुरु करायला हरकत नाही.

  विनोद घडीभर बाजूला ठेवू पण खरोखरच एम.एम.सी.ने या बाबत नियम करावा इतकी ही बाब गंभीर आहे? दरवर्षी सुमारे सात हजार अमेरिकन औषध देण्याच्या चुकीमुळे आपला जीव गमावतात,असा  इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन या संस्थेचा अहवाल आहे. आणि त्यामुळेच डॉक्टरांनी मुळात स्वहस्ताक्षरात औषधे लिहूनच देऊ नयेत, त्यासाठी संगणकाचा वापर करावा, यासाठी अमेरिका युरोपातील अनेक स्वयंसेवी संस्था आग्रही आहेत. आपल्याकडे मुळात संगणकाचा असा आग्रह व्यवहार्य नसल्यानेच एम.एम.सी. कॅपिटल अक्षरावर थांबली आहे. अर्थात ही आपल्याला अगदी कॅपिटल पनिशमेट अशा नजरेने वैद्यकीय व्यावसायिकांनी याकडे पाहण्याची गरज नाही.या निर्णयामागील मतितार्थ समजावून घेणे आवश्यक आहे.
    मुळात प्रगत देशाप्रमाणे आपल्याकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचे ऑडीट फारसे होत नाही त्यामुळे डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षराचा फटका किती जणांना बसतो,हे नेमके कळत नसले तरी आपण सर्वांनीच हा विषय अधिक गांभिर्याने घ्यायला हवा. मुळात प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर तर चांगले आणि सुवाच्य तर हवेच कारण अनेकदा स्पेलिंगमधील एखादे अक्षर बदलले तरी त्या नावाचे दुसरे औषध रुग्णाला दिले जाण्याची शक्यता बळावते पण त्याही पुढे जाऊन प्रिस्क्रिप्शन लिहताना काही पथ्ये प्रत्येक डॉक्टरने पाळायला हवीत. आवश्यकता असेल तरच औषधे द्या.. Prescribe when necessary  हे हिपोक्रीटीसने सांगितलेले तत्व सर्वात महत्वाचे! पेशंटला फायदेशीर ठरेल तेच लिहून द्या,हे त्याचे दुसरे तत्व..! आता हे म्हणजे नेहमी खरे बोलावे या गुळगुळीत झालेल्या सुविचारा सारखे आहे. पण अनेक वेळा पेशंट पेक्षा औषध कंपन्या आणि आपले भले होण्याकरिता काही औषधे प्रिस्क्रिप्शन पॅडवर अवतरतात,हे टाळायला हवे. तिसरे  म्हणजे प्रत्येक डॉक्टरने आपल्या क्षमतेच्या,ज्ञानाच्या मर्यादा ओळखून प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.आपल्याकडे वेगवेगळ्या पॅथीची मंडळी ऍलोपॅथीची औषधे लिहून देतात त्यांनी हे विशेष लक्षात ठेवायला हवे. स्टिरॉईडच्या दिर्घकाळ प्रिस्क्रिप्शनने रुग्णाच्या किडन्या खराब करणारे महाभाग कमी नाहीत. प्रिस्क्रिप्शन देण्यापूर्वी रुग्णाला कोणत्या औषधांची ऍलर्जी आहे,सध्या तो इतर कोणती औषधे घेतो आहे का त्याच प्रमाणे त्याला इतर कोणते आजार आहेत का ,याची माहिती घेणे आवश्यक आहे. बहुसंख्य विकसित देशात औषधाबद्दलची माहिती देणारे छोटेसे लिफलेट रुग्णाला दिली जाते.महत्वाचे म्हणजे हे लिफलेट स्थानिक भाषेत असते.आपल्याकडे हे अद्याप आले नाही. आपण नेमकी कोणती औषधे घेत आहोत,त्याचे दुष्परिणाम आणि इतर माहिती रुग्णाला होण्याच्या दृष्टीने हे लिफलेट महत्वाचे ठरते.
   ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने डॉक्टरांसाठी प्रिस्क्रिप्शन कसे लिहावे या संदर्भात केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर पेशंटचे नाव,वय आणि वजन यांचा उल्लेख असावा. डॉक्टरांनी औषधांची जनरिक नावे वापरावीत. अपूर्णांक लिहताना ०. ५ ग्रॅम ऐवजी ५०० मिलीग्रॅम असे लिहावे, औषधाचे नाव किंवा डोस लिहताना संक्षिप्त रुपे वापरु नयेत,औषध नेमके किती दिवस घ्यावयाचे आहे याचा स्पष्ट उल्लेख प्रिस्क्रिप्शन वर असावा,तसेच औषध कधी म्हणजे जेवणानंतर ,उपाशीपोटी,दिवसाच्या कोणत्यावेळी घ्यावयाचे आहे या सारख्या पूरक सूचनांचा स्प्ष्ट निर्देश प्रिस्क्रिप्शनवर असणे आवश्यक आहे. औषधाच्या संभाव्य दुष्परिणामाबद्दल पेशंटला माहिती देणे आणि त्रास झाल्यास काय करावे,हे सांगणे गरजेचे आहे. आपल्या दवाखान्यात,रुग्णालयात औषध वाटपाचे काम करणा-या फार्मासिस्टना औषधा संदर्भात आवश्यक माहिती रुग्णांना कशी द्यावी या करिता प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. अनेकवेळा आपल्या ओळखीच्या रुग्णांना डॉक्टर मंडळी टेलिफोनवरुन औषधे सांगतात.अशा वेळी पलिकडल्या व्यक्तीला औषधाचे नेमके नाव कळले आहे ना याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. निव्वळ बोलण्यापेक्षा टेक्स्ट वापरलेले बरे..! खरे तर अशा प्रकारे देण्यात आलेल्या औषधांची नोंद तरी कशी ठेवणार? आणि म्हणूनच अशा टेलिफोनिक प्रिस्क्रिप्शनची जोखिम घेताना अधिक सावधान असायला हवे. उच्चारातील साधर्म्यामुळे देखील अनेक गफलती होऊ शकतात. राजकारणात काय आणि रुग्णोपचारात काय, हेतूपूर्वक काय आणि नकळत काय चा मा जीवावर बेतणाराच ठरतो. अमेरिकेत डॉक्टरांवर दाखल होणा-या मालप्रॅक्टीसच्या तक्रारीत औषधे देण्यातील चुका दुस-या नंबरला आहेत,यावरुन या प्रकारच्या चुकांची व्याप्ती लक्षात यायला हरकत नसावी.

