Wednesday 19 March 2014

भेदाभेद भ्रम अमंगळ
               तिसरी चौथीत असेन तेव्हाची गोष्ट. मला मराठी किंवा इतिहासात संत ज्ञानेश्वरांवर एक धडा होता. त्या मध्ये 'संन्याशाची मुले म्हणून लोकांनी ज्ञानेश्वरांच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले,' अशा आशयाचे एक वाक्य होते. 'वाळीत टाकणे,' या शब्दप्रयोगाने माझ्या बालबुध्दीला चांगलेच गोंधळात टाकले होते. माझी आईच माझी शिक्षिका होती. तिने मला अनेक पध्दतीने या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडत नव्हता. 'सामाजिक संबंध तोडणे,' वगैरे संकल्पना माझ्या बालजगाच्या प्रतलाबाहेरील होत्या. पण मग आईने वेगळ्या भाषेत मला 'वाळीत टाकणे'चा अर्थ समजावून सांगितला आणि मला या वाकप्रचारातील दाहकता समजली. आई म्हणाली,"अरे,वाळीत टाकणे म्हणजे सगळ्यांनी कट्टी करणे." मला आजही आठवते, माझ्या सर्वांगावर शहारा आला. माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले, मी वर्गात एका कोप-यात अंग आकसून बसलो आहे आणि वर्गातील कोणीच माझ्याशी बोलत नाहीय्ये. सारे दंगा करताहेत,मौजमस्ती करताहेत पण माझ्याकडे कोणीही पाह्यलाही तयार नाही आणि पाह्यलं तरी अत्यंत कुत्सितपणे,वेडयावल्यासारखे! मला कल्पनेनेच खूप भिती वाटली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी 'वाळीत टाकणे' हा शब्दच वाळीत टाकला आहे. 
   ....पण आज या नकोशा वाटणा-या शब्दाची पुन्हा एकदा आठवण झाली. निमित्त फेसबुकवरील एका पोस्टचे. परवा माझ्या धाकट्या भावाने संजूने फेसबुक वर एक पोस्ट टाकली त्याने लिहले होते," एचआयव्ही पॉझिटिव्ह चिमुरड्यांना नवा पॉझिटिव्ह रस्ता देणारे सेवालय नावाचे आनंदवन रवी बापटले या आमच्या मित्राने लातूरजवळ सुरु केले ... त्यानंतर संघर्षाचे कित्येक क्षण वाट्याला आले... पण, रवीने एक मोठी प्रशासकीय लढाई आज जिंकली आहे. म्हणजे तशी सुरुवात झाली आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्त मुला-मुलींसाठी सरकारी शाळा-वसतिगृहात पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे शासनाने मान्य केले आहे. आता तशा अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. इथे ही अशीमुले राहतात, म्हणून सेवालयाला आग लावण्यापासून ते असल्याशाळेत आम्ही आमची मुलं पाठवणार नाही, इथपर्यंत सारं सहन करत सेवालय धीरोदात्तपणे चालत आहे आणि रोज नवी लढाई जिंकत आहे! रवी, ग्रेट!"
तसं पाह्यलं तर अत्यंत पॉझिटीव अशी ही पोस्ट पण तिने पुन्हा मला माझ्या नावडत्या शब्दाची आठवण करुन दिली,'वाळीत टाकणे'.
