Saturday 23 December 2023

प्रिय शेरअली..... प्रदीप आवटे.

 

प्रिय शेरअली,

मित्रा , काय ऐकतो आहे मी ? काल सकाळी साडे अकरा वाजता आपण व्हॉटस अप वर बोललो आणि संध्याकाळी तू निघून गेल्याची बातमी कानावर पडली. मी क्षणभर भांबावलो, मला खरे काय आणि खोटे काय तेच कळेना. अरे परवा परवा तर आपण तुझ्या ‘ अशांत टापू’ बद्दल बोललो, सोबत जगतापही होता. आणि आता सगळंच संपलंय.

आपण खूप जवळचे मित्र वगैरे होतो का? खरे तर याचं उत्तर 'नाही', असं आहे. तसा कॉलेज मध्ये तू माझा सिनिअर. बारावीला बार्शीतून रॅंकर वगैरे आलेला तू… तुझ्याबद्दल मला माहिती मिळाली ती जानराव मुळे, तो ही बार्शीचा म्हणून. कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला सिनिअर – ज्युनिअर ही दरी असतेच. नंतर ती कमी झाली. तू स्वतःच्याच तंद्रीत वा-याशी गप्पा मारत निघाल्यासारखा अनेकदा पाहिलाय मी. अजूनही तसाच दिसतोस तू मला. कधी तरी तीन नंबर होस्टेलच्या बाहेर कट्टयावर तुझ्याशी गप्पा पण मारल्या आहेत. तुझ्याशी बोलताना लक्षात आलेलं ब्रिलियंट प्रकरण आहे हे, तुझं पाठांतर तर जबरदस्त होतं. तुझ्या आवाजाला एक मुलायम पोत होता, ऐकत रहावा असा. कविता , गझल आवडायच्या तुला. मला आठवतं मला तू 'कमलाग्रज' म्हणायचास. माझ्या कविता कॉलेजात असतानाच प्रकाशित होत होत्या आणि मी तेव्हा त्या नावाने लिहायचो. तू ते टोपण नाव विसरला नाहीस. अगदी तीस वर्षांनीही मला तू त्याच नावाने हाक मारली तेव्हा टाईम मशीन मध्ये बसल्यासारखा मी कॉलेज वयात गेलो.

पण तरीही आपली मैत्री अशी झाली नाही. मी खेडयातून आलेला, थोडासा बुजरा वगैरे. तू ही अगदी गरीब , कष्टकरी कुटुंबातून आलेला. आपल्याला आपले आपले कॉम्प्लेक्स होते. मग कधी तरी तू पास आऊट होऊन बाहेर पडलास. मी पीजी वगैरे केलं.

सरकारी नोकरीत आलो तेव्हा कोर्टीला असताना समजलं तू जवळच नगर जिल्ह्यात चापडगाव इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून आहेस. एकदा करमाळयात धावतं भेटलो देखील पण तेवढंच.

नंतर तुझी भेट झाली ती तू निवृत्त झाल्यावर. तू निवृत्त झालास पण निवृत्त झालाच नाहीस. एक नवी इनिंग तुला खुणावत होती. नगर, नंदूरबार, सोलापूर अशा ठिकाणी तू वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं होतंस. ट्युबेक्टॉमी सर्जन म्हणून तुझं नाव झालं होतं. त्याचा तुला सार्थ अभिमानही होता. वैद्यकीय अधिकारी म्हणून हाज यात्रेलाही तू जावून आला होतास. पण तुझ्यात साहित्य, कला, कविता या सा-यावर प्रेम करणारा एक शेरा दडलेला होता. तो आता मोकळा होण्यासाठी वाट पाहत होता. तू सोलापूर विद्यापीठातून मराठी साहित्यात एम ए  केलंस, मग मास कम्युनिकेशनचा अभ्यास करु लागलास. तीसेक एक वर्षे सरकारी नोकरीत तू जे भोगलंस ते तुझ्या मनात खदखदत होतं. ते तुला मांडायचं होतं. ‘ सात वर्षे सक्तमजुरी?’ या पुस्तकात तू नंदूरबार जिल्ह्यात जे भोगलंस ते मांडलंस. पदरमोड करुन हे पुस्तक प्रकाशित केलंस, अनेकांना पाठवलंस. मलाही पाठवलंस. त्यात नवखेपणातील काही त्रुटी आहेत, तपशीलांची थोडी अनावश्यक जंत्री आहे. पण तरीही सामाजिक दस्तावेज म्हणून मला हे लेखन मोलाचे वाटलं . हे लिहून तू महत्वाचं काम केलेलं मित्रा. या पुस्तकावर मी ‘लोकमत’ मध्ये लिहलंही होतं.