  मागील काही वर्षांमध्ये औषधांच्या संख्येत सुमारे पाचशे पट वाढ झाली आहे.दरवर्षी हजारो नवी औषधे बाजारात येत आहेत आणि म्हणूनच प्रिस्क्रिप्शन देणे बाये हाथ खेल नक्कीच राहिला नाही. प्रिस्क्रिप्शन लिहताना डॉक्टर आर एक्स हे अक्षर एका विशिष्ट पध्दतीने लिहतात.यात आर अक्षराच्या पोटातील रेघ आडव्या रेघेने मोडून एक्स लिहलेले असते. हे रोमन दंतकथेतील ज्युपिटरचे प्रतिक आहे. या ज्युपिटरचे सामर्थ्य या प्रिस्क्रिप्शन मध्येही असते,अशी जुनी धारणा. ज्युपिटर म्हणजे आपल्याकडला गुरु. आपल्या प्रिस्क्रिप्शनमुळे तो कोणाच्या कुंडलीत वक्री जाऊन बसू नये,याची काळजी आपण घ्यायलाच हवी नाही का?  या बाबतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे  हे विधान आपण पुरेशा गांभिर्याने घेऊ या,Ensuring patient safety is not about fixing blame, it is about fixing problem in an increasingly complex system & about creating a culture of safety. “ आणि म्हणूनच आपल्याला आपले प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहायला लागणे, हा आपला अपमान आहे असे कोणी डॉक्टरने समजायचे कारण नाही. गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वैद्यकीय क्षेत्रात सुरक्षेची संस्कृती निर्माण करण्याच्या आपल्या अथक प्रयत्नातील हे आणखी एक छोटेसे पाऊल आहे,इतकेच !

No comments:

Post a Comment