    रवी बापटले, उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा या छोट्याशा गावातला तरुण,पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेला. खरे तर त्याला सैन्यात जायचे होते पण त्याची उंची अपुरी पडली आणि त्याची सैन्यात निवड झाली नाही पण रवीच्या मनाची भरारी गगनचुंबी होती. त्याला समाजासाठी काही करायचे होते, चिमण्या कावळ्याच्या स्क्वेअर फुटी संसारात त्याला रस नव्हता. त्याच्या धोंडी हिप्परगा गावात एका दहा-अकरा वर्षाच्या लहानग्याचा मृत्यू झाला. त्याच्या प्रेताला कोणीही हात लावायला तयार नव्हते. रवीला ही गोष्ट कळली. तो आणि त्याच्या काही मित्रांनी त्या लहानग्याला माणूसकीला शोभेल असा अखेरचा निरोप द्यावयाचे ठरविले. रवी सांगतो,'मी त्या लेकराचे प्रेत हातात घेतले तेव्हा त्या इवल्या देहाला किड्यामुंग्या लागल्या होत्या. वाटले, जो समाज मरणानंतरही या एच आय व्ही बाधित लेकरांना अशा प्रकारे वागवितो तो त्यांचे जिवंतपणी काय करत असेल ?' रवीचा तिथेच निर्णय झाला आता आपले आयुष्य या लेकरांसाठी वेचायचे. २००७ मध्ये त्याने औसा लातूर जवळच्या माळरानावर 'सेवालय' सुरु केले. आज त्याच्या जवळ अशी ४२ एच आय व्ही बाधीत मुले आहेत.या मुलांचे पूर्ण संगोपन 'सेवालय' मोफत करते,कोणत्याही शासकिय मदतीशिवाय! गावातल्या शाळेत 'सेवालय'च्या एच आय व्ही बाधीत मुलांना प्रवेश दिला म्ह्णून आम्ही आमची मुले शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका गावक-यांनी घेतली पण रवीने हार मानली नाही. सा-या प्रस्थापितांना तोंड देत त्याने आपल्या लेकरांचा ('माझी लेकरं' हा खास रवीचा शब्द !) शिक्षणाचा हक्क मिळविला. गेल्या वर्षी 'सेवालया'ची पहिली मुलगी दहावी झाली आणि तिला पुढील शिक्षणासाठी लातूरला येणे भाग पडले कारण गावात फक्त दहावी पर्यंतची शाळा! पण त्या मुलीला कोणत्याही खाजगी वसतिगृहात ती एच आय व्ही बाधित असल्याने प्रवेश मिळेना आणि ती मुलगी खुल्या प्रवर्गातील असल्याने तिला शासकिय वसतीगृहातही प्रवेश मिळेना. लातूर विभागाचे समाजकल्याण सहायक आयुक्त श्री दाणे यांच्या सहकार्याने अखेरीस या मुलीला वसतिगॄह मिळाले खरे पण रवी समोर नवीन प्रश्न निर्माण झाला. पुढील वर्षी सेवालयातील तीन लेकरं दहावी होताहेत,त्यांचे काय? आणि मग त्याने समाज कल्याण विभागाला शासकिय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधे एच आय व्ही बाधित मुलांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवाव्यात ,असा एक प्रस्ताव सादर केला. समाज कल्याण विभागाने या प्रस्तावाची मनःपूर्वक दखल घेतली. या प्रस्तावाच्या सर्व बाजू तपासून लवकरच असा शासन निर्णय घेतला जाईल. रवी आणि त्याच्या लेकरांचा हा एक मोठा विजय आहे.                              मला मॅजिक जॉन्सन या अमेरिकन बास्केटबॉलपटूची आठव्ण झाली. जॉन्सन हा १९९२ साली ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अमेरिकन संघाचा मुख्य खेळाडू. पण १९९१ साली त्याला एच आय व्ही ची बाधा झाली. 'वाळीत टाकणे' या दुष्ट शब्दाचा जीवनानुभव त्याने घेतला पण तो उमेद हरला नाही. १९९६ साली तो मैदानावर परत उतरला. वयाच्या ३६ व्या वर्षीदेखील या एच आय व्ही बाधीत खेळाडूने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले. 'जगातील सर्वात्कॄष्ट पन्नास खेळाडू'त त्याची गणना झाली. आपल्या निवृत्तीनंतर आज जॉन्सन अमेरिकेतला एक मान्यवर उद्योगपती आहे. 'अत्यंत प्रभावी कृष्णवर्णीय उद्योगपती' असा किताबही त्याला नुकताच मिळाला आहे. म्हणजे एच आय व्ही ची बाधा झाल्यानंतरही गेली २२ वर्षे स्वतःसाठी आणि समाजासाठी देखील अत्यंत फलदायी आयुष्य जॉन्सन जगतो आहे. मागे मी मॅजिक जॉन्सनचे उदाहरण देत एक लेख लिहला होता. एच आय व्ही बाधित व्यक्तींशी आपण माणुसकीने,आत्मीयतेने,प्रेमाने वागले पाहिजे, हा माझ्या लेखाचा सारांश होता. या माझ्या लेखावर मला खूप पत्रे आली. ब-याच जणांनी माझी खरडपट्टी काढली होती. ज्यांना एच आय व्ही झाला ते सर्व त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा भोगताहेत आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची काहीही गरज नाही, असा एकूण या पत्रांचा आशय होता. जणू काही ज्यांना एच आय व्ही झाला नाही, त्यांनी कधी आयुष्यात चुकाच केल्या नव्हत्या. एका पापी (?) स्त्रीला भर चौकात दगडाने मारणारे लोक आणि 'ज्यांनी आयुष्यात एकही पाप केले नसेल त्याने पहिला दगड मारावा,' असे सांगणारा येशू मला आठवला.
  जागतिकीकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रही मार्केटच्या विळख्यात सापडले नसेल तरच नवल ! अशा बाजारकेंद्री आरोग्य व्यवस्थेत सारा भर असतो तो 'क्युअर' (Cure) वर पण अशा वातावरणात रुग्ण व्यवस्थापनात क्युअर इतकेच 'केअर' (Care) लाही महत्व आहे, हे आपल्याला एच आय व्ही /एडसने शिकविले. आणि केअर मध्ये वैद्यकिय व्यावसायिकांपेक्षाही अधिक वाटा असतो तो कुटुंबाचा,समाजाचा ! शुश्रुषा काय चमत्कार घडवू शकते, हे आपल्याला 'लेडी विथ द लॅंप' फ्लॉरेन्स नाईटिंगेलने समजावले पण आपण केवळ पाठांतर वीर, आपण कोणतीही ओवी अनुभवत का नाही ?
   १९८६ साली भारतातला पहिला एच आय व्ही रुग्ण आढळला,आज त्याला पंचविस वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे तरीही आपले एच आय. व्ही बद्दलचे गैरसमज तसेच आहेत. आजही एच आय व्ही रुग्णांकरिता शाळा, वसतिगृहात राखीव जागा ठेवण्याची वेळ यावी, ही गोष्ट संस्कृतीच्या गप्पा मारणा-या आपल्या देशाला आणि महान संत परंपरा सांगणा-या महाराष्ट्राला भूषणावह नाही. एखादा आजार आपली प्रतिकार शक्ती हिरावून घेतो, इथवर ठीक आहे पण त्याने जर आपले माणूसपणही हिरावून घेतले तर काय करावे?
   असे का होते? बरं हे केवळ एच आय व्ही बद्दलच होते अशातला भाग नाही. १९९४ मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा मी पाहिले आहे, माझे काही डॉक्टर मित्र पेशंटला हात लावायलाही तयार नव्हते. 'काखेत गाठ आली आहे', असे म्हणत पेशंट आला की यांच्या पोटात भितीचा गोळा येई. फार लांबचे कशाला, अगदी २-३ वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ आली तेव्हा त्यात पल्लवी नावाच्या एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. सालाने शेतावर काम करणा-या मजूराची मुलगी . बापाच्या काळजावर मुलीच्या मृत्यूचा घाव बसलेला पण गावक-यांनी त्याला त्याच्या कुटुंबासह गावातून हाकलून दिले. का तर तुझ्या घरामुळे आमच्या गावात स्वाइन फ्ल्यूची साथ पसरायला नको.
   जगण्याच्या अपरिमित हव्यासापायी आपले माणूसपणच हरविलेली ही माणसं जगतात तरी कशापायी? आणि मग १८९६ च्या पुण्याच्या प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा शुश्रुषा करता करता मरण पावलेल्या सावित्रीबाई फुले आठवतात. कोणत्याही जिवाणू विषाणूने आपले माणूसपण संपविता कामा नये, हा ही धडा आपण या पहिल्या स्त्री शिक्षिकेकडून घ्यायला हवा. 'विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म l भेदाभेद भ्रम अमंगळ ll ',असे म्हणणारा तुका आपण डोईवर घेऊन नाचतो खरे पण वागतो असे?
असे का, याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

No comments:

Post a Comment