त्यातील काही भाग मला अजूनही आठवतो,

हे आत्मकथन मुख्यत्वे दोन तीन महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करते आणि म्हणून ते एका व्यक्तीचे आत्मकथन असले तरी देखील ते आपल्या वर्तमान समाजाचा एक महत्त्वाचा दस्तावेज देखील आहे. या आत्मकथनांमध्ये स्वतःची गोष्ट, स्वतःला आलेले अनुभव तोंड द्याव्या लागलेल्या अडीअडचणी यांचं डॉ. शेख वर्णन करत असताना आपल्यासमोर एकूणच शासन व्यवस्था,आरोग्य सेवा यांच्याबद्दलचे काही मूलभूत प्रश्न पडत जातात. मनुष्य बळ व्यवस्थापन हा आपल्या व्यवस्थेचा दुबळा भाग.

अधिकारी ,कर्मचारी यांच्या नियुक्त्या, बदल्या, पदोन्नती यामध्ये आपल्या व्यवस्थेने अधिकाधिक पारदर्शक होण्याची गरज आहे. काम करणाऱ्या आणि आयतोबा असणाऱ्या माणसातील फरक ओळखण्याइतके तिने संवेदनशील होणे आवश्यक आहे. काम करणाऱ्या माणसाने पूर्णपणे नामोहरम व्हावे, त्याची काम करण्याची उमेदच हरवून जावे इतकी बिन चेहऱ्याची , माणूसपण हरवलेली व्यवस्था , व्यवस्था म्हणून सर्वसामान्य माणसाला काहीच देऊ शकत नाही.

 डॉ. शेख यांच्या अनेक अनुभवांवरून हे वास्तव  आपल्यासमोर येत जाते. नंदुरबारसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यामध्ये सात वर्षे सेवा दिल्यानंतर देखील त्यांची नियमानुसार सहजपणे बदली होत नाही. त्याकरता देखील व्यवस्थेतील दलालांचे हात त्यांना ओले करावे लागतात. अगदी आरोग्य सेवेचा भाग म्हणून मक्का मदीना येथील हज यात्रा करता  पाठविण्यात येणाऱ्या चमू मध्ये डॉ. शेख यांची निवड होते पण त्यासाठी कार्यमुक्ती आदेश मिळवताना देखील पुन्हा त्याच वाटेने जावे लागते. एकूणच शासन व्यवस्था बिनचेहऱ्याची, माणूसपण हरवलेली आणि निष्ठूर कशी असते याचे चित्र डॉ. शेख यांच्या या आत्मकथनामध्ये ठायी ठायी आपल्याला भेटत जाते आणि आपण अस्वस्थ होत जातो. आरोग्य सेवा ही सर्वसामान्य माणसाचा ऑक्सिजन आहे. इथल्या गरीब कष्टकरी माणसाकरता तिची गुणवत्ता चांगली असणे अगदी आवश्यक आहे, परंतु या आरोग्य सेवेचे व्यवस्थापन ज्या पद्धतीने केले जाते त्यामुळे ही व्यवस्था दिवसेंदिवस आपली गुणवत्ता हरवते आहे की काय असा व्याकुळ प्रश्न डॉ. शेख यांचे आत्मकथन आपल्यासमोर उभा करते आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपली आरोग्य सेवा अधिकाधिक मानवी चेहऱ्याची कशी होईल,याच्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले पाहिजे, याची जाणीवही हे आत्मकथन आपल्याला करून देते. खरे म्हणजे, आपल्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्या वरील हा प्राधान्याचा विषय असायला हवा.

 जी गोष्ट आरोग्य सेवांची तीच गोष्ट वैद्यकीय शिक्षणाची देखील!  दिवसेंदिवस वैद्यकीय शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होते आहे. आरक्षणाच्या लाभामुळे अनेक गरीब कष्टकरी समाजातील मुले कशीबशी वैद्यकीय शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचत आहेत पण तिथले वातावरण त्यांना अत्यंत अपरिचित आहे. अशावेळी या मुलांची खूप मोठी मानसिक आणि भावनिक ऊर्जा वैद्यकीय महाविद्यालयातील वातावरणाशी समायोजन करण्यात खर्च होते आणि अनेकदा ही मुले वैद्यकीय महाविद्यालयात एकटी पडतात. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर आणि परीक्षांच्या निकालावर होतो. ही मुले पुन्हा पुन्हा नापास होतात आणि त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. या सर्व मुलांसाठी काही वेगळी व्यवस्था, समुपदेशन , वेगळे मार्गदर्शन हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असणे गरजेचे आहे.  या परिघावरील मुलांना या नवीन व्यवस्थेसोबत समायोजन करण्याकरता व्यवस्थेने देखील दोन पावले पुढे येण्याची गरज आहे. डॉ. शेख यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनुभवातून ही बाब देखील तितकीच ठळकपणे अधोरेखित होते.

