Monday 10 March 2014

स्टॉप टीबीचे ब्रॅण्ड एम्बसिडर
-   डॉ.प्रदीप आवटे.

  “ताबडतोब पहिले विमान पकडा आणि घरी परत जा. टीबी रुग्णांना व्यवस्थित आणि नियमित औषधे मिळतील,याची प्रथम खात्री करा.टीबी नियंत्रण कार्यक्रमाची गुणवत्ता सुधारा...”
“शेम इंडिया...!”
“द टीबी जिनोसाईड मस्ट स्टॉप...!”
आक्टोबर – नोव्हेंबर २०१३ मध्ये पॅरिस येथे फुप्फुसाच्या आरोग्यासंदर्भात जागतिक परिषद भरली होती,तेथे ट्रीटमेंट ऍक्शन ग्रुप (टॅग)या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या शब्दांत परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या चमूची हेटाळणी केली. भारताचे अतिरिक्त आरोग्य सचिव भारतातील टीबी परिस्थिती संदर्भात बोलत असताना अशा मानहानीहारक घोषणा दिल्या. नुकतीच देवयानी खोब्रागडे प्रकरणात भारताची जागतिक पातळीवर नाचक्की झाल्याची भावना सर्व माध्यमे आणि राजकीय पक्ष आळवित असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दोन तीन महिन्यापूर्वी घडलेल्या आपल्या या मानहानीकडे मात्र कोणाचे म्हणावे तसे लक्ष गेलेले दिसत नाही. काही आंग्ल माध्यमात छोटीसी बातमी आली आणि बस्स..! या घटनेने जेवढे व्हावे तेवढे कोणी अंतर्मुख आपण झालो नाही पण आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्वाची आहे.आपण सर्वांनी म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या नियोजकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी याचा आपापल्या पातळीवर विचार करायला हवा.
   का ? एवढे काय घडले आहे,घडते आहे म्हणून आपण इतके हवालदिल होण्याची गरज आहे? पॅरिसला असे आंदोलन करुन आपला निषेध करणा-या टॅगच्या डॉ.बॅक्ट्रीन किलिंगो यांनाच विचारा ना.ते सांगतात,”भारत सा-या जगाची फार्मसी म्हणून तोरा मिरवतो पण तेथील टीबी रुग्णच औषधांपासून वंचित राहतात,असे का? औषधांचा नियमित पुरवठा, टीबी नियंत्रण कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि मॉनिटरिंग यात भारताने अजून सुधारणा करायला हवी.अन्यथा भारतात ड्रग रझिस्टंट (औषधांना न जुमानणारा) टीबी ची मोठी साथच येईल,” असा इशारा देताना डॉ.बॅक्ट्रीन वैश्विक भूमिका घेतात,” आम्ही विश्वाचे नागरिक आहोत आणि भारतातीलच काय पण कुठल्याही वैश्विक नागरिकांची अशी अवहेलना होणे,आम्हांला सहन होणार नाही.”
   डॉ.बॅक्ट्रीन आणि त्यांच्या सहका-यांनी ग्लोबल खेड्याच्या टेरेसवरून एवढे उच्चरवाने ओरडावे,असे काय झाले आहे? की हा आंतरराष्ट्रीय संघटनाचा आपल्या आरोग्यविषयक धोरणातील अर्थपूर्ण हस्तक्षेप आहे? आपण अंतर्मुख होण्याची गरज आहे,हे मात्र नक्की !