 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. शेरअली शेख यांचे मुस्लिम असणे .भारतीय समाजामध्ये मुस्लिम म्हणून वाढताना लहानपणापासून ते अगदी निवृत्तीच्या काळापर्यंत जे वेगवेगळे अनुभव येतात ते विचार करायला लावणारे आहेत. शाळकरी मित्राने ' लांड्या ' म्हणण्यापासून ते मंत्रालयातील सुरक्षा रक्षकाने ' खिशात पिस्तूल बिस्तुल नाही ना,' असे विचारण्यापर्यंत हा प्रवास सुरू असतो. आजच्या काळात तर मुस्लिम समाजाचे आपल्या समाजातून मानसिक विस्थापन होत असताना डॉ. शेख यांचे अनेक अनुभव आपल्या मनामध्ये काहूर उठवतात.

या आत्मकथनातून गंगाजमनी तहजीबमध्ये वाढलेल्या, जाती धर्माच्या भिंतीपल्याड गेलेल्या, इथल्या परिघावरील गरीब कष्टकरी माणसाच्या सुखदुःखाची नाळ सांगणाऱ्या, आपल्या मर्यादांचे नीट भान असणाऱ्या डॉ. शेरअली शेख  यांचे एक लोभस व्यक्तिमत्व आपल्यासमोर येते. हा डॉक्टर, डॉक्टर म्हणून तर गुणवंत आहेच पण त्याला चित्रपट, राजकारण, समाजकारण, संगीत, साहित्य, कविता या सगळ्यांचीच मनापासून आवड आहे. हे सारं तो आपल्या जगण्याशी पडताळून पाहतो आहे. आणि म्हणूनच नारायण सूर्व्याच्या कवितेशी त्याची नाळ जुळते आहे.



डॉ. शेरअली शेख यांच्या या लोभस व्यक्तिमत्त्वामुळेच आणि माणसांवर प्रेम करण्याच्या त्यांच्या अपार ताकदीमुळे नंदुरबार सारख्या किचकट भागामध्ये सात वर्षे सेवा देतात, तो काळ सक्तमजुरीचा न वाटता नवे काही घडवणारा,स्वतःच्याच व्यक्तिमत्वाला नवे नवे पैलू पाडणारा त्यांना वाटतो आणि म्हणून आत्मकथनाच्या शेवटी येणारे प्रश्नचिन्ह डॉ. शेख यांचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करत करून जाते. 

आणि मग तू विभागीय चौकशी वगैरे बाबींवर प्रकाश टाक़णारे ‘ अशांत टापू’ लिहलं. मला पाठवलंस आणि म्हणालास, “ कवी कमलाग्रज नक्की वाचा हे. लिहा याच्यावर. मला यावर फिल्म करायची आहे.” आणि तुझं हे पुस्तक मी वाचण्यापूर्वीच तू एका अनोळखी टापूत निघून गेलास.



तुझा उत्साह प्रचंड होता. तू साठीनंतर एम डी पी एस एम करण्यासाठी नीट परीक्षा देत होतास. आयुष्य जगताना जे जे निसटले ते ते सारे तू पकडण्याचा प्रयत्न करत होतास. हजारो कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यास तू. तू स्वतःला मिशन ट्युबेक्टॉमीचा ब्रॅंड ऍम्बसिडर म्हणवून घ्यायचास. मला ते कधी कधी अगदी विनोदी वाटायचं पण तू ठाम होतास. आपण अगदी भारत सरकारची पद्मश्री मिळावी, एवढं काम केलं आहे याचा तुला मनोमन विश्वास होता. मला वाटायचं, खूप किरकोळ, सामान्य असतो रे आपण एम ओ मंडळी, कुणीही कसंही कोलून द्यावं अशी.

मला तुझ्या उत्साहाचा, आत्मविश्वासाचा, साधेपणाचा हेवा वाटायचा. तू आता कुठं स्वतःला खोदायला सुरुवात केली होतीस. हळूहळू सगळा मलबा दूर करत, असं खोदत खोदत तू शेवटी त्या झ-यापर्यंत पोहचशील, याची मला खात्री होती.

… आणि तेवढयात ही बातमी आली.

शेरा, यार तू असा चीट नाही करु शकत. तुला पद्मश्री नाही मिळाली शेरा पण आजही अकलकुवा, धडगाव, शहाद्याला एखाद्या पेशंटच्या मनात तू त्याचा जीव वाचवल्याची आठवण ताजी असेल. ज्या अडलेल्या बाळंतिणीला तू मोकळी केलीस ती अधून मधून  तुझी आठवण काढून मनातल्या मनात तुझे आभार मानत असेल. शेरा, हीच आपली पद्मश्री असते रे !

इतर कुणाला तुझी वाटचाल किरकोळ वाटत असेल पण मला तुझं मोल माहित आहे. तू कुठून निघाला होतास आणि कुठं पोहचलास हे मला माहित आहे.

दोस्त, अलविदा. तुझ्या वाटेने आम्हा सर्वांनाच यायचे आहेस. तू थोडी घाई केलीस एवढेच.

चालताना, बोलताना घशात अडकलेल्या हुंदक्यासारखा आठवत राहशील मित्रा.

 

तुझा,

प्रदीप अर्थात कवी कमलाग्रज.  

 

No comments:

Post a Comment