   नुकताच प्रसिध्द झालेला “ग्लोबल टीबी रिपोर्ट २०१३ “आपण वाचला तर भारतातील टीबीची परिस्थिती आपल्या ध्यानात येईल. खरे तर मागील १५ - १६ वर्षांमध्ये आपण टीबी नियंत्रणात लक्षणीय प्रगती केली आहे. १९९५ साली आपले यशस्वी टीबी उपचाराचे प्रमाण अवघे २५ % होते ते २०११ मध्ये ८८ % पर्यंत नेण्यात आपल्याला यश आले आहे. १९९७ साली आपण सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु केला आणि २००६ पर्यंत संपूर्ण देशभर त्याचा विस्तार केला. या सा-यामुळे लक्षावधी लोकांचे प्राण वाचविण्यात आपल्याला यश आले. पण हे सारे असले तरी आपली टीबी नियंत्रणाची वाट मोठी बिकट आहे आणि उद्या काही आक्रीत या देशात घडू द्यायचे नसेल तर आपल्याला सर्वस्व झोकून देऊन टीबी नियंत्रणासाठी काम करावे लागेल. पुढील आकडेवारीच आपल्यासमोरील आव्हानाचे स्वरुप स्पष्ट करेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३ च्या अहवालानुसार, जगभरात आढळणा-या एकूण टीबी रुग्णांपैकी २६ % टीबी रुग्ण (सुमारे २२ लाख) एकट्या भारतात आढळतात. भारतात दररोज २० हजार लोकांच्या शरीरात टीबीचा जंतू प्रवेश करतो,रोज नवीन पाच हजार टीबी रुग्ण सापडतात तर दरदिवशी सुमारे एक हजार लोक टीबी ने मृत्यूमुखी पडतात. आपण दरवर्षी एवढे टीबी रुग्ण शोधत असलो तरी अनेक जण आरोग्य संस्थेपर्यंत पोहचत नाहीत किंवा आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. जगभरात सुमारे २९ लाख निदान न झालेले टीबी रुग्ण आहेत आणि त्यापैकी एक तृतियांश अवघ्या बारा देशात आहेत, भारत त्यापैकीच एक ! निदान न झालेला हा प्रत्येक रुग्ण वर्षभरात आणखी दहा ते पंधरा जणांना टीबीचा संसर्ग देतो. भारतासारख्या देशात जिथे लोक अधिक दाटीवाटीने राहतात तिथे असे इन्फेक्शन होण्याची शक्यता कैक पटीने वाढते. म्हणूनच आपण खाजगी डॉक्टर तसेच रुग्णालयांनी टीबीचे रुग्ण सार्वजनिक आरोग्य संस्थेस कळविणे सक्तीचे केले आहे.
   टीबी आणि एच आय व्ही/एडस या आजारांची महायुती हे टीबी नियंत्रणातील आणखी एक आव्हान आहे. टीबीचा उपचार सुमारे सहा ते नऊ महिने घ्यावा लागतो. सर्वसामान्य रुग्णाच्या या उपचारात अनेक अडचणी येतात. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत टीबी वरील औषधे मोफत मिळत असली तरी तिथली प्रचंड गर्दी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांची वागणूक ,तसेच आपल्याला टीबी झाला आहे ही लपवून ठेवण्याची वृत्ती या व अशा अनेक कारणांमुळे रुग्ण ब-याच वेळा खाजगी रुग्णालयात जाणे पसंत करतो. टीबीचा रुग्ण हा खाजगी डॉक्टर करिता मोठे कुरण असते कारण त्याला दीर्घकाळ उपचाराची आवश्यकता असते. टीबीची औषधे एक दोन महिने खाल्ली की रुग्णाला थोडेसे बरे वाटू लागते आणि त्याच वेळी औषध दवाखान्यावर होत असलेला खर्च ही त्याच्या खिशाला परवडेनासा होतो आणि आता आपल्याला बरे वाटत असल्याने तो उपचार घेणे बंद करतो आणि काही दिवसातच त्याचा आजार पुन्हा बळावतो. या व अशा अनेक कारणांनी अनियमित उपचार घेतल्याने टीबीचा जंतू औषधांची पोथी ओळखतो आणि ड्रग रझिस्टंट म्हणजे औषधांना न जुमानणारा होतो. गेल्या वर्षी मुंबईतच टीबीच्या कोणत्याही औषधाला न जुमानणारे बारा रुग्ण आढळले. संपूर्ण जगातील ही अशा प्रकारची केवळ तिसरी घटना होती. मग असे रुग्ण हा ड्रग रझिस्टंट जिवाणू आपल्या थुंकी खोकल्यावाटे संपर्कात आलेल्या इतरांनाही देत राहतात. मागील वर्षभरात अशा रुग्णांमध्ये वेगाने वाढ होते आहे. जगातील एकूण ड्रग रझिस्टंट टीबी रुग्णांपैकी निम्मे रुग्ण ब्रिक्स (ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि द.आफिका) देशांमध्ये आहेत.भारतात हे प्रमाण एकूण टीबी रुग्णांच्या तीन टक्के एवढे आहे. भारतातील एकूण टीबी रुग्णांची संख्या पाहता या रुग्णांची संख्या किती मोठी असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. या रुग्णांच्या उपचाराचा खर्च किमान दोन लाखाच्या घरात आहे त्यामुळे तो आणखी मोठा अडथळा ! १ जुलै हा दिवस दरवर्षी डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.गेल्या वर्षी सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दिनीच एका तरुण डॉक्टर मुलीचा मृत्यू ड्रग रझिस्टंट टीबी मुळे झाला. अशा प्रकारच्या घटनांमुळे स्वाभाविकपणे डॉक्टरांमध्येही एक भितीचे वातावरण आहे. ड्रग रझिस्टंट टीबीचे रुग्ण आपल्या आरोग्य व्यवस्थेतील नवे अस्पृश्य ठरु नयेत,यासाठीही आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे.

    टीबी नियंत्रणासाठी तुम्ही आम्ही काय करु शकतो ? या बाबतीत आपल्याला ब्रिटनचा कित्ता गिरवावा लागेल. ऐंशीच्या दशकात एच आय व्ही/एडसचा उदय झाला आणि ज्या ब्रिटनमध्ये टीबी रुग्ण अवचुकूनच आढळायचा तेथील टीबीचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढले. या टीबीच्या साथीला तोंड देताना तेथील सर्वसामान्य माणसाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. नियमित उपचार हा यशस्वी टीबी उपचाराचा पाया आहे.हे लक्षात घेऊन तेथील नागरिकांनी आपल्या परिसरातील टीबी रुग्ण दत्तक घेण्याची योजना राबविली. आपली नेहमीची कामे सांभाळतच आपण आपल्या परिसरातील टीबी रुग्णाला भेट देणे,त्याने आजची औषधे खाल्ली आहेत की नाही,याची चौकशी करणे आणि त्याला औषधे मिळण्यासाठी काही अडचण असल्यास आवश्यक ती मदत करणे,त्याचे मनोधैर्य वाढविणे आणि त्याला उत्तम आहार व नियमित उपचाराच्या मदतीने बरा होण्यासाठी मदत करणे या प्रकारची सामान्य वाटणारी पण अत्यंत प्रभावी अशी कामे ब्रिटिश नागरिकांनी आवडीने केली.या लोकसहभागामुळे या देशाने अवघ्या काही वर्षातच टीबीचे हे आक्रमण यशस्वीरित्या नियंत्रणात आणले. आपल्यालाही याच वाटेने जावे लागेल. औषधांचा पुरेसा व नियमित पुरवठा, निदानाची सोय या पायाभूत सुविधा शासन सर्व पातळीवर पोहचवित आहेच एक समाज म्हणून आपल्यालाही आपली जबाबदारी उचलण्याची गरज आहे. टीबी संशयित रुग्ण आरोग्य संस्थेपर्यंत पोहचण्यासाठी आणि त्याने नियमित उपचार घेण्यासाठी आपण समाज म्हणून,संवेदनशील शेजारी म्हणून खूप काही करु शकतो. मुळात अशा संसर्गजन्य आजाराने पिडीत माणसाला वाळीत टाकण्याची आपली जुनी खोड आपण सोडली पाहिजे. आजही आपल्याकडे दरवर्षी तीन लाख महिलांना टीबी मुळे घराबाहेर हाकलले जाते तर लाखभर पोरांना आपली शाळा सोडावी लागते. आजाराचा प्रसार होऊ नये या साठी काळजी घेणे वेगळे आणि माणूसपणच सोडणे वेगळे, हे आपल्याला कधी कळणार? आणि माणसांना वाळीत टाकणारे आपण टीबी प्रसार टाळण्यासाठी मात्र काही करतो का?अन्यथा आपल्या सार्वजनिक भिंती,प्लॅटफॉर्म,बसस्टॅण्ड आपल्या पान तंबाखूच्या पिचका-यांनी का रंगली असती ? पॅरिसमधल्या धिक्कारानंतर सारे जग आपण काय करतो आहोत,या कडे लक्ष लावून बसले आहे. केवळ राहुल द्रवीडच का, आपण सारेच स्टॉप टीबी मोहिमेचे ब्रॅण्ड ऍम्बसिडर बनू या...! काय म्हणालात, द्रवीडला त्याचे मानधन मिळते,आम्हांला काय? आपल्या आरोग्याइतके मौल्यवान मानधन दुसरे कोणते असेल?

No comments:

Post a Comment